Kans Maj Balachi - 9 books and stories free download online pdf in Marathi

कंस मज बाळाची - भाग ९

आंस मज बाळाची भाग ९

मागील भागावरून पुढे…


आसं मज बाळाची भाग ९


संध्याकाळी ताई आणि मुकुंदराव डॉ. मेहतांच्या दवाखान्यात आले होते. आपला नंबर येईपर्यंत वाट बघत बसले होते. जवळपास अर्धा तास झाला होता त्यांना येऊन. एवढ्यात त्यांचं नाव पुकारल्या गेलं.


"ममता मुकुंदराव कोल्हटकर कोण आहे?" ममता गडबडीनं उभी राहिली आणि म्हणाली,


"मी आहे".


"आत जा." रीसेप्शानिस्ट बोलली. दोघाही आत गेले.


"नमस्कार डॉ. मी ममता कोल्हाटकर"


"नमस्कार बसा."डॉ. म्हणाले.


"डॉ. मी आपले पेशंट असलेल्या वैभव पांगारकर यांची मोठी बहीण. "


"अच्छा." डाॅक्टर बोलले.


"मी माझं बीजांड माझ्या वहिनीला द्यायला तयार आहे."


तिचं बोलण मधेच तोडत मुकुंदरावांनी बोलण्याची सूत्र आपल्याकडे घेतली.


"डॉ. ममताला तिचं बीजांड द्यायचं आहे पण हे मोठ ऑपारेशन आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला भेटायला आलो. मनात काही प्रश्न आहेत ते तुम्हालाच विचारवेत असं वाटलं."


" छान केलत तुम्ही आलात." डाॅक्टर म्हणाले.


"यात ममताला काही धोका नाही न? म्हणजे ऑपारेशन नंतर तिला काही दुसरा त्रास जडणार नाही न?"मुकूंद रावांनी विचारलं.


" नाही. असं काही होणार नाही. तुम्हाला बीपी, शूगर काही आहे का? "डाॅक्टरांनी विचारलं.


"नाही." ममता म्हणाली.


"मग तर काहीच प्रश्न नाही. या दोन गोष्टी असल्या तर जरा काळजी असते. पांगारकरांनी येऊन ऑपारेशन नक्की करायचं सांगितलं की मी लगेच पुढील तयारीला लागतो. तुमच्या काही टेस्ट करून घ्याव्या लागतील." डाॅक्टर


"आत्ता सांगताय का? कोणत्या टेस्ट करायच्या?" म्हणावे अधीरपणे विचारलं.


"येऊ द्या पांगारकरांना मग सांगतो."


" ठीक आहे. मग आम्ही निघू?"


" हो. आणि अजिबात काळजी करू नका. सकारात्मक रहा. तुमच्या वाहिनीलाही सकारात्मक राहण्यात मदत करा. मी त्यांना ऑपारेशन पूर्वी आणि बाळंतपण होईपर्यंत समुपदेशन करून घ्या असं म्हणालो होतो. कारण त्या मला हळव्या स्वभावाच्या वाटल्या."


" हो डॉ. ती थोडी हळवी आहे. ठीक आहे निघतो." नमस्कार करून दोघही मेहतांच्या दवाखान्यातून बाहेर पडले.


"घरी गेल्यावर वैभवाला फोन करून सांग उद्या लगेच डॉ. जाऊन भेट म्हणा. आता सगळ्या पाया-या पटापट चढल्या पाहिजे."मुकुंदराव म्हणाले.


ताई तर खूप उत्तेजित झालेली होती. कधी घरी जाते आणि वैभवाला फोन करते असं तिला झालं होतं. तेवढ्यात तिला माधवरावांचा फोन आला.


" हं बाबा आम्ही आत्ताच डॉ. कडून निघालो. उद्या वैभव त्यांना भेटला की ते मला काही टेस्ट करायच्या आहेत ते त्याला सांगतील. तुम्ही सहज फोन केला होता?"


"तुला तुझ्या आईचा फोन आला तर तिच्याशी वाद न घालता सरळ फोन ठेवून दे. नाहीतर घेऊच नकोस तिचा फोन."


"का? असं काय झाला?" ताईंनी विचारलं.


"अग ती वेड लागल्यासारखं बोलतेय. तुलाही काहीबाही बोलेल तर तुझी मन:स्थिती बिघडेल. आता हे ऑपरेशन होईपर्यंत तुझी आणि अनघाची मना:स्थिती उत्तम राह्यला हवी. आताच माझं आणि तिचं जरा झमकलं म्हणून जरा बाहेर देवळात येऊन बसलोय. सकाळीपण वाद झाला तेव्हाही इथेच येऊन बसलो होतो."


" बाबा तुम्ही काळजी करू नका. आईचा फोन आलाच तर मी काय बोलायचं ते बोलीन. ठेवू का. निघतो आम्ही घरी जायला. तुम्हीपण शांतपणे जा. संध्याकाळ आहे. संध्याकाळ कसली रात्रच झाली आहे रस्ता सावकाश ओलांडून जा."


मुकुंदरावांना तसा थोडा अंदाज आला होता. घरी जाऊन सविस्तर ममताला विचारू असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी आत्ता ममताला काही न विचारता बाईक सुरु केली. ताई बाईकवर बसता-बसता पुटपुटली ही


"आईपण एक कोडंच आहे. काय मिळतं असं विचित्र वागून तिला कुणास ठाऊक? "


"काय ग काही म्हणालीस का?"मुकुंदरावांनी मागं वळून ताईला विचारल.


" काही नाही. घरी गेल्यावर सांगीन"


दोघं घरी जायला निघाले घरी पोहोचताच ताईनी वैभवला फोन लावला.


ताईंनी वैभवला फोनवर डॉ. काय म्हणाले ते सांगितलं. आईबद्दल बाबा काय म्हणाले तेही सांगितल. वरून ती हेही म्हणाली


'वैभव अनघाला यातील काही सांगू नको. तिला कुठलाही ताण आपल्याला आता द्यायचा नाही. ऑपरेशन ते बाळंतपण होईपर्यंत ती कधी ताणाखाली असणार नाही याची आपणच काळजी घायायाची आहे. विशेषत: तू. कळलं?"


"हो. कळलं. ताई मी सगळं करायला तयार आहे. मलापण बाळ हवाय ग. मी मित्रांकडे बघतो न किती उत्साहात बोलतात आपल्या मुलांबद्दल. तेव्हा मला त्यांचा हेवा वाटतो. मलाही बाबा व्हायचंय ग. "


हे बोलतांना वैभवचा आवाज भरून आला. ताईच्या हे लक्षात आलं. ती लगेच म्हणाली


"वैभव काळजी करू नको. तू नक्की बाबा होणार. आपण सगळे प्रयत्न करतो आहोत. डॉ. मेहता म्हणाले तसं अनघाला समुपदेशकाकडे घेऊन जा. आजपण डॉ. मला म्हणाले की तुमची वाहिनी हळवी आहे. तिला या पूर्ण काळात समुपदेशनाची गरज लागेल."


" हो उद्या दवाखान्यात गेलो की त्या समुपदेशकांचा नंबर घेतो. ठेवतो.अनघाला सांगतो."


वैभवनी अनघाला ताई काय म्हणाली ते सांगितलं.


"उद्या सकाळीच आपण जाऊ डॉ.कडे मी उद्या सुट्टी घेतो." अनघाचा चेहरा आनंदानी फुलला. तिचा चेहरा बघून वैभवही खूष झाला. तो फक्त तिच्याचकडे बघत राहिला. आणि अनघा ती बाळाच्याच विचारात गुंतली होती आणि तिच्या चेह-यावर हसू होतं.


***अनघाचंऑपरेशन होऊन दहा बारा दिवस लोटले होते. अनघा आणि ताई दोघींनाही चांगला आराम मिळावा म्हणून दोघींच्या घरचे प्रयत्न करत होते. अनघाचे आई-बाबा आले होते. आता ते काही दिवस राहणार होते.अनघा आता हिंडूफिरू लागली होती. वैभव तिला काल संध्याकाळी डाॅ.मेहतांनी सांगीतलेल्या समुपदेशकाकडे घेऊन गेला होता.


ऑपरेशनच्या आधीपण अनघाचे त्यांच्याकडे दोन सिटींग्ज झाले होते.काल पुन्हा त्यांचं एक सिटींग झालं.त्यांनी काही गोष्टी सांगीतल्या.ज्यानी तिचं मन सतत प्रसन्न राहील. आता तिला जेव्हा दिवस राहतील तेव्हा यायला सांगीतलं. अनघाला पेंटींग करायला आवडायचं. वैभव तिला म्हणाला


"घरातली जास्तीची कामं काढण्यापेक्षा फावल्या वेळात तू पेंटींग कर.तुला आवडतं नं.त्यानी मॅडम म्हणाल्या तसं तुझं मन प्रसन्न राहील."


अनघाला ही वैभवचं म्हणणं पटलं.आता रोजचा दिवस ऊजाडायचा तो बाळाची चाहूल घेतच. अनघा प्रसन्न कशी राहील याकडे वैभवचं लक्ष असायचं. अनघाच्या आई-बाबांना एवढ्या आधीपासून अनघाकडे येऊन राहणं जमणार नव्हतं.


अनघाचा भाऊ आमोद आणि त्याची बायको स्वाती दोघंही नोकरी करत.त्यामुळे त्यांच्या लहान मुलाला हर्षला बघावं लागतं असे.अनघाला दिवस राहील्या नंतर लगेच गरज वाटली तर ते येणार होते.अनघानी पेंटींग करणं सुरू केलं होतं.आता ती प्रत्येक काम खुप ऊत्साहानी करायला लागली होती. कधी कधी तिच्या मनात नकारात्मक विचार यायचे पण समुपदेशकानी सांगीतल्याप्रमाणे ते विचार ती मनातून लगेच काढून टाकत असे.


आता तिचा फोकस फक्त बाळावर होता म्हणून सतत ती स्वतःच समुपदेशकानी सांगीतल्याप्रमाणे वागत होती.हळूहळू दिवस सरत होते.वैभव आणि अनघा रोज आनंदानी सगळी कामं करत असत.पण मनात कुठेतरी सतत बाळाची वाट बघणं चालू असायचं. ताई मधून मधून फोन करायची, कधी घरी पण यायची. मध्येच वैभव अनघा आणि ताईकडचे सगळे मिळून छान अंगतपंगत करायचे.रात्री पत्याचा डाव रंगायचा,काॅफी व्हायची. काॅफी निनाद छान करायचा त्यामुळे काॅफीचं काॅंट्रॅक्ट निनादकडेच असायचं.


अनघाला मधूनच भिती वाटायची. आपण ऑपरेशन तर केलं पण आपल्याला नक्की बाळं होईल नं! क्षणभरच असा विचार तिच्या मनात यायचा पण लगेच ती सावध व्हायची. नाही असा विचार पुन्हा मनात आणायचा नाही.आपल्याला बाळ नक्की होणार.


अनघा आता जाणीवपूर्वक सकारात्मक वृत्तीनी वागत होती.

तिच्याकडे वैभवचं बारीक लक्ष असायचं.तिचं वागणं बघून वैभव थोडा निर्धास्त झाला.


आता दोघंही बाळाची वाट बघू लागले.
अनघाची अशी मन:स्थिती होणं स्वाभाविक होतं. कारण तब्बल दहा वर्षांनी तिला गोड बातमी कळणार होती. म्हणून मधेमधे असा विचार तिच्या मनात यायचा.


आजही कॅनव्हाॅसवर रंगाचे फटकारे मारताना असंच काहीतरी मनात येत होतं.फोनच्या आवाजांनी तिची तंद्री भंगली. तिनी फोन घेतला.तिच्या आईचा फोन होता.


"बोल आई.सहज केलास नं फोन?"


"हो सहजच केला.तुझी मधून मधून विचारपूस करावी असं आम्ही दोघांनी ठरवलं आहे. कधी तुझे बाबा बोलतील तर कधी मी. काय करते आहेस?"


"सध्या पेंटींगचा नाद लागलाय. वैभव म्हणाला तुला आवडतं ते कर. पेंटींग आवडतं तर ते कर. जरा प्रसन्न राहशील.म्हणून सुरू केलंय."


"छान झालं.वैभव,ताई,तुझे सासरे सगळे तुझी काळजी घेतात म्हणून आम्हाला ताण येत नाही. तुझ्या सासूचे काय बिनसलंय कळत नाही."


"जाऊ दे.मला सगळ्यांनी ताकीद दिली आहे की त्यांच्या बोलण्याकडे अजीबात लक्ष द्यायचं नाही. मनावर कुठलाही ताण घ्यायचा नाही. डाॅ.नीपण सांगीतलं आहे जितकं तुम्हाला प्रसन्न राहता येईल तेवढं रहा म्हणजे गोड बातमी लवकर कळेल."


"बरोबर आहे त्यांच़ म्हणणं.चल ठेवते आमचे राजकुमार शाळेतून यायची वेळ झाली. ठेवते. काळजी घे. काळजी करू नको."


"हो आई."अनघाने फोन बंद केला आणि पुन्हा पेंटींग करू लागली.


****ऑपरेशन होऊन दोन महिने होत आले होते.


एक दिवस अचानक अनघाच्या लक्षात आलं की महिना झाला आपली पाळी आली नाही.यावेळी अनघा मागच्या वेळसारखी उत्तेजीत झाली नाही.तो अनुभव गाठीशी होता म्हणून ती शांतपणे वैभवला म्हणाली,


"वैभव महिना झाला आज. मला पाळी आली नाही. डाॅ. कडे जाण्याअगोदर टेस्ट करून बघू."


हे ऐकल्यावर वैभव पण आनंदी झाला.तरी मागच्या वेळेचा अनुभव गाठीशी असल्याने तोही उत्तेजीत न होता अनघा सारखाच शांत होता.


प्रेगा न्यूज आणुन त्यावर अनघानी टेस्ट केली ती पाॅझीटिव्ह आल्यावर अनघाला शरीरावर आणि मनावर अलगद मोरपीस फिरल्यासारखं वाटलं. तिनी लगेच वैभवला हाक मारून सांगीतलं. तोही खूष झाला.अनघाच्या,त्यांच्या आई-बाबांना, ताईला ही बातमी सांगीतले सगळे खूष झाले. वैभव अनघा तर आनंदाच्या परमोच्च बिंदूवर होते. आज संध्याकाळी डाॅ.कडे जायचं होतं.


***डाॅ.मेहतांकडे दोघंही संध्याकाळी गेले. डाॅ.च्या चेह-यावर पण आनंद होता.ते म्हणाले


"आता काही दिवस खूप धावपळ करायची नाही.वजन ऊचलायचं नाही. पहिले तीन महिने नीट काळजी घ्यावी लागते.कारण गर्भ तिनं महिन्याच्या कालावधीत नीट रूजतो. म्हणून धावपळ करायची नाही. काही कामं पडून राहीलीत तर राहू द्या.आहाराकडे नीट लक्ष द्या.मी तुम्हाला आहारतज्ञाचं नाव लिहून देतो. त्यांच्याकडून आहार लिहून घ्या.समुपदेशकाकडेही जात रहा कारण खूप वर्षांनी तुमच्याकडे ही बातमी आलीय त्यामुळे योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप घ्यायची आणि नियमीतपणे मी सांगीतलेल्या तारखेला तपासणीला यायचं.कळलं?"


"हो.मी सगळी काळजी घेईन."


अनघाला बोलतानाही जाणवत होतं की आपण अंतर्बाह्य मोहरून गेलो आहे. वैभवची अवस्था तिच्याहून फार वेगळी नव्हती.


दोघंही आनंदाच्या हिंदोळ्यावर झोका घेत होते.


दोघांच्याही मनात आलं आता फक्त काही महिने वाट‌ बघायची आहे त्या इवल्याशा बाळाला बघण्यासाठी.


या दिवसात खूप काळजी घ्यायची हे वैभव अनघाला वारंवार सांगत होता. त्या आनंदातच त्याने जयंतला ही गुडन्यूज सांगण्यासाठी फोन लावला.

-------------------------------------------------------------

क्रमशः आंस मज बाळाची भाग९


पुढे काय झालं? वाचा पुढील भागात.

लेखिका... मीनाक्षी वैद्य


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED