मातृर्त्व Sagar Nanaware द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मातृर्त्व

जसा माणसांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा असतो तसाच तो प्राण्यांमध्ये हि असतो प्राणी हि निसर्गाच्या ह्या देणगी पासून वंचित नाहीत. असाच एक प्रसंग माझ्यासोबत घडला होता.

सुमारे दहा वर्षांपूर्वी एकेदिवशी मी आणि माझा मित्र पंकज आम्ही दोघे नुकतेच १० उत्तीर्ण झालेलो, नेहमीप्रमाणे संध्याकाळी सहज म्हणून आमच्या घरापासुन किमान २ किलोमीटर दूर अशा एका बागेत फिरायला गेलो होतो. थोडा उशीर तिथे टाईमपास केला, गप्पा गोष्टी केल्या, डोळेभरून मुली पहिल्या, एकमेकांमध्ये दबक्या आवाजात त्यांच्या वर कॉमेंट हि केल्या. बागेत संध्याकाळी तेथील कर्मचारी हे साफ सफाई, पाणी मारणे, वगैरे अशी ठरलेली त्यांची त्यांची कामे करत होती, सगळं कसं रोजच्याप्रमाणे सुरळीत चाललं होतं.

आम्ही दोघांनी परत घरची वाट धरायला घेतली, बागेपासून थोडे दुर गेल्यावर आम्हाला एक कुत्र्याचं जोडपं व त्यांच्या सोबत त्यांचीच काही पिल्लं दिसली, पंकजला प्राण्यांचा फार लळा आहे म्हणून तो लगेच त्यांच्या जवळ गेला व त्या दोन प्रौढ कुत्र्यांची नजर चोरून एका पिल्लाला उचलून आपल्या सोबत घरी घेऊन आला. दोन दिवस छान पैकी त्या पिल्लासोबत खेळ खेळून त्याला भरपेट दुध पाजून आम्ही खूप खूष झालो. त्याला आपल्याच घराशेजारी एक छोटंसं घर ही बांधून दिलं. त्या पिल्लासोबत खेळायला खूप मज्जा यायला लागली, त्याच ते दुडूदुडू धावणं आम्हाला खूप आवडायला लागंल. त्याची आम्ही इतर मित्रांशी ओळख करून दिली, सर्वाना हि तो खूप आवडला. आता त्याच नाव काय ठेवायचं यावर चर्चा सुरु झाली. कुणी म्हणे मोती, कुणी म्हणे टॉमी,  कुणी म्हणे टायगर, कुणी काय तर कुणी काय, पण आम्हाला एकही नाही पटलं, मी म्हटल हि "काय ओल्ड फॅशनची नावं सुचवताय रे, राहूद्या तुम्ही." मला त्याच्या साठी थोडं युनिक नाव हवं होत म्हणून मी एक दीर्घ श्वास घेतला, थोडा विचार केला व एक नाव सर्वाना सुचवलं ‘सुलतान’ बघू काय म्हणतात म्हणून सर्वांकडे बघत राहिलो. सगळे एकमेकांककडे बघत राहिले, थोडा विचारही सुरु झाला सर्वांमध्ये. एकजण म्हणाला “वाह! यार काय भारी नाव आहे 'सुलतान' मस्तच”. आता आम्ही त्याला ह्याच नावाने हाक मारू लागलो. सुरुवातीला त्याला काहीच कळलं नाही पण आम्ही सारखे त्याला हाक मारतच राहिलो जेणेकरून त्याला सवय व्हावी. काही गोष्टींमध्ये कुत्रे हे क्विक लर्नर असतात हे मला समजलं, त्याने हि लगेच ते नाव आत्मसात केलं. आता तो झाला होता आमचा "सुलतान भाई". गंमतीत आम्ही त्याला असेच हाक मारत असू.

दोन - तीन दिवसांनांतर आता ते पिल्लू आम्हाला वैतागलं हे आम्ही जाणल, ते आता शांत शांत राहायला लागलं, आम्हाला ही काही चुकल्या चुकल्या सारखं वाटायला लागलं, काय करावं काहीच समजेना. आम्हीही आता त्याकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं आम्ही परत आमच्या विश्वात आलो. तेच मग दिवसभर टाईमपास, संध्याकाळी बागेत फेर फटका, टपरी वरचा चहा असं सगळं आमचं संध्याकाळचं नियोजन ठरलेलं, आम्हाला आता त्या पिल्लाचा विसरही पडला. दोन दिवसाची भूतदया अजून काय?

एके दिवशी असाच हिंडताना आम्हाला ते कुत्र्याचं जोडपं पुन्हा दिसलं आम्ही म्हटलं जे ज्याच आहे त्यालाच ते परत करावं म्हणून आणि ते हि इथेच सुखी राहील असं म्हणून आम्ही घरी आलो व त्या कुत्राच्या पिल्लाला घेऊण त्या ठिकाणी आलो. बघतो तर काय ती त्या पिल्लाची आई त्या जवळ आली त्यानेही बरोबर आपल्या आईला ओळखलं तिने त्याच ठिकाणी उलटी केली आणि आपल्या त्या भुकेल्या पिल्लाला आपल्या पोटातील अन्न खाऊ घातलं आणि त्या पिल्लानेही ते लगेच फस्त केलं. त्याचा चेहरा आता फुलला होता. जे आम्हाला दोन तीन दिवसांत हवं तसं जमलं नव्हतं ते त्याच्या आई जवळ आल्यावर अचानक जमलं.

आणि आम्ही दोघेही आवाक होऊन हे दृश्य बघत होतो, आमची हि आता सर्व गणित सुटली होती...