शालिनीच काय चुकलं ? - भाग २ Dilip Bhide द्वारा नाटक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शालिनीच काय चुकलं ? - भाग २

शालिनीचं काय चुकलं ?

भाग २

भाग १ वरुन पुढे वाचा

शालिनी मॅडमनी सर्व वृत्तान्त कथन केला. अगदी जसं घडलं होतं तसा. नंतर पोलिसांनी प्रिन्सिपल आणि इतरांची चौकशी केली आणि ते निघून गेले.

दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी देण्यात आली आणि सगळा  स्टाफ आणि शिक्षक लोक अन्त्यसंस्कारात सामील झाले. पोलिसांनी ‘आत्महत्या’ म्हणून केस ची नोंद केली. अश्या प्रकारची घटना शाळेत प्रथमच घडत होती, त्यामुळे सर्वांवरच शोक कळा पसरली होती. अत्यंत व्यथित अंत:करणाने निलेशच्या आई, वडिलांचे सांत्वन करून सगळे आपापल्या घरी गेले.

त्याच मोहल्यात एका गल्लीत वेगळंच नाटक चालू होतं. एका मोहल्ला नेत्याच्या घरी बैठक भरली होती. एक जण नेताजीला सल्ला देत होता.

“बाबूराव साहेब, आपल्याला या घटनेचा चांगला उपयोग करून घेता येईल.” – शंकर

“शंकऱ्या, काय ते नीट सांग. अर्धवट नको. कोणती घटना ? आणि तिचा कसा फायदा होणार आहे ?” बाबूरावांनी शंकरला दम भरला.

“साहेब, त्या रवीशंकर शाळे मधे एका मुलानी आत्महत्या केली आहे काल. आपण त्यांच्या कडे जाऊन भेटलं पाहिजे.”

“हूं, चांगलं सुचवलस. उद्याच  जाऊ.” बाबूरावांचा होकार.

“आपला लोकल पेपर आहे न ‘स्वाभिमान’, त्याच्या पत्रकाराला घेऊन जाऊ. पब्लिसिटी पण मिळेल.” शंकर ने पुस्ती जोडली.

दूसरा चेला, उत्तम, तो म्हणाला, “साहेब तुम्ही थोडी पैशांची मदत केली त्यांना, तर अजूनच चांगलं होईल.”

“अरे, हा काही अॅक्सिडेंट नाहीये, मदत करायला. पण ठीक आहे एक १०००० ची मदत आपण देऊ शकतो. फोटो छापून यायला पाहिजे”. – बाबुराव

तिसरा चेला, सुशील, तो म्हणाला 

“साहेब माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. सांगू का ?”

मग त्यांनी त्यांची आयडिया सांगितली. काहींना पटली काहींनी विरोध केला.

बराच वेळ चर्चा झाल्यावर साहेबांना ते पटलं.

दुसऱ्या दिवशी गावातल्या लोकांना एक वेगळच नाटक पाहायला मिळालं.

सुमारे पन्नास एक लोक फलक झेंडे वगैरे घेऊन पोलिस स्टेशन च्या समोर निदर्शन करतांना दिसून आले. फलकांवर “ निलेशला न्याय मिळेल का ?” असं लिहिलं होतं आणि लोकं मोठमोठ्यांनी घोषणा देत होते. एक जण बोलत होता आणि बाकीचे साथ देत होते.

“We want”– घोषणा,   “Justice” – पब्लिक

“इनकलाब” – घोषणा ,  “झिंदाबाद”  - पब्लिक

“लेके रहेंगे, लेके रहेंगे” – घोषणा ,  “निलेश को न्याय लेके रहेंगे” – पब्लिक

असा सगळा गदारोळ अचानकच सुरू झाला. पोलिस स्टेशन मधे असलेले पोलिस बाहेर धावले. ते बाहेर आल्यावर लोकांना अधिकच चेव आला. पोलिस त्यांना शांत रहा आणि काय प्रकार आहे ते सांगा असं म्हणत होते पण कोणीही ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत नव्हते. आरडा ओरडा अजूनच वाढला. आठ दहा पोलिस शांत पणे बघत होते. पण परिस्थितीला विपरीत वळण लागलं तर पूर्ण तयारीनिशी सावध पवित्रा घेऊन उभे होते. तेवढ्यात नेताजी बाबुराव तिथे येऊन पोचले. त्यांच्या मागे मागे शंकऱ्या, निलेशच्या बाबांना हात धरून घेऊन आला. बिचारे  निलेशचे बाबा, हा सगळा गोंधळ बघून फारच भेदरलेले दिसत होते. त्यांची या भानगडीत पडायची मुळीच इच्छा नव्हती पण शंकऱ्याने त्यांचा हात घट्ट पकडून ठेवला होता. ते इतके घाबरलेले होते की त्यांचं काही चालतच नव्हतं. पाठोपाठ स्वाभिमान दैनिकाचा वार्ताहर आणि फोटोग्राफर पण येऊन पोचला. या तिघांना बघितल्यावर पोलिसांना काय चाललंय त्याची पूर्ण कल्पना आली. आता हळू हळू रिकाम टेकड्या लोकांची गर्दी जमायला लागली होती. पाहता पाहता बरीच जनता जमा झाली आहे असं पाहून, बाबूराव समोर आले, आता पोलिस आणि जमाव यांच्या मधे बाबुराव उभे होते. आणि त्यांनी आवेशाने भाषणाला सुरवात केली. माइक ची सोय तिथे नव्हती म्हणून जोर जोरात ओरडून ते भाषण करत होते.

“लोक हो तुम्हाला हे माहीत असेल की रवीशंकर शाळेतल्या निलेश नावाच्या मुलाने आत्महत्या केली. आता पर्यन्त तुम्हाला हे ही कळलं असेल की त्यानी परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न केला म्हणून. पण लोकहो, एवढ्याश्या कारणा साठी कोणी आपला जीव देत नाही. मित्रांनो त्याला शाळे मधे प्रचंड मारहाण झाली त्यामुळे तो चिमुकला जीव फार घाबरून गेला आणि त्यानी, मनाच्या त्या अवस्थेत सरळ तलावात जाऊन जीव दिला. आता मला सांगा, यांना शिक्षक म्हणायचं की हैवान. तुम्हीच ठरवा. या साठीच हा मोर्चा घेऊन आम्ही आलो आहोत. शाळेला त्यांचं नाव खराब होण्याची भीती वाटते आहे म्हणून हे सगळं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालला आहे. पण आम्ही सुद्धा प्रतिज्ञा केली आहे की आम्ही निलेशला न्याय मिळवून देऊ. निलेशला झालेल्या मारहाणीचा कुठेही साधा उल्लेख सुद्धा नाहीये. या सगळ्या प्रकरणात हलगर्जी पणा केल्या बद्दल इंस्पेक्टर साहेबांना निलंबित करावं अशी आम्ही या मंचावरून जाहीर मागणी करत आहोत. आता पर्यन्त बरीच गर्दी जमली होती आणि घोषणांना सुरवात झाली होती.

मध्येच “शालिनीबाई मुर्दाबाद, इंस्पेक्टर मुर्दाबाद”  अश्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. इंस्पेक्टर साहेबांनी बाबूरावांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण बाबूरावांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. हळू हळू जमावाला चेव येत होता. बाबूरावांची माणसं पद्धतशीर पणे जमावाला भडकावण्याचं काम करत होती, पोलिस स्टेशन वर जेमतेम १०-१२ पोलिस होते. आता जमाव शेकड्याच्या पुढे गेला होता. जमाव हिंसक बनण्याची शक्यता दिसत होती. इंस्पेक्टर साहेबांनी जिल्ह्याहून जास्तीची पोलिस कुमक बोलावली होती. ती यायला अजून वेळ होता.

बाबूरावांची माणसं आता जमावाला चिथावणी देण्याचा उद्योग करत होती,

“शालिनीला अटक करा” कोणी तरी अश्या घोषणांना आता सुरवात केली. 

आता संध्याकाळ होत आली होती. प्रकाश जरा अंधुक झाला होता. अश्या वेळेस अचानक कोणी तरी पोलिस स्टेशन वर आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली. थोड्याच वेळात तिथे एकच धुमाकूळ सुरू झाला. नवीन पोलिस कुमक येऊन पोचली होती. त्यांच्या मदतीने जमावाला काबूत आणण्यात आलं, सौम्य लाठी चार्ज झाला. पोलिसांनी २० – २५ लोकांना ताब्यात घेतलं. पोलिस बाबूरावला शोधत होते पण तो केंव्हाच पसार झाला होता. शेवटी लाठीचा मार बसल्याने लोकं पांगले, सर्व काही शांत झालं. पोलिस हुश्श करून बसले. पकडलेल्या लोकांची चौकशी सुरू झाली.

संध्याकाळ पर्यन्त गावात झालेल्या निदर्शनाची आणि दगड फेकीची ही बातमी, जिल्हया पर्यन्त जाऊन पोचली, तिथले वार्ताहर लगेच गावात येऊन पोचले. पोलिसस्टेशनमधे त्यांची गर्दी झाली. प्रत्येकाला इंस्पेक्टर साहेबांना प्रश्न विचारायचे होते. इंस्पेक्टर साहेबांनी झालेला प्रकार सांगितला  आणि चौकशी सुरू आहे असं सांगितलं. पत्रकारांचं समाधान काही झालं नाही पण इंस्पेक्टर साहेब काही बोलायला निदान आत्ता तरी तयार नव्हते. मग सगळे बाबूरावांच्या घरी गेले आणि तिथे बाबूरावांनी तिखट मीठ लावून, निलेशला झालेल्या मारहाणीचा मुद्दा उचलून धरला. आणि शालिनीबाईंच्या अटकेची मागणी केली.

दुसऱ्या दिवशी लोकल पेपर स्वाभिमान मधे मारहाणीची बातमी प्रसिद्ध झाली आणि गावात एकच गदारोळ उठला. लोकं आणि बरेच पालक शाळेत जमा झाले. प्रिन्सिपल सरांनी समोर येऊन सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. काही वेळानंतर परिस्थिती हाता बाहेर चालली आहे असं पाहून पोलिसांना बोलावण्यात आलं.

परिस्थिती काबूत आली. पण वरतून पोलिसांना आदेश आला की जन आक्रोश बघता, शालिनी मॅडम ला अटक करा. झालं. शालिनीबाईंना अटक झाली. त्या दिवशी शुक्रवार होता त्यामुळे त्यांना जिल्हा कारागृहात पाठवण्यात आलं. आता सोमवार पर्यन्त त्यांना जेल मध्येच राहावं लागणार होतं.

शाळा ज्या संस्थेची होती तिचे तीन संचालक गावातच होते आणि ते क्षणा क्षणाची माहिती घेत होते. त्यांनी एक बैठक घेतली त्यात प्रिन्सिपल आणि दोन वरिष्ठ शिक्षकांना पण बोलावलं होतं. शालिनीबाई एक लोकप्रिय शिक्षिका होत्या आणि सर्वांना त्यांच्या बद्दल फार आदर होता. गेली २० वर्ष त्या शाळेत शिकवत होत्या, आणि श्रेष्ठ वरिष्ठ शिक्षिका होत्या. आता पर्यन्त कुठलाही डाग त्यांच्या कार्य पद्धती वर लागला नव्हता. बैठकीत सर्वांनी मिळून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. बैठकीत सर्वानुमते असं ठरलं की शालिनी बाईंना सर्व प्रकारे मदत करायची. त्यांच्या पाठीमागे संस्था भक्कम पणे उभी राहील.

संस्था तुमच्या पाठीशी आहे हे शालिनीबाईंना कळवण्या साठी आणि त्यांना धीर देण्या साठी प्रिन्सिपल सर पोलिस स्टेशन ला गेले पण तो पर्यन्त शालिनीबाईंना जिल्ह्याच्या जेल मधे हलवलं होतं.

मग प्रिन्सिपल आणि एक शिक्षक बाईंच्या घरी गेले. घरी, बाईंचा नवरा आणि दोन मुलं सुन्न होऊन बसले होते. शेजारचे काही लोक आणि बायका त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होत्या. शालिनीबाईं काय किंवा प्रिन्सिपल सर काय, नीलेशला मारहाण तर दूरच साधे कोणी रागावले सुद्धा नव्हते. या शाळेतले लोक फार संवेदनशील होते. त्यांनी निलेशला आणि त्याच्या वडीलांना नीट समजावून सांगितलं होतं आणि पुन्हा परीक्षा घेऊ असं म्हंटलं होतं. त्यामुळे, असं काही विपरीत घडेल याची कोणालाच कल्पना आली नव्हती. कोणा जवळच उत्तर नव्हतं. प्रिन्सिपल सरांनी त्यांना धीर दिला. आणि सांगितलं की

“संस्था भक्कम पणे बाईंच्या बचावा साठी उभी आहे. बाईंवर कसलीही आंच येणार नाही, या साठी  संस्था शक्य ते सर्व प्रयत्न करेल. उद्या सकाळीच जिल्ह्यातले एक प्रसिद्ध वकील आहेत त्यांच्याशी संपर्क आपले संचालक करणार आहेत. तुम्ही काळजी करू नका.”

हे ऐकल्यावर तिथे जमलेल्या सर्वांनाच बरं वाटलं. थोड्या वेळ बसल्यावर प्रिन्सिपल सर निलेशच्या बाबांना म्हणाले की

“बरं तुमच्या जेवण्याची काय व्यवस्था आहे ? माझ्या घरून तुमच्या साठी डबा पाठवतो. दोन घास खाऊन घ्या. तुम्हीच धीर सोडला तर शालिनीबाई आणि मुलांकडे कोण बघणार, याचा विचार करा, आणि भानावर या.”

पण तिथे असलेले शेजारी म्हणाले की

“त्यांची काळजी करू नका साहेब, आम्ही आहोत, आम्ही करतो व्यवस्था.”

मग प्रिन्सिपल सर तिथून बाहेर पडले आणि दुसऱ्या बरोबर आलेल्या सरांना संचालक लोकांना माहिती देण्या साठी त्यांच्या घरी पिटाळलं. आणि आपण घरी गेले.

दुसऱ्या दिवशी संस्थेच्या संचालक मंडळींनी वकिलांची भेट घेतली. त्यांना सगळी कथा सांगितली आणि त्यांना घेऊन ते शालिनीबाईंना भेटायला गेले.

वकील साहेबांनी त्यांची वकील पत्रावर सही घेतली. आणि म्हणाले

“काही काळजी करू नका मॅडम. तुम्हाला लगेच जामीन मिळेल असा प्रयत्न करू आपण.”

“पण मला किती दिवस असं इथे राहावं लागेल ?” – शालिनीबाई

“सोमवार पर्यन्त तरी राहावच लागेल. सोमवारी आपण तुमच्या जामीना साठी प्रयत्न करू.” – वकील साहेब.

“वकील साहेब, अहो मी त्या मुलाला हात सुद्धा लावला नाही तरी पण मला ही शिक्षा का ?” शालिनीबाई कळवळून बोलल्या. त्या निराश झाल्या होत्या.

“मी समजू शकतो, तुम्हाला खूप मनस्ताप सहन करावा लागतो आहे. हे सगळं कारस्थान त्या बाबुरावचं आहे. तो आपली राजकीय पोळी भाजून घेतो आहे. पण तुम्ही चिंता करू नका. आपण त्याचा डाव हाणून पाडू.” वकील साहेबांनी बाईंना धीर दिला.

सोमवारी कोर्टा समोर शालिनीबाईंच्या वकिलांनी सांगितलं की “शालिनीबाई चौकशीला पूर्ण सहकार्य करायला तयार आहेत. पोलिस जेंव्हा बोलावतील तेंव्हा त्या हजर होतील.”

पोलिसांनी यावर काही आक्षेप घेतला नाही म्हणून शालिनीबाईंना जामीन मिळून गेला. शालिनीबाई घरी आल्या. त्या घरी आल्याचा आनंद अर्धवटच होता. त्या घरी आल्याचा आनंद होताच. पण जामीन मिळून सुटल्या असल्याने केस ची टांगती तलवार मानेवर होतीच.

संस्थेच्या संचालकांनी त्यांना धीर दिला. म्हणाले

“शालिनीबाई, काहीही काळजी करू नका. पोलिसांना सुद्धा माहीत आहे की तुम्ही निर्दोष आहात म्हणून. आणि पुन्हा मरणोत्तर तपासणीचा रिपोर्ट सुद्धा हेच सांगतो आहे की निलेशला मारहाण झाली नाही. आता केस दाखल झाली आहे त्यामुळे ती कोर्टात लागणारच, पण तुम्ही निष्कलंक सुटाल अशी खात्रीच आपल्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे तुम्ही आता चिंता करू नका, आणि एक दोन दिवसांत शाळेत यायला सुरवात करा. शाळेत आल्या मुळे तुमचं मन रमेल, आणि गोष्टी पूर्ववत होतील. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत, याची खात्री असू द्या.”

संचालकांनी इतक्या नी:संदिग्ध शब्दांत पाठिंबा जाहीर केल्या मुळे शालिनीबाई आणि त्यांच्या कुटुंबाला चांगलाच धीर आला. त्यांनी सगळ्यांचे आभार मानले.

 

क्रमश: ..........

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर जरूर लाइक करा.