Kans Maj Balachi - 10 - last part books and stories free download online pdf in Marathi

कंस मज बाळाची - भाग १० (अंतिम भाग)

आसं मज बाळाची भाग १०

मागील भागावरून पुढे...


अनघाच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमासाठी माधवराव आणि मालतीबाई म्हणजेच वैभवाचे आईवडील आले होते.


माधवरावांनी या संपूर्ण कार्यक्रमात फक्त मालतीबाई कडेच लक्ष देण्याचं काम केलं कारण त्यांना आपल्या बायकोच्या कुचकट स्वभावामुळे तिच्यावर विश्वास नव्हता. मालतीबाईंना ते क्षणभर दृष्टीआड होऊ देत नव्हते.एकदा मालतीबाईनी विचारलही"काय तुम्ही सारखे माझ्या मागे मागे करतात? असं करत नाही तुम्ही कधी?"


"हो मी नेहमी असं करत नाही पण आज खूप आनंदाचा दिवस आहे. कुठे आनंद दिसला की त्याच्यावर विरजण कसं घालता येईल याचाच विचार तू करत असते.म्हणून मला तुझ्यावर लक्ष ठेवावं लागतंय."


माधवरावांच्या या बोलण्यावर मालतीबाईं रागानी नाकाचा शेंडा उडवून तरतर चालत सोफ्यावर जाऊन बसल्या. शांतपणे माधवरावही त्यांच्या शेजारी जाऊन बसले.डोहाळजेवण आनंदात पार पडलं. रात्री सगळा कार्यक्रम आटोपता आटोपता अकरा वाजत आले होते. घरी आल्यावर अनघा अगदी दमून गेली होती.आनंदाची बरसात झाली होती आज तिच्यावर.सगळ्यांचं आनंदाचं बोलणं,वैभवचा ताईचा आनंदी चेहरा बघून तिलाही खूप आनंद झाला. दमलेली अनघा कशीबशी आपलं पोट सावरत सोफ्यावर बसली.


"दमलीस तू आता जाऊन झोप.ऊद्या सकाळी उठायची घाई करु नकोस."ताई म्हणाली.तशी अनघा सोफ्यावरुन कशीबशी उठली. त्या फोमच्या सोफ्यावरून उठतांना वैभवी तिला पकडलं आणि अलगद उभं केलं आणि तिला आत घेऊन गेला.


"एवढं काय झालंय थकायला.सगळी सोंग नुसती." मालतीबाई रागाने बोलल्या.


माधवरावांनी मालतीबाईंकडे जळजळीत नजरेनी बघीतले.त्यावर ऊसळुन मालतीबाई म्हणाल्या


"मी चुकीचं काय बोलले? आम्ही नाही राह्यलो का कधी गरोदर? गरोदर असूनही कामाचा डोंगर उपसत होते .या एवढ्याश्या डोहाळजेवणानी ही दमली. सगळी नाटकं नुसती."


यावर माधवराव म्हणाले


"आजचा कार्यक्रम संपला. आपण ऊद्या सकाळीच इथून निघायचं.आपल्याला मानानी बोलावलंय वैभवनी हे विसरू नको.आज रात्रभर तोंड गप्प ठेवायचं.घरी गेलो की किती फुत्कार मारायचे ते मार."


माधवराव खुप चिडून बोलत होते.


***


"बाबा अगदी लगेच ऊद्या का जाताय,? थांबा एकदोन दिवस."


"वैभव तुला तुझ्या आईचा स्वभाव माहिती आहे नं. आता आग्रह नको करुस खूप छान झाला कार्यक्रम. अनघाचा आणि तुझा आनंदी चेहरा बघून खूप आनंद झाला मला. या आनंदावर विरजण पडू नये असं तुला वाटतं असेल तर ऊद्या आम्हाला निघू दे.थांबण्याचा आग्रह करू नकोस. कळलं नं बेटा."


वैभवनी मान हलवली.आईच्या स्वभावामुळे ते लवकर जातात आहे नाहीतर ते नक्की थांबले असते. डोहाळजेवण सूद्धा तुझ्याकडे होऊ दे असं बाबांनी स्पष्ट सांगीतलं होतं ते ही आईच्या स्वभावामुळेच.वैभवलाही आता कोणताही धोका पत्करायचा नव्हता.कळतं असूनही वैभव खिन्न झाला.


"चल बेटा झोप आता. तूपण खूप दमलास. मी संध्याकाळी फिरायला जातो त्यावेळी तुला फोन करत जाईन. तुझ्या आईसमोर तुमच्या आयुष्यातील आनंदाच्या घडामोडी मला ऐकायच्या नाही.कारण मला त्यातील निखळ आनंद घेता येणार नाही.कळलं नं तुला मी का म्हणतोय हे?"


" हो" वैभव म्हणाला. माधवरावांनी त्याचा खांदा थोपटला आणि झोपायला गेले.


वैभवपण झोपायला गेला.आत गेल्यावर त्याला दिसलं अनघा गाढ झोपली होती.


****


अनघाचे दिवस भरत आले होते. तिच्या डोहाळजेवणाच्या वेळी तिचे आई बाबा आले होते. आई नंतर राहीली बाबा मात्र नागपूरला गेलेत कारण त्यांच्या नातवाला हर्षला सांभाळायची त्यांच्यावर जबाबदारी होती.खरतर त्यांना राहण्याची इच्छा होती. इतक्या वर्षांनंतर त्यांच्या मुलीच्या घरी गोड बातमी होती.तिचा आनंदी चेहरा, बाळाची वाट बघत तिची चालु असलेली बडबड ऐकताना त्यांना खूप मजा वाटायची.पण शेवटी मुलाची सुद्धा मदत करायला हवी होती. ते नसले तर सुनेची खूप धावपळ होईल हे ते जाणून होते.म्हणून ते मुलगा आणि सूनेबरोबरच नागपूरला परत गेले.


अनघाकडे आता तिच्या आईचं आणि वैभवचं बारिक लक्ष असायचं. थोडा जरी त्रास होतोय असं वाटलं तर लगेच तो दूर करण्याची धडपड करायचे. अनघाचे डोहाळे पुरवण्यात अनघाची आई कुठेही कमी पडत नव्हती.अनघानी मला हे हवं म्हटलं की लगेच तो पदार्थ आई करायची आणि अनघाला तृप्त करायची.


त्यांनासुद्धा तिचे डोहाळे पुरवताना आनंद व्हायचा. रोज संध्याकाळी आई तिला सोसायटीत पाय मोकळे करायला घेऊन जायची. सोसायटीतच गणपतीचं मंदीर होतं. तिथे थोड्यावेळ दोघी बसायच्या.समोरच्या लाॅनवर खेळणा-या लहान मुलांकडे अनघा कौतुकाची बघायची. हळुहळू दिवस पुढे सरकत होते. त्या दिवशी अनघा सकाळी उठली तेच मुळी सुस्तावलेली वाटतं होती. आईच्या लक्षात आलं. त्या वैभवला म्हणाल्या


"मला वाटतंय आज ऊद्याकडे हिला दवाखान्यात न्यावं लागेल.आज तू अर्धा दिवस सुट्टी घेऊन घरी ये. ऊद्या सकाळी तिला कसं वाटतंय बघू."


"आई ती फारच गळल्यासारखी वाटतेय.मी तिला हाका मारल्या जागीच होती पण काही बोलली नाही." वैभव म्हणाला.


" हो माझ्या लक्षात आलं ते.तिला बारीक कळा येतात आहे. दुपारपर्यंत वाढल्या तर घेऊन जावं लागेल .म्हणून अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकून ये." आई म्हणाली.


" ठीक आहे.येतो तसा लवकर.मी यायच्या आधी तिला जास्त त्रास व्हायला लागला तर लगेच फोन करा."


" हो ते करणारच.तू तयार हो तुझा डबा तयार झालाय नाश्ता ही तयार आहे."


" हो मी आवरतो आता." वैभव ऑफीसला जायची तयारी करू लागला.अनघा अंथरूणातच लोळली होती. तिला झोप येत नव्हती पण ऊठुन काही करावसही वाटतं नव्हतं.पोटात बारीक कळा येत होत्या पण खूपखूप वेळानंतर येत होत्या. त्यामुळे तिला धड झोपही लागत नव्हती. वैभव तयार होता होता तिला म्हणाला


" अनघा मी आज अर्धा दिवस सुट्टी घेऊन येतोय.तुला मी यायच्या आधी जास्त त्रास व्हायला लागला तर फोन कर."


अंनघानी काहीच उत्तर दिलं नाही तेव्हा वैभव तिच्याजवळ गेला आणि तिच्या बाजूला बसला. .हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. अनघानी हळूच डोळे उघडले.


"कायग फार त्रास होतो आहे का? मी जाऊ नं ऑफीसला." वैभवने विचारलं.


अनघानी होकारार्थी मान हलवली. आणि हलकंसं हसली. तिला कळा येत असल्यामुळे त्रास होत होता पण त्यात आनंदही होता.याच त्रासाची आनंदाची तिचं मन इतकी वर्ष आतुरतेनी वाट बघत होतं.


"अनघा थोड्या वेळानी डाॅक्टरांना फोन करुन विचार ते जर दवाखान्यात या म्हणाले तर लगेच मला फोन कर मी येईन मग घेऊन जाईन डाॅ.कडे." एवढं बोलून वैभव उठला आणि खोलीबाहेर गेला.


आई होणं म्हणजे सोपं काम नाही. आई होणा-या स्त्रीचा पुर्नजन्मच असतो.येणा-या कळा किती वेळ, नव्हे किती तास सहन करायच्या आहेत हे त्या स्त्रीला माहित नसतं. तिच्या एका डोळ्यात बाळ येणार आपल्या आयुष्यात यांचा आनंद असतो तर दुस-या डोळ्यात पोटात येणा-या कळांमुळे त्रास दिसतो. आपल्या शरीरातील ,मनातील सगळी शक्ती ती पणाला लावत असते. तिच्या आयुष्यात हा काळ म्हणजे एक यज्ञच असतो. तिच्याकडून घडणारं एक सुंदर कर्म. या कर्माहून दुसरं कोणतंही कर्म इतकं आनंदी आणि तेजोवलयांकीत नसेल.


नऊ महिने ती किती काळजी घेते आपल्या पोटात वाढणा-या बाळाची.ती तेव्हापासून आई झालेलीच असते.बाळंतपणानंतर ती आई म्हणून मानानी मिरवते. अनघा आताही बाळाची स्वप्नं डोळ्यात सजवत होती.


संध्याकाळी तिला खूप कळा येणं सुरू झाल्या.वैभव दुपारीच घरी आला होता.


आईंची अटकळ खरी ठरली होती.अनघाची परीस्थिती बघून वैभवनी डाॅ.ना फोन करून तिची परीस्थिती सांगीतली. डाॅ.नी तिला येणा-या कळा किती वेळानी येतात आहे हे विचारलं.अनघाला सकाळपेक्षा आता एक मिनीटाच्या अंतरानी कळा येत होत्या आणि त्या बराच वेळ राहत होत्या. त्याचा त्रास आता तिला सहन होत नव्हता. डाॅ.म्हणाले तिला दवाखान्यात घेऊन या.


वैभवनी लगेच अनघाला दवाखान्यात नेण्याची तयारी केली.ताईला लगेच फोन करून कळलं. अनघाला त्याने अलगद पकडून हळुहळू चालवत लिफ्टपाशी आणलं.चालता चालता मध्येच कळ आली की ती थांबून त्या सहन करत होती.तिचं सगळं अंग थरथरत होतं. कसंबसं तिला खाली आणलं.आई खाली तिला पकडूनच उभी होती.


वैभवनी पार्किंगमधून कार काढून त्यांच्याजवळ आणून उभी केली.तो कारमधून उतरला.कारचं मागचं दार ऊघडून अनघाला हळूच आत बसवलं. तेवढं बसतांनाही तिला त्रास झाला.आता तिच्या कळा आणखी जोरात यायला लागल्या होत्या. त्यामुळे तिला ओरडावसं वाटतं होतं. पण तू ओरडलीस तर तुझी एनर्जी कमी होईल तू आणखी थकशील हे आईनी तिला सांगीतलं होतं. त्यामुळे ती आरडाओरडा न करता कळा सहन करत होती.


ते तिघेही दवाखान्यात पोचले. अनघाला एका खोलीत ठेवले. ती खोली आधीच वैभवनी बुक करून ठेवली होती.तिला दवाखान्याचा ड्रेस घातल्या गेला. आता तिच्या कळा मधूनमधून नर्स येऊन तपासुन जात होत्या.अजून जोरात कळा यायला हव्यात अस़ त्या म्हणाल्या. वैभवलातर आताच अनघाची स्थिती बघवत नव्हती. आई अनघाच्या पलंगाजवळ खूर्ची ठेऊन त्यावर बसली होती आणि हळूवारपणे तिच्या केसातून हात फिरवत होती तेवढ्यात तिला खूप जोराची कळ आली तशी तिने ओठ घट्ट दाबले आणि आईचा हात घट्ट धरला. तिने इतक्या जोरात आईचा हात धरून दाबला होता की त्यांच्या हातावर वळ उमटले." बस थोड्यावेळ सहन करबेटा.मग एक चिमुकला जीव तुझ्या कुशीत येणार आहे.आपण त्याचीच वाट बघत होतो नं."


एवढं बोलून आई अनघा कडे बघून हसल्या.तेवढ्यात ताई आणि मुकुंदराव दवाखान्यात पोचले. ताई खोलीत आली आणि अनघा कडे बघून हसली.


"ताई…" अनघा एवढंच बोलली. तिचा चेहरा खुप केविलवाणा झाला होता. ताईंनी हळुच तिच्या हातावर थोपटल़.ती वैभवला म्हणाली


"वैभव तुम्ही दोघं बाहेर बसा.वैभव तुला हिचा त्रास बघणार नाही." वैभव खरच अनघाची स्थिती बघू शकत नव्हता. दोघही खोलीबाहेर असलेल्या खुर्चीवर बसले. थोड्यावेळानी नर्स येऊन तिनी अनघाची आतून तपासणी केली आणि गडबडीनी डाॅ.ना काहीतरी सांगायला गेली. वैभवला काहीच कळत नव्हतं. नर्स पुन्हा अनघाच्या खोलीत गेली. पाठोपाठ दोघी मावश्या स्ट्रेचर घेऊन तिच्या खोलीत गेल्या.अनघाला स्ट्रेचरवरून लेबर रूममध्ये नेण्यात आलं.


बराच वेळ गेला.बाहेर बसून वैभवला काही युगं लोटल्यासारखी वाटली. मुकूंदराव मधून मधून त्याला धीर देत होते. एवढ्यात त्या चौघांच्या कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज आला. वैभव तर आनंदानी थरारून उठला. तेवढ्यात नर्सनी येऊन सांगीतलं." अभीनंदन.तुम्हाला मुलगी झाली." वैभव हसला.ताई म्हणाली


"अरे परी आली आपल्या घरी.पहिली बेटी धनाची पेटी."तिने वैभवाच्या पाठीवर थोपटले.थोड्यावेळानी वैभव आत अनघाला भेटायला गेला.अनघा वैभव कडे बघून छान हसली.वैभव तिच्याजवळ झोपलेल्या छोट्याश्या जीवाकडे बघतच राहिला. केव्हा त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळायला लागले त्यालाही कळलं नाही. त्याने हळुच बाळाच्या गालाला हात लावला तशी त्याने चुळबुळ केली. वैभव अनघाला म्हणाला"खूप छान भेट दिलीस मला. तुझ्यासारखी गोड परी दिलीस."


"वैभव हे सगळं ताईंच्यामुळे शक्य झालं.त्यांची मी आयुष्यभर ऋणी राहीन."


" हो खरय. मी ताईला आत पाठवतो." असं म्हणून वैभव बाहेर गेला.ताई आत आली आणि हसून म्हणाली" काय मग वहिनी साहेब खूष नं" ताईंनी विचारलं.


" हो.ताई पण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. तुम्ही हे धाडस केलं नसतं तर माहित नाही मी आई झाले असते की नाही." तिच्या तोंडावर हात ठेवत ताई म्हणाली


" ऐ वेडाबाई असं आता बोलायचं नाही.हं"


"ताई मी तुमची ऋणको आहे. तुमची कर्जदार आहे.तुमचं खूप मोठं कर्ज आहे माझ्यावर पण मी ते फेडू शकेन असं वाटतं नाही."


" अनघा बस आता.काही कर्ज, काही ऋण कधीच फेडायचे नसतात.ते तसेच राहू द्यायचे असतात.वारंवार त्याचा उल्लेख नसतो करायचा. तुम्ही दोघं आपल्या परीला खूप छान वाढवा. तिला चांगले संस्कार द्या. चांगलं वाईट यातला फरक ओळखायला शिकवा.बस्स एवढं केलंय की तुमचं सगळं ऋण फिटेल.कळलं"


अनघानी हसून मान डोलावली आणि आपल्या परीची पापी घेतली.दोघींचं बोलणं दारात उभ्या असलेल्या आई,वैभव आणि मुकूंद राव ऐकत होते.वैभवच्या डोळ्यात पाणी आलं.त्यानी आनंदानी मुकूंद रावांना मिठी मारली. ताई अनघाला म्हणाली.


"अनघा ही परी तुमच्या आयुष्यात खूप सुख समृद्धी आणेल. आता तिचं नाव काय ठेवायचं ठरवा. होकी नाही ग परी." यावर परी गालातच हसली.ते बघून दोघीजणी आनंदल्या.


"अनघा परीला पण घाई झाली आहे बघ.तिचं नामकरण करण्याची" ताईंनी बाळाच्या गालावरून हळुच हात फिरवला.आज परीनी अनघा वैभवच्या आयुष्यात आनंदाचा खजीना उधळला होता. आज पासून दोघही आई बाबा म्हणून मानानी मिरवणारे होते.

----------------------------------------------- कथा मालिका समाप्त


लेखिका -- मीनाक्षी वैद्य.इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED