अध्याय 6
कौसल्यासांत्वनं
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
कैकेय्युवाच
राजा न कुपितो राम व्यसनं नास्य किंचनं ।
किंचिन्मनोगतं त्वस्य त्वभ्दयान्नानुभाषते ॥१॥
प्रियं त्वामप्रियं वक्तुं वाणी नास्य प्रवर्तते ।
तदवश्यं त्वया कार्यं यदनेन श्रुतं मम ॥२॥
एष मह्यं वरं दत्वा पुरा मामभिपूज्य च ।
पश्चात्संतप्यतेःराजा यथान्यःप्राकृस्तथा ॥३॥
श्रीरामांनी शपथपूर्वक आश्वासन दिल्यानंतर कैकेयीकडून वरांचे वृत्तकथन :
पूर्व प्रसंगी आपण । रामें वाहिली वसिष्ठाची आण ।
तेणें कैकेयी सुखसंपन्न । पूर्वकथन तें सांगे ॥१॥
रायासी नाहीं ज्वरादि अवस्था । नाहीं भूतसंचारता ।
आणिक कांही नाहीं व्यथा । तुझी ममता बहु बाधी ॥२॥
तें रायाचें मनोगत । सांगातां तुझें पोळेल चित्त ।
यालागीं पैं नृपनाथ । साशंकित सांगावया ॥३॥
तूं रायाचा प्रिय पूर्ण । प्रियापासीं अप्रिय वचन ।
सर्वथा न बोलवे जाण । यालागीं मौन धरी रावो ॥४॥
रायाची पूर्व भाक । ते त्वा करावी आवश्यक ।
पितृवचनपरिपाळक । तिन्ही लोक वंदिती ॥५॥
रुक्मागंद सूर्यवंशीं । व्रत भंगतां एअकादशी ।
धर्मागद शिर दे त्यासी । वैकुंठवासी जगद्वंद्य ॥६॥
तूं तंव सत्यवादी रघुनाथ । जगीं तुझा थोर पुरुषार्थ ।
पित्यची भाक तूं करी सत्य । पितृवचनार्थ प्रतिपाळीं ॥७॥
रायांचे मज वरदान । माझें मज नेदितां जाण ।
तुज देवों केंवी आपण । लज्जायमान तेणें रावो ॥८॥
देऊं केले तुजपती । तें नेदीं न म्हणे भूपती ।
काय बोलावें तुजप्रती । सलज्ज चित्तीं नृपनाथ ॥९॥
ऎकोनि कैकेयीची वाणी । श्रीराम श्रीसत्यशिरोमणी ।
लागोनि मातेच्या चरणीं । काय गर्जोनी बोलत ॥१०॥
राम उवाच –
अहं हि वचेनाद्राज्ञः पतेयमपि पावके ।
भक्षयेयं विषं तीक्ष्णं मज्जेयमपि चार्णवे ॥४॥
नियुक्तो गुरुणा पित्रा नृपेण च हि तेन च ।
तद्ब्रुहि वचनं देवि राज्ञो यदभिकांक्षितम ॥५॥
प्रतिजाने करिष्येऽहं रामो द्विर्नाभिभाषते ॥६॥
पितृवचन पूर्तीचे कैकेयीस आश्वासन :
गुरुवचन पितृवचन । न करीं तो पापी पूर्ण ।
मनुष्यवेषें तो स्वान । काळें वदन तयांचे ॥११॥
गुरुवाक्य विषम वितंड । न करी म्हणे जयाचें तोंड ।
तें तोंड नव्हे रौरवकुंड । पापी प्रचंड तो एक ॥१२॥
गुरुवचनअविश्वासी । जिताचि तो नरकवासी ।
प्रेतें आतळों भीती त्यासी । महापापराशी तो एक ॥१३॥
यालागीं पितृवचन अन्यथा । मी न करीं वा सर्वथा ।
त्रिसत्य सत्य हें तत्वतां । विकल्प चित्ता धरूं नको ॥१४॥
तुज कैसें कैसिं वरदान । रायें दिधलें आपण ।
त्याचें समूळ कथन । कृपा करोनि मज सांगिजे ॥१५॥
ऐकोनि श्रीरामसत्यवाणी । कैकेयी उल्हासिली मनीं ।
वरदप्रतापाची कहाणी । हरिखें गर्जोनी सांगत ॥१६॥
पुरा देवासुरे युद्धे पित्रा ते मम राघव ।
रक्षितेन वरौ दत्तौ सशल्येन महारणे ॥७॥
तत्र मे याचितो राजा भरतस्याभिषेचनम् ।
गमनं दंडकारण्ये तव चाद्यैव राघव ॥८॥
दोन वरांची गोष्ट :
पूर्वी शुक्राचे युद्धार्थ । दशरथ गेला मजसमवेत ।
शुक्रासी साह्य दैत्य समस्त । देवसाह्यार्थ दशरथ ॥१७॥
देवां दैत्यां युद्ध पूर्ण । थोर जाले रणकंदन ।
दशरथें दैत्यां दारुण । बाणीं संपूर्ण निवटिलें ॥१८॥
वृषपर्वा दैत्यनाथ । रायें रणीं केला विरथ ।
पायीं पळतां रणांत । बाणीं मूर्छित तो पादिला ॥१९॥
रायें मारिलें वृषपर्व्यासी । म्हणोनि शुक्रें पाठी घातलें त्यासी ।
निर्वाणयुद्ध दशरथेसीं । अति क्रोधेंसीं मांडलें ॥२०॥
शुक्रें बाणलाघवाआंत । आंख छेदोनि राजा केला विरथ ।
युद्धी विचंबला दशरथ । म्हणोनि बाहु चक्रांत सूदला म्यां ॥२१॥
माझे बाहूचा निजनेट । रथ चालिला घडघडाट ।
शुक्राचा रथ करोनियां पीठ । शिरींचा मुकुट पाडिला ॥२२॥
युद्धीं निवटावें शुक्रासी । ब्राह्मण म्हणोनि रक्षिलें त्यासी ।
यश आलें दशरथासी । जयो रायासी माझेनि ॥२३॥
वरांचा तपशील :
ते वेळीं रायें अति संतोषीं । दोन वर दिधले भोकेसीं ।
एकें राज्यपट भरतासी । एकें वनवासी श्रीराम ॥२४॥
रामा रहिवास वनांतरीं । दंडकारण्य़ामाझारीं ।
वल्लंबरें जटाधारी । गौतमीतीरीं रहिवासू ॥२५॥
ज्येष्ठ सांडोनियां दुरी । भरत सर्वथा राज्य करी ।
तैसी मी नव्हें पापाचारी । ऐक निर्धारीं नेमा माझ्या ॥२६॥
मज नाहीं अत्यंत स्वार्थ । चौदा वर्षे नेमस्त ।
राज्य करील माझा भरत । पूढें रघुनाथा निजराज्य ॥२७॥
राज्यांतील अणुप्रमाण । स्वयें न न्यावें आपण ।
पितृवचन जरी प्रमाण । तरी वनप्रयाण आजीच ॥२८॥
अजिन वल्कलें जटाघारी । वना निघावें झडकरी ।
कंदमूळफळाहारीं । गौतमीतीरी रहिवासू ॥२९॥
पितृवचन पाळण्याविषयी श्रीरामांचा उत्साह :
ऐकोनि कैकेयीचें उत्तर । श्रीराम जाला हर्षे निर्भर ।
वना निघावया सत्वर । हृदयीं अपार आल्हाद ॥३०॥
कैकेयी हे एक खोटी । हा विकल्प नाहीं रामाच्या पोटीं ।
तिची सत्य मानोनि गोष्टी । विश्वासें जगजेठी वना निघे ॥३१॥
राज्य गेलियाचें नाहीं दुःख । वना जायाचें परम सुख ।
बाहुस्फुरणीं चालिला हरिख । प्रसन्नमुख वनाभिगमनीं ॥३२॥
सवेंचि पुसे मातेसी । रावो कां न बोले मजसीं ।
येरी म्हणे अतिशयेसीं । लज्जा त्यासी जालीसे ॥३३॥
पहिलें तुज राज्य देऊं केलें । आतां वना जाय हें केवीं बोले ।
या लाजा मौन पडलें । मुख आपुलें दाखवीना ॥३४॥
मानावें पित्याचे वचनार्था । तूं तंव माझी निजमाता ।
तुझे वचन न मानिता । वेदशास्त्रार्थां मी निंद्य ॥३५॥
पित्यापरीस माता श्रेष्ठ । हे संन्यासपद्धति निर्दुष्ट ।
तुझें वचन मज वरिष्ठ । सुख उभ्दट वनवासीं ॥३६॥
संन्यास घेतलियावरी । पिता पुत्रातें नमस्कारी ।
संन्यासी माता वंदी शिरीं । आज्ञाधारी तियेचा ॥३७॥
जें तुज मातेसी होय सुख । आणि पित्याचीं प्रतिपाळें भाक ।
ते मज करणें आवश्यक । श्रीराम निःशंक बोलिला ॥३८॥
पितयाची पढियंती तत्वतां । तें तूं माझी सखी माता ।
विकल्प न धरीं वो चित्ता । तुझिया वचनार्था अनुकूल ॥३९॥
कैकेयी आनंदातिशयाने श्रीरामांस दृढालिंगन देते, त्यामुळे तिचे हृदयपरिवर्तन :
ऐसें ऐकतां श्रीरामवचन । कैकेयी जाली सुखसंपन्न ।
आनंदाश्रु लोटती नयन । दिधलें आलिंगन श्रीरामा ॥४०॥
श्रीरामासी आलिंगतां । विकल्प निघाला आंतौता ।
कैकेयीस उपजे सभ्दावता । त्याचि वचनार्था बोलत ॥४१॥
ते म्हणे तू निर्मळ रघुनाथा । येर तंव न बोलवे आतां ।
तुज वनवासीं असतां । पूर्ण विजयता मद्वाक्यें ॥४२॥
आतां राम न बैसे राज्यपटीं । म्यां व्यर्थ कां करावी गोष्टी ।
हा पित्याच्या भाकेसाठीं । वना उठाउठीं जाईल ॥४३॥
राम सत्यवादी निजनिर्धारीं । आजि मज कळली थोरी ।
हा पितृवाक्यावरी । जाईल वनांतरी दंडकारण्या ॥४४॥
श्रीराम वनाभिगमन । ऐकतां राय पडे विसंज्ञ ।
त्याचे श्रीरामें वंदोनि चरण । निघे आपण वनवासी ॥४५॥
कैकेयीच्या चरणीं ठेविला माथा । म्हणे तुंवा पूर्ण कृपा केली आता ।
शांतवावी कौसल्या माता । चिंता दशरथा करों नेदीं ॥४६॥
दोघां करोनि प्रदक्षिण । राम करी वनाभिगमन ।
कैकेयी गहिंवरली पूर्ण । दीर्घ स्वरें रुदन राव करी ॥४७॥
ऐकतां रायाची ग्लानी । राम निघे धैर्य धरोनी ।
वना जावया उल्हास मनीं । सापत्नवचनीं विश्वासु ॥४८॥
लक्ष्मण कोपाविष्ट होतो :
क्रोध लक्ष्मणाचे पोटीं । भोंवयांसी घालोनि गाटी ।
निघाला श्रीरामाच्या पाठीं । क्रोधदृष्टीं संतप्त ॥४९॥
गमने च मतिं चक्रे वनवासाय लक्ष्मणः ।
अनुचिंत्य विना रामं न हि जीवितुमुत्सहे ॥९॥
लक्ष्मणाचें मनोगत । वना गेलिया रघुनाथ ।
मीही जाईन त्यासमवेत । हा निश्चितार्थ सौमित्रीं ॥५०॥
रामावेगळें जीवें प्राणें । अर्ध क्षण नाहीं राहणें ।
ऐसा निश्चयो लक्ष्मणें । स्वांतःकरणें दृढ केला ॥५१॥
उल्लंघोनि राजभावना । अभिषेकपात्रां प्रदक्षिणा ।
करोनि राम निघाल वना । हाहाकार जना होंसरला ॥५२॥
तस्मिंस्तु पुरुषव्याघ्रे निष्कामति कृतांजलौ ।
आर्तशब्दा महाजज्ञे स्त्रीणामंतःपुरे तदा ॥१०॥
कैकेयी मंदिरात इतर राण्यांचा विलाप :
कैकेयीचे निजमंदिरीं । अति आक्रंदें रडती नारी ।
राम दवडिला वनांतरी । दृढ दुराचारी कैकेयी ॥५३॥
एकी कान केश तोडिती । एकी अति दुःखें आरडती ।
स्त्रीजित जाला भूपती । बाळ वनाप्रति धाडिला केंवी ॥५४॥
कौसल्या मंदिरात श्रीरामांचे आगमन , पित्याच्या वरांचे कथन :
तयांचे ऐकोनि रुदन । वेगें निघे रघुनंदन ।
ठाकुनियां आला मातृभवन । वनाभिगमन सांगावया ॥५५॥
न घेतां मातेचें आज्ञापन । कार्य साधेना निर्विघ्न ।
ऐसे जाणोनि रघुनंदन । आला आपण मातृभवना ॥५६॥
जन बोलती समस्त श्रेष्ठ । दशरथा नियामक वसिष्ठ ।
तेणें श्रीरामासी राज्यपट । करावा वरिष्ठ गुरुप्रतापें ॥५७॥
वसिष्ठाचिया आज्ञेपुढें । कैकेयी कायसें बापुडें ।
राजा बोलों न शके तोम्डें । त्यासीही निवाडें सांगा कोणी ॥५८॥
वना गेलिया रघुपती । त्याची थोर वाढेल किर्ती ।
वसिष्ठें जाणोनि निश्चितीं । जातां वनाप्रति ना न म्हणे ॥५९॥
आपण शीघ्र वनाभिगमनी । हें मातेसी सांगावयालांगूनी ।
राम प्रवेशला मातृभवनीं । उल्हास मनीं गमनाचा ॥६०॥
रामें नमस्कारिली निजजननी । येरी आलिंगी उल्हासोनी ।
गुरूपुष्याचा अभिषेचनीं । रजा त्रिभुवनीं तूं होसी ॥६१॥
गुरुपुष्याचा सुमुहुर्त । सभाग्यासी होय प्राप्त ।
तेणें मुहुर्तें अभिषिंची दशरथ । राजा अघुनाथ तिहीं लोकीं ॥६२॥
त्या मुहूर्ताचें ऐसें काज । जगीं होईल रामराज्य ।
सुरनर नाचती आनंदभोज । निश्चय मज कळलासें ॥६३॥
वसिष्ठ अभिषेकाचें जळ । त्याचें ऐसे आहे बळ ।
तिहीं लोकींचे राज्य अढळ । होईल सकळ श्रीरामा ॥६४॥
ऐसे बोलतां कौसल्येसी । श्रीराम सांगे तियेपासीं ।
जाला अभिप्राव तूं नेणसी । सावकासीं अवधारीं ॥६५॥
पूर्वी राये निजभाकेंसीं । दोन वर दिधले कैकेयीसी ।
एकें राज्यपट भरतासी । एकें वनवासी श्रीराम ॥६६॥
भाकें गोविलें दशरथा । कैकेयीनें साधिलें निजस्वार्था ।
राज्याभिषेकीं नेमिलें भरता । मज वनांत धाडिलें ॥६७॥
मर्यादा नेमूनि चौदा वर्षी । दंडकारण्यीं विजनदेशीं ।
गोदावरी रहिवासीं । फळामूळांसी सेवूनी ॥६८॥
राज्यांतील नेवों नये अणुमात्र । त्यजोनि वस्त्रें अळंकार ।
कृष्णाजिन वल्कलांबर । जटाधारी वनवासी ॥६९॥
रायें नेमिलें नेमस्त । वनप्रयाणा सुमुहर्त ।
आजीच निघावें त्वरित । पुसावया येथ मी आलों ॥७०॥
कौसल्येचा आक्रोश :
ऐकोनि श्रीरामाची वाणी । जीवा मना अति आटणी ।
मूर्छापन्न पडली धरणीं । खुंटली वाणी अति दुःखे ॥७१॥
गरगरिती नेत्रवाट । बाष्पें रोधिला पै कंठ ।
श्वासें फुटोम् पाहे पोट । प्राणसंकट मांडले ॥७२॥
पुत्रवियोगाचा घावो । दृढ जिव्हारीं खोंचला पहाहो ।
पुत्रशोकें पूर्ण विरहो । पडला देहो मूर्छित ॥७३॥
माता मूर्छित भूतळीं । रामें उचलूनि ते वेळीं ।
झाडोनियां धूसरधूळीं । हृदयकमळीं आलिंगली ॥७४॥
तीस रामें सावधान करितां । म्हणे मज मरूं दे रघुनाथा ।
पुत्रवियोगें जिणें जितां । परम व्यथा मातेसी ॥७५॥
येथोनि श्रीरामाचें मुख । मागुती कैं देखेन देख ।
तेणें आक्रंदें दिधली हाक । हृदयी दुःख दाटलें ॥७६॥
कांटा रुतला फणिकपाळी । पुच्छ तुटल्या सापसुरळी ।
जैसी जळावेगळी मासोळी । तैसी तळमळी कौसल्या ॥७७॥
कपटी म्हणों जातां रावो । माझें पतिव्रत्य होईल वावो ।
पतिअवज्ञा थोर अन्यावो । विकिला देहो पतिवाक्या ॥७८॥
कैकेयी भर्तारप्रियकर । तिसीं मज करितां मत्सर ।
माझा अपराध मी देखें थोर । अति दुस्तर मज रामा ॥७९॥
कैकेयीचा आजिवरी । मज द्वेष नाहीं तिळभरी ।
भर्तारकृपा जियेवरी । ते निर्धारीं मज पूज्य ॥८०॥
घारी झडपोनियां कैकेयीसी । गर्भप्रसाद नेता आकाशीं ।
अर्धपिंड दिधला तिसी । निजपतीसी संतोषा ॥८१॥
तैंपासोनि दशरथ । मजवरी कृपा करी अत्यंत ।
अन्यायी नव्हे नृपनाथ । अभागी येथ मी रामा ॥८२॥
कैकेयीचा कोण अन्यावो । तीस निजपुत्राचा मोहो ।
वना जातां रामरावो । अभागी पहा हो मी एकी ॥८३॥
पितृवचनाचा भंग न करिता मातेची आज्ञा पाळण्याविषयी कौसल्येची युक्ती :
रायाचें वचन वंदोनि माथा । वना रघतोसी रघुनाथा ।
माझें वचन पाळिसी आतां । अति गुह्यार्था सांगेन ॥८४॥
रायाचें वचन सिद्धी जाय । माझें वचन पाळिलें होय ।
ऐसें कांही एक वर्म आहे । तें तुज मी पाहें सांगेन ॥८५॥
पित्याच्या प्रतिपाळावें वाक्यार्था । तेणेचिं सुखावे निजमाता ।
तें मज करणं वो सर्वर्था । चरणीं माथा ठेविला रामें ॥८६॥
राज्य देवोनि भरतासी । तुवां रहावें तुजपासीं ।
माझियें शृंगारवाटिकेसीं । चौदा वर्षे वनवास ॥८७॥
दवडोनि सेवकां सर्वांसी । रामा सांडोनि वैभवासीं ।
माझ्या शृंगारवाटिकेसीं । चौदा वर्षे वनवास ॥८८॥
न भेटावें प्रधानासी । न भेटावें निजप्रजांसी ।
माझिये शृंगारवाटिकेसीं । चौदा वर्षे वनवास ॥८९॥
न भेटावें गृहस्त्रीयांसी । न भेटावें निजप्रियांसी ।
बसोनि शृंगारवाटिकेसीं । चौदा वर्ष वनवास ॥९०॥
न भेटावें दशरथासी । न भेटावें वसिष्ठासी ।
माझिया शृंगारवाटिकेसी । चौदा वर्षे वनवास ॥९१॥
रायाची आज्ञा अति सधर । त्यजोनि वस्त्रें वल्कलांबर ।
अलंकार सांडोनि जटाभार । फळाहार करूं दोघें ॥९२॥
तुजशीं असोनियां एक । तृण सेवितां परम सुख ।
तुजवेगळें पीयूख । केवळ विख मज होय ॥९३॥
कौसल्येची युक्ती राजाज्ञेला बाधक :
ऐकोनियां मातेच्या वचनासी । श्रीराम लागला पायांसी ।
आश्वासूनि कौसल्येसी । निजधर्मासी सांगत ॥९४॥
रायाची आज्ञा आहे ऐशी । जावें दंडकारण्यासी ।
राहतां शृंगारवाटिकेसीं । पितृवचनासी विरोध ॥९५॥
तूं बोलसी मोहसंभ्रम । मज पितृवाक्य पूज्य परम ।
सांडोनि मोह ममता भ्रम । आज्ञा परम मज देई ॥९६॥
तुझी आज्ञा पैं न होतां । मज यश नये सर्वथा ।
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । प्रसन्नता मज प्रेरीं ॥९७॥
पित्याचें वचन नुल्लंघिता । याहूनि अधिक जाण माता ।
सावध परिसें रघुनाथा । वेदशास्त्रार्था अनुमत ॥९८॥
दशविप्रानुपाध्यायो गौरवेणातिरिच्यते ।
उपाध्यायादॄश पिता गौरनेणातिरिच्यते ॥११॥
पितन् दश च मातैका सर्वां वा पृथ्वीमपि ।
गौरवेणाधिका लोके न मातृसदृशो गुरुः ॥१२॥
पिताजींच्या आज्ञेपेक्षा मातेच्या आज्ञेचे महिमान श्रेष्ठ असा युक्तिवाद :
कौसल्या बोले आपण । ऐकें श्रीरामा सावधान ।
सांगेन मातेंचे महिमान । अति गहन वेदोक्त ॥९९॥
स्वधर्मकर्मीं अति निपुण । दहा ब्राह्मण अति सज्ञान ।
एक आचार्य त्यांसमान । ऐसें महिमान आचार्याचें ॥१००॥
दश आचार्य श्रेष्ठ कर्मप्रवृत्तीं । त्यांहूनि ज्याची अधिक शक्ती ।
पुत्रविक्रयीं का दूरीकायार्थी । नियामकत्वें निश्चिंत्तीं पिता अधिक ॥१॥
दशाचार्याविशेषीं । गुरुत्वें गौरव पित्यासी ।
पित्याहूनि दशगुणेंसीं । गुरुत्वें मातेसीं भजावें ॥२॥
गर्भधारणपोषणेंसी । मातेसी गुरुत्व विशेषीं ।
पृथ्वीपरीस मातेंसी । पूज्यत्वेसीं गौरव ॥३॥
पिता जालिया पतित । पुत्रें त्यागावा निश्चित ।
माता जालिया पतित । पूज्य माता ।
माझिया भजावें वचनार्था । वना सर्वथा न जावें ॥६॥
मातृवाक्य मानोनि गौण । करिसी पितृवाक्याचें परिपाळण ।
हें तुज गा परम दूषण । माझें वचन उल्लांघितां ॥७॥
श्रीरामांचे उत्तर, पूर्वीचे उदाहरण :
श्रीराम म्हणे कौसल्येसी । तूं श्रेष्ठत्वें पूज्य होसी ।
येचिविषयीं पूर्वधर्मासी । ऐक तुजपासीं सांगेन ॥८॥
पूर्वी पितृवाक्यें तत्वतां । परशुरामें छेदिलीमाता ।
नुल्ल्ंघीच पितृवचनार्था । पूज्य पिता म्हणोनी ॥९॥
पुत्रें वधिलें निजमातेसी । रेणुका न क्षोभेचि रामासीं ।
प्रतिपाळिलें पतिवचनासी । तूंही जाणसी हे कथा ॥११०॥
मज पितृवाक्य पूज्य पूर्ण । तुजही पतिवचन प्रमाण ।
त्याचें करिता उल्लंघन । अधःपतन दोघांसी ॥११॥
कौसल्येचा आर्त विलाप :
ऐकोनि पुत्राच्या वचना । म्हणे तुझा वियोग रघुनंदना ।
मरणाहुनि चौगुणा । तरी सवें वना मज नेई ॥१२॥
या तरी पाळीं माझ्या वचना । मज सवें न्यावें वना ।
म्हणोनि लागली श्रीरामचरणां । अति करुणा विलपत ॥१३॥
काय करूं रे रघुनाथा । मज तव मरण नये आता ।
न साहवे वियोगव्यथा । वना सर्वथा मज न्यावें ॥१४॥
पुत्रासवे वनवासासी । सर्वथा जाता नये मातेसी ।
ऐकतां वसुष्ठ ऋषीं । केवीं वनवासासी म्यां न्यावें ॥१५॥
ऐसियापरी निजधर्मता । रामें संबोधिली माता ।
तिच्या चरणीं ठेविला माथा । क्षमा सर्वथा मज कीजे ॥१६॥
लक्ष्मणाचा संताप व उपाययोजना :
ऐकोनि कौसल्याकरुणावचन । लक्ष्मण क्षोभला आपण ।
म्हणे श्रीरामा ऐक माझें वचन । वनप्रयाण करूं नको ॥१७॥
परम सुख दशरथासी । कौसल्या पावे निजसुखासी ।
जाणें न लागे तुज वनासी । तें मजपासीं वर्म आहे ॥१८॥
आज्ञा देस्सील रघुनाथा । तरी मी साधीन कार्यार्था ।
ऐक तेही व्यवस्था । तुज मी आंता सांगेन ॥१९॥
कैकेयींच्या करीन घाता । तैं परम सुख दशरथा ।
सखावेल कौसल्या माता । राज्यीं रघुनाथा अभिषेक ॥१२०॥
कैकेयीच्या निजकैवारा । आलिया निवटीन सुरवरां ।
रणीं निर्दाळीन असुरां । भरीन सागरा अशुद्धें ॥२१॥
लोहें घोटिन पैं मांस । पृथ्वी करीन निर्मनुष्य ।
यमलोक पाडीन दांत ।
मजला भय नाहीं निश्चित । दुष्ट समस्त निर्दाळीन ॥२३॥
तूं म्हणसी हें अप्रमाण । माझे वचन परम प्रमाण ।
दुष्टां करावया निर्दळण । अवतार पूर्ण श्रीराम ॥२४॥
दुष्टांमाजि दुष्ट संपूर्ण । मुख्यत्वें अति कैकेयीची जाण ।
सहृदश्रिये विध्वंसन । प्रियाच प्राणघातकी ॥२५॥
सुमुहुर्त दुष्टदळणीं । पहिली कैकेयीची बोहणी ।
मातापुत्रविघडणी । महापापिणी पतितापी ॥२६॥
दुःखें रडे तो दशरथ । त्याचा न मानी हे वचनार्थ ।
पायां लागतां नृपनाथ । पितवचनार्थ मानीना ॥२७॥
पित्यापुत्रां करावया तुटी । दृढ दुष्टत्व कैकेयीच्या पोटीं ।
रामां घालवी दिग्पटीं । परम खोटी हे एकी ॥२८॥
इचा करितां पैं घात । सुख होईल जगाआंत ।
कौसल्येसी दशरथ प्राप्त । राज्यीं अघुनाथा अभिषेक ॥२९॥
भर्तृवचन नाणी दृष्टीं । श्रीराम द्वेषी महापट्टी ।
इसी मारिल्या पुण्यकोटी । स्वानंदपुष्टी तिहीं लोकीं ॥१३०॥
येच विषयीं रघुनाथा । मज आज्ञा देइजे आतां ।
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । क्षोभकत्व अनिवार ॥३१॥
लक्ष्मणाला श्रीरामांच उपदेश, पितृपत्नी मातृवत् आहे :
देखोनि सौमित्राचें चिन्ह । श्रीराम त्यासी दे समाधान ।
तुझें बळ आंगवण संपूर्ण । मी आपाण स्वयें जाणें ॥३२॥
वाटीव लांठीव वीरवृत्ती । चारी पुरुषार्थ तुझे हातीं ।
येवढें असोनि अपकीर्ती । आपणाप्रति येवां नेदीं ॥३३॥
आतुर्बळी पुरुषार्थेंसीं । तेणें मारावें मातेसी ।
दुःख द्यावें पितयासी । हेचि आम्हांसी अपकीर्ति ॥३४॥
पित्यासी पढियंती सर्वथा । ते तंव आपली सखी माता ।
तिच्या करितां निजघात । अधर्मता शास्त्रार्थी ॥३५॥
पित्याने हात घातला दासीसी । ते तंव माता होय पुत्रासी ।
विरुद्ध करूं नये तियेसीं । मा कैकेयीसी केवि मारूं ॥३६॥
पितृवचन उल्लंघन । त्यावरी मातेचें हनन ।
तें तंव होय जगीं जघन्य । निंदा पूर्ण तिहीं लोकीं ॥३७॥
येवोनि सूर्यवंशाप्रती । येवढी जोडावी अपकीर्ती ।
सौमित्रा घडे ऐसी युक्ती । पूर्वज क्षोभती स्वर्गस्थ ॥३८॥
सा मास सुरी पारिजिलि । घरची म्हातारी खोंचिली ।
ते अपकीर्ति आम्हीच केली । जरी वधिली कैकेयी ॥३९॥
पराक्रमच गाजवाय्च तर राक्षसांसमोर गाजवावा :
आंगी बळ आहे पूर्ण । स्त्रिये मारणें पुरुषार्थ कोण ।
पित्यासी दुःख देणें दारुण । अधःपतन तै आम्हांसी ॥१४०॥
आंगीं बळची दृढ प्रौढी । वना जातां कोण सांकडी ।
मारूं राक्षसांच्या कोडी । सोडवूं बांधवडी देवांची ॥४१॥
बांधोनि स्चधर्माचा सेत । दुष्ट निर्दाळू लंकानाथ ।
कीर्ति न समाय त्रैलोक्यांत । हा पुरुषार्थ साधावा ॥४२॥
लक्ष्मणाचे वंदन, वनात बरोबर नेण्याची प्रार्थना :
ऐकोनि श्रीरामाचें वचन । सौमित्र करी साष्टांग नमन ।
रामें दिधलें आलिंगन । तेणें समाधान दृढ जालें ॥४३॥
पुढती घातलें लोटांगण । पुढती बंदी श्रीरामचरण ।
तुझे सेवे मी वना येईन । दुष्टकंदन करावया ॥४४॥
पुढती नाचे पुढती गायें । पुढती वंदी श्रीरामपायें ।
तूंचि बाप तूंचि माये । गर्जताहे स्वानंदे ॥४५॥
श्रीरामा देईं निजभाकेसी । मज न्यावे वनासीं ।
सेवा करावया वनवासीं । निजमानसीं उल्हास ॥४६॥
कौसल्येचे समधान , वनगमनास अनुज्ञा :
ऐकून श्रीरामाच्या युक्ती । कौसल्या सुखावली चित्तीं ।
वना नवजावा अघुपती । आग्रहस्थिती सांडिली ॥४७॥
श्रीरामाचें निजवचन । तेणें सुखसमाधान ।
सुखी जाला लक्ष्मण । सुखसंपन्न कौसल्या ॥४८॥
माता आणि सौमित्रबंधु । दोघां जाहला सुखसंवाद ।
एकाजनार्दनीं विनोदु । परमानंदु श्रीरामा ॥४९॥
एकाजनार्दनी शरण । शेकामाजी सुख संपूर्ण ।
कौसल्या सुखावोनि आपण । करवी वनप्रयाण श्रीरामा ॥१५०॥
करोनियां पुण्याहवाचन । श्रीरामासी वनप्रयाण ।
कौसल्या करवी आपाण । स्वस्तिवाचन् अवधारा ॥१५१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
कौसल्यासांत्वनं नाम षष्ठोध्यायः ॥ ६ ॥
॥ ओव्यां १५१ ॥ श्लोक १२ ॥ एवं १६३ ॥