९
@ अंकिता
त्या दिवशी घरी पोहोचायला उशीरच झाला. म्हणजे ती बस, एकतर गर्दी, त्यात ट्रॅफिक. थकले अगदी. पण काही हरकत नाही. सवय तर हवी. त्याची तयारी जेवढ्या लवकर करेन तेवढे चांगले. माइंड शुड बी रेडी टू ॲक्सेप्ट. रेस्ट इज टेकन केअर आॅफ आॅटोमॅटिकली! शेवटी काय एव्हरी थिंग इज इन वन्स ब्रेन .. आणि मी सांगणार तरी काय होते? बाॅयफ्रेंडला भेटायला गेले म्हणून? अँड टिल देन, पुअर अख्खि डिडन्ट क्वालिफाय टू बी काॅल्ड ॲज अ बाॅयफ्रेंड! जरी वन वे ट्रॅफिक मध्ये मी त्याला आॅलरेडी बुक करून ठेवले होते! सो आय प्रिटेंडेड टू बी अ बीट टायर्ड. आणि मग समोर मायक्रोबायोचं पुस्तक उघडून बसले. अभ्यासात गुंगलेय दाखवत! रात्री जेवायला दहा मिनटे बाहेर आले तितकीच. तरी ममा दुसऱ्या दिवशी विचारत आलीच.. केईएमला गेली होतीस? हर फ्रेंड साॅ मी देअर म्हणे. कठीण आहे. कसाबसा आय कुड होल्ड द फोर्ट. बट ममाज फ्रेंड्स इन केईएम आर गोईंग टू थ्रो अ स्पॅनर इन द प्लॅन्स? फाॅर अ मोमेंट आय थाॅट आय विल टेल आॅल टू माॅम. आणि बेग फाॅर ॲम्नेस्टी. बट धिज पेरेंट्स आर अन प्रेडिक्टेबल. ममा पपांना सांगेल आणि आय नो व्हाॅट कॅन हॅपन. त्यापेक्षा आगे आगे देखिए होता है क्या.. ममा तशी चांगली आहे. आय कॅन टेक हर इन काॅन्फिडन्स. पण तरीही.. द टाइम इज नाॅट राइप आय सपोझ! फळ पिकले की झाडाची ब्रांच वाकते. वन कॅन प्लक द फ्रुट इझिली. सो लेट द सिच्युएशन बी राइप! अँड आय विल रीप द फ्रुट्स आॅफ माय हार्ड वर्क!
हार्ड वर्क! इमॅजिन इंटरकाॅलेजिएट लव्हस्टोरी. अखिलेश मला भेटणार कसा? कुठे? नोइंग हिम इट इज अनलाइकली ही विल मेक द मुव्ह. म्हणजे या चेसच्या गेम मध्ये मलाच मुव्हज करून किंगला चेकमेट करायला हवे! त्यासाठी वर्क हवे.. हार्ड वर्क. पण तो किंग आहे का? की प्रिन्स? इट्स सिंपल.. मी क्वीन झाले तरच ही विल बी अ किंग! म्हणजे त्याला राजा बनवून चेकमेट करण्यासाठी आय हॅव टू टेक द लीड! चेझ हिम विथ धिस मेंटल चेस!
आता माझे डोकं चालेनासं झालं. काय करावे? हाऊ टू गो अबाऊट म्हणजे त्याची भेट होईल? केईएम मध्ये लेक्चर्स? लेक्चर सिरीज? पण ती क्लिनिक्स जनरली थर्ड इयर वाल्यांसाठी असतात. मी जाईन पण तो थोडीच तिकडे येणार? नाहीतर वाॅर्डातली क्लिनिक्स? दॅट इज अ मॅड आयडिया. कारण त्या छोट्या क्लिनिकमध्ये मी कशी जाणार होते? विचार करून करून आय वाॅज गेटिंग टायर्ड. रेग्युलर भेट व्हायला काहीतरी कारण हवे.. आणि मॅडनेस शिवाय हे कठीण आहे. तरीही ममा'ज डिटेक्टीव्ह फ्रेंड्स? जोवर अख्खिला पटवत नाही तोवर तरी या फ्रेंड्स कम एनिमीज कडून सांभाळून रहायला हवे. धिस इज गोइंग टू बी रियली क्रेझी. म्हणजे मी तिकडे गेले की इकडे ममाच्याकडे अलार्म वाजणार? फायर स्टेशनसारखा. नि मग ममा आगीचा बंब घेऊन येणार टू डाऊज द फायर. येताना पपा विल बी ड्रायव्हिंग दॅट फायर व्हॅन.. आणि एकदा ते आले की आग विझवण्याऐवजी पसरवणार.. अँड माय लव्हस्टोरी सुरू होण्याआधीच विझून जाणार? इमॅजिन फायर ब्रिगेड आग विझवण्यासाठी असते, इथे पापा द फायर मॅन, विल वर्क एक्झॅक्टली अपोझिट! कठीण आहे! पण तरीही आय वोन्ट गिव्ह अप!
व्हेअर देअर इज अ विल.. देअर इज अ वे! आणि इफ यू वाँट समथिंग डियर्ली.. यू हॅव टू गेट इट. आॅफकोर्स तसा मोठा काही वे आऊट मिळाला असं नाही. बट फाऊंड अ वे व्हेअर ही कॅन कम टू माय काॅलेज! त्या आधी मला ही तिकडे जायला लागेल.. वाॅव!
म्हणजे झालं असं की आय वाॅज वाॅकिंग थ्रू द काॅलेज काॅरिडाॅर. तिथे सगळे ते बोर्ड वगैरे असतात. त्यात एक मराथी वाङमय मंडळाचा बोर्ड होता. आजवर मी कधी त्यावरचे काही वाचायला गेले नव्हते, पण त्यादिवशी सडनली आय नोटिस्ड इट. मराथी माझी मदर टंग, पण मला ती तशी परफेक्ट जमत नाही. तोंडात इंग्रजी वर्ड्स आल्याशिवाय राहात नाहीत. आणि मराथी वाचन माझं जेमतेमच आहे. पण आज हे मराथी वाङमय मंडळ केम टू माय रेस्क्यू.. टेम्पररी का होईना, काहीतरी सोल्यूशन.. थोडीफार केली तिकडमबाजी.. पण शेवटी जमलेच..
आता चलो केईएम.. दॅट टू आॅन ॲन आॅफिशियल व्हिजिट!
*****
@ अखिलेश
आंधळा मागतो एक डोळा नि देव देतो दोन, तेही रेबॅन गाॅगल सकट!
.. म्हणजे आमचे ते घनघोर चर्चासत्र पार पडले. आम्ही अंकिताच्या काॅलेजात जाऊ कदाचित म्हटलेले पण मध्ये प्रॅक्टिकल्स नि एक्झाम्समुळे वेळ कसला मिळतोय. त्यामुळे सध्या ती प्रेमकहाणी अधांतरी लटकत होती. सेकंड इयर आहे म्हणून ठीक, थर्ड इयरला तर नुसती तिची आठवण काढायलाही वेळ मिळणार नाही कदाचित. खरेतर तोवर आमची प्रेमकहाणी बऱ्यापैकी पुढे सरकली असेल. अगदी फास्ट फाॅर्वर्ड नसली तरी जुन्या आर्ट फिल्मसारखी तरी. होपफुली!
तर झाले असे की नेहमीप्रमाणे कट्ट्यावर बसलेलो. प्रॅक्टिकल्स नुकतेच संपलेले. मेसमध्यल्या पातळ वरणात आज डाळ सापडण्याचा योग आलेला. त्यामुळे पोटभर जेवून ढेकर देत बडिशेप चघळत बसलेलो. बाकी काही असो, आमच्या मेसमध्ये बडीशेप मात्र नेहमीच चांगल्या शेपमध्ये असायची! सकाळी ते फार्म्याकाॅलाॅजीचे प्रॅक्टिकल म्हणजे एक बोअरिंग. लोक कसे तो फार्म्याक शिकतात विषय देवास ठाऊक .. असे म्हणेतोवर आठवण आली, होऊ घातलेल्या सासूबाई फार्म्याकमधल्याच आहेत! असोत. मनात हा विचार येण्यास नि अंकिता समोर उभी ठाकण्यास एकच गाठ पडली. क्षणभर वाटले की भास असेल. म्हणतात ना दिवसरात्र एखाद्याचा विचार केला की त्या व्यक्तीचा भास व्हायला लागतो.. पण गेले काही दिवस मी अभ्यासात बिझी होतो. म्हणजे कदाचित बॅक आॅफ द माइंड विचारांनाही ही थियरी लागू पडत असावी! पण नाही! हा भास नव्हता. ते सत्य होते..
"ओह! तू? व्हाॅट अ सरप्राईझ!"
"आयॅम आॅन ॲन आॅफिशियल ड्यूटी.." पुढे ती हळूच फाॅर अनआॅफिशियल वर्क म्हणाली हळूच. मी ते ऐकलेच.
"सो व्हाॅट ब्रिंग्स यू हियर?"
"हे इन्व्हिटेशन!"
"वाॅव! कसलेय?"
"सी फाॅर युवरसेल्फ.."
इतक्यात आमच्या फार्म्याकच्या मॅडम समोरून आल्या..
"अंकिता? तू इकडे?" डाॅ.देशपांडे मॅडम.
"ओह! मॅडम तुम्ही!"
"हे इन्व्हिटेशन द्यायला आलेय. मराठी वाङमय मंडळाचा प्रोग्राम आहे.."
"वा! तू मराठी वाङमय मंडळात? आईला सांग, आठवण काढली होती.."
"सांगते. ममा म्हणाली, त्या दिवशी तुम्ही फोन केलेलात म्हणून .."
"मी? छे गं. वेळच कुठेय. आणि मी आजच जाॅइन होतेय. दोन महिने बाहेर होते मी.. एनी वे. मी निघते.." मग माझ्याकडे वळून म्हणाल्या,"दुसऱ्या काॅलेजचे आमंत्रण आहे. अटेंड करा."
"यस मॅडम."
देशपांडे मॅडम निघून गेल्या.
"माय ममा'स फ्रेंड.."
मग मी ते आमंत्रण पत्र उघडले. एका कागदावर टाइप्ड. टी एन मेडिकल काॅलेज आणि नायर हाॅस्पिटल आयोजित.. लघु एकांकिका.
असले कार्यक्रम होत राहतात. पण दुसऱ्या काॅलेजातून कोणाला बोलवण्याची पद्धत नाही. मला संशय आलाच, बहुतेक अंकितानेच काहीतरी चक्कर चालवले असणार.
"मस्त आहे हे! पण तू म वा मं जाॅइन केलेयस?"
"व्हाय? ओरिजिनली मी मराथी मुलगीच आहे ना?"
तिच्या आवाजात चक्क थोडा डिफेन्सिव्ह टोन होता! काही असो मला तिच्या काॅलेजात जायला कारण मिळाले. आणि ते पुरणवण्याचाच तिचा प्लॅन होता! कसे तिने जमवले ते पुढे मला तिने सांगितले ही ते एकदा.
"एवढ्या दुरून आलीयस. काॅफी?"
"यस. व्हाय नाॅट!"
"आमच्या कँटीनमधला सामोसा इज गुड.. खातेस?"
"चालेल."
"एकांकिका कुणी बसवल्यात?"
"माय काॅलेज मेट्स.."
"तू अटेंड केल्यास रिहर्सल्स?"
"नाही रे!"
"पण तू मराठी वाङमय मंडळात..?"
"लेट दॅट बी. पण तू येशील ना? आय हॅव ॲश्युअर्ड देम.."
"आॅफ कोर्स. तुमने बुलाया और हम चले आएं.."
बोलता बोलता मी जीभ चावली. पण माझी ही सवय आहे. मिळाले काही कारण की मला गाणी सुचतात!
"मी वाट पाहते. तुला माझा नंबर देऊ का? यू काॅल अप.."
"मोबाईल?"
"हुं. घरचा पण देते. पण घरी रात्री फोन कर. बिटवीन सेव्हन टू एट.."
"करतो.."
जेवण झाल्यानंतर ही मी पोटात थोडी जागा बनवून एक प्लेट सामोसा ॲडजस्ट करून बसवला. मग त्याच्यावर एक कप काॅफी! आज कुठल्यातरी काॅफी शाॅपवर लिहिलेय म्हणे.. अ लाॅट कॅम हॅपन ओव्हर ए काॅफी! आमच्या स्टोरीला पण ह्या कप आॅफ काॅफीमुळेच पुश मिळाला होता!
ती जायला निघाली तसा मी माझ्यातला अभिनेता जागा केला.. काहीतरी आठवल्यासारख्या सुरात म्हणालो,
"आज गुरूवार आहे ना?"
"यस. थर्सडे!"
"ओह! आता मला आठवले.. मला आज बाँबे सेंट्रलला जायचे आहे. माय फादर्स ट्रेन बुकिंग टू बी डन.. चल एकत्रच जाऊ.. गुड यू केम टुडे. नाहीतर मी विसरलोच होतो. यू नो नंतर तिकिटं मिळत नाहीत!"
माझ्या वडलांना गावी जायचे होते हे खरे, पण ते चार पाच महिन्यांनी. उगाच त्याची आठवण झाल्याचे नाटक करत मी अंकिताबरोबरच्या पहिल्या बस प्रवासाला तयार झालो!
१६६ नंबरच्या बसचे अनंत उपकार आहेत! एकतर तो अर्धा पाऊण तासाचा निवांत वेळ. बसचा वरचा मजला. दुपारी रिकामी बस! बाजूला अंकिता. समोरून येणारा वारा! काॅलेजात नि कॅटिनमध्ये तशा गप्पा मारता येतात पण विषय सुचत नाहीत. प्रवासात गप्पा मारायला विषयाचे बंधन नाही. त्या पहिल्या प्रवासात आम्ही कितीतरी बोललो. आज आठवत काही नाही. लोअर परेलला माझ्या घरावरूनच बस जाते. अंकिताला लांबून माझी दुमजली चाळ वजा बिल्डिंग दाखवून घेतली. बरे वाटले! म्हणजे माझ्या एकूण स्थितीचा अंदाज तिला यावा. माझी दोन्ही मने अजून तशीच ॲक्टिव्ह होतीच. फक्त अंकिताचा मोह तसा डायरेक्ट सोडवत नव्हता. पण ह्या श्रीमंताघरच्या राजकन्येला सगळे आधी ठाऊक असायलाच हवे.. हे मात्र दोन्ही मनांना एकाच वेळी पटत होते!