अव्यक्त प्रेमाची कथा. भाग २ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अव्यक्त प्रेमाची कथा. भाग २

अव्यक्त प्रेमाची कथा.

पात्र रचना

संदीप आपल्या कथेचा नायक.

सुशीलाबाई संदीपची आई.

केशवराव संदीपचे वडील.

अभय संदीपचा मोठा भाऊ.

अश्विनी अभयची बायको.

रामलिंगम संदीपचे सहकारी.

रमेश कुमार संदीपचे सहकारी.

प्रसाद संदीपचे सहकारी.

विश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष

भाग २

भाग १ वरुन पुढे वाचा......

संदीप एका बहुराष्ट्रीय कंपनीत लॉजिस्टिक्स डिपार्टमेंट मधे असिस्टंट मॅनेजर होता. मेकॅनिकल इंजीनियर झाल्यावर त्यांनी एमबीए केलं आणि आता लगेच चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, तीही एका बहु राष्ट्रीय कंपनीत. संदीप आणि त्याच्या घरचे म्हणजे त्यांचे आई, वडील मोठा भाऊ आणि वहिनी सगळेच खुश होते. नवीन नवीन नोकरी, खूप साऱ्या गोष्टी शिकून घ्याव्या लागणार होत्या. संदीप हुशार होता आणि सगळ्या गोष्टी भराभर आत्मसात करायचा त्याचा प्रयत्न होता. पण याच्यात एक मेख होती. संदीपने एमबीए फायनॅन्स मधे केलं होतं. तो त्याचा आवडता विषय होता. पण आता जी नोकरी मिळाली, ती लॉजीस्टिक मधे मिळाली. प्रथम त्यानी नाकारण्याचा विचार केला होता, पण घरच्यांनी त्याचा बेत उधळून लावला. त्या दिवशी जवळ जवळ रात्रीचे दोन वाजले, संदीपचं मन वळवण्यात, सर्व जण जागे होते, आणि आपापल्या परीने त्याची समजूत काढत होते.

“अरे संदीप, एवढ्या चांगल्या पॅकेज ची नोकरी तू नाकारायला निघालास! काय म्हणावं तुला?” -संदीपची आई सुशीला बाई बोलल्या.

“अग आई, ही सिस्टम परदेशात रूळली असली, तरी आपल्याकडे नवीन आहे. सगळी घडीच बसवण्याचं काम आहे. हेड ऑफिस मधून जसे निर्देश येतील, त्या प्रमाणे इथे ते कार्यान्वित करावं लागणार आहे. या सिस्टम मधे कोणीच अनुभवी नाहीयेत. त्यामुळे मार्गदर्शन करणारा पण कोणी नसणार आहे.” संदीपने आपली अडचण सांगितली.

“हे बघ संदीप,” आता बाबा मधे बोलले, “तू हुशार आहेस, आणि मला नाही वाटत की तुला हे सगळं आत्मसात करायला फारसा वेळ लागेल असं. तसंही तू जेंव्हा एमबीए केल्यास तेंव्हा कॉमर्स किंवा अर्थशास्त्राबद्दल तुला काय माहीत होतं?”

“बाबा, तेंव्हा मी कॉलेज मधे होतो आणि कॉलेज मधे सगळे विषय शिकवतात. अडचण आली तर प्राध्यापक असतात शंका निवारण करायला. ही नोकरी आहे. इथे मी जर चुकलो, तर कोण येणार आहे मला सांभाळून घ्यायला?” संदीप म्हणाला.

“संदीप, अरे, जर सर्वच अननुभवी असतील तर तुझी चूक कोण दाखवून देणार? तज्ञ लोक परदेशात बसले असतांना, तू का एवढा घाबरतो आहेस?” अभय म्हणाला. “आणि माझ्या मते, ही सिस्टमच जर नवीन असेल, तर तुम्हा लोकांना ते प्रशिक्षण नक्कीच देतील. आणि त्या साठी तज्ञ लोकांना बोलावतील.”

“दादा तू म्हणतो आहेस ते खरं आहे. पण दादा, हे माझ्या आवडीचं काम नाहीये, त्यामुळे कदाचित माझं मन रमणार नाही याचीच भीती वाटते आहे.” संदीपने त्याची व्यथा बोलून दाखवली.

“अरे, असं काही नसतं.” केशवराव म्हणजे संदीपचे वडील म्हणाले, ”एकदा नोकरी सुरू झाली, की आपोआप त्यातल्या खाचा खोंचा कळायला लागतात. आणि मग आपण पण त्यात हळू हळू रूळून जातो. कालांतराने आपणच त्यातले तज्ञ बनतो. तू निर्धास्त पणे ही नोकरी जॉइन कर. सगळं ठीक होईल.”

शेवटी बरीच चर्चा आणि भवती न भवती होऊन संदीप एकदाचा तयार झाला. नोकरीवर रूजू झाला. कंपनीची नाशिकला फॅक्टरी होती आणि तिथेच त्याला जॉइन व्हायचं होतं. जॉइन झाल्यावर त्याला सांगण्यात आलं की ठरल्याप्रमाणे, मुंबईला त्यांचं ट्रेनिंग सुरू होणार आहे तेंव्हा त्याला उद्याच मुंबईला रीपोर्ट करायचं आहे.

संदीप आता वैतागला होता. मुंबईला त्यांचं कोणीच नव्हतं त्यामुळे सर्वप्रथम राहण्याची व्यवस्था करावी लागणार होती. घरी गेल्यावर त्यानी यावरून बरीच कुरकुर केली. पण फायनली दुसऱ्या दिवशी तो मुंबईला गेला. ऑफिस मधे गेल्यावर मात्र त्याचा मूड एकदम छान झाला. कंपनीची आठ मजली इमारत होती आणि सगळ्यात वरच्या मजल्यावर कंपनीचं गेस्ट हाऊस होतं. आणि तिथे सर्व व्यवस्था होती. तिथलं ट्रेनिंग चार महिन्याचं होतं.

त्याच दिवशी ट्रेनिंग सुरू झालं. स्वीडनहून एक अधिकारी आला होता. कॉन्फरन्स रूम मधे गेल्यावर संदीपला कळलं की अजून तिघं तिथे आले आहेत. या चौघांची एक टीम बनणार होती आणि सर्व कामं याच चौघांना एकमेकांशी समन्वय साधत पार पाडायची होती.

पहिल्या दिवशी, कंपनीचे उपाध्यक्ष विश्वनाथन साहेब आले. त्यांनी आधी कंपनीची माहिती सांगितली. मग जेवण्याच्या वेळेपर्यंत, सर्व अधिकार्‍यांची ओळख करून दिली. जेवण झाल्यावर मग खरं ट्रेनिंगला सुरवात झाली.

विश्वनाथन साहेबांनी बोलायला सुरवात केली. “लॉजीस्टिक मॅनेजमेंटचा कन्सेप्ट आपल्याकडे नवीन आहे.”

“लॉजीस्टिक मॅनेजमेंट म्हणजे ठोकळ मानाने, अतिशय योजनापूर्वक आणि परिणामकारक रीतीने, पुरवठा साखळी चे व्यवस्थापन करणे. आता ही पुरवठा साखळी कुठे कुठे, लागते ते आपण बघू. कारखान्यांमधे उत्पादन करण्यासाठी अनेक प्रकारचे साहित्य लागते, कारखान्यांमधे मशीनरीची देखभाल आणि दुरुस्तीचे साहित्य लागते. हे सगळं सामान वेळच्यावेळी पोचलं तर उत्पादन, खंड न पडता अव्याहत सुरू राहील. ही पुरवठा साखळी, मध्येच कुठे तरी विस्कळीत झाली, तर उत्पादनात खंड पडेल आणि पर्यायाने कंपनीचे नुकसान होईल.” साहेब थोडं थांबले. मग पुन्हा म्हणाले की,

“दुसरं म्हणजे, कारखान्यात उत्पादन झालेला माल, आपल्या निरनिराळ्या शहरांमध्ये असलेल्या वेअर हाऊस मधे पोचवणे आणि तिथून डीलर कडे त्यांच्या मागणी प्रमाणे, अगदी कमीत कमी वेळेत पोचणे आवश्यक असते. उशीर झाला तर ग्राहक दुसरीकडे जाण्याचा धोका असतो.” साहेब, प्रतिक्रिया बघत होते, पण सगळेच हुशार असल्याने, सर्वांच्या चेहऱ्यावर सांगीतलेचं सर्व समजल्याचा भाव होता. साहेबांचं समाधान झालं आणि त्यांनी पुढे सुरवात केली.

“तिसरं म्हणजे, आपल्या कारखान्यांना असे बरेच पार्ट्स लागतात, जे दुसऱ्या छोट्या छोट्या कारखान्यांमधे निर्माण होतात. आता या छोट्या कारखान्यांना आपले पार्ट्स बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो, तो पुरवण्याची जबाबदारी आपली असते. ही साखळी अतिशय महत्त्वाची असते. याचं कारण असं की आपल्या या साखळीमधे दोष निर्माण झाला, आणि त्यांना माल वेळेवर मिळाला नाही, तर एका छोट्या पार्ट मुळे आपली पूर्ण उत्पादन साखळी थांबू शकते. आणि ही साखळी थांबली, तर पुढचं सगळंच विस्कळीत होतं आणि कंपनीचं नुकसान होतं.”

“तर माय फ्रेंड्स तुमच्या लक्षात आलंच असेल की तुमचं डिपार्टमेंट किती महत्वाचं आहे. तुम्हा सर्वांना अतिशय काळजीपूर्वक आणि हुशारीने काम करायचं आहे. आता जर कोणाला काही शंका असल्यास, विचारू शकता.”

संध्याकाळ होत आली असल्या कारणाने, विश्वनाथन साहेबांनी आवरतं घेतलं. “ मला आत्ता एका मिटिंगला जायचं असल्याने, आता आपण इथे थांबू. उद्या आज सांगितलेल्या गोष्टींबद्दल जरा विस्ताराने चर्चा करू. तुम्ही सर्व माझ्या अंदाजा प्रमाणे प्रथमच मुंबईला आला आहात, तेंव्हा जर बाहेर फिरून यायचं असेल तर जाऊन या. बाय ” असं म्हणून साहेब रूम च्या बाहेर गेले.

आता रूम मधे चौघेच उरले होते. परस्परांची ओळख आणि थोड्या गप्पा यामध्ये बराच वेळ गेला. त्यामुळे खूप दूर जाण्यापेक्षा जवळपासच फेरफटका मारण्याचं त्यांनी ठरवलं. रामलिंगम आणि प्रसाद दोघंही कानडी होते. रामलिंगम हॉस्पेटचा तर प्रसाद कोईमतूरहून आला होता. बऱ्याच पिढ्या कोईमतूर मधे गेल्यामुळे, त्याचं शिक्षण तामिळ मधे झालं होतं. त्याला तामिळ चांगलं आणि कानडी फक्त बोलता यायचं. आणि त्याला मल्याळम पण थोडं थोडं बोलता यायचं. रमेशकुमार इंदूर वरुन आला होता. संदीप नाशिकचा होता. चार ठिकाणावरून चार जण आले होते आणि आता त्यांना एकत्र काम करायचं होतं. आधी रूमवर जाऊन फ्रेश व्हावं आणि मग कॉफी पिऊन थोडं फिरून येऊ असं सर्वानुमते ठरलं. संदीप आणि प्रसाद यांना एक रूम मिळाली होती आणि रामलिंगम आणि रमेश कुमार यांना दुसरी रूम. खोल्यांना बाल्कनी होती. बाल्कनीत गेल्यावर संदीपला दिसलं की बाहेर मुसळधार पाऊस पडतो आहे. तो प्रसादला काही म्हणणार, तेवढ्यात रामलिंगम खोलीत आला, म्हणाला, “यार, इतक्या पावसात आपण कसं बाहेर जाणार? प्रसाद कुठे आहे?” संदीपने काही न बोलता, बाथरूम कडे बोट दाखवलं. प्रसाद बाहेर आल्यावर त्याचं आणि रामलिंगमचं कानडीत बोलणं झाल्यामुळे संदीपला काही कळलं नाही. थोड्या वेळाने रमेश आल्यानंतर सर्व जण तळ मजल्यावर असलेल्या कॅंटीन मधे जाऊन कॉफी प्यायले. पाऊस पडत असल्याने, बाहेर कुठे जाण्याचा प्रश्नच नव्हता, तिथेच गप्पा मारत बसले. जेवण झाल्यावर सगळे रूम मधे परतले.

दुसऱ्या दिवशी फ्रेड लिंडबर्ग नावाचे स्वीडन वरुन आलेले ऑफिसर क्लास घ्यायला आले. दोन दिवस ते इनपुट चेन बद्दल म्हणजे फॅक्टरीला लागणार्‍या मालाचा पुरवठा कसा सुरळीत आणि नियंत्रित पद्धतीने करायचा या बद्दल विस्तृत विवेचन करत होते.

नंतर च्या दिवशी थॉमस विल्सन नावाचा ब्रिटिश इंजीनियर आला, तो विक्री करिता मालाच्या पुरवठा साखळी बद्दल माहिती देत होता. त्याचा क्लास दोन दिवस चालला.

मग शनिवार रविवार आला. हे दोन दिवस सर्व जण मुंबई फिरत होते. संदीपला मुंबईची खूप माहिती नव्हती, पण मुंबई नवीन पण नव्हती. त्यांनी सगळ्यांना मुंबई फिरवून आणली. या दोन दिवसांत सर्व जण एकमेकांच्या खूप जवळ आले.

सोमवारी, ज्युली ओलसोन आली आणि तिने फॅक्टरीला लागणारे विविध पार्ट्स, जे दुसऱ्या छोट्या कारखान्यांतून बनवून घेतल्या जातात, त्या पुरवठा साखळी बद्दल संपूर्ण मार्गदर्शन केलं.

मंगळवार पासून पुन्हा सर्वांनी आधी जे काही सांगितलं होतं त्यांच्या बद्दल अजून बारकावे सांगीतले. जवळ जवळ दोन आठवडे याच गोष्टींवर चर्चासत्र आयोजित केलं होतं. जेंव्हा वरिष्ठ लोकांची खात्री झाली, की आता सर्वांच्या मनात कुठल्याही शंका राहिल्या नाहीत, तेंव्हा एक छोटासा समारंभ करून ट्रेनिंग कार्यक्रमाची सांगता झाली.

या सर्व कार्यक्रमामधून सर्वांनाच खूप काही शिकायला मिळालं. लॉजीस्टीक म्हणजे फक्त माल इकडून तिकडे पोहोचवणे एवढंच नसून, बऱ्याच गोष्टींचं व्यवस्थापन करावं लागतं हे कळलं. आधी या सर्व गोष्टींची कल्पनाच कोणाला नव्हती. हा कन्सेप्टच सर्वांसाठी नवीन होता. सर्वात प्रथम म्हणजे फॅक्टरीत स्टोर मधे काय सामान आहे आणि काय लागणार आहे यांची संपूर्ण माहिती असायला हवी. प्रॉडक्शन चं प्लॅनिंग काय आहे ते माहीत असायला हवं, म्हणजे त्या प्रमाणे लागणारं सामान आणि बाहेरून येणारे पार्ट्स याचं योग्य नियोजन करून सामान वेळेत आणून स्टॉक करून ठेवायचा, जेणेकरून प्रॉडक्शन मधे अडथळा येणार नाही. या साठी परचेस डिपार्टमेंट शी योग्य समन्वय साधायचा. डीलर आणि व्यापार्‍यांशी सतत संपर्कात राहायचं आणि त्यांच्या मागणी प्रमाणे पुरवठा करायचा. पूर्ण मशीन आणि त्यांचे सुटे भाग जे विक्री नंतर दुरुस्ती साठी उपलब्ध करून द्यावे लागतात, त्याचा व्यापारांना पुरेसा पुरवठा, मग हा सगळा फीडबॅक प्रॉडक्शन प्लॅनिंग कडे द्यायचा. बाजारात सर्वे करून कोणचा माल जलद जातो आणि कोणच्या मालाला उठाव कमी आहे हे बघून त्याचं विश्लेषण करून कंपनीला रीपोर्ट करायचा. अशी बरीच नवीन माहिती या चौघांच्या नवीन टीमला मिळाली. तसे सर्वच हुशार असल्याने, सर्व बाबी त्यांनी आत्मसात केल्याच आणि प्रत्यक्ष कामाला सुरवात करायला सज्ज झाले.

आता पुढची पायरी म्हणजे कंपनीच्या पांच कारखान्यामधे सर्वांना २ -२ महीने सर्व विभागांमध्ये काम करायचं होतं. त्यात सर्वांनी आळी पाळीने सर्व विभागांमध्ये काम करायचं होतं. सध्या परदेशातून आलेली माणसं हे विभाग सांभाळत होती, नंतर यांनाच सांभाळायचं होतं.

सर्व कारखान्यांमधे ट्रेनिंग झाल्यावर प्रत्येकाला एक एक फॅक्टरी सांभाळायला दिली होती. तिथे त्या त्या परदेशी अधिकाऱ्यांच्या मार्ग दर्शनाखाली स्वतंत्र पणे फॅक्टरी सांभाळायची होती. संदीपला फरीदाबाद च्या फॅक्टरीमधे काम करायचं होतं.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com