येवा कोंकण आपलोच असा.. - भाग ३ Dr.Swati More द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग ३

तासभर विश्रांती घेऊन आम्ही सिंधूदुर्गकडे रवाना झालो..
मालवण मध्ये फिरण्यासाठी रिक्षा खूप चांगलं साधन आहे. स्वस्त आणि मस्त!!
अजून एक, प्रवास करता करता तिथल्या स्थानिक लोकांशी आपल्याला संवादही साधता येतो..
तिथली त्यांची बोलीभाषा, त्यांचे सणवार, जवळपास बघता येण्यासारखी ठिकाणं सगळं सगळं माहिती करून घेता येतं..
आम्हालाही असेच वेंगुर्लेकर काका भेटले.. मग काय बाहेर पडलो की काकांच्या घराच्या अंगणात उभं राहून काकांना हाक दिली की काका "इलो , इलो' म्हणत आम्हाला कुठंही घेऊन जायला तयार!!

आम्ही किल्ला बघण्यासाठी मालवणात जात असताना काकांनी सांगितलं, "उद्या मालवणची जत्रा आसा.तुमका वेळ मिळालो तर याचो आनंद घ्या"....

या जत्रेविषयी मी पुढे लिहणारचं आहे.. त्यामुळे आता सविस्तर सांगत नाही..

पंधरा मिनिटातच काकांनी आम्हाला मालवण जेट्टी जवळ आणून सोडले.. इथून किल्ल्याकडे जायला फेरी बोट सुटतात.. मानसी शंभर रुपये आणि लहान मुलांना पन्नास रुपये आकारतात..

आम्हीही तिकीट काढून फेरी बोटीत बसून घेतलं..

आज हा किल्ला हजारो पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनलेला आहे. दररोज हजारो पर्यटक मालवणच्या बंदरातून हा किल्ला पाहण्यासाठी जात असतात. शासनाने फेरी बोटीची व्यवस्था केल्याने किल्ल्यात पोहचणे अतिशय सुखकर झाले आहे. बोटीत बसून किल्ल्याकडे जाण्याचा सागरी प्रवास करताना समुद्रात उभ्या असलेल्या मासेमारीच्या बोटी, स्कुबा डायव्हिंगसाठी पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटी तर काही ठिकाणी स्नोरकलिंग करणारे पर्यटक आपल्याला दिसतात..

हा सागरी किल्ला साधारण मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस सुमारे दीड कि .मी . कुरटे नावाच्या बेटावर बांधलेला आहे.

या बेटाच्या आजूबाजूला उथळ सागर आणि टोकदार खडक मोठ्या प्रमाणात असल्याने शत्रू जहाजांच्या हालचालींना यामुळे पायबंद घालणं शक्य होणार होते.या जागेचा नैसर्गिक अभेद्यपणाचा विचार करून ही जागा किल्ल्यासाठी महाराजांनी नक्की केली असणार..

किनाऱ्याहून बोटीतून निघाल्यावर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण किल्ल्यात पोहचतो.. बोटीतून उतरण्यासाठी काळ्या दगडापासून बांधलेला एक धक्का आहे. लांबूनच किल्ल्याची भक्कम तटबंदी आपलं लक्ष वेधून घेते.

तिथून चालत पुढं पुढं गेलो तरी किल्ल्याचा दरवाजा दृष्टिक्षेपात येत नाही.. इतर किल्ल्यासारखा याचेही मुख्य द्वार बेमालूमपणे तटबंदीत लपवलेलं आहे.. वेड्यावाकड्या कमानदार वळणानंतर आपल्याला मुख्य द्वार दिसते.. मालवणाकडे तोंड केलेला दरवाजा पूर्वाभिमुख आहे..

संकटांना पळवून लावणारा संकट मोचन हनुमानाचे मंदिर शिवरायांनी प्रत्येक किल्ल्यात उभे केले आहे. इथेही त्याचे दर्शन होते..
दरवाजा पार केल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत..

महाद्वारापासून उजव्या बाजूच्या तटावर दोन देवळ्या आहेत. यांपैकी एका देवळीत डाव्या पायाचा व दुसरीमध्ये उजव्या हाताचा ठसा आहे. ते ठसे छ. शिवाजी महाराजांचेच असावेत, असे जनमत आहे.

आपल्याला हवा असल्यास आपण गाईड बरोबर घेऊ शकतो.. पाचशे रुपये अशी एका गाईडचे चार्जेस आहेत. आम्ही जाताना किल्ल्याची माहिती वाचून गेलो होतो आणि आमची ही दुसरी भेट असल्याने आम्ही गाईड घेतला नाही..

मुख्य दरवाजा पार केल्यावर आपण दोन मार्गांनी किल्ला फिरू शकतो.. एक म्हणजे दरवाज्यातून बाहेर आल्यावर लगेचच डाव्या हाताला असलेल्या पायऱ्या आपल्याला किल्ल्याच्या तटबंदीवर घेऊन जातात.. तिथून पुढं तटबंदीवरुन प्रदक्षिणा घालत आपण पूर्ण किल्ला फिरू शकतो.. मध्ये मध्ये तटबंदीवरुन खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत..

दुसरा मार्ग म्हणजे दरवाज्यातून बाहेर आल्यावर सरळ डाव्या हाताला पुढं जात जात किल्ला बघायचा.. आम्ही तटबंदीवर न चढता तसचं पुढं गेलो..

मार्गात खाण्या पिण्याचे स्टॉल्स आहेत.. काही स्थानिकांची घरेही आहेत..

थोडं अंतर गेल्यावर महादेवाचे मंदिर आहे...किल्ल्यात मध्यभागी छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत बांधलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य व लक्षणीय मंदिर आहे. त्यातील वीरासनातील वालुकाश्म मूर्ती नावाड्याच्या टोपीसदृश शिरस्त्राण घातलेली, दाढी नसलेली अशी आहे. येथे एक म्यानात ठेवलेली तलवार आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्रीशिवराजेश्वर मंदिर,
महादेव मंदिर, भगवतीदेवी, महापुरुष, जरी-मरी, द्वाररक्षक हनुमंत अशी छोटी मंदिरे आहेत.

खाऱ्या समुद्रात किल्ला असूनही दुधबांव, दहीबांव, साखरबांव या नावाने येथे विहिरी आहेत. तसेच एक छोटा तलाव आहे. किल्ल्यात नारळ व पोफळीची झाडं सगळीकडे पसरलेली आहेत..

लाटांमुळे किल्ल्याचे काही बुरूज व तटाचा भाग ढासळला आहे. तटबंदीवरून किल्ल्यात उतरण्यासाठी ठिकठिकाणी दगडी जिने आहेत.

दक्षिणेकडच्या तटाकडे चंद्राकृती व मऊ रेतीची छोटी पुळण आहे. तिथं जाण्यासाठी तटबंदीतून छोटा मार्ग आहे..
ओहोटी असेल तर इथ नक्कीच भेट द्यावी..
याखेरीज महादरवाजावरील मोडकळीस आलेला नगारखाना व राजवाड्याचे काही अवशेष दिसतात..

असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला.

गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुका रोखण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे, हे विशेष होय.
कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.

शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत या किल्ल्याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :

'चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला ।
सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।

इतिहासाची साक्ष देणारा हा जलदुर्ग फिरता फिरता तास दोन तास कसे मोडतात कळतही नाही..

महाराजांनी बांधलेल्या कोणत्याही गडावर जा, आपला ऊर अभिमानाने भरून येतो..

परतीच्या बोटीची वेळ झाली असल्याने आम्ही माघारी फिरलो..