येवा कोंकण आपलोच असा... मालवण डायरी भाग ४
किल्ला बघून बोटीने परत येईपर्यंत सूर्यास्त होत आला होता.
रूमवर येऊन थोड फ्रेश झाले आणि त्याला भेटायला चार पावलं चालत किनाऱ्यावर आले..
आता निवांत बसून त्याच्याशी गुजगोष्टी करायच्या होत्या ..
सूर्यदेव अस्ताला गेले होते.त्यांचा लालिमा स्वतःच्या अंगावर घेत तो शांतपणे फेसाळत लाटांच्या रुपात माझ्याकडे किनाऱ्यावर येत होता. संध्याकाळच्या थंडीत माझ्या पायांना होणारा त्याचा गरम स्पर्श मला सुखावत होता..
असं नुसतचं त्याला बघणंही कितीतरी सुंदर वाटत होतं.
फक्त नजरेचा नजरेशी चाललेला मूक संवाद..
काहीही न बोलताही मन हलकं हलकं झालं होतं..
साऱ्या दूनियाचा कचरा, निर्माल्य, पाप आपल्या पोटात सामावून घेणारा तू..
माझ्या मनातील खळबळही स्वतः मध्ये सामावून घेतोस आणि प्रत्येक वेळी मन शांतीच दान मुक्तहस्ते मला देतोस..
तुझ्यासारखं दातृत्व मला कधी जमेल की नाही माहीत नाही मित्रा..
पण तुझ्या संगतीत राहून बऱ्याचश्या नको असलेल्या गोष्टी सोडून द्यायला शिकतेय. कितीही संकट आली तरी तू तुझ्या दिनचर्येत कधीच बदल केला नाहीस..
आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहायचं. कोणत्याही अपेक्षेशिवाय हे शिकतेय तुझ्याकडून..
आपल्या या प्रगल्भ नात्यावर मला सुचलेल्या काही ओळी..
कधी कधी तास न् तास
नुसतच तुला डोळे भरून पाहणं
तर कधी तुझ्या स्पर्शासाठी
तुझ्या जवळ येणं
आताशा तर रंगतोय
तुझ्या नि माझ्यातला
मूक संवाद
माझ्या प्रत्येक प्रश्नाला
उत्तर देते तुझी गाज
तू सोबत असताना
एकटेपणा जाणवत नाही
तुझ्याशी गप्पा मारताना
वेळेचही भान राहत नाही..
चल मित्रा.. बरीच रात्र झाली आता..
बाकीचे सगळे जेवणासाठी थांबले असतील..
सकाळी अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला जायचे आहे..
उद्या सकाळी भेटू...
त्याचा प्रेमळ निरोप घेऊन मी रूमवर आले..
आर्या आणि अनिलने स्कुबा डायव्हिंगचा प्लॅन केला होता..
माझा आणि भावाच गेल्या वेळचा स्कुबाचा अनुभव चांगला नसल्याने मी, वहिनी भाऊ आणि रिशू देवीच्या दर्शनाला जायचे ठरवले ...
रात्रीचे जेवण आम्ही आमच्या होम स्टे पासून जवळच असणाऱ्या शिवकृपा हॉटेलमध्ये जेवलो.. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवण अतिशय रुचकर होते..
जेवून परत येताना मालवणाची थंडी अनुभवायला मिळत होती..
कोंकणातील थंडीविषयी मी बऱ्याच पुस्तकातून वाचलं आहे.. त्याची मला आज आठवण आली..
इथली थंडी म्हणजे मोरपीस. हळुवारपणे गालवरून फिरताना जो आनंद वाटतो तशी. ब्लॅकेट पांघरून बसायचे एवढी बोचरी थंडी येथे नाही आणि मोकळय़ा अंगाने तुम्ही कसेही हुंदडाल तरी ते या थंडीला मान्य नाही.
शेकोटीचा इवलासा आस्वाद घ्यावा. त्याबरोबर गप्पांचा फड रंगावा. मध्येच थंडीची झुळूक हिवाळय़ाची जाणीव करून देत असते. सोबतीला भणभणारा वारा.. सागराच्या कडेला चंदेरी लाटांचा अनुभव घेत घेत कोकणची थंडी अनुभवायची..
मालवणातील थंडी खूप कडाक्याची नसली तरी स्वेटरशिवाय कुणाला फिरूही देत नाही.
ती अंगात हुडहुडी भरवणारी नसली तरी अंग मऊशार लोकरीच्या कपड्यात झाकायला लावणारी असते ..
या थंडीत मनसोक्त फिरताना पहाटे धुक्याची चादर पांघरलेला निसर्ग पाहायचा आणि सायंकाळी सूर्य अस्ताला जाताना निरोप देत स्वतःला वाळूत झोकून दय़ायचे. म्हणजे उबदार शालीचा आनंद वाळू कशी देते हे अनुभवायचे...
अशा या गुलाबी थंडीत अंगावर सोलापुरी चादर घेऊन आम्ही गुडूप झालो...
सकाळी सकाळी जाग आल्यावर रूमच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर कोळी बांधवांच्या होड्या किनाऱ्यावर लागल्या होत्या..
बाहेर जावून चौकशी केल्यावर कळलं की हे सारे कोळी बांधव रोज रात्री मासेमारीसाठी खोल समुद्रात जातात आणि सकाळी सकाळी ताजी मासळी घेऊन परततात.. पापलेट, सुरमई, बांगडा, मोठमोठ्या आकाराच्या कोळंबी प्रत्येकाच्या जाळ्यात अनेक प्रकारचे मासे होते..
इथून मासळी गोव्याला पाठवली जाते... रोज मालवण बंदरात मासळीचा लिलाव होतो.. आपणही घाऊक प्रमाणात मासे घेऊन आपल्या हॉटेल मध्ये फ्राय करण्यासाठी देवू शकतो..
आम्ही समद्रावर थोडा फेरफटका मारून फ्रेश होण्यासाठी परत आलो..