शालिनीच काय चुकलं ? - भाग ३ - अंतिम भाग Dilip Bhide द्वारा नाटक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शालिनीच काय चुकलं ? - भाग ३ - अंतिम भाग

शालिनीचं काय चुकलं ?   भाग 3

भाग २  वरुन पुढे वाचा

संचालकांनी इतक्या नी:संदिग्ध शब्दांत पाठिंबा जाहीर केल्या मुळे शालिनीबाई आणि त्यांच्या कुटुंबाला चांगलाच धीर आला. त्यांनी सगळ्यांचे आभार मानले.

दोन दिवस भेटायला येणाऱ्यांची रिघ लागली होती. शालिनीबाई बऱ्याच लोकप्रिय शिक्षिका होत्या. आणि शालिनीबाईंच्या हातून असं काही कृत्य घडेल यावर कोणाचाच विश्वास बसला नव्हता. इतक्या साऱ्या लोकांचा विश्वास पाहून शालिनीबाई भारावून गेल्या. त्यामुळे गाडी पूर्वपदावर यायला मदत झाली.

काळ हे उत्तम औषध असतं म्हणतात. शालिनीबाई सुद्धा शाळेच्या कामात रुळल्या. सर्व गोष्टीत पूर्वी प्रमाणेच रस घेऊ लागल्या.

पोलिसांचा तपास चालूच होता. सर्व पुरावे गोळा करणं चालू होतं. संबंधित लोकांचे जाब, जबाब नोंदवणं चालू होतं. ज्यांनी दगडफेक केली होती त्यांच्यावर चार्ज शीट दाखल केल्या गेली. शंकऱ्यां आणि उत्तम दोघंही अडकले होते आणि जेल मधे होते. काही दिवसांत बाबूरावांनी त्यांना पण जामीन मिळवून दिला. पण पोलिसांचं त्यांच्यावर बारीक लक्ष होतं. अशातच एक दिवस नीलेशचे बाबा आणि नवनीतचे बाबा पोलिस स्टेशन मधे आले.

इंस्पेक्टर साहेबांनी त्यांना पाहिलं. म्हणाले-

काय, बाबूरावांनी पाठवलं का माहिती घेण्या साठी ?

नीलेशचे बाबा आणि नवनीतचे बाबा दोघंही जाम घाबरले होते. काय बोलावं, कसं सांगावं हे त्यांना सुचतच नव्हतं. ते चुळबुळत चूपचाप उभेच राहिले.

“हूं, बोला, काय सांगायचं आहे ? की काही विचारायचं आहे ?” – इंस्पेक्टर.

“साहेब, सांगायचं आहे.” नवनीतचे बाबा म्हणाले.

“मग बोला न. असे गप्प का बसला आहात ?” – इंस्पेक्टर.

“साहेब, शालिनीबाईंना आम्ही चांगले ओळखतो. आमची त्यांच्या विरुद्ध कसलीच तक्रार नाहीये. आम्ही त्यांचा फार आदर करतो साहेब.” – नीलेशचे बाबा.

“मग एवढं रान का उठवलं तुम्ही लोकांनी ?” – इंस्पेक्टर.

“नाही साहेब, आम्ही नाही. पण दुसऱ्या दिवशी आम्ही राख गोळा करायला घाटावर गेलो होतो.” – नीलेशचे बाबा.

“मग ?” – इंस्पेक्टर.

“साहेब, त्या दिवशी आम्ही नुकतेच घाटावरून राख गोळा करून आलो होतो. त्याच

दिवशी संध्याकाळी बाबुराव साहेब आमच्या घरी आम्हाला भेटायला आले होते.” नीलेशचे बाबा म्हणाले.

“बरं मग त्यात काय विशेष ? ही पद्धतच आहे.” इंस्पेक्टर साहेब म्हणाले.

“नाही साहेब, एवढंच नाही, ते म्हणाले की “आम्ही म्हणतो तसं केलं तर एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळू शकते.” मग आम्हाला सुद्धा त्या वेळेला जरा मोह सुटला आणि आम्ही कबूल केलं.” नीलेश चे बाबा पुढे म्हणाले.

“असं काय सांगितलं त्यांनी तुम्हाला ?” – इंस्पेक्टर

ते म्हणाले की “उद्या पोलिस स्टेशन वर मोर्चा न्यायचा आहे त्या वेळी तुम्ही आमच्या

बरोबर या.” आम्हाला काही साहेब, ते पटलं नाही पण एवढ्या मोठ्या माणसाला नकार कसा  द्यायचा म्हणून विचार करतो असं सांगितलं.” – नीलेशचे बाबा

“पण तुम्ही तर मोर्चा मधे होता, मी पाहिलं तुम्हाला.” इंस्पेक्टर म्हणाले.

“हो साहेब, दुसऱ्या दिवशी शंकऱ्यां आणि उत्तम आम्हाला न्यायला आले होते, त्यांना आम्ही येणार नाही असं सांगितलं. तर त्यावर ते म्हणाले की तुमच्या दोन्ही मुलांना आणि यांच्या मुलाला पण पोहता येत नाही हे लक्षात असू द्या. मग काही नुकसान भरपाई तर सोडाच, तेच लोकं आमच्या घरावर मोर्चा घेऊन येतील म्हणून. मग आम्ही दोघंही फार घाबरलो साहेब, शेवटी आमच्या मुलांचा प्रश्न होता साहेब. मग आम्ही काय करणार होतो साहेब, आलो आम्ही मोर्च्यात” नीलेशच्या बाबांनी खुलासा केला.

“ठीक आहे. हे जे काही तुम्ही आत्ता सांगितलं आहे ते लिहून देणार का ?” – इंस्पेक्टर

“हो साहेब आम्ही तयार आहोत. पण साहेब, आमच्या मुलांना काही धोका तर होणार नाही न ? ”नीलेशचे बाबा घाबरले होते म्हणून त्यांनी विचारले.

“नाही त्यांची तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत.” इंस्पेक्टर साहेबांनी त्यांना धीर दिला.

त्या दोघांनी स्टेटमेंट दिलं. ते घेतल्यावर पोलिसांनी शंकऱ्याला आणि उत्तमला धरलं. आणि कोर्टा समोर उभा करून ७ दिवसांची मुदत मागून घेतली. पोलिसांनी त्याच्या कडून सर्व गोष्टी वदवून घेतल्या. हे सगळं कळल्यावर बाबूरावांचा सुद्धा धीर सुटला. त्यांना अटक झाली असती तर त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला असता, आणि ते त्यांना परवडणारं नव्हतं. त्यांनी आपल्या बाकीच्या सहकाऱ्यां बरोबर थोडा विचार विनिमय केला आणि स्वत:च इंस्पेक्टर साहेबांना भेटायला गेले.

“ साहेब, आम्ही जनतेचे सेवक, त्यांच्या समस्या सोडवणं आमचं काम. आता या प्रकरणात आम्हाला आमच्याच लोकांकडून चुकीची माहिती मिळाली म्हणून हा घोळ झाला साहेब. आमच्या मनात कोणाही बद्दल शत्रुत्व नाहीये. हवं तर मी शालिनीबाईंची जाहीर माफी मागतो.” बाबूरावांनी बोलायला सुरवात केली.

“बाबुराव,” इंस्पेक्टर म्हणाले “ त्या बाईंचा कोणताही दोष नसतांना त्यांना दोन दिवस जेल मधे राहावं लागलंय. त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे आणि तुम्ही फक्त सॉरी म्हणून मोकळे होणार ? नाही बाबुराव असं नाही होऊ शकत. तुम्हाला पण बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. आणि आम्ही त्याचीच तयारी करतो आहोत.” थोडं थांबून, इंस्पेक्टर साहेब पुढे म्हणाले “ इतक्या सहजा सहजी नाही सोडणार तुम्हाला. तुमच्या दोघा माणसांनी बयान दिलं आहे. आणि त्यात कबुली दिली आहे की तुमच्याच सांगण्यावरून त्यांनी हे काम केलं. नीलेशच्या वडिलांना त्यांनी ज्या धमक्या दिल्या त्या पण तुमच्याच सांगण्यावरून दिल्या. नुसतं सॉरी म्हणून मोकळं होण्या इतकं सोपं नाहीये हे.”

“साहेब, मी बिनशर्त माफी मागायला तयार आहे आणखी काय करू, म्हणजे तुमचं समाधान होईल ?” बाबूरावांनी आता शस्त्र टाकली होती. तसेही ते मोहल्ला नेता होते. वर चढण्याचा प्रयत्न करत होते पण अजून सरावले नव्हते. अश्या परिस्थितीत त्यांची इमेज खराब झाली असती तर त्यांच्या राजकीय प्रवासाला पूर्णविराम  लागला असता. हा सगळा विचार करूनच त्यांनी विचारलं की आणखी काय करू म्हणून.

“ ते आम्ही काय सांगणार, तुम्हीच ठरवा. एका निष्कलंक आणि श्रेष्ठ शिक्षिकेचा तुम्ही फार अपमान केला, त्यांची मानहानी केली. त्यांना आयुष्यातून उठवण्याचा घाट घातला. त्याच्या बरोबरच तुम्ही शाळेची सुद्धा बदनामी केली आहे. हे सगळं करतांना तुम्ही काहीच विचार केला नाही, पण आता करा, आता तुमच्यावर पाळी आली आहे. तेंव्हा तुम्हीच विचार करा.” – इंस्पेक्टर

“साहेब, सुचने बद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद. आता मी काय सांगतो ते ऐका. मी शाळेला ५ लाखांची देणगी देतो. शालिनी बाईंना एक लाख आणि नीलेशच्या बाबांना सुद्धा एक लाख द्यायला तयार आहे. एवढं चालेल का ?” बाबूरावांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“हे बघा साहेब, आमचा म्हणजे पोलिसांचा, यात काहीही संबंध नाहीये. तुम्ही विचार केलात, स्तुत्य उपक्रम आहे. पण हे सगळं जाहीर रित्या करा. शाळेत एक समारंभ घडवून आणा आणि त्यात जाहीर करा. नुसतं जाहीर करू नका प्रत्यक्षात द्या. आम्हाला बोलावू नका. हा समारंभ तुमचा आहे आणि तुमचाच राहू द्या. त्यामुळे तुमची इमेज पण उजळून निघेल. या तुम्ही.” इंस्पेक्टर साहेबांनी फायनल सांगून टाकलं.

शाळेत मग एक समारंभ झाला सर्व मुलं आणि पालक हजर होते. त्यात बाबूरावांनी जाहीर रित्या शाळेची आणि शालिनी बाईंची माफी मागीतली. शालिनीबाईंचा सन्मान करून बाबूरावांनी त्यांना एक लाखांचा चेक दिला. निलेशच्या बाबांची क्षमा मागून त्यांना पण चेक दिला. मग आपल्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले की जो काही गोंधळ झाला, तो सर्व त्यांच्या लोकांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे झाला आणि आता कुठलाही गैरसमज नाही हे सांगायला ते विसरले नाहीत. ते जनतेचे सेवक आहेत आणि जनतेच्या हिता साठी लढत राहतील. असा त्यांनी लोकांना विश्वास दिला. जवळची माणसं निवडण्यात चूक झाली आणि या पुढे ते सर्व प्रकारची काळजी घेऊनच माणसं निवडतील असं ठणकावून सांगितलं. लोकांना पण त्यांचा आदर वाटला. एवढा मोठा माणूस पण चुकीची जाहीर माफी मागतोय हे लोकांना फारच आवडलं.

बाबुराव साहेबांचा जयजयकार असो असे नारे लागले आणि समारंभ संपला.

**** समाप्त *****

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com