बबन्या राजेश जगताप - मुंबई द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बबन्या

         

       ..... बबन्या .....

सकाळी सकाळी एस टी स्टॅंडवर बबन्या येरझारा घालीत आणि उठा बशा काढीत एस टी कव्हा येतीय म्हणून घडी घडी मान वर करून पहात व्हता.. जाणारा येणारा जाता येता ...

“काय बबनराव..आज लई येरवाळी हाजरी लावलीय..?नंबर लागणार हाये वाटतं आज ?”

“ए.. बाळ्या..! भाड्या जा की गपगुमान आपल्या वाटानं.. कशापायी डोकं उठीवतोय..?”

“आरं.. बबन्या म्या तुला बबनराव म्हणलं आन् त्वा तं लगेच श्या द्याया लागलाय.. अशानं नंबर लागन व्हय रं तुझा...”

“मंग काय आरती ववाळू का काय?माझा नंबर लागंन न्हाई तर न्हाई लागंन.. त्वा मला पैशे देतोस काय ? “

“बरं आशे किती पैशे लागत्यात ते तरी सांग.. खिशात आसले तर देतो.. नसले तं च्या तरी पाज..”

“म्या च्या पाजू तुला ? फुकणीच्या बायकू कोणासंग पळून गेली व्हयं रं तुझी..?”

बबन्या आन् बाळूचं गमतीदार भांडण ऐकायला सात आठ जण भवताली गोळा झाले व्हते.. बबन्याला पाहून फिदी फिदी हासंत व्हते..तसा बबन्या आजून कावला..

“सुक्काळीच्यानो..! तुम्हाला हासाया काय झालंय.. म्या काय नागडा नाचतोय व्हयं रं..?”

तसा नामा पुढं व्हवून म्हणला..

“बबन्या सोड त्या बाळूला.. एस टी याची तव्हा येईल.. चाल म्या तुला च्या पाजतो...”

नामानं बबन्याला हाताला धरून हाटिलात नेलं.. म्हणला..

“बरं..आख्खा घ्याचा का कटींग.?”

“कटींगच सांग दोन... “

नामानं दोन कटींग च्याची आडर दिली..

“बबन ..कावणार नसशील तर एक इचारु का? “

“नामा...त्वा मला याच्यापायी च्या पाजत आसंन तं नको मला तुझा च्या ..जातो म्या ‌..”

“आरं आसं काय करतोस दोस्ता..बस बस..तुला आवडत नसंन तं न्हाई इचारीत..मग तर झालं?”

“इचाराया.. तसं काय न्हाई गड्या पण त्यो बाळ्या.. भडवीचा उगा डोकं खराब करतोय..”

“आरं पण त्वा त्याच्याकडं बघूच नको ना.. घे च्या घे.. आन् शांत व्हय जरा.. म्या तुझा जीवाचा मैतर हाय का न्हाई? एवढं टेन्शन कशापायी घेतोय?”

च्या पेता पेता एस टी दिसली तसा बबन्या उठला.. आन् म्हणला..

“नामा दादा.. तुला काय इचारायचं व्हतं ते मला ठावं हाये.. सांजच्याला घरी ये.. मग सांगतो समदं..”

“आरं पर सांजच्याला आपली गाडी बी गेरमंधी आसतीय..”

पुढचं ऐकायला बबन्या थांबलाच नव्हता. एस टी उभी राह्यली तसा तो डायवरच्या आंगाला गेला...डायवरनं त्याला पेपराचं भेंडोळं दिलं..ते घेऊन त्यो घाईघाईनं तडक घराकडं निघाला..

“म्या बी येऊ का बबन ?” नामानं इचारलं..

बबन्या काही न बोलता लगा लगा घराकडं गेला.. बायकू वट्टयावरच बसली व्हती.. कपाळला आठ्या देत म्हणली..

“वाईच थांबा..आरतीचं ताट आणती ववाळाया.. राजं आमचं मोठी लढाई जितून आलंय..”

बबन्यानं तिला एक सणसणीत रट्टा दिला...घरात जाता जाता म्हणला “..आतापुरतं एवढ्यावरच भागीव.. आन् न्हाई भागलं तं..मंग आणि देतो...”

त्यो घरात गेला..कवाडाला आतून कडी लावली.. खुट्टीला टांगल्याली पिशवी घेऊन खाली बसला... पेपराचं भेंडोळं सोडून एक एक पेपर येगळा करून एका आंगाला ठिवला.. डोळे मिटून हात जोडले... व्हटातल्या व्हटात काय तरी पुटपुटला... पिशवीतून पाच पन्नास लॉटरीचे तिकीटं काढले.. पेपर उघाडला.आख्खा पेपर लॉटरीच्या निकालानं भरला व्हता..

एक एक तिकीट घेऊन निकालाशी नंबर जुळवून पाहू लागला.. बक्षीस लागल्याल्या तिकीटाच्या मागं बक्षीसाचा आकडा लिवून बाजूला ठिवलं.. बक्षीस लागल्याली अठरा तिकीटं आन् फुसकी ढीगभर झाली व्हती..एका कागदावर एक एक करीत त्यानं बक्षीसाची रक्कम लिव्हली...

“बक्षीस रुपये शंभर तिकीटं तीन एकूण रक्कम तिनशे. बक्षीसाची रक्कम पन्नास , तिकीटं पाच एकूण रक्कम आडीचशे.. बक्षीस रक्कम रुपये दहा एकूण तिकीटं दहा. बक्षीसाची रक्कम रूपये शंभर.. जितल्याल्या बक्षीसाची आखंड रक्कम तिनशे, आधिक आडीचशे आधिक शंभर.. झाले साडे सहाशे..”

डोक्यावरली टोपी काढून जमिनीवर आपटीत म्हणला..

“च्यायला तिच्या... समदे मला छळाया आन् लुटाया टपलेत..दोन हजार रुपायाचे तिकीटं व्हते.. बक्षीस लागलं फक्त साडे सहाशे.. पुढल्या बारीला पाच हजाराचे तिकीटं घेतो. म्हणजी एखादं पाच पन्नास हजाराचं बक्षीस लागंन..मागला पुढला हिसाब बराबर व्हईल आसं म्हणून समदा पसारा आवरून त्यानं कवाड उघाडलं...”

बायकू.. गुडघ्यावं त्वांड टेकून बसली व्हती..

“आशी कव्हार बसणार हायेस.. कोणी मेलंय का काय? भाकर तुकडा काही मिळंन का न्हाई?”

“ग्यासचं बाटलं संपलय..सैपाक काय हाडकं पेटवून करू ?”

“मंग घ्याचं कोणाकडून.. आपलं आल्यावं परत देता येईल..”

“कोणी बी देत न्हाई..!”

“देत न्हाई..? मंग काय उपाशी राहू म्हणती का काय ?”

“मंग म्या काय करू ? आसं करा.. तुमचे ते फुसके तिकीट आसतीनंच..ते द्या म्हणजी घालते चुलीत आन् करते सैपाक..”

“हे पाह्य संगे..उगा कटकट करू नको.. बाटलं जव्हा संपल तव्हाचं सांगायचं व्हतं.. घरात काय हाये आन् काय न्हाई ते बी म्याच बघायचं का? तुला ध्यानात धराया काय व्हतंय?”

“व्हय.. व्हय.. म्याच ध्यानात धरते.. तुम्ही कवाड लावून बसा. खिशातलं हाय न्हाई ते लॉटरीच्या तिकिटावर उडवा.. आन् एखाद्या दिशी तिथंच स्टॅंडवर भीक मागत बसा..”

“आगं..आज न्हाई तं उद्या पाच दहा लाखाचं बक्षीस नक्की लागंन पाह्य..नशीबाचं आसंच आसतंय आदुगर घेतंय आन् मंग पदर फाटूस्तवर देतंय...”

“मंग पदर कशापायी न्याचा..एखादी गोधडी न्हाई तं चादर घेऊन जावा..म्हणजी गठूडं बांधाया बरं पडंन..”

“आगं गप की जरा...त्वांड हाये का गिरणीचा भोंगा हाय? म्या करतो काही तरी...”

आसं म्हणून बबन्या स्टॅंडवर गेला.. नामाला इकडं तिकडं हुडकू लागला..पण त्यो कुठं बी दिसंना तव्हा त्यो हाटिलात गेला.. पोटात खड्डा पडला व्हता.. एक रिकामी जागा पाहून त्यो तिथं बसला..

हाटिलातलं पोरगं खांद्यावर कळकाटल्याला बारका टावेल ठिवून उगा इकडं तिकडं हिंडत व्हतं..पण बबन्याला त्यानं काय बी इचारलं न्हाई.. बबन्या आधीच वैतागला व्हता.. उठून म्हणला..

“ए..! भाड्या कव्हा धरनं इथं बसलोय तुझे डोळे फुटलेत व्हयं रं.. काय पायजे काय नको.. कव्हा मेल्यावर इचारणार हायेस का?”

“आवं शेठ म्या पाह्यलं न्हाई..बोला काय देऊ ?”

“आरं आधी पाणी तं दे...म्हणं काय देऊ ? काय रितीरिवाज हाये का न्हाई?”

पोरगं पाणी घेऊन आलं.. पाण्याचा गलास ठिवून म्हणलं.. “बोला काय देऊ?”

“सरणाची लाकडं आसतीन तं दे.. पाण्याचा घोट घशाखाली उतारला न्हाई तं काय देऊ, काय देऊ? काय पंगतीला वाढायला आलाय व्हय रं..”

पोरगं.. तोंडात मारल्यावाणी गप उभं राह्यलं.. मनातल्या मनात श्या देऊ लागलं..

“आता उभा काय राह्यलायं खांबावाणी.. एक मिसळ दोन पाव आण.. मिसळ चांगली तर्री मारुन आण.. “

पोरगं गेलं.. मिसळ पाव घेऊन आलं.. बबन्याच्या म्होरं ठिवलं आन् जाऊ लागलं..

“अ..य.. लिंबू कुठाय रं..?”

“आणतो...!”

मिसळीच्या रश्श्यापरीस ज्यादा लाल आज बबन्या दिसत व्हता... गल्ल्यावर बसून दामू आण्णा गप पहात व्हता..

मिसळपाव खाऊन बबन्यानं पाण्याचे दोन गलास रिकामे केले पैशे द्यायला गल्ल्यावर थांबला..

“काय बबनराव आज मिसळ वाईच जास्तीच तिखाट झालीय वाटतं..”

“आवं आण्णा .. सकाळधरुन समदं उलटंच व्हतंय.. काय बी मनासारखं व्हईना झालंय..”म्हणत पन्नासची नोट दिली..

उरलेले पैशे परत देत दामू आण्णा म्हणला.. “काय झालंय काय एवढं? “

“काय न्हाई आपलं रोजचच..नामा आला व्हता काय?”

“आला व्हता... च्या पेवून गेला.. काही काम व्हतं का?”

“आवं आण्णा.. घरातलं ग्यासचं बाटलं संपलंय.. तुमच्याकडं आसंन तर द्या ना.. आमचं आलं का परत देतो..”

“बाटलं...देतो.. पर शंभर रुपये ज्यादा घेईल म्या..जमत आसंन तं पाह्य..”

“आण्णा..पर शंभर जरा जास्तच व्हत्यात.. पन्नास घ्या..”

“जमायचं न्हाई...!लाग वाटाला..”

“बरं .. द्या..आता काय ..आडला हारी..गाढवाचे..”

“ए.. बबन्या..मला गाढव म्हणतो व्हय रं.. न्हाई बाटलं जा..”

“आवं.. आण्णा ..नाराज कशापायी व्हताय..वाडवडलाची म्हण हाय ती.. म्या बी आपलं..सहज म्हणलंय.. हे घ्या पैशे.. आन् द्या बाटलं..”

ग्यासचं बाटलं घेऊन बबन्या घरी गेला..बायकू म्होरं ठिवलं..म्हणला..

“राणीसरकार..उठा गादीवरून.. आन् घ्या हे बाटलं..आता तरी काही व्हईल का न्हाई..? तुमचे राजकुमार आन् राजकुमारी बी येतील घटकाभरानं..”

“आता सैपाक वट्टयावर करु का काय ? घरात ठिवा.. आन् घरात म्हणजी सैपाकघरात..”

बबन्याचं हे आसंच चाललं व्हतं..सहा महिन्याच्या मागं.. समदं झकास चाललं व्हतं..हम दो हमारे दो.. घर दोन टाईमाला खाऊन पिवून सुखी व्हतं..

बबन्या एकदा आसाच आठवडी बाजारला गेला व्हता.. पाचशेची नोट सुट्टी करायला एका लॉटरीच्या दुकानात गेला..

“ओ..शेठ. जरा पाचशेचे सुट्टे मिळतील का ?”

“मिळतील.. पर एखादं तिकीट घेतलं पायजे...”

“तिकीट घेऊन म्या करु..?”

“आरे.. एखाद्या बारीला पाच दहा लाखाचं बक्षीस लागलं तं एका झटक्यात लखपती व्हशील..”

“छ्या..! एवढं आमचं नशीब कुठं थोर हाये..तस आसतं तं एखाद्या राजाच्या घरी जलामलो आसतो..”

“सुट्टे पायजे का नको...?”

“बरं द्या एक तिकीट..पण बक्षीस लागलं का न्हाई ते कसं कळणार?”

“ये पुढल्या बारीला.. तव्हार निकाल बी लागंन..तिकीट जपून ठिव..”

लॉटरीच तिकीट घेऊन बबन्या घरी आला..तिकीट देवापुढं ठिवून हात जोडले.. डोकं टेकलं...

दोन चार दिस आशेच गेले..मग बबन्याचं मन .. बाजारच्या वाटंला पळू लागलं.. कव्हा एकदा बाजारचा दिस येतोय.. आन् आपून घेतल्याल्या तिकीटाचा निकाल पहातोय आसं त्याला झालं व्हतं.. बाजारचा दिस उगावला आन् बबन्यानं सकाळी सकाळी बाजारची वाट धरली..

“राम राम शेठ...!”

“राम राम..बोला..”

“आवं ते मागल्या बारीला तुम्ही मला एक तिकीट दिलतं..”

“म्या दिलतं..? म्या कशाला देऊ? गि-हाईक आपल्या पायानं येतंय आन् सवता घेतंय..”

“न्हाई.. न्हाई तसं न्हाई वं शेठ.. मागल्या बारीला म्या पाचशे रुपये सुट्टे कराया आलतो तव्हा न्हाई का तुम्ही दिलतं.. म्हणले लखपती व्हशील...”

“आरं.. व्हय व्हय..बघू दे तिकीट...आणलंय का घरीच ठिवलंय?”

“आणलंय .. आणलंय.. हे घ्या..”

दुकानदारानं एक पेपर उघाडला.. मागल्या पुढल्या पानावर नीट पाह्यलं... एका ठिकाणी बोट ठिवून थांबला..तिकीटाचा नंबर आन् पेपरातला नंबर नीट जुळवून पाह्यला...

“वा...!! भाऊ.. नशीबवान हायेस तू..पाच हजाराचं बक्षीस लागलंय..

खरंच..? आवं मला खरंच वाटंत न्हाई.‌. बरं मग.. द्या पैशे..”

“आरे...बक्षीसाचे पैशे आशे मिळत न्हाईत..तिकीट सरकारला पाठवाया लागंल.. तुझे दोन फोटू, राहात्या घराच्या पत्याचा पुरावा.. घेऊन ये..एक फारम भराया लागंन..मग तिकीट आन् हे समदं सरकारला पाठवाया लागंल.. मग सहा महिन्यांत तुला चेक मिळंन..”

“आरा..ss रा..लईच मोठी भानगड हाये ही.. “

“बॅंकेत खातं ..हाये का न्हाई? आसंन तं ठीक.. न्हाई तं खातं बी उघडाया लागंन..”

“आवं शेठ पर हे समदं तुम्ही आदुगर का न्हाई सांगितलं..? शेठ.. आसं करा.. तुम्ही मला पाच हजार द्या आन् हे समदं तुमच्या नावानं करा..”

“तसं आसंन तं..मग तुला परत पाचशे रुपयाची तिकीटं घ्याया लागतील..”

“म्हणजी..? हे आसं कसं?”

“म्हणजी त्याचं आसं हाये..नांव काय म्हणला तुझं..?”

“बबन...!”

“हां तं बबन म्या तुला रोख पैसे देणार..तिकीट माझ्या नावानं भरणार..पण मला तिकीटाच्या बक्षीसाचे पैशे परत कव्हा मिळतील.. सहा महिन्यांनी..यात माझा काय फायदा?”

“आवं पर.. म्या तिकीट तुमच्याच दुकानातून घेतलंय..”

“आरं पण ते सरकारचं हाये.. सरकार लॉटरी चालवतंय.. आम्ही इकायचं काम करतो..आता तुझ्या कडून मला दहा टक्के कमीशन मिळाया पायजे.. पण म्या त्याच्याबदली तिकीटं देतोय.. तुझं काय बी जात न्हाई..त्या तिकीटाला बक्षीस लागलं तर परत आजून पैशे मिळतील...”

बबन्यानं इचार केला.. तसं पाहिलं तं सवदा फायद्याचाच हाये.. दहा रुपायाचं तिकीट घेतलं तं पाच हजाराचं बक्षीस लागलंय... पाचशे रुपायाचे तिकीटं घेतले तं आजून मोठं बक्षीस लागंन.. च्यामारी..उगा उन्हा तान्हात डोकं तापीवण्यापरीस हे बरं हाये..

“बरं शेठ.. द्या पाचशेचे तिकीटं.. आन् आशेच चांगले नंबर काढून द्या..बक्षीस लागलंच पायजे...”

दुकानदारांनं त्याला दहा दहा रुपये किंमतीची येगयेगळी पन्नास तिकीटं दिली.. खरं म्हणजी त्यानं चलाखी केली व्हती.बक्षीसाची रक्कम दहा हजारापरीस जास्त आसली तरच तिकीट सरकारकडं पाठवायचं आसतंय हे माहित असूनही त्यानं बबन्याला पाच हजार रुपये बक्षीसाचं तिकीट सरकारकडं पाठवाया लागंन आसं खोटं सांगितलं व्हतं..

बबन्या लई खुश झाला व्हता... लगूलग जाऊन पोरानला खाऊ घेतला..बायकूला एक साडी घेतली..घरी आला...खाऊ बघून पोरं आनांदली आन् साडी बघून बायकू हाराकली..

तव्हापासून बबन्याला नादंच लागला व्हता..त्यो दर हप्त्याला बाजारला जायचा.. तिकीटाला बक्षीस लागलंय का न्हाई ते बघाया शिकला व्हता.. मग सवताच नंबर जुळवून बघायचा.. नंबर जुळला तं लागल्याल्या बक्षीसाची परत तिकीटं घ्याचा.. न्हाई लागलं तं सवताच्या खिशातले घालीत व्हता..

आसं करता करता दोन महिने गेले.. आन् बबन्याच्या तिकटाला पन्नास हजाराचं बक्षीस लागलं...गडी लई खुश झाला.. दुकानदाराशी चांगलीच दोस्ती झाली व्हती... या बारीला बी दुकानदारांन पाच हजार रूपायाची तिकीटं दिली..आणि पंचेचाळीस हजार रुपये रोख बबन्याच्या हातावर ठिवले...

आपलं नशीब लई जोरदार हाय.आसं त्याला वाटू लागलं.. आता आठवडी बाजाराचा नेम मोडला.. बबन्या दर दिसाआड जाऊ लागला...कव्हा तरी कामाला जायाचा...

बबन्यानं आपला हा रिवाज ठरवून टाकला व्हता.. आता दुकानात झटपट लॉटरी आली व्हती..तिकीट घ्याचं...नखानं न्हाई तं रुपायाच्या नाण्यानं नंबरवरली पट्टी खरडायची..नंबर दिसल्यावर लगूलग निकाल बघाया मिळत व्हता.. चार आठ दिस वाट बघायची गरजंच नव्हती.. बबन्या दिसभर दुकानात तिकीटाचे बंडल घेऊन खरडत बसायचा.. कव्हा तरी दुकानदार च्या पाजायचा...भूक लागली तं भजे न्हाई तं वडापाव खाऊन पोटाचा खड्डा भरीत व्हता...

दिसामागून दिस जात व्हते.. दुकानदार बबन्याला उधार तिकीटं देत व्हता... कव्हा पाचशे, कव्हा हजार दोन हजाराचं बक्षीस लागायचं.लागलेल्या बक्षीसातून दुकानदार उधारी कापून घेत व्हता... अशातच झटपट लॉटरी बंद करण्याची सरकारची आडर आली...बबन्या चार दिस घरात डोकं धरून बसला...घरी बायकू पोराची परवड व्हया लागली व्हती... पैशाची लईच आडचण झाली व्हती... कोणी उसनवारी बी करीत नव्हतं..गावात त्वांड दावनं आवघाड झालं व्हतं. तव्हा तो एकलाच गावाबाहेरच्या देवळात बसला व्हता. मळ्याच्या वाटानं जाता जाता नामानं त्याला पाहिलं.

“काय बबनराव...एकलाच बसलाय.. समदं बरं हाय नव्हं ?”

“आवं नामा दादा कशाच बरं आन् कशाच काय?”

“आरं पर झालं तरी काय?” म्हणून तो बबन्या शेजारी बसला.

“नामा दादा तुला म्हणून सांगतो , घरातला पैसा आडका समदा संपलाय.. कोणी काम बी देत न्हाई..बायकू दिसभर डोकं खातीय.. दुकानदाराची उधारी वाढलीय.. तो बी तिकीटं देत न्हाई.. तुम्हीच सांगा पैसा येणार तरी कसा? तुमच्याकडून काही झालं तं बरं व्हईल.”

“गड्या काम जरा आवघाडच झालंय.. पण आता दोस्तासाठी काय तरी कराया पायजे..बरं किती रक्कम लागंन तुला?”

“दादा आता सांगू तरी कसं आन् कोणत्या तोंडानं?”

“ए.. गड्या पटदिशी सांगून मोकळा व्हयं.. झालं माझ्याच्यानं तं करतो न्हाई तं सोड इषय म्या जातो..”

“आवं दादा थांबा.. मला एक लाख रुपये पायजेत..”

“बबन्या डोस्कं जाग्यावर हाय ना ? लाख रुपये म्हणजी काय चुरमुरे वाटलं व्हयं रं तुला?”

“दादा.. मला रक्कम तशी नका देऊ.. माझं वावार गहाण ठिवा..आता न्हाई म्हणू नका.. पण कोणाकडं बोलू नका..बायकूला समाजलं तं फाडून खाईल मला..”

नामानं डोकं खाजीवलं..म्हणला “दोन दिसानं भेट..करतो काही तरी..”

दोन दिसानी नामानं पैशे दिले. बबन्यानं समद्याच्या उधा-या चुकत्या केल्या. डोक्यावरलं वझं उतारलं व्हतं.. परत त्या लॉटरीच्या नादाला लागायचं न्हाई म्हणून बायकूनं सवताची आन् पोरांची शपथ घातली. मन हालकं करायचं म्हणून पोरानला घेऊन आठ दिस माहेरला गेली व्हती...

बबनला घरात कटाळा येत व्हता..जाता येता बडबड कराया बायकू नव्हती... खाऊसाठी पैशे मागाया पोरं बी नव्हते.. घरात एकट्याला बसवत नव्हतं..स्टॅंडवर वडाच्या पारावं बसून च्या पेत व्हता... आणि पाजीत व्हता.. बसल्या जागी कव्हा तंबाकूचा बार भरीत व्हता तं कव्हा गुटक्याची पूडी फोडीत व्हता...

आसाच एक दिस सांजच्याला आपली गाडी गेरमधी टाकून नामा आला.लटपाटत्या पायानं कसाबसा वट्टा चढून वर आला ..दारावर थाप देऊन म्हणला...

“बबन...!ए...बबन...! आरं घरात हायेस का न्हाई... दार उघड...बघ तुझा दोस्त तुला भेटाया सवताच्या पायानं चालत आलाय...”

बबन्यानं दार उघाडलं... “का..वं ..नामा दादा ..आज इकडं कुठं?”

“बबनर्राव... हो.. बबनर्राव... तुम्ही माझं आन् म्या तुमचा दोस्त हाय का न्हाई ?”

“व्हय.. म्या कव्हा न्हाई म्हणलंय...”

“न्हाई ना...मग आसं परक्यावाणी.. मला दारात का उभं केलंय...”

“व्हय..व्हय... या घरात या...”

“आत्ता... म्या घरात येणार न्हाई.. इथंच दारात बसणार...”

“आवं.. दादा चुकलं माझं..माफी द्या.. चला घरात या...”

“येऊ?..घर्रात..येऊ..? बबनर्राव.. तुम्ही लई.. मोठ्या मनाचे हायेत..माझ्झी माफी... मागितली... बबनर्राव..आवं लई मोठा गुन्हा झालाय... ह्या.. ह्या.. तोंडानं..घर्रात येणार न्हाई म्हणलो...” नामा आपल्याच हातानं आपलं थोबाड बडवून रडू लागला..

बबन्यानं त्याला कसं तरी घरात घेऊन बशीवलं..

“बबनर्राव...! मला ठावं..हाय.. तुम्हाला लई तर्रास दिलाय गावानं.. तुम्ही आजिबात काळजी करू नका.. म्या हाय ना तुमच्या संग..हाये का न्हाई? दोस्तासाठी जीव द्याची पाळी आली तं..जीव बी देईल...देऊ का बोला ? आता जीव देतो...”

“नामा दादा.. शांत व्हा.. कशापायी आलाय ते सांगा..”

“म्या तुझं टेन्शन घालवाया आलोय...”

आसं म्हणून त्यानं.. खिशातून बाटली काढली..

“बबनर्राव..हे समद्या टेन्शनवरलं जालीम औषध हाये.. मला तुमची परवड बघवत न्हाई... आणा ..दोन गलास आणा... दोघं बी टेन्शन घालवू..”

“न्हाई.. न्हाई.. दादा... तुम्हाला गलास देतो.. तुम्ही घ्या.. म्या न्हाई घेत...”

“बबनर्राव..! म्या तुमचा दोस्त हाय का न्हाई...? .. तुम्हाला तंबाकु कोणी दिली... म्या दिली.. तुम्हाला गुटका कोणी दिला... म्या दिला.. तुम्हाला पैशे कोणी दिले..म्या दिले..मग आता हे जालीम औषध कोण देतंय... म्या देतोय.. तुम्ही माझा मान ठिवाया पायजे...”

“दादा ते समदं खरं हाय..पर हे नको.. मला माफ करा...”

“बबनर्राव..! म्या तुमच्यासाठी जीव द्यायला तयार हाये... आन् तुम्ही माझा आपमान केलाय...आपली दोस्ती खतम... जीवाभावाच्या दोस्तानं आपमान केलाय... आता जगून काय उपेग..? बबनर्राव... येतो म्या... सकाळी तळ्यात माझं मढं दिसंन... तव्हा एक बाटली माझ्या खिशात ठिवा..वर जायच्या वख्ताला संग घेऊन जाईल...”

बबन्याला धडकी भरली...नाम्याच्या हाताला धरून खाली बशीवलं..म्हणला..

“दादा.. म्या याच्या आदुगर कव्हाच घेतली न्हाई..आता तुमचा मान ठिवायचा आन् आपली दोस्ती राखायची म्हणून घोटभर घेतो..”

आसं म्हणून तो उठला... दोन गलास घेऊन आला..नामानं बाटली उघाडली..तसा वासाचा भपकारा त्याच्या नाकात घुसला.. बबन्यानं नाकाला हात लावला...नामाने दोन गलासात बाटली आर्धी आर्धी रिकामी केली...

“हं.. घ्या.. बबनर्राव..उचला..”

“आवं पर नामा दादा.. म्या घोटभरंच घेणार हाये...कमी करा...”

“आरं..घे...दोस्ती बराबरीची आसतीय..आशी कमी जास्तीची नसती..”

बबन्यानं गलास उचलून घोट घेतला..त्वांड पार कडू कडू झालं..आंगावर शिरशिरी आल्यागत करून म्हणला...

“दादा काय वं हे...कडू झार हाये.. कसं काय पेता वं तुम्ही..?”

नामानं खिशात हात घालून एक पुडी काढली...बबन्याला देत म्हणला.. “बबनर्राव..!हे घ्या तिखाट शेव आन् खारं शेंगदाणं हायेत..दोन चार तोंडात टाका...मंग बघा.. कसं वाटतंय...”

बबन्या हुकमाचा ताबेदार झाला व्हता..शेवशेंगदाणे तोंडात टाकून घोट घेतला... घोटभर घेतो म्हणणा-या बबन्यानं बघता बघता गलास रिकामा केला... नामा आन् बबन्याची दोस्ती पक्की झाली गळ्यात गळा घालून रोज रातच्याला दोस्तीच्या झाडाला बाटलीतलं पाणी घालू लागले...

बबन्या एक दिस तालुक्याला गेला व्हता... पेठेतून जाता जाता त्याला एक देशी दारूचं दुकान दिसलं.. पावलं आपसूक दुकानाकडं वळली..दोस्ताची आठवण काढीत काढीत एक बाटली रिकामी करून तो बाहीर आला.. शेजारी एक लाटरीचं दुकान व्हतं..दुकानापुढं उभा राहून म्हणला..

“राम राम वं शेठ...”

“रामराम..!रामराम...!”

“शेठ..! आवं ती झटपट लाटरी हाये का तुमच्याकडं..?”

“आरं बाबा ती कव्हाच बंद झालीय.. माहित नाही का ?”

“न्हाई ..माहिती हाये..पर मला वाटलं एखाद्या बारीला परत चालू झाली आसंन...”

“झटपट..इसरा ...नवी लॉटरी आलीय आता..”

“नवी लाटरी..? ती आणि कोणती?”

“कॅम्पूटरवर ...दोन आकड्याची ..शेवटचे दोन आकडे जुळले का शंभर रुपये...”

“आणि तिकीट किती रूपायाचं हाये..? “

“फक्त अकरा रूपये..!”

“थांबा..! थांबा...! मला वाईच समदं नीट समजून सांगा..”

दुकानदारांनं बबन्याला समदं समजून सांगितलं... आणि बबन्याच्या सांगितल्या परमाणं येगयेगळ्या नंबरची साडे पाचशे रुपायाची पन्नास तिकीटं दिली..म्हणला काही दुसरं काम आसंन तर करून या.. तासाभरानं निकाल येईल...

“न्हाई ... तसं काय बी काम न्हाई.. म्या थांबतो इथं...”

बसल्या बसल्या भिंतीवर लावलेला निकालाचा चार्ट बघून मनातल्या मनात आकड्यांची जुळवाजुळव करू लागला...कधी उभी, कधी आडवी तर कधी तिरकी जुळवाजुळव केली..दुकानदाराकडून एक कागद आन् पेन घेतला... काही आकडे लिहिले...कागद खिशात ठिवला..

एक तास..उलाटला.. दुकानदारानं निकाल चार्टवर भरला... बबन्यानं त्याच्या तिकीटाचे नंबर जुळवून पाहिले .. सहा तिकीटाचे नंबर जुळले.. शंभर रुपया परमाणं बक्षीसाचे सहाशे रुपये मिळाले.. साडे पाचशे रुपायाच्या तिकीटाचे सहाशे रुपये मिळाले..गडी हाराकला.. खिशातला कागद काढून लिव्हल्याल्या नंबरचे परत साडे पाचशे रुपायाचे तिकीटं घेऊन घरी आला...

रात्री दोस्ताबरोबर बैठक जमली.. बबन्यानं नव्या लॉटरीचं गुणगान करीत.. नामाला माहिती दिली..नामा म्हणला..

“भले.. शाब्बास.. म्हणजी दिसभरात दोन चार हजार डोळं झाकून मिळणार.. दोस्ता... काय पण म्हणं तुला लॉटरीतूनंच पैसा मिळंन... आसंच बक्षीस लागत राह्यलं तर माझ्याकडलं गहाण वावार बी लवकरच सोडवशील..”

“व्हयं रं नामा दादा.. मला बी तसंच वाटतंय.. म्या पहिलं तिकीट घेतलं तव्हा पाच हजार रूपायाचं बक्षीस लागलं व्हतं..दोन महिन्यान दुसरं पन्नास हजाराचं बक्षीस लागलं व्हतं...”

“बबन.. आरं ते देवानं काही तरी म्हणलंय ना..करमणे वाधिकार..का आसंच काही तरी हाये..म्हणजी आपून आपलं काम करीत रहायचं..फळाची आस धरायची न्हाई...”

“अ..य्.. नामा दादा इथं काही तरी घोटाळा व्हतोय.. आरं म्हणजी आपून काम करीत रहायचं..हे बरूबर हाये..म्हणजी म्या लाटरी खेळत रहायचं..पण फळाची आस धरायची न्हाई...पण मला तं बक्षीस लागाया पायजे ना... मग कसं व्हणार ?”

“आरं म्हणजी लगूलग फळाची आस धरायची न्हाई आसं म्हणायचं आसंन.. तुझं जे चाललंय ते चालू ठीव... बरं..घरी जायाचं का आजून आर्धी आर्धी बाटली चालंन...”

“नको नामा..आता बास झालं..” नामाचा फळाची आस धरायची न्हाई.. आपलं काम करीत रहायचं..हा गुरुमंतर त्याच्या मनात पक्का बसला.. बबन दिसभर तालुक्याला जाऊन लॉटरी खेळत व्हता.. दिवसातून दोन चार येळाला बक्षीस लागायचं..पण फायदा कमी आन् तोटा जास्त व्हवू लागला.तव्हा तो दुकानदाराला म्हणला..

“शेठ..ही लॉटरी निसतीच खेळवत ठिवतीय ..गेल्यालं पैशे परत मिळतील आशी काही तरी युगत सांगा की राव...”

“बबनराव.. तुम्ही आमचं रोजचं गि-हाईक हाय..आता तुम्ही इचारलंय म्हणून सांगतो..जरा जवळ या...”

बबन्या जवळ बसला.. म्हणला “ हां शेठ सांगा..”

“बबनराव..काय करायचं माहिती हाये का? एकी बेकी खेळायचं.”

“म्हणजी वं शेठ..?”

“म्हणजी शेवटचा आकडा दोन, चार, सहा,आठ आन् शून्य आसंन तर त्याला बेकी .. आन् एक , तीन, पाच, सात , नऊ आसंन तर त्याला एकी म्हणत्यात.. म्हणजे निकाल कोणता आसतो एकी नंबर न्हाई तर बेकी नंबरचा.. एकीचे नंबर आसत्यात पाच आणि बेकीचेबी पाच.. आता समजा तुम्ही एकी नंबरच्या पाची नंबरचे दोन दोन तिकीटं घेतले..तं तिकीटं झाले दहा.. आन् पैशे झाले एकशे दहा.. निकाल कोणत्या बी एका नंबराचा आला तर तुमच्या कडं त्या नंबराची दोन तिकीटं आसतील.. दोन तिकीटाच्या बक्षीसाचे झाले दोनशे रुपये.. म्हणजी तुम्ही दिले एकशे दहा आन् मिळाले दोनशे.. आसं आलटून पालटून खेळायचं..”

“शेठ.. तुमचं बरूबर हाये पर एक शंका हाये..समजा त्या पाची नंबरला बक्षीस न्हाई लागलं तं काय करायचं?”

“आवं सोप्पं हाये..! दुसऱ्या टाईमाला त्याच नंबराची दुप्पट तिकीटं घ्याची. आसं जव्हार तुमचा नंबर लागत न्हाई तव्हार दुप्पट करीत राहायचं.. जव्हा नंबर लागंन तव्हा तुमचे गेलेले समदे पैशे परत मिळतील.. तुम्ही सवता.. हिशोब करून पहा.. पटलं तर ठरवा काय करायचं ते...दोन चार दिस तिकीटं घेऊ नका..निसतं मनात धरून हिशोब करुन पहा..”

झालं.. बबन्यानं तसंच केलं.. गणित बरूबर बसत व्हतं.. दुसऱ्या दिसापासून आकड्याचा खेळ चालू झाला.... बबन्या सकाळपासून संध्याकाळपवतर दुकानातच बसायचा.. दुकानदारानं टी.व्ही. लावला व्हता..मग काय..तिकीटं घ्याची आन् टी.व्ही बघत बसायचं..सांजच्याला हजार पाचशे रुपये घेऊन घरी याचं..

आसं दुप्पट करता करता एका दिशी बबन्याला पायजे तिकीटं कमी पडली.. मग दुकानदारानं त्या नंबराची एक चिठ्ठी लिहून दिली.. चिठ्ठीवरल्या नंबराला बक्षीस लागलं..पैशे बी मिळाले... बबन्या आता निर्धास्त झाला व्हता..आकड्याचा खेळ मांडला व्हता.. आन् नशीबानं दगा दिला.. एकाच दिसात पन्नास हजाराचा फटका बसला...बबन्याचा नंबर लागला नव्हता.. डोकं धरून नामाकडं गेला.. दोस्तीची बाटली रिकामी करता करता.. बबन्या म्हणला...

“नामा दादा..आज लईच आडचण झाली..आकडा फूटला व्हता म्हणं म्हणून निकाल बदली झाला.. आन् माझं बक्षीस गेलं.. पन्नास हजार बुडाले... दादा.. मला आजून पैशे पायजे...”

“किती लागतील..?”

“दादा...लाख रुपये पायजेत..”

“बबन्या..! आपली दोस्ती एका आंगाला आन् यव्हार एका आंगाला...गहाणवटीच्या वावराचे एवढे पैशे न्हाई देता येणार.. तुझी लईच आडचण आसंन तं मला वावार इक.. हिसाबानं जेवढे व्हतील तेवढे देतो...जमतंय का बघ..”

“जमंन.. घ्या जमवून उद्याच जाऊन खरेदीखत करून टाकू..”

गहाण ठिवल्यालं वावार बबन्यानं इकलं..आकड्याचं भूत बबन्याच्या मानगूटीवर बसलं.. दुकानात बसल्या बसल्या तंबाखू, गुटका..चहा..भूक लागली तं मिसळपाव न्हाई तं वडापाव.. सांजच्याला दोस्तासंग कव्हा एक तं कव्हा दोन बाटल्या फुटल्या.. तब्येतीची हेळसांड झाली..हातातली गंगाजळी आटू लागली...

पुन्हा एकदा नशीबानं दगा दिला.. दुकानदाराची उधारी वाढली..मग बायकूचं मंगळसूत्र आन् सोन्याच्या बांगड्या चोरून इकल्या.. परत बबन्या जतरातल्या पाळण्यात बसल्यावाणी वरखाली झाला... आन् एकदा खाली आला तो वर गेलाच न्हाई..

दुकानदारांची उधारी वाढली..पुढचा खेळ सुटला.. हातात आता देण्यासारखं आन् इकण्यासारखं काय बी उरलं नव्हतं.. दोन दिस दुकानदारानं दुकानात कोंडून ठिवलं.. दोन दिस नवरा घरी आला न्हाई तव्हा संगीनं माहेरला सांगावा धाडला... भाऊ आला.. इकडं तिकडं इचारपूस करता करता बबन्याला कोंडून ठिवल्याचं समाजलं..

संगीचा भाऊ तालुक्याला जाऊन दुकानदाराला भेटला..आठ दिसात पैशे चुकते करायची हामी दिली..बबन्याला घेऊन घरी आला..बायकूनं त्वांड बडावलं.. नको नको ते बोलली.. बबन्याला दोन तीन दिसापासून तंबाकु,गुटका दारू काहीच मिळालं न्हाई... डोक्यात हातुडा मारल्यावाणी व्हवू लागलं..मन सैरभैर झालं.. मध्यान्ह रातीला ऊठला.. दार उघाडलं..बायकू जागी झाली...

“काय वं.. काय झालं ?”

“काय न्हाई गं..झोप तू.. म्या जरा डब्याला जाऊन येतो...” बबन्यानं पाण्यानं डबा भरला.. घराबाहेर पडला..

अर्धा तास झाला, एक तास झाला..पण बबन्या घरी आला नव्हता.. संगीनं भावाला उठीवलं..म्हणली..

“भाऊ हे..डब्याला गेलते..लई टाईम झालाय आजून आले न्हाईत..जरा बघून येतो का..?”

पाव्हणा बॅटरी घेऊन घराबाहेर पडला.. तांबडं फुटलं तव्हा परत आला..म्हणला “आक्के..दाजी कुठं बी दिसलं न्हाई..”

संगीच्या काळजाचा ठोका चुकला..दिस उगावला तव्हा लगूलग.. शेजारच्या पोरांना हाका मारल्या.. बबन्या मध्यान्ह रातीला गेला तो आजून आला नसल्याचं सांगितलं.. पोरं चारी वाटाला निघाली...नामा त्याच्या मळ्याच्या वाटानं गावात येता येता.. गावाबाहेरच्या देवळात दर्शनाला थांबला.. देवाचं दर्शन घेऊन बाहेर आला.. दाराबाहेरची चप्पल घालता घालता डाव्या आंगाला नजर गेली..नींबाच्या झाडाला बबन्या गळ्यात फास लावून .. लटकत व्हता...