aas maj balachi kadambari bhag 3 books and stories free download online pdf in Marathi

कंस मज बाळाची - भाग ३

'आसं मज बाळाची भाग ३

मागील भागावरून पुढे...


वैभवनी उत्तरादाखल फक्त हं असा हुंकार दिला.कारण इथे अनघाला वैभवन काही बोलावं हे अपेक्षितच नव्हतं. अनघाला फक्त ही गोष्ट त्याला सांगायची होती. वैभव हे जाणून होता म्हणून डोळे मिटून बसला होता.आज दहा वर्षं झाली वैभव अनघाला ओळखत होता. तिच्या स्वभावानुसार आपण कधी उत्तर द्यायचं कधी फक्त हुंकारच द्यायचा हे तो जाणून होता. म्हणूनच आत्ता तो काही बोलला नाही. तसाही खूप दु:खाच्या प्रसंगात कोणालाच चर्चा आवडत नाही तर स्पर्शातून, चेह-यावरून, डोळ्यातून सांत्वना हवी असते.



दु:ख झेलणाराच बोलत असतो. त्यालाच बोलू द्यावं.आपण फक्त श्रोत्याची भूमिका करावी. बोलणारा भडभडून बोलतो आणि तणावमुक्त होतो. हे त्यानी कुठंतरी वाचलं होतं. ते आज त्याला आठवलं. म्हणून तो संयम बाळगून अनघाशी वागत होता.



या सगळ्या धामधुमीत सकाळचा चहा राहिला होता वैभव चहा करण्यासाठी आत गेला चहा करायला खरं तर खूप वेळ लागत नाही पण आज चहा करता करता त्याची मधेच कुठेतरी तंद्री लागत होती इतका जरी तो हळवा नसला तरी काही प्रमाणात होता तो खरं तर तिला सावरताना थकला होता उद्या रिपोर्ट मध्ये काय येईल ही विचित्र धडधड त्याच्या मनात चालू होती.


त्या आवाजाने वैभव दचकून भानावर आला आणि चहावर झाकण ठेवताच वैभवच्या डोक्यात विचारांची गाडी पुन्हा सुरू झाली. लगेच वैभवच्या लक्षात आलं आपण ठाम राहायला हवं डोळ्यातलं पाणी पुसून वैभवनी सगळा चेहेरा पाण्याने धुतला आणि काहीच घडलं नाही अशा अविर्भावात चहा आणि बिस्कीटे घेऊन आला आणि अनघाजवळ गेला.



"मॅडम गरम गरम चहा हाजीर है."


असं त्यानी नाटकी सुरात म्हटलं. अनघाने डोळे उघडले वैभवचा एकूण अविर्भाव बघून तिला हसू आलं. ती उठून म्हणाली



"बडे अच्छे वेटर बनके आये हो?"


त्यांचं नाटकी हेल काढून बोलण्याची पद्धत बघून तीही हसत-हसत बोलली. वैभव म्हणाला,



"तू हसलीस खूप छान वाटलं. तू चार दिवसानंतर हसतेस अनघा. घे चहा बिस्कीट आणि केक."


अनघालाही ते जाणवलं एवढ्यात आपण हसायलाच विसरून गेलो. असं करून नाही चालणार वैभवला किती त्रास होत असेल माझ्या अशा वागण्याचा.



'मी स्वतःला सावरायला हवं. मी शारीरीक त्रास सहन करतेय पण वैभवपण मनातून दु:खी असेलच आणि वरून आपल्याला त्रास होवू नाही म्हणून आपल्यालाही सांभाळतोय. आजपासून हे थांबवायचं. आपण शांतपणे सगळ्या तपासण्यांना सामोरं जायचं. तिने रोजच्यासारखी सहजपणे चहा-बिस्कीट घेतली. वैभवकडे बघून छानसं हसली. वैभावलाही बरं वाटलं.

चहा झाल्यावर ती नेहमीसारखी स्वयंपाक घरात गेली. ते बघितल्यावर वैभवला जरा हायसं वाटलं.


"मी आज ऑफिसला गेलो तर चालेल ना?" वैभवने विचारलं. स्वयंपाक करता-करता अनघा उत्तरली,


"जा तू ऑफिसला मी घरी स्वतःला त्रास करून घेणार नाही. ऑफिसमधून येतायेताच सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन ये.


"हो तसंच करतो तू तयार राहा मी घरी आल्यावर आपण डॉक्टरांकडे जाऊ."वैभव म्हणाला.


"मी आठवण करू का दुपारी तुला?" असं अनघानी विचारताच वैभव म्हणाला.


";नको मी आणीन आठवणीनी." तो ऑफीसला जाण्याची तयारी करू लागला.



अनघाने रमत-गमत आपली आवडती गाणी ऐकत स्वयंपाक केला. वैभव तयार होता-होता अनाघानी त्याचा डबापण रोजच्यासारखा तयार केला. डबा तयार असल्याचं बघताच वैभव निवांत झाला. आज आपण ऑफीसला गेलं तरी चालणार आहे. कालपेक्षा आज अनघा खूप सावरली होती.वैभवला मनातून खूप बरं वाटलं. आज तो ऑफीसमध्ये नीट काम करू शकेल. आपल्याच विचारात त्यांनी डबा घेतला. अनघाला टाटा केलं आणि तो खाली उतरला.



पार्किंगमध्ये लावलेली बाईक काढली, डोक्यावर हेल्मेट घातलं आणि बाईक चालू केली. तेव्हाच अचानक वैभवाच्या चेहे-यावर हसू आलं. त्याच्या ऑफीसमधला कलीग जयंत नक्की विचारेल,


"काय आहे आज? गडी एकदम खुश दिसतोय?"

जयंत शब्दांच्या पलीकडे जाऊन वैभवला ओळखतो. मित्र असावा तर असा. वैभव हसत गाडीवर बसला आणि ऑफीसच्या दिशेनी निर्धास्तपणे निघाला.



*****


वैभव आणि अनघा डॉक्टरांच्या केबिनमध्ये बसली होती. सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टर म्हणाले,


"मिसेस पांगारकर आपण तुमची हार्मोनल टेस्ट करून घेऊ."

सोनोग्राफीचा रिपोर्ट काय सांगतोय?"अनघानं विचारलं डॉक्टरांनी तिला समजेल अशा भाषेत समजावून सांगितलं


"मिसेस पांगारकर तुमच्या बीजांडकोशाचा आकार लहान झाल्या सारख वाटतोय.ते बहुदा काम करत नाहीत. त्याकरता आपल्याला तुमची हार्मोनल टेस्ट करावी लागेल. त्यातून नक्की कारण काय आहे ते कळेल तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा पेशंटसाठी या सगळ्या टेस्ट खूप जाचक असतात.पण पेशंटनी जर सकारात्मक विचार ठेवला तर चटकन चांगला रिझल्ट मीळतो. या सगळ्या तपासण्यांसाठी खूप वेळ लागतो.पण त्या कराव्याच लागतात. त्याला इलाज नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. सकारात्मक रहा. एक डॉक्टर म्हणून तुम्हाला विनंती करतो. मनावर दडपण ठेऊ नका. सकारात्मक विचार करा .चांगला रिझल्ट मिळेल."


अनघाच्या मनातल्या सगळ्या शंका डॉक्टरांच्या बोलण्यानी दूर झाल्या तरीही अनघानी विचारलं,


"डॉक्टर काही दोष दिसतोय का?" अनघाच्या मनाची होणारी घालमेल डॉ. समजू शकत होते.कारण ज्या स्त्रिया आपल्याला मुल व्हावं म्हणून त्यांच्याकडे उपचारासाठी येत त्या सगळ्या स्त्रीयांची मनस्थिती अनघासारखीच असते. हे त्यांना माहित होतं म्हणून अनघाच्या प्रश्नं विचारण्याचा त्यांना त्रास होत नव्हता.ते स्पष्ट पण शांतपणे म्हणाले,


"मी तुम्हाला काय सांगीतलं. एका तपासणी करून काम होत नाही. सोनोग्राफीमधून नक्की काय झालं आहे ते कळलं नाही म्हणुन आता आपण ब्लड टेस्ट करायची आहे."


डॉ.चं वाक्य पूर्ण व्हायच्या आताच अनघा बोलली


"तुम्ही तर हार्मोन्स टेस्ट म्हणालात?"डॉ. किंचित हसले.


वैभवला मात्र अनघाच्या सतत प्रश्नं विचारण्यानी डॉ. चिडतील की काय अशी भीती वाटत होती. पण डॉ. हस-या चेह-यांनी अनघाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते.


"हो हार्मोन्स टेस्टच करायची आहे पण ती ब्लड घेऊन करतात. तुम्ही अवंती लॅबमध्ये जा. कोणती टेस्ट करायची आहे ते लिहून देतो. तेवढी करा.रिपोर्ट आला की घेऊन या."


डॉक्टरांनी दोघांकडे बघून स्मीतहास्य केलं. दोघही त्यांच्या दवाखान्यातून बाहेर पडले.



";वैभव रोजचा दिवस माझ्या अंगावर कोसळतो.सहन होतं नाही."



वैभव बाईक आणे पर्यंत अनघा तिथेच थांबली होती. पुन्हा ती त्याच विचारात गुंतली. उद्या ब्लडटेस्ट केल्यावर काय निकाल येतो देव जाणे.


"अनघा डॉक्टर काय म्हणाले आत्ता सकारात्मक विचार करा. नको फार ताण घेऊ. चल बस गाडीवर. तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला.


वैभव आला तरी तिचं लक्ष नव्हतं.


"अनघा.." वैभवच्या हाक मारण्यानी ती दचकली.


"अनघा बस. पुन्हा विचर करायला लागली?"


"नाहीरे. पण हो ..विचार येतात मनात."


अनघा गाडीवर बसली आणि ते घराच्या दिशेनी निघाले.


***


आज ब्लड टेस्ट केली. रिपोर्ट संध्याकाळपर्यंत मिळेल. अनघानी ब्लड देऊन घरी आल्यावर उत्साह नसतांनाही स्वयंपाकघरात शिरण्याची तयारी दाखवली.वैभव तिची मन:स्थीती जाणून होता म्हणून तो म्हणालाही तिला,



" अग राहू दे डबा. तुझ्यासाठी जेवणाची ऑर्डर करतो. मी ऑफीसच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता करीन. मी आता आंघोळ करून तयारीला लागतो."


वैभव आंघोळीला गेला तशी अनघा चटकन उठली आणि स्वयंपाकघरात गेली. एका बाजूला बटाट्याच्या काच-या फोडणीस घालून दुसरीकडे पोहे केले. घाई-घाईत बटाट्याची भाजीच मदतीला येते. साधी आणि सोपी.


अनघाला हसू आलं कशाचं? बटाट्याच्या भाजीमुळे नाही तर मनुष्य किती प्रत्येक ठिकाणी कष्ट न घेता काम कसं होईल हे बघतो. आपल्या बाबतीतही हेच घडतंय नं! बाळ तर हव आहे पण पटकन. त्यासाठी एवढे दिवस थांबायची तयारी नाही. एवढ्या तपासण्या करणं म्हणजे कट–कट वाटते.


आई नेहमी म्हणते कोणतीही चांगली गोष्ट करताना अडथळे येतातच. सहज आपल्याला काहीच मिळत नसतं.थोडे कष्ट घ्यावेच लागतात.


आपण हे कष्ट घ्यायचे असं मनाशी ठरवत अनघा कामाला लागली.

_________________________

क्रमश: आसं मज बाळाची' भाग३

पुढे काय होतं? पुढच्या भागात वाचा.

लेखिका—मीनाक्षी वैद्य.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED