निरपेक्ष प्रेम Pradeep Dhayalkar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निरपेक्ष प्रेम

आज जवळजवळ एक महिना होऊन गेला..!

'प्रतिक्षा' अजून कोमातून बाहेर आली नव्हती, ती एकटीच कोमात गेली नव्हती तर तिच्याबरोबर सगळं घरदार कोमात गेल्यासारखे होते..! सासू,सासरे,नवरा, दोन मुलं..! तीचं किचन,देवघर,आंगण, तीनं सजवलेला घराचा कोपरा न कोपरा...जणू तिच्यावर हिरमुसलेलं होतं. घरातील सगळं वातावरण निर्जिव झालं होत...! अठरा वर्षाची तिची मुलगी प्रणेता तिच्या आजीच्या गळ्यात पडून रडत होती.. म्हणत होती--आईला कंटाळा आला काय ग आमचा ? म्हणून इतकी विश्रांती घेते..? का नाही उठत आई ? असं म्हणून हमसून हमसून रडत होती. घराची जणू स्मशान भूमी झाली होती.

कारण ही तसंच होतं..! तिच्याशिवाय कोणाचं पान हालत नव्हतं, सर्वांची मनापासून घेत असलेली काळजी, थकलेल्या सासू-सासऱ्यांची सेवा, मुलांची देखभाल, त्यांना काय हवं काय नको ते, त्यांचा अभ्यास व शिक्षण या सगळ्यावर लक्ष... नवऱ्याला जास्त त्रास नको म्हणून वीज बिल भरण्यापासून ते बाजार-हाट करण्यपर्यंत सगळी कामं करणे. तिची कामातली चपळाई, तिचा सळसळता उत्साह अगदी वाखाणण्याजोगा होता...! मुलं आता मोठी झाली होती, शिक्षणासाठी बाहेरगावी होती, नवरा आपल्या बिझनेसच्या मागे व्यस्त असे...
इतक्या जबाबदाऱ्या पार पाडेपर्यंत वयाची चाळीशी कधी ओलांडली हे देखील समजले नाही तिला... पण कधी कुठली तक्रार नाही की घरात कधी वाद नाही, सगळं कसं अगदी हसत खेळत चाललं होतं !सासूबाई म्हणायच्या ही माझी सून नाही तर माझी लेकच आहे. तिची चपळ हालचाल आणि अजूनही न ओसरलेलं सौंदर्य 25-30 वर्षाच्या तरुणीलाही लाजवेल असं....आणि आज महिना होऊन गेला तरी ती निपचिप पडली होती... एखाद्या निर्जीव बहुलीसारखी..!

काही दिवसांपूर्वी लगबगीने जिना उतरताना तिचा पाय घसरला होता आणि डोक्याला जबर मार लागल्याने प्रतिक्षा कोमात गेली होती. डॉक्टरांचे सर्वोतोपरी प्रयत्न चालू होते पण अजून यश आलं नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी ईश्वरावर भरवसा ठेवायला सांगून रिकामे झाले... कोमातून बाहेर यायला आठ दिवस, महिना किंवा वर्ष ही लागेल असे... डॉक्टरांनी सांगितले.. नातेवाईक-पाहुणे पण आता दवाखान्याच्या येरझाऱ्या घालून कंटाळले होते. ज्याची त्याची कामं, मुलांचं शिक्षण,नवऱ्याचा व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत होतं. आता "वाट बघणं" या व्यतिरिक्त कोणाच्याच हातात काहीच नव्हतं. शेवटी घरातील लोकं एका नर्सला ड्युटीवर ठेऊन, वेळ मिळेल तेंव्हा येत-जात होते. शेवटचा एक उपाय डॉक्टरांनी सांगितला होता -रोज किमान एक तास तरी घरच्या सदस्यानी येऊन तिच्याशी बोलायचं, तिच्या आवडीच्या गोष्टी, तिच्या आवडीचं संगीत, तीचं मन कशात रमत होतं त्या सगळ्या गोष्टी तिच्याशी शेअर करायच्या...
"पण मग प्रतिक्षाचं मन हल्ली कशात रमत होत....???" हे फक्त तिलाच माहीत होतं...!
इकडे ' प्राजक्त 'सैरभैर झाला होता..! एक-एक क्षण एक-एक तपासारखा त्याला वाटत होता. प्रत्येक मिनिटाला व्हाटसप ओपन करून पहात होता, पण नो रिप्लाय...? रोज सकाळी न चुकता तिचा शुभ सकाळ चा मेसेज आणि तिचा तो लोभस डिस्प्ले फोटो पाहूनच त्याच्या दिवसाची सुरुवात होत असे. रोज व्हाटसप वर तासं-तास गप्पा मारणारी...! अचानक असं काय झालं ??? एकाएकी बोलणं का बंद? तिची फार सवय झाली होती त्याला. अशीच एक व्हाटसप ग्रुप वर तिची ओळख झाली, ग्रुप वर बोलणं वाढत गेलं आणि मग ग्रुप मधून बाहेर पडून प्रायव्हेट चॅटिंगला कधी सुरवात झाली हे दोघांनाही समजले नाही. दोघांची केमिस्ट्री उत्तम जमली होती. दोघांचे सूर एकमेकात अगदी चपखल बसले होते. कोणताही एक विषय बास होता त्यांना दिवसभर गप्पा मारायला. मग हळूहळू एकमेकांना जाणून घ्यायला लागले..... खरंतर दोघेही विवाहित..., आपापल्या संसारात समाधानी. पण असं काय घडलं की दोघांनाही एकमेकांच्या स्वभावाची भुरळ पडली होती. तिचा मनमोकळा स्वभाव, तीचं सौंदर्य, तिनं त्याला न पहाताही त्याच्यावर टाकलेला प्रचंड विश्वास, तिला त्याच्या बोलण्यातून जाणवणारा खरेपणा, त्याचं स्वच्छ मन, स्वतःच्या बायकोच, मुलांचं वारंवार करत असलेले कौतुक.. त्याच्या मनाच्या श्रीमंतीने ती अक्षरशः भारावुन गेली होती. आणि हेच कारण होतं आज ते एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते...!
" सर्वप्रथम आपले कुटुंब व जबाबदारी... इच्छा.. आकांक्षा... मग तु आणि मी..!" अस दोघांच्याही संमतीने ठरवलेलं त्यांचं तत्व होत..!
प्रेमाची अनुभूती फार सुंदर असते कारण खरं प्रेम जे कोणीही कोणावरही करावं .ज्यात आपलेपणा, जिव्हाळा, आदर असतो. आयुष्याच्या ज्या वळणावर आपलं प्रेम फुलत आहे, ते आंधळं नसून डोळसपणे केलेली एक सुंदर प्रार्थना आहे... ज्यात कोणतीच आसक्ती नाही, समर्पणाच्या भावना नाहीत की, कोणाकडूनही कसली अपेक्षा नाही. आणि स्वतःच्या फॅमिली ला डावलून तर त्यांना कोणतेच प्रेम साध्य करायचे नव्हते. तर अश्या ह्या निरागस, मॅच्युअर प्रेमाची शपथ दोघांनीही घेतली होती.आणि आज जवळपास एक ते दीड वर्षे झाले... दोघेही या प्रेमरूपी अमृतात न्हाऊन निघाले होते... आजपर्यंत दोघांनी साधा एक कॉल सुद्धा केला नव्हता की बोलण्यात कोणत्या मर्यादा ओलांडल्या नव्हत्या..!
या स्टेज ला आपण पुन्हा प्रेमात पडू शकतो हे नव्यानेच उमगले होते तिला. त्याच्या प्रेमाला नाही ... नाही म्हणत दिलेला होकार... होकार..! दिल्यानंतर आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तुला काय गिफ्ट देऊ??? असं विचारणारा तो ! आणि आज तिला जाणवलं की आपण आजपर्यंत आहे त्या गोष्टीत समाधान मानत गेलो, पण अश्या किती तरी गोष्टी आहेत... ज्या आपण जगायच्या राहिलो आहोत...! "हा साडीचा रंग बघ किती खुलून दिसतो तुला!" हे वाक्य साधंच आहे... पण असं बोलल्याने आपल्याला होणारा आनंद काही वेगळाच असतो..! तर अश्या या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद ती त्याच्या रूपानं घेत होती आणि संतुष्ट होत होती...

कधी कधी चिडायची, कंटाळा यायचा तिला चॅटिंगचा. मग ती त्याला म्हणायची,"काय अर्थ आहे रे या प्रेमाला...! ना कधी भेटू शकतो, ना कधी समोरासमोर बसून मनसोक्त बोलू शकतो, एक साधा फोन करायची पण सोय नाही"....रडायची, स्वतःला त्रास करून घ्यायची.... तो तिची समजूत घालायचा,"अग! हीच तर आपल्या प्रेमाची खरी परीक्षा आहे...! या विरहातच प्रेमाची खरी मजा आहे...! हे बघ समाजाचा विचार केला तर आपलं नातं समाजाला मान्य न होणारं आहे, त्या दृष्टीने आपण किती सुरक्षित आहोत... ज्यादिवशी आपल्या दोघांनाही आपल्या प्रेमाचा साक्षात्कार झाला.. तेंव्हा दोघांनीही माघार घायचं ठरवलं होतं.., पण जमलं नाही, आपण मनान गुंतलोय..! असंही प्रेम का कधी ठरवून होत का..? ती तर ईश्वराने दिलेली एक सुंदर भेट आहे. असेल आपलं नात मागच्या जन्मी काहीतरी त्याचीच ही उतराई आहे..., नाहीतर जगातल्या इतक्या लोकांमध्ये आपलीच का ओळख झाली असावी विचार कर.. थोडा...!
हे सर्व ऐकून मग ती शांत व्हायची, आणि तिचारडवा चेहरा परत फुलासारखा टवटवीत व्हायचा.. असं हे यांचं प्रेम दिवसें-दिवस बहरत चाललं होतं. त्या दिवशी अचानक एकाच कार्यक्रमाचे आमंत्रण दोघांनाही आले होते. प्रथमच ते दोघे आज एकमेकांसमोर येणार होते. त्यानं तिला सांगितलं होतं, परत आपली भेट होईल न होईल म्हणून मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय त्याचा स्वीकार कर... आणि माझी आठवण म्हणून आयुष्यभर तुझ्याजवळ ठेव..!
सकाळपासून ती जायच्या गडबडीत होती. घरातलं सर्व आटोपून ती तयार झाली. हलकासा मेकअप, त्याच्या आवडत्या रंगाची साडी नेसून आपल्याच धुंदीत जिना उतरून येत असताना पायरी चुकली आणि जिन्यावर पडली, डोकयला मार लागला होता.. त्या दिवसा पासून ती हॉस्पिटलमध्ये कोमात होती.
इकडे प्राजक्त शेवटच्या क्षणापर्यंत तिची वाट पहात होता. कार्यक्रम कधीच आटोपला होता, सगळेजण परतीच्या मार्गाला लागले होते. हॉल सगळा रिकामा झाला होता, तरी तो तिची वाट पहात बसला होता.. एकसारखा मोबाईल चाचपडत होता, पण तिचा एकही मेसेज नव्हता. शेवटी नाईलाजाने उठला आणि जायला निघाला. "खूप मोठे वादळ येऊन गेल्यानंतर ची भयाण शांतता, आणि त्या वादळात आपलं सर्वस्व गमावल्याचे भाव त्याच्या डोळ्यात दिसत होते. "
व्हाट्सअप ग्रुप मधून ही लेफ्ट होऊन ही बरेच दिवस झाले होते. त्यामुळे कोठे कॉन्टॅक्ट ही करता येईना. आणि एक दिवस अचानक ग्रुप वरील एक मैत्रीण भेटली आणि तिच्याकडून प्रतिक्षाची.. ही बातमी समजली... हे ऐकून जणू काही त्याच्या पायाखालची जमीनच सरकली ! इतक्या दिवसांनंतर आज आपल्याला ही गोष्ट समजली !अक्षरशः जीवाची घालमेल झाली त्याच्या.....कसंबसं स्वतःला सावरून तिच्याकडून दवाखान्याचा पत्ता घेतला. आणि एकदम त्याला जाणवलं..आपण पत्ता घेतला खरा, पण जाणार कसं..? तिच्या घरच्यांना काय सांगणार..?तिला पहायची तर इच्छा खूप झाली होती.पण करणार काय ??? विचार करून करून मेंदूचा अगदी भुगा झालाय! नक्की तिचा जीव माझ्यात अडकलाय..?जोपर्यंत मी तिच्यापर्यंत पोहोचत नाही, तिच्याशी बोलत नाही तोपर्यंत ती यातून उठणार नाही, हे तो जाणून होता.
एक दिवस धाडस करून दवाखाना गाठला. तिच्या सेवेला असलेल्या नर्सला विश्वासात घेऊन सगळी हकीकत सांगितली... होय - नाही म्हणत तिने शेवटी एकदाचा होकार दिला. तिला भेटण्यासाठी त्यानं फक्त दोन तास मागितले होते.....आणि त्याप्रमाणे तो रात्री दहाच्या सुमारास दवाखान्यात आला होता. नर्सने त्याला तिच्या रुम मध्ये आणून सोडले आणि ती वेटिंग रुम ला निघून गेली.
त्यानं बघितलं तिला ....काळजाचं पाणी - पाणी झालं त्याच्या..! डोळ्यातून अश्रू च्या धारा वहायला लागल्या."परिकथेतल्या गोष्टीप्रमाणे एखाद्या चेटकीनीने शाप दिल्यानंतर जशी एखादी राजकुमारी शांत झोपलेली असते, कधीही न उठण्यासाठी....."तशी ती वाटली... चेहऱ्यावर तेच समाधान, तीच निरागसता..!
कसंतरी डोळ्यातल्या अश्रूंना आवर घालून तिचा हात आपल्या हाती घेऊन बोलायला लागला... बरेच दिवसांचं बोलायचं राहून गेलं होतं.. काय सांगू नी काय नको असं झाल होत त्याला...भरभरून बोलत होता... तिच्या आवडीची गाणी गुणगुणत होता..,मधेच एखादा विनोद सांगून हसत होता... तिच्या केसांवरून मायेनं हात फिरवत होता... प्रत्येक शब्द नि शब्द तिच्या आत्म्यापर्यंत पोहोचत होते...
शेवटी तो म्हणाला, मी वाट पाहतोय तुझी, उठ लवकर..! अजून खूप काही आयुष्य जगायचे आहे, खूप- खूप बोलायचं आहे. मी आज तुला प्रत्यक्ष बघितलं...
"खूप सुंदर आहेस..! " "मनाने ही आणि तनाने ही!"आणि हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय..? असं म्हणून त्याने खिशातून एक छोटी डबी काढली आणि ती उघडून त्यातून सुंदर.. नाजूक मोत्यांची नथ बाहेर काढली, आणि तिच्या हातावर ठेवत म्हणाला... तू बरी झालीस की तुझ्या या चाफेकळी सारखं असलेल्या नाकात ही नथ घाल आणि मस्तपैकी सेल्फी काढून dp ला लाव..! " या क्षणांची मी आतुरतेनं वाट पहात आहे. असे म्हणून ती नथ असलेल्या हाताची मूठ बंद करून अगदी जड पावलाने तो निघून गेला. तिला पाहून त्याच मन पूर्ण भरलं होत. मनावरचं ओझं कमी झालं होतं. कारण त्याला नक्की माहीत होतं ती लवकरच यातून उठणार.. स्वतःला सावरणार.. !
देवाच्या कृपेने खरंच अस घडलं..! प्रेमाच्या या अवघड परीक्षेत ती परमेश्वराच्या साक्षीने पास झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली. तिला काहीच समजेना आपण कोठे आहोत?? तीनं नर्सला विचारलं तुम्ही कोण..? मी कोठे आहे ? माझी मुलं कुठं आहेत?एकावर एक प्रश्न विचारत सुटली होती? आणि एकदम तिला जाणीव झाली..! मला त्याला भेटायला जायचं होतं, तो वाट बघत असेल..!मला जायला हवं..! असं म्हणून ती उठायला लागली... नर्सने कसंबसं तिला परत झोपवलं आणि डॉक्टराना बोलवायला गेली...
तीचं लक्ष झाकलेल्या मुठीकडं गेलं.. तीनं मूठ उघडून बघितली. त्यानं दिलेली नथ तिच्या हातात होती. क्षणात तिला सर्व गोष्टींचा उलगडा झाला... जिन्याच्या पायरीवरन आपण पडलो होतो इथपर्यंतच तिला आठवत होत. पण ती नथ बघून तो येऊन गेल्याची तिला खात्री पटली...! डोकं जड झालं होतं....हे सगळं काय घडलं असावं याचा ताळमेळ बसवताना तिला फार त्रास झाला. तोपर्यंत डॉक्टर आले, त्यांची चाहूल लागताच तिने ती नथ उशीखाली ठेऊन दिली. सर्व तपासण्या झाल्यावर दोन दिवसात डिस्चार्ज मिळेल असं सांगून निघून गेले. नर्सने पण काय घडलं ते थोडक्यात तिला सांगितलं. घरात सगळीकडे आनंद पसरला होता. तिची तुळस बहरु लागली, फुले वाऱ्यावर डोलू लागली. सासरे म्हणाले ,"तिचीच पुण्याई तिच्या कामी आली."सगळं वातावरण तिच्या स्वागतासाठी चैतन्यमय झालं होतं. आज ती घरी येणार होती. मुलं पाखरासारखी आईची वाट पहात होती...! नवरा न्यायला आला होता. सर्वांचा निरोप घेऊन ती गाडीपर्यंत आली, आणि क्षणभर तिला काहीतरी आठवल्यासारखे झाले तशी ती गर्रकन मागे वळली, पाच मिनिटात आले असं नवऱ्याला सांगून पुन्हा दवाखाण्याच्या पायऱ्या चढून वर आली. रूममध्ये गेली तर तिची नर्स आवरा-आवर करत होती. तिला मिठी मारून रडायला लागली....नर्सने तिच्या मनातली होणारी कालवाकालव लगेच ओळखली आणि म्हणाली....."अगं, वेडी आहेस का रडायला..! डोळे पूस बरं आधी, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस. काही बोलू नकोस, तू न सांगताही मला सर्व समजलंय..! लक्ष्यात ठेव, तुम्हा दोघांच गुपित माझ्याबरोबरच संपेल. कारण तुमचं प्रेम हे दोन अत्म्यांच मिलन होतं.. निरपेक्ष होतं..त्यात कोणताही स्वार्थ नव्हता ,अपेक्षाही नव्हत्या...! अश्या प्रेमाला ईश्वर सुद्धा दूर करू शकत नाही.... जा....सुखी रहा..! तिचे आभार मानून म्हणाली तुमच्या रूपाने ईश्वर तर मला इथेच भेटला...! नमस्कार करून जायला निघाली.....
" पुन्हा नव्याने जगण्यासाठी..! "

प्रदीप धयाळकर ✍️✍️✍️

या कथेतील पात्र व विषय हे पुर्णपणे काल्पनीक आहेत..यात काही साम्य आढळल्यास तो योगायोग असेल..! कॉपी राईटस लेखकाधिन..!
नावासह शेअर करण्यास काही हरकत नाही..!
- प्रदीप धयाळकर.✍️✍️✍️