रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 80 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 80

अध्याय 80

गुहकाला श्रीरामांचे दर्शन –

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामदर्शनाला जाण्यासाठी सैन्य सिद्ध
करण्याची सुमंतांची सेनापतींना आज्ञा :

सुमंता आज्ञापी मारुती । शीघ्र संजोग सैन्यसंपत्ती ।
येरें ऐकतां अति प्रीतीं । आनंद चित्ती उथळला ॥ १ ॥
तेणें आनंदेकरोनि जाण । घातलें मारुतीसीं लोटांगण ।
सेनापतीसी आज्ञापन । केले आपण सुमंतें ॥ २ ॥
आपुलाले दळभार । सिद्ध करा अति सत्वर ।
भरत निघाला वेगवत्तर । श्रीरघुवीरदर्शना ॥ ३ ॥
तंव भरतें करोनियां दान । सुखी केलें दीनजन ।
आनंदमय प्रसन्नवदन । काय गर्जोन बोलत ॥ ४ ॥

भरताची नगर शृंगारण्याची शत्रुघ्नाला आला :

भवशत्रुविनाशना । ऐकें सुबंधो शत्रुघ्ना |
सेनापतीसी करोनि आज्ञा । सहित प्रधानां सिद्ध करवीं ॥ ५ ॥

श्रुत्वा तस्य तदा वाक्यं भरतः सत्यविक्रमः ।
क्षिप्रमाज्ञापयामास शत्रुघ्नं परवीरहा ॥ १ ॥
दैवतानि व चैत्यानि वेश्मानि नगरस्य व ।
विचित्रैर्गंधमाल्यैश्चाभ्यर्च्यतामिति सर्वशः ॥ २ ॥
भरातस्य वचः श्रुत्वा शत्रुघ्नः परवीरहा ।
तदादिश्य सहस्राणि चोदयामास वीर्यवान् ॥ ३ ॥

मारुतिवचनें भरत । रामागमनें हर्षयुक्त ।
तेणें आनंद अत्यद्‌भुत । पोटीं अत्यंत उथळला ॥ ६ ॥
तेणें पूर्णानंदेंकरून । आज्ञापिला शत्रुघ्न ।
नगर शृंगारावे संपूर्ण । जेणें रघुनंदन सुखावे ॥ ७ ॥
ऐकोनि भरताचें वचन । अति आल्हादें शत्रुघ्न ।
सेनापतीस आज्ञापन । करोनि सैन्य सिद्ध केलें ॥ ८ ॥

शृंगारलेल्या ह्मा नगरीचे रूपकात्मक वर्णन :

नगर थंगारिलें प्रीतीं । देवसदनें अति निगुतीं ।
मुक्तघोष पै झळकती । देखतां निश्चितीं मन निवे ॥ ९ ॥
यंत्रपाठीं आवरणें जैसीं । कीं ध्यानस्थ सिद्धांची वोळी कैसी ।
नक्षत्रमाळापरी तैसी । चिद्‌रत्‍नेंसीं झळकती ॥ १० ॥
स्वर्गभोगाची जे गोडी । तेचि झाली दृढ बेडी ।
ते छेदावया लवडसवडी । दृढ आवडी श्रीरामीं ॥ ११ ॥
भेटावया श्रीरघुपती । धरूं भरताची संगती ।
म्हणोनियां शीघ्रगतीं । नक्षत्रे प्रवेशती माळेमाजी ॥ १२ ॥
मध्यपीठ अति शुद्ध । वरी श्रीरामपादुका विशुद्ध ।
दर्शनमात्रें महाबोध । परमानंद उपासकां ॥ १३ ॥
वर्णितां तेथींचा महिमा । सरस्वेतीसीं लाजे ब्रह्मा ।
भरताचिया भजनधर्मा । वेदां सीमा न करवे ॥ १४ ॥
सभामंडपीं पडशाळा । शृंगारिलिया सुमनशाळां ।
सुखी व्हावया जनकबाळा । अति सोहळा पै केला ॥ १५ ॥
निजगृहीं स्त्रीशाळा । शृंगारिल्या कुशळकळा ।
भांडारगृहें चित्रशाळा । शेजारशाळा सोज्ज्वळ ॥ १६ ॥
वनवासींचा श्रम समस्त । देखतांचि पै साद्यंत ।
सकळ निरसोनि जाय तेथ । ऐसें अद्‌भुत रचियेले ॥ १७ ॥
अश्वशाळा गजशाळा । कापडगृहें शस्त्रशाळा ।
कंडणीपेषणीपाकशाळा । जळशाळा मनोहर ॥ १८ ॥
नगर शृंगारिलें कोडे । श्रीरामकीर्तीचे हुडे ।
ध्वज उभारिले चहूंकडे । देखतां उडे भवभय ॥ १९ ॥
पताकाइतिहास अंबरीं । देखतां ऐकतां श्रवणांतरीं ।
आनंद होतसे बहुतापरी । चिदंबरीं रहिवास ॥ २० ॥
मुक्त अभिमानें शिणले । ते श्रीरामभेटी आले ।
नगरीं अनुष्ठानें मांडिलें । अधोमुख मुक्तघोषेंसीं ॥ २१ ॥
श्रीरामदर्शन त्वरित । मुक्तीसीं मोक्ष निश्चित ।
येणें निश्चयें सतत । ओळकंबत दर्शना ॥ २२ ॥
भक्तिपछव परिकर । श्रीरामप्रेमें साद्र ।
पालविती वेगवत्तर । श्रीरघुवीरदर्शना ॥ २३ ॥
माडिया गोपुरांचिया परी । सांगतो अनुपम्य भारी ।
कांहीं सांगेन संक्षेपाकारीं । श्रोतीं समग्रीं क्षमा कीजे ॥ २४ ॥
प्रथम मोक्षाची पुरी । जे दुर्लभ सुरासुरीं ।
आत्माराम राज्य करी । तेथींची थोरी केंवी वर्णवे ॥ २५ ॥
मुळीं अधिष्ठान श्रीराम एक । चैतन्य गाडोरा सुरेख ।
त्यावरी नगर रचिलें देख । विराजे सुरेख मोक्षश्रिया ॥ २६ ॥
शुद्धाच्या ठायीं सहजस्थिती । अहमात्मैक उठे स्फूर्ती ।
तैसा पाया गृहाप्रती । बांधिलीं जोतीं नेमस्त ॥ २७ ॥
जेंवी त्रिगुणांची उभवणी । तेंवी जोतियां मेखा तिन्ही ।
मुक्तीच्या चैतन्यखेवणी । निश्चयेकरोनी बैसविल्या ॥ २८ ॥
पाचूंचे खांबांचे परिकर । प्रतिगृहीं मनोहर ।
जेंवी पंचभूतप्रकार । धरी भार चराचर ॥ २९ ॥
उथाळीं पोळियांची शोभत । जेवीं नेमस्त धातु सात ।
त्या चिद्‌रत्‍नीं भिंती जडित । अति मंडित निजतेजें ॥ ३० ॥
दहा गवाक्षें निजनिर्वडीं । दावती नाना परवडी ।
परी ते एका प्रकाशाची ओढी । दावती गोडी एकत्वें ॥ ३१ ॥
सकळां प्रावरण वस्तूचें । तैसे शेकार गृहाचे ।
निवासस्थान आत्मयाचें । श्रीरामाचें निजनगर ॥ ३२ ॥
चुकोनि मुळींचे एकपण । द्वैतदुखणां भरलें पूर्ण ।
त्यासीं बहुसाल भासती खण । युगाचे जाण सर्वथा ॥ ३३ ॥
तळीं वरी येतां जातां । कोटी कोटी फेरे खातां ।
मूळ न सांपडे सर्वथा । सबाह्य पाहतां भरलेसे ॥ ३४ ॥
मोक्षपुरी अयोध्याभुवन । अनुपम्य तेथींचें रचन ।
वरी शृंगारिता शत्रुघ्न । अति विचक्षण श्रीरामभ्राता ॥ ३५ ॥
भवशत्रूचा संहार करी । नित्य विराजे मोक्षपुरी ।
म्हणोनियां नाम निर्धारीं । अति कुसरीं शत्रुघ्न ॥ ३६ ॥
तेणें नगराचें रचन । शृंगारिलें प्रीतीकरोन ।
अलौकिक तेथींचें महिमान । श्रीरघुनंदनसुखार्थ ॥ ३७ ॥
रथ्यांतरीं वाडेंकोडें । विजु पिळोनि घातले सडे ।
प्रकाश पडिला निजनिवाडे । मशक त्यापुढें सत्यलोक ॥ ३८ ॥
नवल अयोध्येची परी । चिंतामणीची चिंता हरी ।
कल्पतरूची कल्पना वारी । परिसाची निवारी जडत्वकाळिमा ॥ ३९ ॥
दशेचें दैन्य दवडी । अमृताची साल काढी ।
स्वानंदाची निजगोडी । नांदे उघडी अयोध्येमाजी ॥ ४० ॥
नगरा बाह्यप्रदेशीं । आराम नित्य जीवशिवांसी ।
सर्वकाळीं वसंतासी । अयोध्येसीं विश्रांति ॥ ४१ ॥
प्रेमोत्फुल्ल कमळे शुद्ध । गुंजारवती कृष्ण षट्‌पद ।
ऐकोनि गंधर्व झाले स्तब्ध । सामवेद मौनावे ॥ ४२ ॥
प्रबोध पारवे घुमघुमत । तेणें शारदा चवकत ।
देवगुरू विस्मित तेथ । पडे ताटक्य सुरसिद्धां ॥ ४३ ॥
डोलत द्राक्षांचे पै घड । मुक्त परिपाकें अति गोड ।
सकळ कामाचे पुरवीत कोड । गोडिया गोड ते गोडी ॥ ४४ ॥
चूतवृक्षाचे ठायीं जाण । अच्युतफळें परिपक्व पूर्ण ।
रस स्रवती उलोन । गोडी गहन तयांची ॥ ४५ ॥
डाळिंबें उललीं मदभारें । बीजे झळकती तेजाकारें ।
ज्ञानकर्मउपासनाद्वारें । रस रघुवीरें सेवावया ॥ ४६ ॥
वनामाजी अति प्रीती । श्रीरामाची गुणकीर्ती ।
कोकिळा पंचमें कूजती । तेणें मौनावती सामवेद ॥ ४७ ॥
शुक बोलती सिद्धांत । तेणें लाजला वेदांत ।
श्रीरामागमनें वसंत । पातला ऋतु मारुति ॥ ४८ ॥
ऐकतांचि श्रीरामागमन । सिद्धि पातल्या धांवोन ।
अयोध्येच्या बिदी जाण । स्वयें आपण झाडिती ॥ ४९ ॥
ऋद्धि सिद्धि करिती मार्जन । रमा रंगमाळालेखन ।
स्वयें करीतसे आपण । श्रीरामागमनसंतोषे ॥ ५० ॥
येरीकडे वीर भरत । श्रीरामदर्शना उदित ।
निघाला अति त्वरान्वित । सैन्यासमवेत गजरेंसी ॥ ५१ ॥

अपरे मुक्तपुरुषैश्च सवर्णैः पंचवर्णकैः ।
रातमार्गं सुरग्म्हळं स्तुवीत शतशो नराः ॥ ४ ॥
राजदारास्तथामात्याः सैन्यश्रेण्यस्तथाश्रमा: ।
त्वरमाणा विनिर्याता रथै: सह महारथाः ॥ ५ ॥
द्विजातिमुख्यैर्धर्मज्ञैः श्रेणीमुख्यैश्च नैगमैः ।
मालामोदकहस्तैश्च मन्त्रिभिर्भरता वृतः ॥ ६ ॥
शंखभेरीनिनादैश्च बन्दिभिश्चाभिवन्दितः ।
पादुके च पुरस्कृत्य शिरसा धर्मकोविदः ॥ ७ ॥

भरत कौसल्यादि माता, प्रधान यांसह
वाजत गाजत रामांच्या दर्शनार्थ निघाला :

सुमंतादि प्रधान । सेनापति अति दारुण ।
गजरथ सहिताभरण । निघालें सैन्य अति गजरें ॥ ५२ ॥
जेंवी मुमुक्षु अति प्रीतीं । साधनचतुष्टयसंपत्ती ।
घेवोनि निघे आत्मप्राप्ती । भरत चक्रवर्ती तेंवी निघे ॥ ५३ ॥
कौसल्या सुमित्रा दोनी । दशरथाच्या प्रियकामिनी ।
श्रीरामाच्या माता उल्लासोनी । प्रीतिकरोनी निघाल्या ॥ ५४ ॥
जिचेनि वचनमात्रेंकरूनी । राज्यादिभोगां देवोनि पाणी ।
पादत्राणही त्यागूनी । झाला वनीं वनस्थ राम ॥ ५५ ॥
जिचेनि धर्में सुरमोचन । जिचेनि निवटिला रावण ।
त्रैलोक्यासीं आनंद पूर्ण । विजयी रघुनंदन जिचेनि ॥ ५६ ॥
ते कैकयी श्रीराममाता । भेटों निघाली रघुनाथा ।
आणिक कांहीं दशरथकांता । आनंदभरितां निघाल्या ॥ ५७ ॥
सुमंतादि प्रधान । मातांसी करिती विनवण ।
तुमचे भेटीसी रघुनंदन । येईल आपण लोटांगणीं ॥ ५८ ॥
ऐकोनि सुमंतवचन । कौसल्या सुमित्रा आपण ।
काय बोलती प्रतिवचन । विवेक संपन्न प्रेमळा ॥ ५९ ॥

रामांच्या दर्शनाची मातांना उत्कंठा :

पहिलें विश्वासिलें तुज । जे घेवोनि येसी रघुराज ।
शेखी कळली तुझी वोज । रिता रथ मागें आणिला ॥ ६० ॥
हातींचा सांडोनि रघुनाथ । रिता घेवोनि आलासि रथ ।
श्रीरामवियोगें दशरथ । झाला स्वर्गस्थ देहत्यागें ॥ ६१ ॥
राम वनवासी होतां वनीं । राये सांडिली राजधानी ।
भरतें भोगां देवोनि पाणी । फळभोजनीं भूमिशायी ॥ ६२ ॥
आकांत सकळ राज्यासी । दुःखनिमग्न अयोध्यावासी ।
ऐकतां त्याच्या आगमनासी । केंवी मनासी राहवेल ॥ ६३ ॥
आणिकाची असो कथा । श्रीरामातें सांडोनि येतां ।
हतश्री तूंचि सुमंता । दिससी तत्वतां मृतप्राय ॥ ६४ ॥
श्रीराम सकळांचे जीवन । प्रेतरूप सकळ तेणेंवीण ।
त्याचे ऐकतां आगमन । सर्वथा मन न राहे ॥ ६५ ॥
श्रीरामागमनगोष्टी । सकृत् ऐकतां कर्णपुटीं ।
भेटी न घे उठाउठीं । तो जाण सृष्टीं महापापी ॥ ६६ ॥
यालागीं गा सुमंता । सर्वभावेसीं सर्वथा ।
भेटी येऊं रघुनाथा । विचार अन्यथा असेना ॥ ६७ ॥
ऐकोनि मातांचें वचन । सुमंतें घातलें लोटांगण ।
सकळ जयजयकारें जाण । निघाले दर्शना रघुनाथाचे ॥ ६८ ॥
राम ज्यांच्या वचनाधीन । श्रीराम ज्यांचा अनन्यशरण ।
ज्यांचेनि बोलें होय सगुण । ते ऋषिगण निघाले ॥ ६९ ॥

ऋषिसमुदाय, समस्त नागरिक व
आबालवृद्ध रामदर्शनासाठी निघाले :

श्रीराम साधूंचा केला । श्रीराम साधूंलागीं झाला ।
त्यासी भेटावया वहिला । गजरे निघाला ऋषिसमुदाय ॥ ७० ॥
कश्यप अत्रि वामदेव ऋषी । जाबाली गौतम परियेसीं ।
वसिष्ठ सद्‌गुरू सूर्यवंशी । शिष्यसमुदायेसीं निघाले ॥ ७१ ॥
इत्यादि सकळ ऋषी । जे मनें कल्पिती ब्रह्मांडासी ।
ते ऋषिवर वेदघोषेंसीं । श्रीरामभेटीसीं निघाले ॥ ७२ ॥
श्रीरामवियोगें संतप्त । नागरिक लोक समस्त ।
आला ऐकोनि रघुनाथ । उतावेळ चित्तें निघाले ॥ ७३ ॥
चाटे भाटे सोवनी सोनार । गणिक रजक सुतार ।
तेली माळी कुंभार । अति सत्वर निघाले ॥ ७४ ॥
तांबोळी अति हरिखें उडविती पानें । फुलारी करिती सुमनसिंचनें ।
रंगारी सुखावले निजमनें । रावलगीं रंगणें उडविती ॥ ७५ ॥
श्रीरामभेटी अति हरिख । एकापुढे धांवे एक ।
स्त्रीपुत्रादि बाळक । एकींएक निघाले ॥ ७६ ॥
आदिकरोनि दासदासी । निघाले श्रीरामभेटीसी ।
वेश्या ज्या कां नगरवासी । हरिखें भेटीसी निघाल्या ॥ ७७ ॥
श्रीरामनगरीं अकुमाळ । सर्वथा नाहीं कर्मचांडाळ ।
नगरप्रांतीं अधिकारशीळ । तेही तत्काळ निघाले ॥ ७८ ॥
सर्वस्व त्यागोनि संन्यासी । जे विरक्त देहभावासीं ।
तेही श्रीरामभेटीसीं । अति त्वरेंसी निघाले ॥ ७९ ॥

रामभेटीसाठी भरत सर्वांपुढे गेल्याने इतरांचीही धावपळ :

श्रीरामदर्शना भरत । पुढें गेला त्वरान्वित ।
म्हणोनि लोक नगरस्थ । स्वयें धांवत अति शीघ्र ॥ ८० ॥
स्त्रीपुत्रादिसुहृदसंग । श्रीरामभेटीसी विघ्न सांग ।
त्यांचा निःशेष होय त्याग । राम अव्यंग तैं भेटे ॥ ८१ ॥
ऐसें जाणोनि निर्धारीं । रामदर्शनीं प्रीती थोरी ।
कोणी कोणाचा संग न घरी । आनंद भारी रामभेटी ॥ ८२ ॥
येरीकडे वीर भरत । श्रीरामभेटीसीं उदित ।
निघाले अति त्वरान्वित । समवेत दळभारें ॥ ८३ ॥

रामदर्शनासाठी गर्जत निघालेल्या मिरवणुकीचे वर्णन :

अनुभवगजांचियां हारी । गुढार घातलें तयांवरी ।
पताका झळकती चिदंबरीं । द्वैत चकचुरी करिती पाहें ॥ ८४ ॥
निजबोध महावत वरी । विवेकांकुश झळकती करीं ।
मर्यादा चकल्या हाणिती शिरीं । करोनि किरकिरी येती ठायां ॥ ८५ ॥
साधनचतुष्टयसंपत्ती । अति कुशळ तीक्ष्णयुक्तीं ।
तैसे वारू नाचती । चौताळती रामभेटी ॥ ८६ ॥
तयांवरी वळंघले वाट । रणशौर्य अति उद्‌भट ।
वारुवां वाजती साट । त्राणें अंबुट कवळती ॥ ८७ ॥
रथध्वजपताकीं मंडित । चालती विमानीं जेंवी मुक्त ।
तेथें बैसतां सुख अद्‌भुत । लाजवित सुरवरां ॥ ८८ ॥
वोडण खड्‌ग तळपोनियां पाहीं । तुळवे नाचती लवलाहीं ।
मल्ल झोंबती दोहीं बाहीं । देखतां तो देही काळ कांपे ॥ ८९ ॥
तयांमागें असिवारी । यावा दावियेला स्वारी ।
नाचती तींच पायांवरी । आली शारी कृतांता ॥ ९० ॥
तयांमागें चालती रथ । वारु जुंपिले हिंसत ।
चक्रवाटातळीं पर्वत । पीठ होत कर्माचें ॥ ९१ ॥
दोहीं बाहीं कुंजरथाट । गळदंडी गजघंट ।
गजी गज समसगट । घडघडाट चालती ॥ ९२ ॥
स्तोमीस्तोमीं वाद्य विचित्र । ध्वनि उठला अति गंभीर ।
जेंवी अनुहताचा गजर । दशधा प्रकार वाजती ॥ ९३ ॥
सवें श्वेतातपत्र । कनकदंडी युग्मचामर ।
राजचिन्हे पैं समग्र । त्वरित चालती ॥ ९४ ॥
भाट गर्जती कैवाडें । श्रीरामाचे पैं पवाडे ।
तेणें वेदांत झाले वेडे । लाजिले स्वयें नेतिशब्दें ॥ ९५ ॥
सवें ऋषीश्वर असंख्य । उच्चारिती वेदघोष ।
माता घेउनि देख । भरत समवेत निघाला ॥ ९६ ॥
भेटावया रघुकुळटिळका । माथां ठेवोनि पादुका ।
आनंदमग्न होवोनि देखा । शत्रुघ्नसखा समवेत ॥ ९७ ॥
सहित माता ऋषिपंक्ती । भरत शत्रुघ्न निश्चितीं ।
सुमंतादि प्रधानपंक्ती । चरणीं चालती सकळिक ॥ ९८ ॥
श्रीरामशकुनालागीं तेथ । पूर्णकुंभ हेमयुक्त ।
दधि मधुअक्षताभरित । दूर्वासहित पूर्ण जळें ॥ ९९ ॥
मागें पालखियांची हारी । कोणी न बैसे तयांवरी ।
श्रीरामदर्शनीं प्रीती थोरी । हर्षे गजरीं चालती ॥ १०० ॥
उपवासें अति संकटी । उदर बैसलें अति खपाटीं ।
माथां जटांची वीरगुंठी । कृष्णाजिनगांठीं प्रावरण ॥ १०१ ॥
मागे सांडोनि नगर । पुढें चालिले वेगवत्तर ।
मार्ग अवलोकितां समग्र । श्रीरघुवीर दिसेना ॥ १०२ ॥

रामांचे विमान दिसेना म्हणून भरत उद्विग्न :

दशदिशांसहित गगन । स्वबुद्धी पाहतां जाण ।
सर्वथा न दिसे रघुनंदन । भरत उद्विग्न स्वयें झाला ॥ १०३ ॥
सांगितलें हनुमंतें । पैल तें गा विमान येतें ।
आणि अद्यापि न दिसे मातें । अभाग्य अद्‌भुत मी करंटा ॥ १०४ ॥
तरी आतां कळलें चिन्ह । कोटिधा होतां पुराणश्रवण ।
सर्वथा नव्हे समाधान । वचनारूढ मन जंव नव्हे ॥ १०५ ॥
जेणें काळें हनुमंतें । सांगितलें रामागमनातें ।
तेणें काळें दुश्चित चित्ते । पामर निश्चितें मी एक ॥ १०६ ॥
वचनसमयीं दुश्चित्तता । गुंतलों लौकिकार्था ।
तेणें सुनाट केली वार्ता । भेटी रधुनाथा वंचलों ॥ १०७ ॥
लोकांसी मज संबंध काय । दळभार मज काय होय ।
वचन वृथा गेलें स्वये । वल्ग आहें कोरडाचि ॥ १०८ ॥
स्वरूपप्राप्तीची ज्यांसी आर्ती । तिहीं सांडोनि लौकिकस्थिती ।
अनन्य शरण रघुपती । जावोनि एकांतीं पुसावें ॥ १०९ ॥
तैसें न करींच मी तत्वतां । लोकिकी पुसिली वार्ता ।
तेणेंचि वंचलों सर्वथा । भेटी रघुनाथा नव्हेचि ॥ ११० ॥
तेणें अत्यंत उद्विग्न । न भेटेचि रघुनंदन ।
मारुतीच्या चरणांलागून । भरत मागुतेन पुसत ॥ १११ ॥

न हि पश्यामि काकुत्स्थं राममार्यं परंतप ।
अर्थवयुक्ते वचने हनूमानिदमब्रवीत् ॥ ८ ॥
अथ विज्ञापयन्नेवं भरतं सत्यविक्रममू ।
सद्य: फलान् कुसुमितान् पश्य वृक्षान्मधुच्युतान् ॥ ९ ॥

अत्यंत प्रीतिपुरस्कर । भरत होवोनियां नम्र ।
हनुमंतासी पुसे उत्तर । श्रीरघुवीर कां नये ॥ ११२ ॥
हें गा येते विमान । म्हणोनि बोलिलासी वचन ।
अद्यापि त्याचें नव्हे भान । कां विलंबन लागलें ॥ ११३ ॥

श्रीराम गुहकाला भेदून लवकरच येतील
असे सांगून मारुतीने भरताचे सांत्वन केले :

ऐकोनियां भरतवचन । बोलता झाला वायुनंदन ।
यथार्थ आला रघुनंदन । पाहें चिन्ह सावकाशी ॥ ११४ ॥
ऐक भरता सत्वमूर्ती । साचार आला रघुपती ।
संदेह नाहीं ये अर्थी । वोळल्या वनस्पती रसभावें ॥ ११५ ॥
निर्जीवासी जीव आले । निरंकुरासी अंकुर फुटले ।
अपल्लव ते पालवले । अफळ आले फळासी ॥ ११६ ॥
सजीव निर्जीव वनस्पती । अमृतरस पै स्रवती ।
पुण्यी फळी पै शोभती । मघमघिती चोफेर ॥ ११७ ॥
असो वनस्पतींचा भाव । तुझे अंतरींचा उत्साव ।
तोचि श्रीरामाचा आविर्भाव । नाही संदेह ये अर्थी ॥ ११८ ॥
अवस्था शिणवी मना । ते निश्चयेसीं रघुनंदना ।
भेटवोनि समाधाना । पाठवी मना तत्काळ ॥ ११९ ॥
आतां येईल रघुपती । संदेह नाहीं ये अर्थी ।
मार्गी येतां शीघ्रगतीं । गुहकाप्रती सांगितलें ॥ १२० ॥
त्यासीं भेटोनियां जाण । आता येईल रघुनंदन ।
सर्वथा उदास न करीं मन । सत्यवचन हें माझें ॥ १२१ ॥
शनैः शनैः अभ्यास करितां । अबळासही ये योग्यता ।
तेंवी श्रीरामपंथीं चालतां । निश्चये रघुनाथा भेटसी ॥ १२२ ॥
ऐशा वचनीं हनुमान । भरता देवोनि समाधान ।
स्वयें मार्गस्थ केला आपण । श्रीरघुनंदनदर्शना ॥ १२३ ॥

भरद्वाजाश्रमात रात्री मुक्काम करून भरतभेटीसाठी राम निघाले :

येरीककडे रघुपती । भारद्वाजाश्रमीं क्रमोनी राती ।
ऋषींसहित विमानस्थिती । शीघ्रघगतीं निघाले ॥ १२४ ॥
सुखवोनियां ऋषींसी । भरताचिया भेटीसीं ।
राम निघाला शीघ्रतेसीं । जयजयकारेंसीं गगन गर्जे ॥ १२५ ॥
वानरांचें उल्लाण । जयजयकारें गडगर्जन ।
तेणें नादें त्रिभुवन । सहित गगन कोंदलें ॥ १२६ ॥
रीस वानर गोळांगूळ । नामें गर्जोनियां सकळ ।
आक्रमिलें नभोमंडळ । विमान बळें सांडोनी मागें ॥ १२७ ॥
निजनगरा राघवासी । जातां वानर उल्लासी ।
तें देखोनि श्रीरामासी । निजमानसीं आनंद ॥ १२८ ॥

श्रीरामांचे विमान पाहून गुहकाकडून श्रीरामांची स्तुती :

करीत नामाचा कल्लोळ । विमान चालत अंतराळ ।
गुहकें देखोनी तत्काळ । गर्जला प्रबळ रामनामें ॥ १२९ ॥
देखोनियां रघुकुळटिळक । जयजयकारें गर्जोनि देख ।
लोटांगणीं एकएक । अत्यंत हरिख नामाचा ॥ १३० ॥
गुहक भाग्याचा संपूर्ण । श्रीरामासीं ज्याची आठवण ।
तेणें करोनियां नमन । करूं स्तवन आदरिलें ॥ १३१ ॥
जयजयाजी अव्यक्तव्यक्ता । उत्पत्तिस्थितिप्रळयातीता ।
स्वयें करोनि अकर्ता । होसी तत्वतां स्वामिया ॥ १३२ ॥
तूं सर्वांतीत सनातन । सर्वसाक्षी चैतन्यघन ।
सकळ जीवांचें जीवन । सनातन परब्रह्म ॥ १३३ ॥
तूं सर्वदा सम । कदा नव्हसी विषम ।
तो तूं अभक्तां दुर्गम । सदा सुगम निजभक्तां ॥ १३४ ॥
अणुमात्र करितां भजन । सर्वस्वें होसी भक्ताधीन ।
तुज चिंतिती भक्तजन । तुज चिंतन तयांचें ॥ १३५ ॥
नीच कुट्टीणी अनायासें । तूतें स्मरली पक्ष्याचेनि मिसें ।
तिसी निजपद दिधलें कैसें । तें साधनीं असोसें नव्हे प्राप्त ॥ १३६ ॥
ब्राह्मादिकां असाध्य पूर्ण । तें तियेसी दिधलें स्थान ।
विचारितां निंद्य कर्माचरण । माझें गहन अति भाग्य ॥ १३७ ॥
जातिहीन किरात देख । कर्म तरी निजघातक ।
त्या मज भेटला रघुकुळटिळक । भाग्य अलोलिक पै माझें ॥ १३८ ॥
ब्रह्मादिकां न पुससी पूर्ण । त्या तुज माझी आठवण ।
पाठविला वायुनंदन । समाधान गुढींसीं ॥ १३९ ॥
तेणें विजयवार्ता सांगतां । अति आल्हाद झाला चित्ता ।
अमृतवृष्टि होय मरतां । तेंवी रघुनाथा आम्हां झालें ॥ १४० ॥
राहवितां अति प्रेमयुक्त । तेथें न राहेचि हनुमंत ।
भरत असेल चिंताक्रांत । त्वरान्वित मग गेला ॥ १४१ ॥
त्या काळापासोनि येथ । उभे असो वाट पहात ।
तंव विमान देखिलें जात । त्वरान्वित अयोध्येसी ॥ १४२ ॥

रामांनी विमानातून उतरून गुहकाला प्रेमालिंगन दिले :

ऐसें गुहकें स्तवितां पूर्ण । जवळी येवोन विमान ।
श्रीरामें उचलोनि आपण । हृदयीं जाण आलिंगिला ॥ १४३ ॥
श्रीरामीं देतां आलिंगन । उडालें शून्याचे शून्यपण ।
चिदाभासता कोंदली पूर्ण । चैतन्यघन श्रीरामें ॥ १४४ ॥

गुहकाची रामरूप अवस्था :

नाठवे देहगेहस्फूर्ती । नाठवे वर्णाश्रमजाती ।
नाठवे कर्माकर्मगती । भेटी रघुपती होतांचि ॥ १४५ ॥
आत्मया श्रीरामाचें श्रेष्ठपण । नाठवे आपुलें नीचपण ।
वोळला श्रीराम आनंदघन । समाधान जीवशिवां ॥ १४६ ॥
गुहकाचें प्रेम गहन । प्रेमें भेटला रघुनंदन ।
प्रेमें पावला समाधान । प्रेम गहन भक्ताचें ॥ १४७ ॥

निर्व्याज प्रेमाचे महिमान :

प्रेमें सुटला गजेंद्रु । प्रेमें अढळ केला धुरु ।
उपमन्यासी क्षीरसागरु । देखोनि प्रेमादरु दीधला ॥ १४८ ॥
प्रेम तेथे भाव पूर्ण । प्रेम तेथें वैराग्य गहन ।
प्रेमें निरसे जन्ममरण । प्रेमेवीण ज्ञान वांझोटे ॥ १४९ ॥
प्रेम तेथें उपजे भक्ती । प्रेम तेथें नित्य विरक्ती ।
प्रेम तेथें अढळ शांती । प्रेमळां मुक्ती वोळंगण्या ॥ १५० ॥
यालागीं भक्त साधक सज्ञान । आर्त जिज्ञासु अर्थार्थी जाण ।
तिही प्रेम वाढवावे पूर्ण । क्षणोक्षणां अति आवडीं ॥ १५१ ॥
प्रेमाची पुढें निजकथा । भेटी भरता रघुनाथा ।
प्रेमाचा रसाळ वक्ता । सत्य सर्वथा जनार्दन ॥ १५२ ॥
एकाएकीं प्रेम पूर्ण । प्रेमें वोळंगला जनार्दन ।
एका जनार्दना शरण । प्रेम अविच्छिन्न मज द्यावें ॥ १५३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
श्रीरामगुहकदर्शनं नाम अशीतितमोऽध्याय : ॥ ८० ॥
॥ ओंव्या १५३ ॥ श्लोक ९ ॥ एवं १६२ ॥