चेतन घरात घुसला तेव्हाच थोडा बैचेन वाटला.
मला जरा नवलच वाटलं. काय झालं असेल बरं? आत्ता एवढ्यातच तर सायकल घेऊन बाहेर गेला, तेव्हा तर चांगला हसत खिदळत होता. घटकाभरात थकून परत ही आला?
जाऊ दे, असेल काहीतरी. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा कशाला उगाच बाऊ करायचा? खरं तर आपण मोठी माणसं लहान मुलांना नीट समजावूनच घेत नाही. आपण त्यांना लहान मुलं समजत राहतो आणि हेच मानून चालतो की यांच्याजवळ केवळ एक सपाट मन आहे. जेवण-खाण, खेळ आणि अभ्यास सोडून यांना कुठल्याच गोष्टीत ना काही अनुभव आहे, ना कोणती भावना, ना कोणती अपेक्षा. पण खरं तर प्रत्यक्षात असं बिलकुल नसतं. कोमल मन व सुकुमार शरीर असलं तरी या मुलांच्या अंगात वादळ असतं वादळ! आपले स्वतःचे अनुभव; एकमेकांमधील स्पर्धा,चढाओढ; मोठ्या माणसांनी केलेली उपेक्षा; टीव्ही वर बघितलेल्या, मासिकांमध्ये वाचलेल्या गोष्टी, आजूबाजूच्या लोकांचे स्वभाव, नातेवाइकांचे वागणे, इतरांचे किस्से, इत्यादी असंख्य गोष्टी असतात ज्या त्यांच्या भावनाप्रधान मनाला घुसळून टाकतात. त्यांच्या मनात त्यांचं स्वतःचं असं एक जग असतं. काहीही असो, पण चेतनला इतका गंभीर क्वचितच कधी पाहिला होता. नक्कीच काहीतरी गोष्ट आहे जी त्याला खुपते आहे. आत येऊन, सायकल भिंतीलगत उभी करून एका कोपर्यात चुपचाप एका पुस्तकात डोकं खुपसून बसला. उगीचच थोडंच कोणी होतं उदास! माझ्याच्याने राहवलं नाही. मी त्याला हाक मारली.
चेतन समोर येऊन उभा राहिला. अजूनही त्याचा चेहरा पडलेलाच होता.
“काय झालं?” मी विचारलं.
“काही नाही!” तो म्हणाला.
“काहीतरी तर नक्कीच आहे. तुला बरं वाटत नाहीये का?”
“नाही, असं काही नाही, ठीक आहे मी…” असं उत्तर दिलं त्याने, पण अगदी मिटलेल्या आवाजात.
अर्थातच त्यावर माझा काही विश्वास बसला नाही. एरवी माझ्या प्रश्नाचे उत्तर इतक्या हळू आवाजात कधीच आलं नसतं. काळीज हललं माझं. मी त्याचा हात पकडून माझ्याजवळ त्याला बसवलं. एक गोष्ट पक्की होती की कुठली ना कुठली तरी गोष्ट त्याला खुपत होती. कारण असं नसतं तर आश्चर्यचकित होऊन उलट तोच मला विचारत असता की मला काय झालं आहे? आणि मी त्याला असं का बरं विचारतो आहे? पण मुंडी खाली करून तो नुसताच बसून राहिला.
मी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि विचारलं, “आत्ता तर फक्त सात वाजले आहेत. आज एवढ्या लवकर परत पण आलास?” इतर दिवशी ही गोष्ट सुद्धा त्याला चकित करणारी होती कारण नेहमी मी त्याला विचारत असायचो की इतका उशीर का झाला? दिवसभर खेळत राहतोस, अभ्यास कधी करशील? बहुतेक गंगा उलटी वाहते आहे हे त्यालाही समजलं असावं. आईवडिल जेव्हा नको इतकी विनम्रता दाखवतात तेव्हा काहीतरी गडबड नक्की असते हे मुलांना पण कळतंच की!
मी परत एकदा विचारलं, ”तब्येत ठीक दिसत नाही तुझी?”
उदास चेहऱ्याने माझ्याकडे त्यानं बघितलं आणि मग एकदम म्हणाला, “बाबा, आपला तो मोठा गालिचा केवढ्याचा आहे?”
“अं, काय?” मी हैराण झालो, हा काय प्रश्न आहे? याच्या मित्रांमध्ये काही पैज वगैरे तर लावली नाही याने, गालिचाच्या किमती बद्दल!
“नाही बाबा, पण सांगाना… दिवाळीत तुम्ही हा गालिचा कितीला घेऊन आला होतात?”
मी सहजतेने म्हणालो, “मला नक्की आठवत नाही पण बहुतेक एक-दोन हजारांपर्यंत होता. पण तू का बरं असं विचारतो आहेस?” आता मला अगदी हलकं वाटत होतं आणि या गोष्टीमध्ये मौज पण वाटू लागली होती. याच्या खिन्नते मागे कोणतीही गंभीर गोष्ट नव्हती तर दोन-चार मित्रांच्या मधलं बालसुलभ भांडण होतं हे कळल्यावर माझ्या छातीवरचं दडपण गेलं.
चेतन ने खुलासा केला, “बाबा, ते माथुर काका … ते आपल्या गालिचाची चेष्टा करत होते. म्हणत होते की गालिचा कुठला आलाय हा, सतरंजी सारखा तर दिसतो. अगदी स्वस्तातला असणार.”
मी हतबल होऊन गेलो. या माथुरचं डोकं फिरलय की मुलांच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी करतो आहे. मला आता या माथुरचा रागही येऊ लागला. पण तरीही मुलाच्या समोर मी अगदी सहजपणे आणि कुठल्या ही भावनेमध्ये न अडकता म्हणालो, “मग काय झालं? चूक काय आहे त्यात, खूप महाग थोडाच आहे तो?”
चेतन एकदा परत निरुत्तर आणि असहाय्य दिसू लागला. बहुतेक त्याला माझे म्हणणे पटले नसावे. तो एकटक माझ्याकडे बघू लागला आणि मग एकदम म्हणाला,” का? आता महाग कसा नाही हा? त्या दिवशी तर तुम्ही म्हणत होतात की हा खूप सुंदर आहे, किमती पण आहे आणि तुम्ही सगळ्या बाजारातून शोधून मोठ्या मुश्किलीने मिळवला आहे…” आता हे मुलांना मी कसं समजावणार की अशा गोष्टी तुलनात्मक असतात. शिवाय स्वस्त गोष्टी काय चांगल्या नसतात?
चेतनचा चेहरा आता रागाने लालेलाल झाला. मला असं वाटलं जणू हा पुन्हा एकदा हरला आहे. मुलांचा आपसातला वाद, त्यावर त्या मूर्ख माथुरची टिपण्णी… आणि आता त्यावरची माझी अशी प्रतिक्रिया; या सर्व गोष्टींनी जणू काही त्याला अपमानित केलं होतं. मला थोडी चीड पण आली आणि आश्चर्य पण वाटलं. म्हणजे मुलं इतकी लक्ष देऊन ऐकतात तर सगळ्या गोष्टी! पण आता माथुर बरोबरच थोडासा राग या चेतन वर पण आला. अरे, स्वाभिमानी असणं चांगलीच गोष्ट आहे, पण या अशा घरगुती गोष्टींबद्दल स्वाभिमान! हा तर महिला वर्ग दाखवितो, आपल्या साड्या, दागदागिने यांच्या किमती वरून. घरातील गालिचा महाग आहे का स्वस्त, यावरून या मुलांना काय फरक पडतो?
पण खरं सांगायचं तर मनातल्या मनात मी सुद्धा या गोष्टीने थोडा हैराण झालो होतो. चेतनला मी कसं तरी पटवून परत खेळायला पाठवून दिलं पण मी स्वतः मात्र बैचेन होतो.
हं, ठीक तर आहे. अगदी बरोबर म्हणतो आहे तो. आजकाल माथुर आणि त्याच्यासारख्या इतर भ्रष्टाचारी लोकांना स्वतःच्या लाच घेण्याबद्दल अजिबात लाज वाटत नाहीच उलट अगदी निर्लज्जपणे त्याचे कौतुकच करतात ही मंडळी. त्यांना या गोष्टीची अजिबात शरम वाटत नाही की आपण बेइमानी आणि कपटकारस्थान करून पैसा कमवत आहोत. या काळया पैशांनी आणलेल्या महागड्या गोष्टी आपल्या मुलांच्या समोर ठेवून आपल्या हलकटपणाच्या सवयीला चांगलं बनवून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर ही आहे की माथुर आता समाजात एक-दोन, दहा-वीस नव्हे तर नव्वद टक्के निपजले आहेत. आज जर तुम्हाला कुठल्या ठिकाणी आपली इमानदारी आणि सचोटीने नोकरी किंवा व्यापार करायची इच्छा असेल तर तुम्हाला या ‘माथुरांना’ रोजच भेटावं लागतं. आज काल गोष्टी या थराला जाऊन पोहोचल्या आहेत की हे लाचखोर भ्रष्टाचारी, अशांच्या बायका मुलांना भडकवू लागले आहेत, जे हा हरामाचा पैसा घेत नाहीत. सोन्याची लंका अशीच बनली असावी जसे आज एक एक शहर बनत आहे. जिथे आहात, जे काम करत आहात, त्यात वाईट पद्धतीने का होईना पण जास्तीत जास्त पैसे कसे काढता येतील हाच विचार. कुठल्याही चांगल्या गोष्टींची खिल्ली उडवत राहणार. हा हरामखोर माथुर मुलांचं मन राखण्याकरता असं तर म्हणू शकत होता की तुझे वडील स्वस्तातला पण किती सुंदर नक्षीकाम केलेला गालिचा घेऊन आले आहेत. पण बेइमानी करून मिळवलेला पैसा माणुसकी शिल्लक ठेवेल तर ना!
पण नाही, त्या साल्याला ना कलेशी काही देणं घेणं आहे, ना मुलांशी. त्याला तर फक्त हेच सांगायचं होतं की त्याने नऊ हजाराचा गालिचा खरेदी केला आहे. मग हे नऊ हजार एखाद्या गरीब बिचाऱ्या विधवा शिक्षिकेची जबरदस्तीने नको असलेल्या ठिकाणी बदली करून, तिच्या ऐवजी त्या जागेवर श्रम आयुक्तांच्या भाचीला चिकटविले असल्याबद्दल मिळालेले असो. कायदा-सुव्यवस्था, शिक्षण, मुलांचे भविष्य, शासन-प्रशासन, नीती-नियम सगळ्याला आग लागली तरी चालेल, याला त्याचे काय, तो तर आपलं काम करून श्रम आयुक्तांच्या केबिनमध्ये येऊन उभा राहील, त्यांच्यासमोर हात जोडत. या युगातील हे किडे आहेत किडे, सरकारी चिखलातले किडे.
मला असं वाटलं की फक्त चेतनला भावनेच्या आहारी जाण्यापासून वाचवणे आवश्यक नाही तर मला स्वतःला ही रक्तदाब वाढू न देण्याची काळजी घ्यायला हवी. बिचारी सीमा माझा रक्तदाब आटोक्यात राहावा म्हणून दिवस-रात्र खाण्या-पिण्याच्या बाबतीत माझी काळजी घेत असते. त्यामुळेच औषधांची जास्त जरूर पडत नाही. आणि दुसरीकडे हे माथुर सारखे लोक… काय तर म्हणे माझा गालिचा अगदी भंगार आहे.
चला, रिकामं बसल्यावर डोकं फिरणारच की. कोणत्यातरी कामात मन गुंतवावे असा विचार करून मी मोठ्या भावाला पत्र लिहायला बसलो. हे खरं की दादा मला कधीच पत्र लिहायचा नाही. म्हणायचा की फोनवर सर्व गोष्टी दोन मिनिटात बोलून होतात तर उगीच पांढरा कागद काळा का करा?
आता ही तर ज्याची त्याची आवड आहे. जे काम तीन रूपयांच्या पत्रात आरामात होऊ शकते त्या करता फोनवर तब्बल साठ रुपये कशाकरता खर्च करावे? या दादाने आपल्या दोन्ही मुलांना डोनेशन आणि टेबलाखालून पैसे देऊन इंजिनियर आणि मॅनेजमेंटच्या कोर्सला टाकले आहे. चांगल्या मार्कांनी हे कधीच पास झाले नाहीत. कधी काठावर पास तर कधी तृतीय वर्ग. परीक्षेच्या आधी एक महिना कॉलेजच्या अध्यापकांची नावं विचारायला लागलो तर इकडेतिकडे बघू लागले. हा, आता बाजारात कपड्यामध्ये कुठलीही नवीन फॅशन यायचा अवकाश, उद्या यांच्या अंगावर तो सगळ्यात पहिला दिसेल.
हा दादाही ना, नजरेला नजर मिळवून माझ्याशी कधीच बोलत नाही. आणि वहिनी? चेतनच्या समोर शेखी मिरवत होती, तुझ्या दादाला इंजिनियर बनायचंय आणि तो धाकटा दादा, तो म्हणतो आहे की जर्मनीला जाऊन अभ्यास पूर्ण करेल. छोट्या चेतनला कधी कळलंच नाही की अशी मुलं, ज्यांचे आई-बाबा दिवस-रात्र त्यांच्या सवयी आणि त्यांच्या अभ्यासाबद्दल रडगाणं गातात, ती मुलं इतकी हुशार कशी काय निघतात? सगळा पैशाचा खेळ आहे. आता मला हळूहळू दादाचा राग येऊ लागला. काळा पैसा काय कमी कमावला त्याने, नोकरीला लागून तिसऱ्या वर्षात गाडी, सात वर्षांमध्ये स्वतःचं घर...आणि तेव्हा तर त्याचा पगार माझ्याहून अर्धा पण नव्हता. मला असं वाटायला लागलं की मी नाही तर बाजूचा माथुर त्याचा भाऊ आहे. सगळे एकाच माळेचे मणी… पृथ्वीला भार… या युगाचे कलंक आहेत नुसते सगळे एकजात... या पृथ्वीवरील वटवृक्षाला लागलेली वाळवी…
जेवण झाल्यावर म्हटलं थोडा वेळ बाहेर चक्कर मारून यावी. मी दारातून बाहेर पडतच होतो एवढ्यात चप्पल घालून पळत पळत चेतन पण मागून आला.
“बाबा, मी पण तुमच्या बरोबर येतो चक्कर मारायला”
“आणि गृहपाठ?”
“तो तर मी आज दुपारीच करून टाकला ना आणि उद्या मला तपासून पण नाही घ्यायचा. उद्या आमच्या शाळेमध्ये बास्केटबॉलच्या मॅचेस सुरू होणार आहेत. वर्ग होणार नाही त्यामुळे.”
“चल,... “ असं म्हणत माझा हात खिशावर गेला. हा बरोबर असताना हाच एक धोका असतो की पाच पन्नास रुपयेतरी जवळ ठेवणे आवश्यक असते. कुठल्या वेळी काय मागेल काय भरोसा. कधी चिप्स तर कधी चॉकलेट.
“बाबा, तुम्हाला माहितीये, हेमंत पुढच्या महिन्यात नवा कॉम्प्युटर घेतोय?”
“अच्छा!”
“तो सांगत होता की जर त्याने क्लास टेस्ट मध्ये चांगले मार्क मिळवले तर हेमंतच्या बाबांनी त्याला कॉम्प्युटर घेऊन देण्याचे प्रॉमिस केले आहे.”
“अच्छा...”
घशात दाटून आलेला आवंढा मोठ्या मुश्किलीने मी गिळला. घ्या, एक मी आहे की या बिचार्याच्या छोट्या-छोट्या मागण्यांना घाबरतो आहे. कलियुग आहे कलियुग! काही अपेक्षाच करता कामा नयेत या काळाकडून! हा काळ निर्लज्ज लोकांचा आहे. बदमाश लोकांचा आहे. नीच लोकांचा आहे. हा काळ माथुरचा आहे आणि दादाचा आहे.
मला वाटू लागलं की जेवण झाल्यावर मी रक्तदाबावरची गोळी घेतली नाही बहुतेक. यामुळेच थोडसं बेचैन वाटतं आहे. मलाच हा आजार का बरं झाला? मी कोणाचं काय नुकसान केलं होतं? या चेतनने कोणाचं काय बिघडवलं होतं? माझ्या औषधावर खर्च होणारा पैसा याला चॉकलेट किंवा चिप्स घेऊन देण्यात खर्च झाला असता तर काय आकाश कोसळलं असतं? का विष्णू क्षीरसागरामध्ये डुबले असते? ग्लोबलायझेशनच्या गोष्टी करतात! उदात्तीकरण चांगलं वाटतंय साल्यांना… विदेशी पैसा, विदेशी गोष्टी, विदेशी कंपन्या आता या हरामखोरांना आवडायला लागल्या आहेत. व्लादिमिर पुतिन असो की बिल क्लिंटन,सगळे एक जात सारखेच. सगळे माथुरचे भाऊबंद! सगळ्यांना दादा बद्दल सहानुभूती. तेरा तुकड्यांमध्ये देशाला वाटून आरामात झोपलेत गोरबाचेव्ह. बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश… सगळ्यांचं विभाजन करून टाकलं. करा… करा… अजून छकलें करा. तुकडे तुकडे करून टाका. सगळ्यांना आपापसात लढू द्या… म्हणजे पोर्तुगाल आणि इंग्लंड नाही तर त्याहूनही छोटे-छोटे देश आले तरी त्यांच्यासमोर सुद्धा उभे ठाकू शकणार नाही आपण. गुडघे टेकावे लागतील त्यांच्यासमोर. मग जाईल वाघ पिंजऱ्यात. बोलवा… बोलवा… सगळ्यांना आरडाओरडा करत जोरात बोलवा. कंपन्यांना ईस्ट इंडिया कंपनीचे क्लोन बनवा. कशाला बरं मरून गेली इंग्रजी राजवट? पुन्हा नव्याने जिवंत करा. बोलवा अमेरिकनांना…बोलवा इंग्रजांना…करा स्नेहसंमेलनं … करा खुश त्यांना … नाचा त्यांच्यासमोर! आणि ते लोक, जे आपल्या देशाला शिवी देत, इथल्या मातीत शिकून-सवरून मग त्याच शिक्षणपद्धतीला खराब म्हणत विदेशात जाऊन बसले आहेत, दिवे ओवाळा त्यांच्यावरून… परत बोलवा… कोणी थांबवून ठेवलं आहे तुम्हाला? आणि प्रॉब्लेमच काय आहे? सगळे तुमच्या बरोबरच आहेत, माथुर तुमच्या बरोबर आहे, दादा तुमच्या बरोबर आहे…
मी चेतनला म्हणालो, ”चला, जाऊया का परत घरी?”
“इतक्या लवकर?”
“अरे, खूप उशीर होऊन जाईल बाळा, लम्हों की खता सदियों रुलाएगी”
“काय?”
“अरे काही नाही, काही नाही. मी म्हणत होतो की थंडी चांगलीच वाजू लागली आहे. चल, आता घरी परत जाऊ या. तू स्वेटर पण तर नाही घातलेला”
रात्री ‘सरफरोश’ बघता बघता डोळे जड होऊ लागले. सीमा आणि चेतनला सिनेमा बघत तसंच सोडून मी झोपायला अंथरुणावर आडवा झालो. डॉक्टरांचा विचार मनात आला. सारखी आठवण करून देत असतात– काही झालं तरी ही गोळी रिकाम्या पोटी घ्यायची नाही. रक्तदाबावरील हे औषध काही ना काही तरी पोटात गेल्यावरच घेतले पाहिजे. जेवण झाल्याला आता तीन तास होऊन गेले आहेत. औषध घ्यायचं मी विसरलो आहे.
गोळी तर आत्ता सुद्धा घेऊ शकतो. पोट थोडंच रिकामं आहे आता? भरपूर जेवण झालं आहे, ते अन्न तर आहेच पोटात. जास्तीत जास्त काय तर जठरातून खाली सरकून छोट्या आतड्यापर्यंत पोहोचलं असेल. कपाटातून गोळी काढून मी ती घेतली.
रात्री कसल्या तरी आवाजाने माझी झोप चाळवली. चेतन झोपला होता. टीव्हीवरचा सिनेमा संपून सुद्धा बहुतेक बराच वेळ झाला होता. पत्नी सीमा बहुतेक घरातलं सगळं काम आवरून आता झोपायला आली होती. मी अर्धवट झोपेत होतो, पण विरुद्ध दिशेला वळून तिच्यासाठी थोडी जागा करून दिली. अंधार असूनही जाणवलं की पत्नी काही खुश झालेली नाही. तिचा काहीतरी वेगळाच विचार असावा.
अंगावरचे पांघरुण नीट करण्याचा बहाणा करीत पायावर पाय घासत तिने हळूच माझ्या मानेला पण स्पर्श केला.
... हा देश काही वाचत नाही. व्हिक्टोरियाचे राज्य लवकरच येणार म्हणायचं! साले, परदेशी कंपन्यांचा सडका-कुजका माल कचऱ्यासारखा इथे भरला जात आहे. आधी माकडिणीला पावडर-लाली लावून चांगलं सजवा आणि मग ढम ढम ढोल वाजवत बाजारामध्ये नाचवा… कमाल आहे. आंधळे आहेत झालं, काही दिसत नाही यांना. पाच वर्षांमधे मधू सप्रे, राणी जयराज, ऐश्वर्या राय, सुष्मिता सेन, डायना हेडन, युक्ता मुखी, लारा दत्ता… गल्लोगल्ली सौंदर्याच्या पऱ्यांनी जन्म घेतला आहे. आता यांना जाहिरातींच्या मध्ये नाचवा आणि शेण- माती सोन्याच्या भावात विका. पैसा मिळवा.
मला सीमाची पण दया येऊ लागली. बिचारी रात्री साडे अकरा वाजता चेतन झोपल्यानंतर हात पाय धुऊन अत्तर लावून केसांमधून परत कंगवा फिरवून इथे येऊन आडवी झाली आहे. या बिचारीला कुठे माहित आहे की हिच्या शेजारी जो मांसाचा गोळा झोपला आहे तो झोपेत सुध्दा मिस युनिवर्स, मिस वर्ल्ड बनलेल्या सुंदऱ्या आणि विदेशीचा प्रसार करणाऱ्या करिश्मा कपूर आणि काजोलला शिव्या-शाप देत आहे. हिला असं वाटतंय की अनेक वर्षांपूर्वी वहिनीने दिलेल्या विदेशी perfume च्या सुवासिक मार्गाने ही माझ्याकडून इच्छित साध्य करून घेईल. काय ही असहाय्यता! आता हा perfume दादाने वहिनीला आणून दिला होता. फुकटात मिळाला होता त्याला. एका व्यापाऱ्याच्या मुलीचे काही मार्क्स वाढवून दिल्याबद्दल. व्यापाऱ्याकडून दादाकडे, दादाकडून वहिनीला, वहिनीकडून सीमाकडे… आणि आता सीमाकडून माझ्याकडे येण्याच्या तयारीत… साला… कचरा माल… विदेशी. माथुर पण असलेच perfumes आणत असणार. दादा, माथुर सगळे धार्जिणे एकमेकांना. माझ्या सुंदर नक्षीकाम केलेल्या गालिच्यावर हागायला बसलेत…आणि यात माझ्या प्रिय बायकोला पण लपेटून घेत आहेत साले.
मी हा गालिचा आणायचं खरं कारण तर हे होतं की हा गालिचा अंध मुलांनी आपल्या कार्यशाळेत बनविला होता. प्रदर्शन पहायला गेलो होतो तेव्हा दिसला. माझ्या आवाक्याच्या बाहेरच होती त्याची किंमत. पण आपण गालिच्याची किंमत देत नसून, अंध जीवांना चार पावलं नीट टाकता येण्याइतका आत्मविश्वास यातून मिळणार आहे, हा विचार मनात होता. आणि अगदी याच विचाराने हा गालिचा अत्यंत किमती असल्याचं अभिमानाने चेतनला सांगितलं होतं. माझ्याकरीता अत्यंत पवित्र असा हा गालिचा आहे. अत्यंत … पण या माथुरला घाण करायला अजून दुसरं काहीच मिळू नये? हलकट, नालायक, कुत्रा … हा पण दादासारखाच.
मान वळवून बघितलं, थोड्या अंतरावर चेतन अगदी गाढ झोपेत होता. शांत, निरागस, निश्चिन्त, या सगळ्या गोष्टींपासून अगदी दूर… कारण मी त्याला संध्याकाळीच छान समजावून सांगितलं होतं की हे बघ सोन्या, अशा छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल जास्त विचार नसतो करायचा. माथुर काका सहज, अगदी गमतीत म्हणाले असतील. आपण कशाला इतकं मनावर घ्यायचं त्यांचं बोलणं?
सीमाची इच्छा पण मला कळलीच होती.
आणि शेवटी, हे सगळं असंच तर चालू राहणार, अगदी वर्षानुवर्ष… मग त्या दुःखाचा विचार करत राहून आत्ताचं सुख हातचं थोडंच घालवायचं असतं?
*******