मृण्मयीची डायरी - भाग ७ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मृण्मयीची डायरी - भाग ७

मृण्मयीची डायरी भाग ७


वैजू आणि सारंग घरी पोचतात तेव्हा सारंग म्हणाल्या प्रमाणे आई बाबा समोरच्या हाॅलमध्ये या दोघांची वाट बघत असतात.


टिव्ही नावालाच चालू असतो.वैजू आणि सारंग एकमेकांकडे बघून हसतात.सारंग मान आणि डोळे मिचकाऊन वैजूला म्हणतो "बघ मी म्हटलं होतं तसंच झालं की नाही?"


दोघंही हसत घरात शिरतात.आईबाबांना वाटतं की हे दोघं काहीतरी सांगतील.कुठे गेले होते इतक्या वेळ.पण दोघांपैकी कोणीच बोललं नाही.पुढील प्रश्नाची सरबत्ती टाळण्यासाठी वैजू आत जाऊ लागली तेवढ्यात जतीनचा तिच्या नव-याचा फोन येतो.तिला मनातून हायसं वाटतं.ती आत जाते.


पायातील काढलेल्या चपला सारंग पुन्हा पायात अडकवतो आणि " आई मी येतो थोड्याच वेळात." असं म्हणत घराबाहेर पडतो आणि तो ऊदयकडे पळतो.


वैजू आणि सारंगच्या वागण्यामुळे आई-बाबांच्या चेह-यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह ऊभं राहतं.बाबा निराश होऊन टिव्हीकडे बघू लागतात.आई...आई दबक्या पावलांनी वैजू ज्या खोलीत गेली त्या खोलीच्या बाहेर सावधपणे उभी राहते. वैजू नव-याला काही सांगते का याचा अदमास घेत असते.पण इथेही नकारघंटाच.


वैजू मुद्दाम नव-याशी वेगळं काही बोलते आहे? अशी शंका आईला येते.शेवटी आई कंटाळून पुन्हा बाहेरच्या खोलीत येऊन बसते. बाबा नजरेनीच आईला विचारतात.आई नकारार्थी मान हलवते.शेवटी तीपण कंटाळून टिव्ही बघू लागते.



दोन दिवस असेच जातात. वैजू आणि सारंग इकडच्या तिकडच्या गप्पा करत असतात. बाबांपेक्षा आईची अस्वस्थता वाढलेली तिच्या हालचालीवरून वैजू आणि सारंगला कळतं. . त्यामुळे दोघांनाही मनातच हसू येत असतं.


ऊद्या वैजू अमरावतीला परत जाणार असते. प्रायव्हेट बसचं तिनी तिकीट काढलेलं असतं.


आज रात्री जेवण झाल्यावर वैजूला विचारायचच असं आई ठरवते.कालपासून वैजू आईनी पण नीट बोलत नसते.ते आईंच्या मनाला टोचत असतं.



"वैजू कालपासून बघतेय माझ्याशी बोलत नाहीस."


"नाही ग असं का वाटतंय तुला?"


"वैजू खोटं बोलायला पण शिकलीस का?"


" तुला असं का वाटतंय? मी तुझ्याशी खोटं बोलावं असं काही तू वागलीस का?"


" मृण्मयीचा राग माझ्यावर काढते आहेस हे कळतंय मला."


" आई उगीचच तर्कवितर्क करू नकोस."


" मग सांग मला काल कुठे गेला होतात तुम्ही दोघं?"


"हं आत्ता आलीस मुद्द्यावर. मग हे कालच विचारायचं होतंस."


"तुम्ही दोघं घरी आल्यापासून गप्प आहात.म्हणून आज विचारते आहे."


"आम्ही दोघं काल काऊंन्सलर अमीता पटवर्धन कडे गेलो होतो."


" कशाला?"


" मृण्मयीसाठी जे करू शकलो नाही ते आता तिच्यासारख्या इतर मुला मुलींना काही मदत करू शकतो का हे विचारण्यासाठी गेलो होतो."


" इतरांशी काय करायचं आहे तुम्हाला?"


"आपल्या मृण्मयीसाठी तुम्हा दोघांना काहीच करायचं नव्हतं.आता आम्ही इतरांसाठी काय करतो यात तुम्हाला दखल देण्याची गरज नाही."


" आई वडील आहोत तुमचे.लक्षात आहे नं?"


" आहे नं. तुम्ही मृण्मयीचे सुद्धा आई-वडील होता.हे तुम्ही मृण्मयीशी वागताना विसरलात."


" आम्ही काही विसरलो नव्हतो."


"मग मृण्मयीची अशी दशा का झाली? तिला तुम्ही दोघांनी समजून घेतलं नाही आणि आम्हाला आमची जबाबदारी समजून दिली नाही.यात तुमची चूक आहे असं नाही वाटत?"


" मला झेपलं नाही तिला जन्म देणं. तुम्हा दोघांत आणि तिच्यात इतकं अंतर.हेच झेपलं नाही."


"मला हे पटत नाही.माझ्या चुलत सासूबाईंना गार्गी नंतर १२वर्षांनी आमोद झाला.पण ते दोघंही मस्त आहेत.त्या दोघांमध्ये छान ट्युनिंग आहे.अग तुझ्यापेक्षा त्यांना किती जड गेलं असेल.पण सुरवातीपासूनच त्यांनी गार्गीला बाळाची गोष्ट सांगून तिच्या मनात बाळाची ओढ निर्माण केली.आज ती त्यांचं प्रत्येक काम ताई या नात्याने जबाबदारीने करते.


तू असं नाही केलंस. आम्हाला मृण्मयी बद्दल ओढ निर्माण केली नाहीस. मृण्मयी बद्दल सदैव नकारात्मकच बोलत आलीस. मी आणि सारंग लहान होतो. तेव्हा काय बुद्धी असणार आम्हाला तू बरोबर आणि मृण्मयी चूक असंच वाटलं म्हणून आम्हीपण मृण्मयीशी तुझ्यासारखच वागलो. आई तुझं चुकलं. तू मृण्मयीवर अन्याय केलास आणि आमच्याकडून ही तिच्यावर अन्याय झाला. तोच दूर करायचा आहे.आमच्या गुणी बहिणीला आम्ही समजून घेतलं नाही ही खंत मनाला पोखरते आहे.तिची डायरी वाचल्यावर आमची चूक कळली.


आता मी आणि सारंग जे करणार आहोत ते आम्ही केलेलं प्रायश्चित्त असेल.यात तू आणि बाबांनी पडायचं नाही आणि आम्हाला अडवायचंपण नाही कळलं?विषय संपला. यावर मला तुझ्याशी काही बोलायचं नाही."वैजू तणतणत समोरच्या खोलीत गेली.जातांना बाबा दाराशी उभे असलेले तिला दिसले.त्यांचा चेहरा काळाठिक्कर पडला होता.


वैजू आणि आईमध्ये तू तू मै मै झाली हे वैजुनी घरातल्या घरात सारंगला प्रत्यक्ष न सांगता मेसेज नी सांगितले.


दुस-या दिवशी रात्री वैजू अमरावतीला जायला निघाली. निघतांना रितीप्रमाणे तिनी आई बाबांना खाली वाकून नमस्कार केला आणि म्हणाली "आई बाबा स्वतःची काळजी घ्या.


"आमच्याशी लपंडाव खेळते आणि वर आमची काळजी असल्याचं दाखवते."आईचं हे तिरकस बोलणं वैजु कानाआड करते आणि घराबाहेर पडते.


बसस्टॅंडवर पोचल्यावर सारंगी गाडी पार्क केली आणि दोघं वेटींग रुममध्ये आले.दोघं बसले आणि सारंग वैजूला म्हणाला.


"वैजू तू आज निघालीस मी आता सापडणार आईच्या तोफे पुढे."


"सारंग ते जाऊ दे.मला सांग प्राजू काय म्हणतेय?"


" तुझ्याशी या विषयावर मला बोलायच होतं."


"कारे काही प्राॅब्लेम झालाय?"


"आपली आई माझ्या आणि प्राजूच्या लग्नाचं कळल्यावर कशी रिअॅक्ट होईल सांगता येत नाही. प्राजूच्या घरचे आणखी थांबायला तयार नाही.आई मृण्मयीशी अशी वागू शकते तर प्राजू वेगळ्या जातीची म्हटल्यावर त्रास देऊ शकते."


" असं एकदम का वाटलं तुला?"


"अगं आत्तापर्यंत आई बाबांशी आपल्या दोघांचा कधीच कुठला वाद झाला नाही. पण मृण्मयीची गोष्ट कळल्यावर मला वाटायला लागलं की आई बाबांची ही बाजू आपल्याला कधीच दिसली नाही.


मृण्मयीला हे सगळं किती जड गेलं असेल सहन करणं. आई प्राजूशी पण अशी वागू शकते. आई असं वागली तर कस़ करायचं?"


" हं… तू म्हणतोस ते खरं आहे.सारंग मला सांग प्राजू कडचे सहा महिने थांबतील का?"


" तिलाच विचारावं लागेल.का ग?"


" पटवर्धन मॅडमनी पुढल्या भेटीसाठी बोलावलं की येईन नं तेव्हा मी आई बाबांना सुतोवाचं करीन. त्याचे काय पडसाद उमटतात बघू. मग ठरवू पुढे काय करायचे ते."


"आई भडकणार. बाबा तिला साथ देणार हे मला आत्ताच कळतंय."


" हो मलापण कळतंय.पण विषय तर मांडायला हवा.कारण तू मुली बघत नाहीस म्हणून ती आधीच ओरडते आहे त्यात आता तू तुझी प्रेमकहाणी सांगीतल्यावर घरात धरणीकंप होणारच आहे त्याची तयारी ठेव. सारंग हे काम आपण सहा महिन्या पूर्वीच करायला हवं होतं. ठीक आहे.पुढच्या भेटीत करू हे काम.तोपर्यंत प्राजूला जरा सावध कर.नाहीतर एकदम गोंधळून जाईल."


सारंग फारच विचारात पडला.वैजूनी त्याला हलवून भानावर आणलं." अरे सारंग काय झालं?"


" माझं लग्नं होईल की नाही ही शंका आहे."


सारंगच्या चेह-यावरचे भाव बघून वैजूला हसायला यायला लागलं. तिला हसतांना बघून सारंग म्हणाला,


"ए… बाई हसतेस काय?माझं लग्नं होईल की नाही हा प्रश्न मला पडलाय आणि तू हसतेस. तुझं झालय बाई लग्नं. मी डेंजर झोन मध्ये आहे."


" अरे साॅरी मी हसले तुला वाईट वाटलं.अरे पण एवढा ताण नको घेऊन.पुढल्या वेळी आली की तुझं लग्नं पक्कं करते."


" हं बघू.चल तुझी बस आली."


अमरावतीची बस आली.वैजू आता चढली.खिडकीतून हसत सारंगला म्हणाली.


"सारंग निघालास तरी चालेल. जाताजाता प्राजूला भेटून जा.बेस्ट लक" आणि हसली.


सारंगनी मान हलवली. त्याने गाडीला किक मारली आणि तो निघाला.


गाडी चालवताना सारंगच्या मनात स्वतःच्या आयुष्याचा विचार सुरू झाला. आजवर आई बाबांच्या स्वभावाची काळी बाजू दिसली नाही म्हणून आपण खूप आनंदी होतो. मृण्मयीचं कळल्यापासून आपल्याला काय सहन करावं लागू शकतं याची जाणीव सारंगला झाली.


तो मनातून हादरला. प्राजू त्याच्यावर विसंबून होती. आलेली स्थऴ नाकारत होती. सारंग नोकरीत थोडा स्थीर स्थावर झाल्यावर लग्नं करायचं असं दोघांचं ठरलं होतं.


आता हे नवीनच संकट समोर उभं राहिलं आहे.वैजूची मदत घेतल्याशिवाय आपण लग्नं करू शकणार नाही याची त्याला जाणीव झाली.


विचाराच्या नादात तो घरापाशी आला तरी त्याला कळलं नाही.तो आपल्याच नादात गाडी जागेवर ठेवून घरात शिरला.चपला स्टॅंडर्ड ठेऊन तो खोलीत जाऊ लागला तसा त्यांच्या कानावर आईचा ओरडा पडला.


" अरे मी काय विचारतेय?लक्ष कुठे आहे तुझं?"


" अं..मला काही म्हणाली का?"


" नाही तुला काही म्हटलं नाही मला भींतींशी बोलायची सवय आहे आणि आपल्या घरच्या भींतींना खूप मोठ्यानी बोललं तरच ऐकू जातं."आईचा ऊपरोधी सूर लागला होता.


"ऐ आई काहीतरी बोलू नको.डोक्यात विचार चालू होते म्हणून तू काय म्हणाली ते ऐकू आलं नाही.भरीस भर हा टिव्ही ओरडतो जोरजोरात."


"कळतं सगळं बोलणं.वैजूची बस निघाली का?हे विचारलं मी."


"हो निघाली.जाऊ आत."


"हं…." आई फुत्कारली.सारंगनी त्याकडे दुर्लक्ष केलं.तो आपल्या खोलीत गेला आणि आधी दार लावलं.विचार आणि टिव्हीचा ढणढण आवाज यांनी त्यांचं डोकं दुखायला लागलं.


------------------------------------------------------------

क्रमशः


लेखिका... मीनाक्षी वैद्य.