पाहिले न मी तुला - 2 Omkar Ashok Zanje द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाहिले न मी तुला - 2

४ नेने करंडक
आज नेने कॉलेजला एक महत्त्वाचा दिवस होता. दरवर्षीप्रमाणे सामाजिक उपक्रम राबवण्याचा मोठा कार्यक्रम असायचा- नेने करंडक! यासाठी कॉलेजमधले वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ठरविक ग्रुप केले जात. नेनेच्या वेगवेगळ्या वर्गातल्या टॅलेंटेड मुलांनी नाव देऊन टाकली. आज यादी जाहीर होणार होती. प्रिया आणि अनु अगदी नऊच्या काट्यावर कॉलेजच्या एलसीडीच्या इथे येऊन पोहोचले. त्याच्या आधीच सर्व जण येऊन पोहोचले होते. सगळे एलसीडीकडे डोळे लावून बसले काऊंट डाऊन झाला
३.. २.. १..
ओह नो..
ग्रुपची नावं बघून सर्व चकित झाले. यावेळी नियम बदलला होता. सगळे डिपार्टमेंट मिक्स केले होते आणि सर्व गुण लक्षात घेऊन ग्रुप पाडले होते. चार जणांचे दोन गट पडले होते. कवितासुद्धा हताश होती. पुढे नावे झळकली होती..


टीम रायगड-
प्रिया इन्स्ट्रुमेंट रायगड
अक्षय इएनटीसी कोल्हापूर
कविता इलेक्ट्रिकल सिंधुदुर्ग
साहिल इलेक्ट्रिकल रायगड
टीम राजगड-
अनु इन्स्ट्रुमेंट रायगड
पियुष इलेक्ट्रिकल रत्नागिरी
कबीर कॉम्प्युटर पुणे
अंकीता इएनटीसी सातारा


सगळेच हादरून गेले. पण आता काय जे आहे ते एक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता. सगळेजण माना खाली घालून परतले. सिलेक्ट न झालेले प्राचार्यांना शिव्या घालत होते. कॉलेजच्या कँटीन पेक्षा बाहेरचा नाना नानी कट्टा जाम फेमस होता. या हॉटेल चे मालक आगरी होते. आज मात्र कट्टा उदास वाटत होता.
नाना- आज पोरा येकदम गप गप बसलीन.
नानी- हं .. क झालं क मायती.
नाना- त्यांचे मुलं आपला कट्टा जाम गप गप वाटतंय.
नेहमीप्रमाणे सर्वजण आपापल्या मित्रांसोबत वेगवेगळे बसले होते. पण ह्यावेळी त्यांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. तसे विविध क्षेत्रात झळकलेल्या सर्वांचे नाव नोटीस बोर्ड वर येत असल्याने सगळे नावाने एकमेकांना वरच्यावर ओळखायचे. पण आता ही ओळख आणखी घट्ट झाली तीही या अशा धक्क्याच्या स्वरूपात! दुर्देव म्हणजे जवळचे मित्र विरुद्ध गटात होते. प्रिया-अनु, साहिल-पियुष, कविताला ज्याच्या कविता आवडायच्या तो कबीर, अक्षयला ज्याच्या नावाने चिडवायचे ती अनु..
एक नवीन मेंबर यात आला. सातारची पोलीसाची पोरगी अंकिता जी अक्षयच्या वर्गातच होती. प्रत्येक इव्हेंटसाठी जसे आपण व्हॉट्सप्प ग्रुप तयार करतो तसेच आज दोन ग्रुप तयार झाले. टीम रायगड आणि टीम राजगड.. पुढच्या नोटीस एलसीडीवर झळकणार होत्या. टीमच्या मेंबरची एकमेकांशी ओळख व्हावी यासाठी मध्ये खूप वेळ दिला होता. त्यानंतर कामे जाहीर होणार होती.


५ ईटी आणि एल आय सी
"कोणतं लेक्चर आहे बरं.. "टाइमटेबलवरून बोट फिरवत प्रिया शोधत होती.
'एलआयसी - लिनीयर इंटिग्रेटेड सर्किट'
अनु- अगं आज सरांनी एलआयसीचं पुस्तक आणायला सांगितलेलं
प्रिया- हो यार शीट चल फास्ट

"पियुष, इकडे आहे मी" साहिलने हाक मारली
"इथे काय करतोयस" पियुष
"दिसत नाय काय पेपर वाचतोय"
"बरं मी आलोच मला एक पुस्तक शोधायचंय"
"कुठलं ?"
"मशिन्ससाठी रे "पियुष म्हणाला
पियुष इलेक्ट्रिकच्या खणामध्ये पुस्तक शोधू लागला. बराच वेळ शोधल्यावर त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली.
'इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी बी एल थरेजा व्हॉल्युम २' (ईटी) हेच सांगितलं होतं सरांनी मशीन्स वन विषयासाठी. असं वाटतय एकच कॉपी आहे. हट यार.. आता हे दुसरीकडे ठेवावं लागणार. जर एखाद्या विषयाची पुस्तके एकदम कमी असतील तर ती पुस्तके दुसऱ्याच डिपार्टमेंटच्या रॅक मध्ये ठेवायचे. कारण तिकडे कुणी शोधत नाही मग आपल्यालाच पुस्तक मिळतं. ही आयडिया काही मुलांना माहीत होती. पियुष त्यापैकीच एक!
पियुषने गुपचूप पुस्तक दुसऱ्या ब्रांच च्या रॅकमध्ये नाव दिसणार नाही असे उलटे ठेवले आणि तो निघाला.
"मी आले पुस्तक घेऊन तू थांब इथेच" प्रिया अनुला म्हणाली
" बरं " अनु
प्रिया एलआयसीचं पुस्तक शोधू लागली .
याच्यामारी टोपी भेटत का नाही यार हे पुस्तक..
इतक्यात तिची नजर त्या उलट्या ठेवलेल्या पुस्तकावर गेली. तिने ते बाहेर काढले.

इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी (ईटी) हे पुस्तक तर आम्ही गेल्या सेमला वापरलेल. इथं कुणी ठेवलं असेल ? पुस्तक लपवायची आयडिया प्रियालाही माहीत होती. तिने एक वहीचा कागद फाडून त्यात लिहीले..
"बाळा तुझी जागा इथे नाही .आपल्या जागी परत जा. तुझं इथं काय काम !"
आणि ही चिठ्ठी त्या पुस्तकात ठेवली. पुस्तक पहिल्यासारखा ठेवलं.
कोण तो शहाणा असेल त्याला टोला मारण्यासाठी तिने हे केलं .
अथक प्रयत्नानंतरही तिला एलआयसीचं पुस्तक नाही भेटलं. तेव्हा तिच्या डोक्याची ट्युब पेटली. ती पटकन दुसऱ्या ब्रांचच्या कपाटाकडे गेली. पहिल्यांदा जिथे कोणी जायचे चान्सेस कमी तिकडे गेली पॉलीमरचा रॅक. खालच्या कप्प्यात तिला एलआयसीचं बुक मिळालं. आपल्याच वर्गातल्या कुणीतरी शहाण्यांनी हे लपवले तिला माहित होतं.
पुस्तक घेऊन प्रिया बाहेर आली.
"काय गं किती वेळ" अनु चिडलेली
"तुला सांगते चल"
"राहु दे तुझं तुझ्याकडेच" अनु
चला कॉलेज झालं एकदाचं! अनु प्रिया गेटपाशी आल्या. अनु गेटकडे वळणार इतक्यात कुणाचा तरी जोरदार धक्का तीला लागला .
"ए यडपट दिसत नाय काय तुला बावळट साला"
अनुने रागाने पाठी वळून पाहिले. एक सुंदर मुलगा समोर होता. थोडा धष्टपुष्ट, कानात बाळी, गोरापान, डोळ्यावर गॉगल, ब्लॅक टी शर्ट आणि कार्गो पँट. सॉरी सॉरी सॉरी तो खूप वेळा सॉरी म्हणत होता. पण त्याच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नव्हतं. ती त्याच्याकडे एकटक बघतच होती..
तिकडून पियुष आणि कविता गप्पा मारत येत होते. त्यांनी हे पाहिले.
पियुष मस्करीत म्हणाला
"बघ तुझो तो कबीर त्यान काय नवीन आयटम काढलीन असा वाटता"
"र मेल्या तू गप्प रव रे" कविता लाजत म्हणाली
पियुष जोर-जोरात हसू लागला
प्रियाने एक जोरात टपली मारली अनुच्या डोक्यात. "आई ग " ती विव्हळली.
"अगं गेला तो कधीच' प्रिया म्हणाली
" बरं ते सोड तू येतेस ना आज पूजा आहे आमच्याकड"
"हो आहे माझ्या लक्षात पण मला चेंज करून यावे लागेल "
"मग तू माझ्यासोबत चल आजीच्या घरी
मग निघू आपण "
" अगं मग माझी एसटी चुकेल"
" त्यानंतर नाही का मग?"
"आहे पण साडेसहाला डायरेक्ट रामदास पठार "
"मग तिच्या ने जाऊ की"
"ओके" खांदे उडवत अनु म्हणाली
केशरी सदरा, पांढरा लेहंगा आणि केसाची लांब वेणी घालून प्रिया सोज्वळपणे तयार होऊन आली. त्या दोघी महाड एसटी स्टँड वर आल्या. थोडा काळोख पडला होता. अखेर त्यांची बस लागली. अनुने प्रियाला पुढेच बसायला सांगितले. कॉलेजची मुलं थांबली होती . त्यांची खूप गर्दी होती.
एसटी सुरू होऊन दहा मिनिटे झाली होती . प्रियाचा रुमाल हातातून निसटला. ती रुमाल उचलायला पहिल्या सीटवरून खाली वाकली. तिचे लक्ष अनावधानाने शेवटच्या सीटवर केले. तिच्या भुवया उंचावल्या. मागच्या सीटवर काही प्रेमी जोडप्यांची कारस्थाने चालू होती. ती कॉलेजमधलीच मुलं मुली होती. तिला एकदम कसेतरी वाटले. आणि रुमाल पटकन उचलून ती सीटवर बसली. तिच्या चेहऱ्यावरून अनुला सर्व कळले. पण ती रोज प्रवास करत असल्यामुळे या सगळ्याची तिला सवय झाली होती. अखेर अनुचं घर आलं. कंडक्टरने बेल दिली. दोघी उतरल्या. दरवाजा धाडकन आदळला.. प्रिया थोड्या वेळासाठी स्तब्ध झाली.. सत्यनारायणाची पूजा व्यवस्थीत पार पडली. त्यानंतर अनुच्या पप्पांनी प्रियाला घरपोच केले.
प्रिया आजचा दिवस कधीच विसरणार नव्हती. तिने नाईट लॅम्प बंद केला आणि एलआयसीचं पुस्तक बंद करून डोळे मिटले..



६ नवी मैत्रीण
इएनटीसी डिपार्टमेंटची आज पालक सभा होती. सगळे जण वर्गात गोळा झाले. अंकिता एकटीच बसली होती. कारण तिचे पोलीस वडील ती लहान असतानाच वारले होते. तिच्या आईला शेतीची कामं सोडून पाटण वरून एवढ्या लांब येणं शक्य नव्हतं. तिला बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर दिसू लागल्या.
"अंकीता साळुंखे तुम्ही बाहेर जाऊ शकता" सरांनी तिला बाहेर काढलं. अक्षयलासुद्धा बाहेर काढलं.
"हाय अक्षय"
"हाय काय ग तु हितं कशी काय तुझं पप्पा न्हाई आलं का" अक्षयने विचारलं
"अर माझं बाबा या जगात न्हाईत" अंकिता नाराज झाली
"सॉरी" अक्षय
"असू दे पर येक सांग तू हिकडं काय करतुईस "
"त्याच काय हाय की माझे वडील पोलीस होते आणि मी लहान असतानाच ते वारले "
दोघांनाही एकमेकांच्या भावना कळत होत्या. दोघांनी आपला मोर्चा नाना नानी कट्ट्याकडे वळवला. कॉलेजच्या कॅन्टीन पेक्षा या कट्ट्यावरच मुलं जास्त असत. कारण या हॉटेलचे मालक नाना नानी बोलायला एकदम वंगाळ असले तरी आतून मात्र एकदम चांगले होते. आगरी होते ना म्हणूनच.. अक्षय आणि अंकिताने चहा मागवला.
"बालू जा त्या घाटी पोराना च्या देऊन य"
घाटी शब्द ऐकल्यावर अंकिताच्या डोक्यात झिणझिण्या आल्या.
"हितली लोकं आपल्याला घाटी म्हणत्यात मला लय राग येतो बघ "अंकिता चिडून म्हणाली
अक्षय- तर काय अन म्हणत्यात कोकणी लोक साधी भोळी
अंकिता - असं कोण बोललंय
अक्षय- अगं आपल्याला कविता नाय का होती .. एका कवीने भारताचं वर्णन केलंय त्यात लिहिलंय कि कोकणी माणसं फणसासारखी अस्त्यात.
बाहेरून काटेरी आनी आतून गोड.
अंकिता- म्हंजी तुला बी तसं वाटतय व्हय?
बोलता बोलता तिच्या हातातून चहाचा कप निसटला आणि तो फुटून काचा विखुरल्या .. नेमका तिचा पाय त्यावर पडला आणि ती जोरात किंचाळली..
तोच नानी धावत आल्या.
"काय ग पोरी जरा हलू पी च्या, कप फोरलास तो फोरलास पुन तुला लागला कती, रगत यतय, बघू"
असं म्हणत त्यांनी पटकन तिला मलमपट्टी केली.
ती नानींकडे बघतच बसली.
थोड्या वेळाने अंकिता नॉर्मल झाली. इतक्यात तिकडून तो हँडसम मुलगा आला कविता करणारा. कॉम्प्युटरचा हो तोच पुण्यातला कबीर .
"काकू उपीट आहे का" पुणेरी शैलीत त्यानं विचारलं
"नाय बा, इकर उपमा न पव नाय भेटत, ते फक्त तुमचे पुण्यानूच भेटतान, वरापाव हाय"
पुण्यातल्या या उपीट च्या जोकवर कट्ट्यावर हशा पिकला .
"एक वडापावच द्या मग काय करणार " कानात पुन्हा इयरफोन टाकून कबीर टेबलकडे गेला. पालकसभा संपली आणि कॉलेजही सुटले. अक्षय आणि अंकिताने एकमेकांना बाय केले आणि ते आपापल्या वाटेला निघून गेले.
व्हाट्सअप ग्रुप सुरुवातीला शांत होते. मग जिएम जिएन ला सुरुवात झाली. त्यानंतर हाय हॅलो. एकमेकांचं नाव-गाव इंट्रोडक्शन वगैरे वगैरे.. टीम मधल्या लोकांची वरचेवर तर तोंड ओळख झाली पण सोबत काम करताना त्यांचे पटणार का यावर शंका होतीच. ग्रुप वर मेसेज आला एक फेब्रुवारीला पहिला टास्क जाहीर होणार आहे. ही ॲक्टिव्हिटी दरवेळेस प्रमाणे एका महिन्याची न ठेवता वाढवून तीन महिन्यांची केली आहे. दोन निळ्या टिक आल्या म्हणजे सर्वांनी
मेसेज वाचले. खरं तर काही जण व्हाट्सअप वर नव्हते.