माया Chinmayi Deshpande द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माया

राकेश ऑफिस मधून थकून घरी आला. पल्लवी( राकेशची बायको) हॉल मध्ये सोफ्यावर बसून टीव्ही बघत होती. उमाताई( राकेशची वयस्कर आई) खाली बसून देवाचे नामस्मरण करत होत्या. राकेश आपले शूज काढून गळ्यातली टाय सैल करत सोफ्यावर बसला. पल्लवीचे लक्ष टीव्ही वरून हटत न्हवते.

"सुनबाई अग पाणी दे ना त्याला."- उमाताई

"आई कळतं मला तेवढं उठणारच होते मी प्रत्येक गोष्ट मला सांगायची काही गरज नाही."- पल्लवी तणतणत उठली आणि किचन मधून पाणी घेऊन आली.

"एक दिवस स्वतः जाऊन पाणी घेतलंस तर काही बिघडत नाही म्हटलं! तू थकतोस ऑफिस मध्ये तशी मी सुद्धा दमते घरी काम करून आणि तुमच्या ह्या आईची आयती सेवा करून. तुमच्या मातोश्री काही कामाच्या नाही, जरा म्हणून काही काम करत नाही."-पल्लवीच्या तोंडाचा पट्टा चालू झाला होता.

हे राकेशला काही नवीन न्हवत. रोज सकाळी ऑफिसला जाताना आणि तिथून आल्यावर हेच ऐकायला मिळायचं. त्याची सुद्धा चिडचिड व्हायची पण तरी बायको पुढे कोण आवाज चढवणार त्या मुळे गप्प बसायचा. एकदा तर बायकोला वरच्या स्वरात दम दिला होता तेव्हा बाईसाहेब चिडून महिनाभर माहेरी निघून गेल्या होत्या, तेव्हा तिला किती विनवण्या केल्या नंतर ती घरी आली हे आठवून राकेश तिला काही बोलायचा नाही आणि आईला सुद्धा गप्प राहायला सांगायचा.

पल्लवी किचन मध्ये जेवण गरम करत होती. राकेश मागून आला आणि तिला मिठी मारली.

"लाडात येऊ नको माझा मूड नाहीये अजिबात."-पल्लवी वैतागून म्हणाली

"आणि जर मी माझ्या बायकोचा मूड बनवला तर?"-राकेश

"ते कसं काय?"-पल्लवी

राकेशने तिला स्वतःकडे वळवले आणि तिचा हात पुढे करून त्यावर एक बॉक्स ठेवला. तिने उत्साहात येऊन तो बॉक्स उघडला आणि ती खुश झाली आणि राकेशला मिठी मारली. ती उड्या मारत मारत बाहेर आली.

"हे बघा आई राकेशने मला सोन्याचा नेकलेस आणला आहे. मी कालच शोरूम मध्ये बघितला आणि मला आवडला आणि राकेशने लगेच मला तो आणून दिला"-पल्लवी आनंदित होऊन बोलत होती.

"वाह खूप छान आहे सुनबाई सणाच्या दिवशी घाल. शोभून दिसेल तुला."-उमाताई

"चल पल्लवी ताटं घे जेवायला तो पर्यंत मी फ्रेश होतो. प्रिया आणि प्रणवला (त्याची मुलं) बोलावं जेवायला काय गेम खेळत बसतात नुसते जेवायचं भान नाही त्यांना."-राकेश

"राकेश बाळा अरे आपण कधी जायचं चष्मा घ्यायला? मला निट दिसत नाही रे ह्यातून ह्याच्या काचेला पण थोडा तडा गेलाय."- उमाताई

"आई अग हो आजच खर्च झालाय ना आणि कालच प्रिया प्रणव ची ट्युशन फी पण भरली आणि उद्या पल्लवी आणि मुलं पण हट्ट करतायत शॉपिंग ला जायचा तर तू थोडा धीर धर १ महिनाभर चालवून घे मग पुढच्या महिन्याला माझा पगार झाला की घेऊन देतो तुला नवीन चष्मा. १ काय २ घेऊन देईन माझ्या लाडक्या आईला."-राकेश

"२ नको रे बाबा १ च दे. पुढच्या महिन्या पर्यंत कशी थांबू मी बघ जरा १०००-२००० कुठून जमवा जमव कर."-उमाताई

"वा वा वा छान हा आई. जरा बाहेर जाऊन बघा १०००-२००० कमवायला किती वेळ लागतो ते. बोलणं सोप्पं आहे. तो सांगतोय ना आजच खर्च झाली त्याचा म्हणून. आणि तुमच्या चष्म्या साठी मी आणि माझ्या मुलांनी काही एन्जॉय नाही करायचं का?"- पल्लवी नाक मुरडत बोलली

"राकेश अरे बाळा जरा खर्च जपून करावा गरजेची वस्तू आधी आणि मग हातात शिल्लक पैसे राहिले की चैनीच्या वस्तू खरेदी करायच्या मौजमजा करायची. तुझ्या बाबांनी आणि मी असाच संसार केला."-उमाताई

"झालं ह्यांच संसार पुराण सुरू. माझ्या नवऱ्याने असं केलं आणि माझ्या नवऱ्याने तसं केलं. तुमच्या संसाराचे गुणगान आम्हाला कशाला सांगता ओ. बाबांना काही जमलं नाही आयुष्यात तुम्हाला असे सोन्याच्या वस्तू आणून द्यायला आणि माझ्या नवऱ्याने जर प्रेमाने माझ्यासाठी काही आणलं तर लागलं तुमच्या पोटात दुखायला. घे राकेश नको मला हे. जरा ह्या घरात सुख भेटत नाही मला"-पल्लवी ने गळ्यातला नेकलेस काढला आणि बेडरूम मध्ये पाय आपटत निघून गेली.

"अग सुनबाई मला तसं न्हवत ग म्हणायचं बाळा ये इथे."-उमाताई तिच्या खोलीकडे बघून बोलल्या.

"तुला काय गरज होती ग आई असं बोलायची. आज किती तरी दिवसांनी पल्लू एवढी खुश होती आणि तू टाकलास आमच्या आनंदात मिठाचा खडा. घे हे नेकलेस आणि मोडून टाक आणि बनव तुला किती चष्मे बनवायचेत तेवढे."-राकेशने नेकलेस आईच्या हातात ठेवलं आणि तो सुद्धा रूम मध्ये निघून गेला.

उमाताईंच्या डोळ्यात मात्र अश्रू जमा झाले होते. त्यांनी प्रिया आणि प्रणावला जेवायला वाढलं. त्यांचं जेऊन झाल्यावर त्यांना रूम मध्ये झोपवलं आणि स्वतः उपाशी हॉल मध्ये झोपून गेल्या. त्या झोपल्यानंतर पल्लवी किचन मध्ये आली आणि जेवणाचं ताट बनवून आत घेऊन आली.

"आई जेवली का ग?"-राकेश

"त्या काय उपाशी राहणारेत? झालंय त्यांचं जेऊन माझ्यावर विश्वास नसेल तर बघ जाऊन बेसिन मध्ये ताट आहे त्यांचं. तू इथे त्यांची काळजी करत बस आणि त्या तिथे झोपल्या सुद्धा. साधं ताट सुद्धा घासून ठेवलं नाही त्यांनी , ते सुद्धा मीच करायचं ह्यांची सेवा करून करून हाडं मोडणारेत माझी!"- पल्लवी

"अग तू शांत हो आणि जेऊन घे मग मी ठेवतो घासून सगळं. जेऊन झोपून जा तू"- राकेश. त्याने आणि पल्लवीने जेऊन घेतलं आणि ते सुद्धा झोपले.

असेच रोजचे दिवस कटकटीचे जात होते. उमाताई बिचाऱ्या नातवंडांसाठी गप्प राहत होत्या. त्या शक्यतो बागेत जाऊन बसत आणि त्यांचा वेळ घालवत. नातवंड शाळेतून आली की थोड्यावेळ त्यांच्या सोबत खेळ खेळून त्यांचा वेळ जात असे. पल्लवीला कधी कधी भाजी वैगेरे निवडून दे आणि चिरून दे अशी छोटी छोटी काम त्या त्यांना जमेल तशी करायच्या. पल्लवीची तब्येत खराब असतांना सुद्धा हळू हळू का होईना एक वेळचा स्वयंपाक तरी त्या करायच्या. पण ह्याच कौतुक किंवा लाज बाळगायची सोडून पल्लवी मात्र तिथे सुद्धा त्यांनाच सूनवायची. नातवंडांना मात्र उमाताईंनी चांगले वळण लावले होते. प्रिया आणि प्रणव संध्याकाळी श्लोक आणि शुभंकरोती न चुकता म्हणत असत. प्रणव तसा मोठा होता प्रिया मात्र त्याच्यापेक्षा लहान होती. त्या घरात सुखाचे थोडे क्षण ह्या दोघांमुळेच उमाताईंना मिळत असे.

आज रविवारचा दिवस होता. दुपारचं जेवण करून राकेश जरा आराम करत होता. मुलं बाहेर हॉल मध्ये उमाताई सोबत सापसीडी खेळत बसले होते. पल्लवी शेजारी बायकांसोबत गप्पा मारत बसली होती. थोड्या वेळाने ती तिथून चिडून घरात आली आणि तिचा आरडा ओरडा सुरू झाला. ते ऐकून राकेश बाहेर आला.

"अग पल्लू काय झालं तुला चिडायला एवढं. आज रविवार आहे एक दिवस भेटतो यार मला जरा शांत झोपुदे की."-राकेश

"झोप हा झोप तू झोपाच काढ. तू झोपा काढत राहा आणि तुझी आई आहेच माझं नाव खराब करायला."- पल्लवी

"मी काय केलं ग बाळा. मी का तुझं नाव खराब करेन."-उमाताई

"तुम्ही ना ही नाटकं करूच नका. समोर बाळा वैगेरे म्हणायचं म्हणजे राकेशला आणि सगळ्या जगाला हेच वाटणार की तुम्ही किती प्रेमळ. मीच काय ती वाईट आहे. ह्या शेजारच्या बायका मला टोमणे मारत होत्या. लोकांच्या घरी सासू सुनेचा छळ करते आणि इथे आपली पल्लवी सासूचा छळ करते. मी कधी छळ केला ओ तुमचा? कशाला बाहेर जाऊन काहीही सांगता तुम्ही? एकतर तुम्हाला आयतं जेऊ घाला तुमच्या औषधाच्या वेळा बघत बसा, तुम्हाला काही दिसत नाही तुमच्या वस्तू शोधण्यात दिवस घालवा. मला स्वतःची अशी काहीच लाईफ नाही राहिली. माहेरी असतांना सगळं चांगलं चालू होतं. लग्न करून ह्या घरात आले आणि आयुष्याची माती झाली माझ्या."-पल्लवी डोळ्यातून पाणी काढून रडू लागली

"सुनबाई अग मी कोणालाच काहीच नाही बोलले ग."-उमाताई

"आई तू प्लिज गप्प बसते का आता तरी! मी सांगतोय म्हणून तरी गप्प बस."- राकेश पल्लवीच सांत्वन करू लागला.

प्रिया आणि प्रणव गप्प राहून हे सगळं बघत होते. त्यांना हे सगळं काही नवीन न्हवत पण नेहमी बेडरूम मधून ऐकायचे आज प्रत्यक्ष बघत सुद्धा होते आणि आज पल्लवीचा अवतार सुद्धा काहीतरी वेगळाच होता.

"मम्मी तू आजूला असंका बोलते ग ती किती चांगली आहे"- प्रिया हळूच म्हणाली.

"बघ राकेश बघ ह्या बाईला तुला माझ्या पासून दूर करणं जमलं नाही म्हणून आता माझ्या मुलांना माझ्या पासून दूर केलं हिने. हे दोघे ह्या बाईचीच भाषा बोलतात. माझं काहीच ऐकत नाही हिने काही सांगितलं की लगेच ऐकतात."-पल्लवी

"हो कारण आजू तुझ्यासारख चिडून नाही बोलत ती ना प्रेमाने समजवून सांगते. तू आजूला काही बोलू नको ना ग."-प्रिया

"कारटे आता आईला शिकवणार का तू कसं वागायचं ते"- पल्लवी प्रियाला फटके मारू लागली.

"अग त्या लेकराला नको ग मारू तिची काय चूक ग लहान आहे ते त्याला काय कळतंय."-उमाताई पल्लवीला अडवत बोलल्या.

"पल्लू अग अस नको करू. प्रणव तू प्रियाला घेऊन आत जा बघू"-राकेश. प्रणव प्रियाला घेऊन आत निघून जातो.

"आता तरी तुला पटतंय का माझं बोलणं राकेश? आजपर्यंत ही बाई तुझी आई आहे म्हणून मी सगळं सहन करत आले. पण आता नाही मला सहन होत."- पल्लवी

"अग पल्लू जाऊदे ना सोड वय झालंय तीच. आणि आई तुला पण कळत नाही का ग बाहेर कुठे काय बोलायचं ते. लोकं आपल्या सुनेच कौतुक करतात आणि तू बाहेर जाऊन आपल्या घरातल्या गोष्टी सांगतेस तुझ्या सुनेच नाव खराब करतेस. अग तू आज आहे उद्या नाही पण भोगाव तर आम्हालाच लागेल ना!"- राकेश चा सुद्धा पारा आता चढला होता.

"मी कशाला कोणाला सांगेन. पल्लवीचा आवाज पोहोचतो की आजूबाजूच्या घरात. ती इतक्या जोरात बोलते त्या मुळे बाहेरच्यांना जे ऐकू येत तेच समजणार ना ते. आता सुद्धा सगळे कान लावून ऐकत बसले असणार. त्यांना काय काम आहेत लोकांच्या घरात आग लावणं सोडून"-उमाताई

"बघ बघ हे सगळं माझ्यावरच ढकलत आहेत. अहो लोक काय तुमच्या सारखे रिकामटेकडे नाहीयेत इथे. आपण तुम्ही राहायचा तश्या चाळीत नाही राहत ब्लॉक मध्ये राहतो आपण, इथे सगळ्यांना आपापली काम असतात."- पल्लवी

"आई अग आपल्या घरात होतं तो पर्यंत काही वाटलं नाही पण आता असे सगळे लोक माझ्या बायको बद्दल वाईट काही बोलणार ते मला चालणार नाही आणि आवडणार सुद्धा नाही"- राकेश

"अरे मग तिला सांग ना तसं वागायला. तिच्या वागण्यामुळे लोकं तिला काहीकाही बोलतात त्याला मी काय करणार."-उमाताई हळू आवाजात बोलत होत्या.

"हे माझं आणि माझ्या नवऱ्याचं घर आहे तुम्ही मला नका सांगू कसं वागायचं ते. तुम्ही आश्रित आहात इथे. तुम्हाला दोन वेळेचं खाणंपिणं भेटतंय ना मग शांतपणे गिळा आणि गप्प राहा ना."-पल्लवी.

पल्लवी तोंडाला येईल ते बोलत होती आणि राकेश मात्र मूग गिळून गप बसला होता. त्याला हे पटतंय असच त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. पल्लवी चे शब्द मात्र उमाताईंच्या काळजावर घाव घालत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

"झालं ह्यांना काही चांगलं सांगायचं पण नाही लगेच रडायची नाटकं सुरू ह्यांची. पण आज चालणार नाही हे आज काय मी ऐकून घेणार नाही. एकतर ह्या इथे राहतील नाहीतर मी. राकेश निर्णय तुझा आहे तू ठरव आता तुला आई पाहिजे की बायको"-पल्लवी

"अग पल्लू तू असा तडकाफडकी निर्णय घेऊ नको ग. आपण बघू ना समजवून सांगतो मी आईला मी बोलतो ना तिच्याशी ऐकेलं ती माझं"-राकेश

"का हो आपण काय ठेका घेतलाय का ह्यांना सांभाळायचा. तुमचा भाऊ आणि त्यांची बायको तिथे परदेशात मजा करताय आणि आपण झेलतोय ह्यांना रोज. त्यांना सांगा ना ह्यांना घेऊन जा तिथे. पाठवून द्या ह्यांना त्यांच्याकडे फक्त आपणच का सहन करायचं जरा त्यांना पण झेलूदे की!"- पल्लवी

"आग हो तुझं बरोबर आहे पल्लू दादा सोबत झालंय ह्या विषयावर माझं बोलणं पण त्याच असं म्हणणं आहे तिथलं वातावरण आईला मानवणार नाही आणि शिवाय तिथे कंटाळून जाईल ही. इथे ओळखीचे लोक आहेत आणि इथे तिला करमत सुद्धा"- राकेश

"हो तुमच्या भावाने सांगितलं आणी तूम्ही नंदीबैलासारखी मान डोलावली असणार. ते काही नाही जर तुमचा भाऊ सुद्धा ह्यांना घेऊन जायला तयार नसेल तर काहीतरी वेगळी व्यवस्था करा ह्यांची. गावाला वैगेरे नातेवाईकांकडे पाठवून द्या ह्यांना. माझ्या डोक्याला शांती भेटेल"- पल्लवी डोक्याला हात लावून बोलली. उमाताई स्तब्ध उभ्या राहून त्यांचं बोलणं ऐकत होत्या.

"अग वेडी आहेस का तू नातेवाईक नावं ठेवतील आपल्याला. त्या पेक्षा दुसरा काही उपाय बघू. म्हणजे बघ आईमुळे तुला पण घरी राहावं लागतंय. आई घरी नसेल तर तू सुद्धा जॉब करशील. आईला वृद्धाश्रम मध्ये ठेवलं तर..."-राकेश

"हो हो बेस्ट आयडिया आहे ही. आत्ताच चौकशी कर आणि काय तो सोक्ष मोक्ष लाव"- पल्लवी

"वृद्धाश्रम छान छान. अरे त्या पेक्षा गळा दाबून मारून टाक ना मला." उमाताई राकेशने हाथ त्यांच्या गळ्याजवळ धरून बोलल्या.

"आई अग असं काय करतेस तू. तू तिथे असली की मला पण तुझी काळजी नाही राहणार. तिथे तुला करमेल सुद्धा शिवाय मी येईन ना तुला भेटायला प्रिया प्रणव ला घेऊन."-राकेश

"नाही मी नाही जाणार वृद्धाश्रमात."-उमाताई

"मग दादा कडे तरी जाशील का मी बघतो त्याच्याशी बोलून नाहीतर गावी जा पण तिथे काही बोलू नको भांडण झाल्यामुळे तू गेलीयेस अस"-राकेश

"म्हणजे मला हकलायच ह्या घरातून हे ठरलंयतर तुमचं!"-उमाताई

"हो ठरलंय. हे घ्या तुमची बॅग भरून आणलीये मी. तुमच्या गोळ्या औषध ठेवलेत सगळं ह्यात."-पल्लवी

"पल्लू अग थांब ना मी बोलतोय ना आईसोबत"-राकेश

"अजून काय बोलायचंय यार बस झालं सोडून ये ह्यांना बस स्टॉप वर तिथून त्यांचा मार्ग शोधतील त्या"-पल्लवी

"आजु तू कुठे चाललीयेस ग बॅग घेऊन. नको ना जाऊ तू"-प्रिया रूम मधून धावत आली.

"आजी अग नको ना जाऊ तू प्लीज ना ग"-प्रणव

"प्रणव प्रिया आत जा आणि स्टडी करा"-पल्लवी

"आजी गेली तर मी सुद्धा आजी सोबत जाणार"-प्रणव

"पुन्हा अस बोललास ना तर थोबाड फोडून ठेवेल तुमचं जा गपचूप आत"-पल्लवी

"मम्मी तू खूप वाईट आहेस"-प्रिया

"ऐ असं आईला वाईट बोलायचं नाही"-उमाताई

"मग आजू ती तुला असंका बोलते म्हणून मी तिला बोलली"-प्रिया

"बाळा तू लहान आहेस ना गप बस हा असं काही बोलायचं नाही. आणि मी गेल्यावर तुझ्या मम्मी पप्पा ना त्रास द्यायचा नाही"-उमाताई

"आई कुठे जायचे ठरवलंय तू. मी सोडतो तुला चल तिकीट तरी काढून देतो."-राकेश

"नको रे बाबा एवढे उपकार करू नको माझ्यावर जाईन माझी मी"-उमाताई

"आई तू वाकड्यात का ग शिरतेय आता मी बोलतोय ना मी येतो सोबत. तू ना खूप अडमुठी स्वभावाची आहेस. खूप हट्टी आहेस म्हणून पल्लू वैतागते तुला."-राकेश

"पटलं तर तुला तुझ्या बायकोच"-उमाताई

"ती कधी चुकीची नसतेच. पण घरात वाद नको म्हणून मी गप्प बसत आलोय पण आज नाही आई खरच ग खूप वैताग आलाय मला ह्या सगळ्याचा, त्रास होतोय आता मला "-राकेश

"मीच मेली मूर्ख तुम्हाला एवढं शिकवलं मोठं केलं हा दिवस बघायला. अहो बघताय ना तुम्ही तुमचा लाडका लेक कसा वागतोय ते."-उमाताई त्यांच्या नवऱ्याच्या फोटोफ्रेम कडे बघत रडत रडत बोलत होत्या.

"तुमचा रडण्याचा कार्यक्रम झाला असेल तर निघा आता तुम्ही आणि हो ती फ्रेम घेऊन गेलात तर बरं होईल"-पल्लवी

उमताईंनी ती फ्रेम आपल्या हृदयाशी घट्ट धरली आणि हातात बॅग घेऊन त्या घर बाहेर जाऊ लागल्या. त्यांना मनातून थोडी आशा होती की राकेश त्यांना थांबवेल, त्यांची पाय पडून माफी मागेल, बोलेल 'आई मी चुकलो ग आणि मग मी त्याला माफ करेन' पण राकेश गप्प उभा राहिला. बायकोचा बैलच म्हणावं लागेल त्याला. प्रिया प्रणव ने मात्र रडून रडून डोळे लाल केले होते आणि त्यांच्या आजीला अडवायचा प्रयत्न करत होते पण पल्लवी ने त्यांना घट्ट धरून ठेवलं होतं. राकेशने काही उमाताईना अडवलं नाही त्यामुळे त्या भरल्या डोळ्यांनी घरा बाहेर पडल्या.

*****************

"मी जरा बाहेर जाऊन येतो"-अर्णव

"हमम...बरं वाटेलं तुला. जाऊन ये बाहेर. पण काहीतरी खाऊन घे आणि मग जा"-प्रगती

"नको माझी इच्छा नाहीये आता, पण खाण्याचं नाव काढलस बाहेर निघतांना तर चिमूटभर साखर दे"-अर्णव

प्रगती ने अर्णवच्या साखर हातावर टेकवली. अर्णव घराबाहेर निघाला. त्याच मन स्थिर न्हवत रडावं वाटत होतं पण त्याला रडता येत न्हवत. भावनांना आवर घातला होता त्याने. बागेत येऊन बसला. समोर खेळणारी मुलं, हळू हळू फेऱ्या मारणारे वयस्कर आजी आजोबा ह्यांना बघत होता. त्याच आजूबाजूला लक्षच न्हवत. अचानक कोणाचा तरी हळू हळू हुंदके देण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्याने बाजूला बघितलं त्याच्या शेजारी बसून कोणीतरी तोंडाला पदर लावून रडत होत. हे कोणीतरी दुसरं तिसरं कोणीतरी नसून आपल्या उमाताईच. अर्णवला त्यांना असा रडताना बघून चांगलं वाटत न्हवत शिवाय तो सुद्धा त्याच्या भावनांना आवर घालून बसला होता. त्यांना रडताना बघून अर्णवच्या डोळ्यात सुद्धा पाणी दाटून आलं.

"मावशी काय झालं काही त्रास होतोय का तुम्हाला? कुठे लागलय का तुम्हाला? कुठे पडला का तुम्ही?"-अर्णव

"नाही रे बाळा काही नाही झालं कुठेच नाही पडले मी. पण मनाला मात्र लागलय खूप"-उमाताई

"मावशी मी घरी सोडतो तुम्हाला चला."-अर्णव

"मला घर नाहीये"-उमताई

"म्हणजे?"-अर्णव

"म्हणजे काही नाही बाळा नको त्रास करून घेऊस तू. आणि माझी विचारपूस केलीस म्हणून थंक्यू"-उमाताई

"मावशी मला कशाला त्रास होईल मी तुमच्या मूला सारखा आहे ना?"-अर्णव

"नाही तू माझ्या मूला सारखा नाहीये आणि त्याच्या सारखा बनू पण नकोस कधी"-उमाताई

"मावशी खरं तर तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाहीये���ही बॅग? तुम्ही कुठे बाहेर जाताय का? मी सोडू का तुम्हाला?"-अर्णव

"नको रे बाळा. तू इथे तुझ्या मुलांसोबत वैगेरे आला आहेस का?"-उमताई विषय बदलत बोलल्या.

"नाही. म्हणजे येतो मी कधी कधी माझ्या मुलीला घेऊन इथे पण आज एकटाच आलोय. छान वाटतं इथे बसल्यावर म्हणून आलो."-अर्णव

"बरं. घरी कोण कोण असतं?"-उमाताई

"मी माझी बायको आणि पाच वर्षांची माझी मुलगी मुग्धा लाडाने आम्ही तिला चिऊ बोलतो"-अर्णव

"तुम्ही तिघेच राहता तर. आणि आई वडील तुझे?"-उमताई

"गेल्या वर्षी एका अपघातात ते...��� आज वर्षश्राद्ध झालं त्यांचं. आज खूप आठवण येतेय त्यांची. ते इथे यायचे ह्या बागेत म्हणून एकटा येऊन बसलो इथे."- हे बोलतांना अर्णवच्या डोळ्यातून पाणी आलं.

"वाईट वाटलं ऐकून"-उमताई

"हम्म. आई बाबा होते तेव्हा घर भरल्या सारख होत. हसत खेळत वातावरण असायचं. म्हणजे दिवसभर ऑफिसचा ताण आणि सगळी दगदग त्यांना बघितल्यावर दूर गेल्या सारखी वाटायची. आता ते नाहीत तर सगळं बदललं. प्रगती, माझी बायको तिला सुद्धा आधार होता त्यांचा. ती लहानपणापासून अनाथ आहे. माझ्यापेक्षा तिलाच आई बाबांचा जास्त लळा होता. माझी मुलगी अजून पण विचारते आजी आजोबा कुठे गेले? कधी येणार? ते जेवले असतील का? तिच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची हेच कळत नाही."-अर्णव आपलं मन मोकळं करत होता. उमाताई त्याच सांत्वन करत होत्या.

"लहान आहे ती. नातवंडांना असतचं वेड आजी आजोबांचं. माझ्या प्रिया प्रणावचा सुद्धा फार जीव आहे माझ्यावर"-उमाताई

"कुठे असतात तुमची नातवंड?"-अर्णव

"असतात इथेच त्यांच्या मम्मी पप्पा सोबत"-उमाताई

"आणि मग तुम्ही नाही राहत का त्यांच्या सोबत?"-अर्णव

"राहत होते. पण आता त्यांना माझं ओझं झालंय. दोन मुलं आहेत मला. माझी मुलं लहान असतांना माझा नवरा गेला. तेव्हा शाळेत होते हे दोघे. खूप कष्ट करून दोघांना शिकवलं मोठं केलं. त्यांना वाढवतांना काय चटके सोसलेत मी ह्याची जाणीव नाहीये त्यांना. मोठा मुलगा शिकला आणि नोकरी साठी बाहेरगावी गेला तिथेच लग्न केलं त्याने आणि तिथेच ते काय म्हणतात सेटल झाला तो. फोन वर बोलणं होत असतं अधून मधून. आणि वर्षातून एकदा येतो भेटायला."-उमाताई

"आणि धाकटा मुलगा?"-अर्णव

"तो इथेच आहे. त्याच लग्न झालं त्याची बायको पल्लवी, खूप प्रेमळ, मायेने वागायची माझ्यासोबत. मुलगा आणि सून खूप काळजी घ्यायचे माझी. मी सुद्धा तिला माझ्या मुलीसारखं जीव लावला. आता किती दिवस जगणार मी, असा विचार करून जे काही कमावलं माझ्या हक्काचं होत ते दोन्ही मुलांना दिलं मी. सगळं चांगलं चालू होतं पण अचानक सगळं बदललं..."-उमाताईंनी आजपर्यंत जे झालं ते आणि आजचा सगळा घडलेला प्रकार अर्णवला सांगितला.

"किती नालायक आहेत हे मावशी खरच खूप राग येतोय मला. तुम्ही काळजी करू नका आपण जाऊन पोलीस कॉम्प्लेइंट करूया पोलिसांचे चार फटके खाल्ले की चांगले वठणीवर येतील दोघे."-अर्णव

"नाही नको जाऊदे माझीच मुलं आहेत ती. मी करेन माझी सोय जाईन वृद्धाश्रमात"-उमाताई

"अहो पण पोटचा मुलगा जिवंत असताना काय गरज आहे वृद्धाश्रमात जायची?"-अर्णव

"नाही मी पुन्हा त्या घरात नाही जाणार"-उमाताई

"बरं मी सोडतो तुम्हाला वृद्धाश्रमात गाडीने. चालेल ना?"-अर्णव

"हो चालेल"-उमाताई

उमाताई गाडीत बसल्या. अर्णवने गाडी चालू केली. आणि थोड्यावेळात एका बिल्डिंग जवळ येऊन गाडी थांबवली.

"इथे कुठे आणलस तू मला?"-उमाताई

"मावशी आपण माझ्या घरी आलोय. तुम्ही थोडावेळ बसा आराम करा काहीतरी खाऊन घ्या मग मी सोडतो तुम्हाला"-अर्णव

अर्णव आणि उमताई दोघे अर्णवच्या घरी गेले. प्रगतीने त्यांना चहा पाणी आणि थोडं खायला दिलं आणि ती अर्णव सोबत बोलायला आत निघून आली. अर्णव ने घडलेला सगळा प्रकार तिला सांगितला.

"व्हॉट नॉनसेन्स. कसले हरामखोर असतील ते. सरळ सरळ मावशींना घराबाहेर जा सांगितलं. ज्यांना आई मिळते त्यांना तिची कदर नसते. आणि इथे मी जन्मल्यापासून आईच्या प्रेमाला भुकेली आहे आईंमुळे (अर्णवची आई) मला आईची माया भेटली ती सुद्धा फार काळ टिकली नाही देवाने हिरावून घेतली. एक आई एकटी कष्ट करून स्वतः सगळे दुःख आणि चटके सोसून आपल्या दोन मुलांचा सांभाळ करू शकते पण असले नालायक आयश्योआरामात जगणारी दोन मुलं मिळून एका आईचा सांभाळ करू शकत नाहीत ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे"-प्रगती

"हो खरंय तुझं"-अर्णव

"मग तुझा काय विचार आहे? तू काय खरच त्यांना वृद्धाश्रमात सोडून येणारेस?"-प्रगती

"तुला खरंच असं वाटतंय मी त्यांना वृद्धाश्रमात जाऊ देईन? अग तसं असतं तर मी त्यांना इथे घेऊनच नसतो आलो. त्या इथेच राहतील आपल्या सोबत. तुझी काही हरकत…?"-अर्णव

"वेडा आहेस का तू अर्णव. माझी काय हरकत असणारे? उलट मला आनंदच होईल त्या इथे राहिल्या तर. ती बघ आपली चिऊ सुद्धा मावशींसोबत बोलताना किती दिवसांनी एवढे मनमोकळं वागतेय."प्रगती

"हो ते सगळं खरंय पण त्या इथे राहायला तयार होतील का?"-अर्णव

"असं कसं तयार नाही होणार?मी नाही जाऊ देणार त्यांना इथून. मी बोलते त्यांच्याशी"-अस बोलून प्रगती बाहेर हॉल मध्ये निघून आली

"चिऊ तुला आजी आवडल्या का ग?"-प्रगती

"हो मम्मा आजी खूप चांगल्या आहेत आपल्या आजी सारख्या गोड गोड"-चिऊ उमाताईंच्या मांडीवर बसून त्यांचे गाल ओढत लाडाने बोलली.

"अरे बाळा मला कधी सोडणारेस तू?"-उमाताई

"कुठे?"-अर्णव

"अरे असं काय करतोय तू मला बोलला होतास वृद्धाश्रमात सोडशील. बरं तुला जमणार नसेल तर मी जाईन एकटी"-उमाताई त्यांची बॅग उचलत म्हणाल्या.

"मावशी तुम्ही कुठे नाही जाणार. तुम्ही इथेच राहणार आहात आमच्या सोबत"-प्रगती

"हो मावशी हा तुमचा मुलगा असतांना तुम्हाला वृद्धाश्रमात जायची काही गरज नाही"-अर्णव

"नाही मी इथे नाही राहू शकत"-उमाताई

"पण का?"-प्रगती

"मी तुझ्या सोबत इथे यायलाच नको होतं. तुम्हाला आता फक्त माझी दया येतेय माझं वाईट वाटतंय म्हणून तुम्ही माझ्यावर उपकार करताय. मला आधाराची गरज आहे म्हणून तुम्ही..."-उमताई बोलत असताना अर्णव त्यांना अडवतो.

"उपकार? अहो मावशी मुलाने किती काही केलं तरी आईचे उपकार एका जन्मात फेडू शकत नाही हजारो लाखो जन्म घेऊन पण आईचे उपकार फेडता येणार नाही. आणि असं असतांना मी तुमच्यावर उपकार करतोय असं कसं वाटलं तुम्हाला? तुम्हाला काय वाटतय तुम्हाला आमची गरज आहे, आमच्या आधाराची गरज आहे म्हणून तुम्हाला इथे थांबवतोय? छे ओ, ज्या बाईने एकटीने तिच्या दोन्ही मुलांचं भवितव्य घडवलं तिला आमच्या आधाराची काय गरज? अहो खरं तर आम्हाला तुमची, तुमच्या आधाराची गरज आहे. खूप स्वार्थी आहोत आम्ही म्हणून तुम्हाला थांबवतोय. मी हाथ जोडतो प्लीज मावशी आम्हाला सोडून जाऊ नका आम्हाला गरज आहे तुमची"-अर्णव हाथ जोडून उमाताईंसमोर उभा राहिला.

अर्णवचे बोलणं ऐकून उमाताईंचे डोळे पाणावले होते. अर्णव आणि प्रगती दोघेही त्यांना थांबवण्यासाठी विनवणी करत होते.

"आजी तू पण आता मला माझ्या आजी आजोबांसारखी सोडून जाणार? नको ना ग जाऊ तू. थांब ना माझ्या जवळ"-मुग्धा उमाताईंना घट्ट मिठी मारून रडत बोलत होती.

उमाताईंना गहिवरून आलं. त्यांनी मुग्धाला मिठीत घेतलं. तिच्या गालावर प्रेमाने पापे घेतले.

"मी नाही जाणार कुठेच तुला सोडून. इथेच राहणार तुझ्या सोबत"-उमाताई

हे ऐकून प्रगती आणि अर्णव ने सुद्धा जाऊन उमाताईंना मिठी मारली. त्यांना खूप आनंद झाला होता.

"मी इथे राहीन पण माझी एक अट आहे"-उमाताई

"कसली अट?"-प्रगती आणि अर्णव दोघांनी एकसाथ विचारलं.

"तुम्ही मला आई बोलणार असाल तरच हक्काने राहीन मी इथे"-उमाताई

"हो आई"-प्रगती आणि अर्णव दोघे एकसाथ बोलले.

"अहो आई तुम्हाला ह्या चष्म्यातून कसं काय दिसतं?असा कसा चष्मा लावलाय तुम्ही? अर्णव उद्या च्या उद्या आईंना नवीन चष्मा घेऊन दे"-प्रगती

"हो आई आपण उद्या जाऊन घेऊन येऊ"-अर्णव

"बरं चालेल"-उमताई

सगळं काही खूप छान चालू होतं. उमाताई अर्णव, प्रगती आणि मुग्धा सोबत आनंदाने राहत होत्या. इथे पल्लवी आणि राकेश चे रोज छोट्या मोठ्या कारणा वरून वाद होत होते. राकेशला उमाताईंची आठवण येत होती.

"अर्णव काल आई बोलता बोलता मला बोलल्या त्यांचा आज वाढदिवस आहे. मी तुला सांगायचं विसरली"-प्रगती

"अग अशी कशी विसरभोळी तू. मग आता एक काम कर आज जेवायला सगळं आईच्या आवडीचं कर मी जाऊन आईसाठी जिलेबी आणतो तिला खूप आवडते ना"-अर्णव

"हो जा लवकर घेऊन ये"-प्रगती

अर्णव बाहेर निघून जातो. घरी फक्त प्रगती, उमाताई आणि मुग्धा असतात. दाराची बेल वाजते. प्रगती जाऊन दरवाजा उघडते.

"आपण कोण?"-प्रगती

"आई..."-ती व्यक्ती दारातून आत डोकावून आवाज देते.

आवाज ओळखीचा वाटल्याने उमाताई दारात कोण आलंय बघतात. समोरील व्यक्तीला बघून त्यांच्या कपाळावर आठ्या येतात. समोरची व्यक्ती राकेश असतो.

"कशाला आला आहेस इथे तू"-उमाताई

"आई...राकेश?"-प्रगती

"हो मी राकेश"-राकेश

"हा या आत या"-प्रगती.

राकेश आत येतो आणि डायरेक्ट उमाताईंचे पाय धरतो आणि माफी मागू लागतो.

"आई माफ कर ग चुकलो ग मी. मी खूप चुकीचा वागलोय तुझ्यासोबत प्लीज माफ कर ग मला"-राकेश

उमताई काहीच बोलत नाहीत

"आई परत चल तू आपल्या घरी मी न्ह्यायला आलोय तुला. थँक्स तुम्ही माझ्या आईला घरी राहू दिलं तुम्ही आता मी घेऊन जातो माझ्या आईला"-राकेश प्रगती कडे बघून बोलतो.

"तुम्ही असं घेऊन नाही जाऊ शकत त्यांना आधी माझ्या मिस्टरांना येउद्या मग तुम्ही त्यांच्याशी बोला"-प्रगती

"पण आई माझी आहे तर तिला मी हक्काने घेऊन जाऊ शकतो"-राकेश

"कोणत्या हक्काने? आणि कोणाच्या घरी?"-उमाताई

"आई अग आपल्या घरी. तुझ्या मुलाच्या घरी"-राकेश

"मी माझ्या हक्काच्या घरीच आहे. हे माझ्या मुलाचं घर आहे"-उमताई

उमाताईंचे हे वाक्य ऐकून दारात उभ्या असलेल्या अर्णवला खूप आनंद होतो.

"आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा"-अर्णव उमाताईना नमस्कार करतो. प्रगती सुद्धा त्यांचे आशीर्वाद घेते. अर्णव उमाताईंना जिलेबी भरवतो.

"आई तुझा वाढदिवस आहे आज? हॅपी बिर्थडे आई"-राकेश आशीर्वाद घेऊन बोलतो. उमाताई त्याला आशीर्वाद देतात पण काही बोलत नाही.

"मिस्टर राकेश तुम्हाला आता आठवण झाली तुमच्या आईंची? मी त्यांना पाठवणार नाही"-अर्णव

"हे बघा ती माझी आई आहे तुम्ही अस तिला डांबून ठेऊ शकत नाही!"-राकेश

"ठीक आहे आई स्वतःहून तुमच्या सोबत यायला तयार असेल तर मी तुम्हाला अडवणार नाही. मग तुम्ही खुशाल घेऊन जा तिला"-अर्णव

"आई चल जाऊया आपण"-राकेश

"मी नाही येणार. तू जा इथून आणि पुन्हा इथे आला नाहीस तरी चालेल"-उमाताई

"अग माझ्या साठी नको येऊस पण तुझ्या प्रिया प्रणव साठी तरी चल"-राकेश

"आजी चल ना मला गोष्ट सांग ना"-मुग्धा रूम मधून येते आणि उमाताईंना मिठी मारते.

"हो बाळा येते मी तू आत जा"-उमाताई

"मला तुझ्या आणि तुझ्या बायकोसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत. पण माझ्या नातवंडांची ह्यात काही चूक नाही. मी त्यांना दूर नाही करणार. त्यांना मला भेटावं वाटेल तेव्हा घेऊन ये इथे. चालेल ना ते इथे आले तर अर्णव बाळा?"-उमाताई

"हो आई न चालायला काय झालंय"-अर्णव

"आई माफ कर ना प्लीज"-राकेश गयावया करत होता.

"माफ तर केलं मी तुला पण परत येणार नाही, तू येऊ शकतोस आता"-उमाताई असं बोलून आत निघून जातात.

राकेश नाईलाजाने घरी निघून जातो.

"आई... तुम्ही आम्हाला वाईट वाटेल म्हणून इथे राहण्याचा निर्णय नाही घेतला ना?"-प्रगती

"आई तो तुझा मुलगा आहे तुला त्रास होत असेल तर फक्त आमच्या साठी इथे नको राहुस आणि चिऊची काळजी नको करुस आम्ही समजूत काढू तिची"-अर्णव

"कारट्यांनो मला हाकलून द्यायचा विचार आहे का तुमचा?"-उमाताई

"नाही नाही आई फक्त तुम्हाला वाईट वाटत असेल म्हणून. आणि शेवटी ते तुमचं रक्ताचं नात आहे..."-प्रगती

"रक्ताच्या नात्या पेक्षा मायेचं बंधन जास्त महत्वाचं असतं. मी खुश आहे खरच. आणि मी तुम्हाला आणि आपल्या चिऊला सोडून कुठेच नाही जाणार"-उमाताई

अर्णव आणि प्रगती दोघे आनंदाने उमाताईंना मिठी मारतात.

मुलगा असावा तर अर्णव सारखा आणि नसावा तर राकेश सारखा. जर सासू आपल्याला आईसारखी माया लावत असेल तर सुनेने सुद्धा सासूला आईचा दर्जा दिला तर कुठे बिघडलं? सासू सासऱ्यांची सेवा करणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आई वडील म्हातारे झालेत ते आता थोडे चिडचिड करणार, त्यांना आपल्या काही गोष्टी पटणार नाहीत, कधी कधी ते लहानमुलांसारखं हट्ट सुद्धा करणार तेव्हा आपण त्यांचे हट्ट पुरवले पाहिजेत, त्यांना समजून घेतलं पाहिजे. शेवटी आपल्याला दोन पायांवर उभं राहायला, बोबडे बोल बोलायला, लिहायला वाचायला सुद्धा त्यांनीच शिकवलंय हे विसरून चालणार नाही.

हा आता ह्या सगळ्यात राकेशला त्याच्या आईसोबत राहता येणार नाही. त्याला आई दूर गेल्यावर तिची किंमत कळली पण तो पर्यंत उशीर झाला होता. उमाताईंनी राकेश सोबत न जाऊन अर्णव सोबत राहण्याचा निर्णय घेतला हा तुमच्या मते योग्य की अयोग्य हे समीक्षा मार्फत नक्की सांगा.

 

©ChinmayiDeshpande