आज आमचे दोन ग्रुप झाले होते.मी आणि भावाचे कुटुंब आंगणेवाडी जायला निघालो आणि अनिल आर्या स्कुबा डायव्हिंग साठी.
मालवण वरून आंगणेवाडी साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.. रिक्षाने जाऊन येऊन पाचशे रुपये पडतात.
रिक्षाने साधारण तासाभरात आपण आंगणेवाडीत पोहचतो.. मालवण सोडले की सुरवातीला रस्ता सुस्थितीत आहे नंतर नंतर मात्र बऱ्यापैकी खराब रस्ता आहे..
दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंगणेवाडीच्या जत्रेला येतात.. शासनाने पुढाकार घेऊन जिथं जिथं रस्त्याची दुरवस्था आहे तिथं डांबरीकरण करून घेतलं तर भाविकांना होणारा त्रास नक्कीच कमी होईल..
रस्ता खराब होता पण सोबत असलेला हिरवागार निसर्ग , नागमोडी वळणे, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं यामुळे प्रवासाचा त्रास जाणवत नाही..
या प्रवासातील अजून एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे.. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच लांब पसरलेलं माळरानं.. असं माळरानं कुडाळ ते मालवण या प्रवासातही दिसतं परंतु अंगणेवाडीला जाताना जे माळरानं आपण बघतो त्याची व्याप्ती खूप मोठी आहे..
काळ्या खडकावर डौलात वाढलेलं सोनेरी गवत कुठं गुडघाभर तर कुठं अगदीच फूट दीड फूट..
काळ्या मातीने सोनेरी रंगाचा परिधान केलेला तो नैसर्गिक साज तिचं सोन्याहून पिवळं रूप अधिकच खुलवत होता..
ह्या माळरानाचा संबंध कुठंतरी अंगणेवाडीच्या देवीशी नक्कीच असावा..
कारण, भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी ' असं ठेवण्यात आलं आहे.भराड म्हणजे माळरान.
ही देवी कशी अवतरली याचीही सुरस कथा आजही कोकणवासियांच्या तोंडून ऐकायला मिळते..
लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या "माय भराडी" देवीच्या दर्शनाला आम्ही चाललो होतो..
रिक्षातून तिथं जाई पर्यंत रिक्षावाल्या काकांनी सांगितलेली आणि मी वाचलेली आंगणेवाडीच्या जत्रेविषयी माहिती थोडक्यात मी तुम्हाला सांगते..
मालवण तालुक्यातील आंगणेवाडी हे लहानसे गाव .
आंगणेवाडी या गावातील केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. म्हणजे हे आंगणे कुटुंबीयांचे खाजगी मंदिर आहे पण नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने ग्रामस्थांसोबत सामान्य नागरिकांना तिचे दर्शन खुले असते.
गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात.
दरवर्षी भरणाऱ्या दीड दिवसांच्या जत्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात.
देवीची यात्रा अमूक एका तारखेलाच होणार हे निश्चित नसते..
तिच्या यात्रेचा दिवस हा देवीला कौल लावून ठरवला जातो.. एकदा का दिवस ठरला की मग गावोगावी, मुंबईतील चाकरमान्यांना आणि इथल्या माहेरवाशिनींना निरोप धाडले जातात..
असं म्हणतात की जगाच्या पाठीवर कुठेही इथला ग्रामस्थ असो तो यात्रेला आवर्जून येतोच येतो..
या जत्रेमध्ये पहिला दिवस हा पाहुण्यांसाठी असतो तर दुसरा दिवस हा आंगणे ग्रामस्थांसाठी असतो.
जशी इथली यात्रा खास तसाच इथला नैवैद्यही खास असतो आणि आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो. साऱ्यांसाठी केवळ या आंगणेवाडीच्या महिलाच प्रसाद बनवतात.याची खासियत म्हणजे हा प्रसाद बनवताना त्यांना बोलण्याची परवानगी नसते. प्रसादामध्ये भोपळ्याचे वडे, भाजी, भात, वरण याचा समावेश असतो. हा प्रसाद केळीच्या पानावर मांडला जातो. हा प्रसाद देवीला दाखवण्याच्या प्रक्रियेला ' ताट लावणं' असं म्हटलं जातं.
हा प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी असते कारण या प्रसादाला देवी स्पर्श करते अशी भाविकांची धारणा आहे.
दीड दिवसांच्या भराडी देवीच्या यात्रेमध्ये देवीच्या उत्सवासोबतच दशावतारीचा खेळ देखील रंगतो. भाविकांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी खास बंदोबस्त असतो.
जत्रेची सुरस माहिती ऐकता ऐकता मंदिर कधी आलं समजलेच नाही.
बाहेरूनचं मंदिराची भव्यता लक्षात येते. दिवाळी असल्याने मंदिराच्या आवारात आकाश कंदीलांची सुरेख सजावट केली होती.. पूर्वी कौलारू असलेल्या मंदिराचा जीर्णोध्दार गेल्या काही वर्षांत झाला आहे. मंदिर आणि त्याचा परिसर अतिशय स्वच्छ आहे..
मंदिराच्या बाह्य आणि आतील बाजूस सुरेख नक्षीकाम आढळते..
गर्भगृहात लावलेलं भले मोठ्ठ काचेचं झुंबर आपलं लक्ष वेधून घेतं.
मंदिरात प्रवेश करताना रंगीबेरंगी धाग्यात विणलेला "माय भराडी' हा फलक आपले स्वागत करतो..देवीची मूर्ती स्वंयभू पाषाणातील आहे.
आपण देवीच्या ओटीचे सामान पुजाऱ्याला दिल्यानंतर ते पारंपरिक पद्धतीने देवीकडे आपल्या भल्यासाठी साकडं घालतात..
अशी साकडं घालताना मी गोव्याला मंगेशी मंदिरात बघितलं होतं.
दर्शनाला जास्त गर्दी नसल्याने शांतपणे आम्ही देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडलो.
शांत आणि प्रसन्न होऊन आम्ही मालवणकडे परत निघालो..