नातवंड सांभाळण्याची सक्ती संदिप खुरुद द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नातवंड सांभाळण्याची सक्ती

           नातवंड सांभाळण्याची सक्ती

उमाबाई व दिनकरराव तसं पाहिलं तर सुखी दांपत्य. त्यांच्या संसाराला आता जवळपास चाळीस वर्ष झाली होती. त्यांचे आतापर्यंतचे जीवन खूपच सुख समाधानाचे, आनंदी गेले होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांचेही मानिसक व शारीरीक स्वास्थ्य बिघडले होते. उमाबाई यांना गुडघेदुखीचा त्रास सुरु झाला होता आणि दिनकरराव यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाला होता. आणि गेल्या काही दिवसांपासून ते दोघेही एकमेकांपासून दूर राहत होते. त्याचे कारण म्हणजे त्यांचा मोठा मुलगा विवेक हा आपली पत्नी उर्वशी व आपली मुले यश व स्वरा यांच्यासोबत नोकरीनिमित्त मुंबईमध्ये राहत होता. त्यांच्या दोन्ही नातवांना सांभाळण्यासाठी उमाबाई गावाहून मुंबईला आल्या होत्या. दिनकररावही एक आठवडा मुंबईत राहून गेले. पण त्यांना मुंबईतले वातावरण लागु झाले नाही. त्यांना गावामध्ये मोकळया वातावरणात राहण्याची सवय होती. आणि मुंबईमध्ये त्यांना बंदिस्त रहावे लागे. बाहेर कोठे फिरायला जावं तर नुसती गर्दी. या वयात कोठे पडलो तर नुसती पंचाईत व्हायची या भितीने ते बाहेरही फिरायला गेले नाहीत. शेवटी कंटाळून ते गावी परत गेले होते. पण उमाबाईंचा मात्र नाईलाज झाला होता. नातवंडांच्या प्रेमाखातर त्यांना मुंबईला थांबणं गरजेचंच होतं.

            गावाकडे दिनकरराव यांचा लहान मुलगा विनोद व त्याची पत्नी रेखा हे दोघेही दिवसभर शेतात काम करायचे. त्यांनाही एक तीन वर्षाचा जय नावाचा मुलगा होता. दिनकररावांना त्याची काळजी घ्यावी लागत होती. दिवसभर दिनकरराव आणि जय गावभर फिरायचे. सगळया गावभर आजा आणि नातवाची जोडी प्रसिद्ध झाली होती. एखादे दिवशी दिनकरराव एकटे दिसले तर लोक विचारायचे आज नातु नाही आणला सोबत?

            तसं पाहिलं तर उर्वशी इतक्या दिवस गृहिणीच होती. पण फ्लॅट घेतल्यामुळे त्याचे हप्ते भरण्यासाठी एकटया विवेकला जड जात होतं. त्यामुळे आता उर्वशीनेही जॉब करण्याचं ठरवलं होतं. जॉबसाठी दोघांनाही घराबाहेर पडणं आवश्यक होतं आणि त्यामुळेच मुलांना सांभाळण्यासाठी उमाबाईंना मुंबईला बोलावलं होतं.

            आज नेहमीप्रमाणे विवेक व उर्वशी आपल्या कामावर निघून गेले होते. पाच वर्षाचा यश व तीन वर्षाची स्वरा कॉटवर बसून एकमेकांसोबत खेळत होते. उमाबाई त्या दोघांचा खेळ पाहत त्यांच्याकडे लक्ष देत जवळच सोफयावर बसल्या होत्या. इतक्यात यशने स्वराची बाहुली हातात घेतली. ते पाहून स्वरा ‘माझी बाहुली दे’ म्हणून रडु लागली. दोघेही कॉटवर उभे होते. यश तिची बाहुली द्यायला तयार नव्हता. उमाबाई यशवर ओरडत होत्या. पण यश काही ऐकायला तयार नव्हता. यशने बाहुलीचे डोके धरले होते. तर स्वराने पाय धरले होते. दोघेही जोराने एकमेकांकडे बाहुली ओढु लागले. तेवढयात बाहुलीच्या डोक्याकडील भाग उपसून यशच्या हातात आला. त्यामुळे यश मागच्या भिंतीवर जारोने आदळला आणि स्वराच्या हातात डोके तुटलेली अर्धवट बाहुली आली. तीही कॉटवरून खाली पडली. दोघांच्याही डोक्याला मार लागला होता. दोघांच्या डोक्यातून रक्त वाहु लागले. हा प्रसंग क्षणार्धात घडला होता. कितीही चपळ माणूस असता तरी त्याला त्या दोघांनाही पडण्यासापासून वाचवता आलं नसतं. गुडघे दुखत असतानाही उमाबाईंनी कसे तरी खुर्चीवरुन उठून दोघांनाही उचचले. दोघांच्या जखमा पदराने दाबून धरत त्या मदतीसाठी जोरजोराने ओरडु लागल्या. त्यांचा फ्लॅट सातव्या मजल्यावर होता. उमाबाई पुरत्या गांगारून गेल्या. काय करावं त्यांना काही सुचेना.

            तेवढयात बाजुलाच राहणाऱ्या विवेकच्या मित्राचा दहा वर्षाचा मुलगा दरवाजा उघडुन आत आला. घरातील दृश्य पाहून तो परळतच बाहेर गेला व त्याने तात्काळ माणसांना बोलावून आणले.उमाबाईंनी आलेल्या माणसांच्या मदतीने मुलांना दवाखान्यात नेले. तोवर ही बातमी विवेकला कोणीतरी फोनवर सांगीतलीच होती. त्याने उर्वशीला फोन केला. दोघेही घाईने दवाखान्यात आले. आता उमाबाईंना काळजी लागून राहिली होती. त्यांना माहित होतं. आता विवेक आपल्यावर नक्कीच ओरडणार.विवेकने आपल्या मुलांची परिस्थिती पाहिली. त्यांची प्रकृती आता स्थिर झाली होती. दवाखान्यात यायला उशिर झाला त्यामुळे रक्तस्त्रावही जास्त झाला.परिणामी दोघांनाही रक्त चढवावे लागले.

            विवेक बाहेर आला. बाहेर बाकडयावर बसलेल्या उमाबाईंना पाहून त्याचा पारा चढला. उमाबाई मान खाली घालून बसल्या होत्या. विवेक मोठया आवाजात त्यांच्यावर ओरडला.

            “ साधं मुलांना सांभाळायचं कामही तुला जमलं नाही. तुझ्यामुळे माझ्या मुलांची आज ही अवस्था झाली.”

            उमाबाई त्याला काही बोलल्या नाहीत. त्यांना माहित होतं. आता काही बोलावं तर तो रागात आहे. आपलं म्हणणं ऐकण्याच्या मन:स्थितीमध्ये नाही. आपण काही बोलावं तर हा आणखी जास्त रागवेल. त्यामुळे त्या काही न बोलता शांतच राहिल्या. तो दवाखान्यातील लोकांसमोर उमाबाईंना घालून पाडून बोलला. उर्वशीने त्याला शांत राहण्यास सांगीतले. पण तो तिच्यावरही ओरडला. त्यामुळे तीही शांतच राहिली.

            मुलांना दवाखान्यातून घरी आणलं. आता त्या दोघांचीही तबीयत ठिक होती. मुलं पडल्याचं दिनकररावांनाही माहित झालं होतं. त्यामुळे ते आपला लहान मुलगा विनोद व त्याची पत्नी रेखा व नातु जय सोबत मुंबईला आले होते. दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे विवेक, विनोद, उर्वशी व रेखा हे आपल्या मुलांना त्यांच्या आजी आजोबाजवळ ठेवून चित्रपट पहायला व बाहेर फिरायला गेले. सकाळी दहाला बाहेर पडलेल्या त्या दोन जोडया रात्री सात वाजता घरी आल्या. ते परत येईपर्यंत मुलांना खाऊ घालणं, त्यांचे औषधं देणं, सु-शी केल्यानंतर धुणं, त्यांचे कपडे बदलणं अशा प्रकारच्या कामांनी व त्या तिघांच्या पळापळीने उमाबाई व दिनकरराव खूप थकून गेले.

            दोन दिवसानंतर दिनकरराव आपल्या लहान मुलाच्या कुटुंबासोबत गावी परत जायला निघाले. ते दरवाजापर्यंत गेले. तोच उमाबाईंचे डोळे पाण्यांन भरून आले. त्यांनी थांबा म्हणून दिनकररावांना आवाज दिला.

            आपल्या पत्नीचा रडका चेहरा पाहून त्यांनाही गलबलून आले. आजपर्यंत कित्येक सुख- दु:खाचे प्रसंग त्या दांपत्याने एकमेकांसोबत घालवले होते. आजपर्यंत उमाबाईंच्या डोळयांत त्यांनी आश्रु पाहिले नव्हते. ते कधी डगमगलेच तर उमाबाईंनीच त्यांना खंबीर साथ दिली होती. मग आज अचानक काय झाले? आपल्या पत्नीचे डोळे का पाणावले? याचं कोडं दिनकररावांना पडलं.

            दिनकरराव आपल्या पत्नीस म्हणाले,

            “उमा, काय झालं? कशामुळे रडतेस?”

            उमाबाई रडवेल्या स्वरात म्हणाल्या, “ मला नाही रहायचं ईथे. माझा जीव गुदमरतोय.मला गावाकडे घेऊन चला.”

            सासुबाई गेल्यावर मुलांना कोण सांभाळेल याचा प्रश्न उर्वशीला पडला. तिने तसे बोलूनही दाखवले. त्यावर उमाबाई म्हणाल्या,

            “ त्या दिवशी मुलं खेळताना पडली. त्याचं दु:ख जेवढं तुम्हाला झालं. त्यापेक्षा जास्त दु:ख मला झालं. कारण मी त्यांच्याजवळ असताना त्यांना पडण्यापासून वाचवू शकले नाही. मी जवळच सोफयावर बसले होते. त्या दोघांचे बाहुलीवरून भांडण चालू होते. त्यावेळी मी उठण्याचा प्रयत्न केला. पण गुडघेदुखीमुळे मला लवकर उठता आले नाही. आणि तेवढयात ते दोघेही पडले. त्यांची जखम पाहून मलाच खूप दु:ख झाले. आता या वयात शरीर साथ देत नाही. लहान मुलं पळणारंच. पळताना पडणारच. आमचं त्यांच्यावर प्रेम  नाही असं नाही. पण त्यांना सांभाळण्यासाठी आमचं शरीर पूर्ण साथ देत  नाही. त्यांना सांभाळण्याइतपत आता आमची कुवत राहिलेली नाही.”

             आपल्या आईचे बोलणे ऐकून विवेकलाही वाईट वाटले. तो म्हणाला,

            “आई, माफ कर मला. कारण मी तुझं बोलणं ऐकून घ्यायच्या आधीच त्या दिवशी तुझ्यावर चिडलो होतो. प्रत्यक्षात काय झालं? हे जाणून घेण्याआधी मी तुला बोलायला नको होतं.”

            एवढा वेळ शांत असलेले दिनकरराव म्हणाले,

            “तुम्हाला वाटतं. आई-बाप आता काही काम करत नाहीत. म्हणून त्यांनी निदान आता मुलांना तरी सांभाळलं पाहिजे. लहान मुलांना सांभाळणं तुम्हाला सोपं काम वाटतं का? विवेक आणि विनोद तुम्ही दोघे एकच दिवस मुलांना सांभाळून पहा. मग तुमच्या लक्षात येईल. तुमचं तुमच्या मुलांवर जितकं प्रेम आहे. आमचंही तितकंच त्यांच्यावर प्रेम आहे.पण आता आमची मानसिक,शारीरीक क्षमता त्यांना सांभाळण्यासाठी राहिलेली नसते. आम्ही कोठे म्हणतो की आम्ही त्यांना सांभाळणार नाही. आम्ही त्यांना नक्कीच सांभाळणार कारण त्यांना खेळवताना आम्हाला जो आनंद मिळतो ना? तो आनंद जगात इतर कोठेही मिळणार नाही. पण तुम्ही आमच्या शारीरीक क्षमता समजून घेतल्या पाहिजे.जसे आपल्याला आपल्या कुवतीपेक्षा जास्त काम पडल्यावर आपली जशी चिडचीड होते. तसेच शरीर साथ देत नसल्याने आमचीही चिडचीड होते. त्यामुळे तुम्ही या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.”

             त्या चौघांनाही आता आपल्या आई-वडिलांचं म्हणणं पटलं होतं. विनोद म्हणाला,

            “ खरं आहे. आप्पांचे मित्र गावात निवांत बसतात. पण आप्पा निवांत कधीच बसत नाहीत. ते सतत जयची काळजी घेतात. आम्ही तुम्हाला थोडा निवांत वेळ दिला पाहिजे. तुम्हालाही कोठे बाहेर फिरायला जाययं असेल तर आम्ही तुम्हाला बाहेर जाण्यासही वेळ दिला पाहिजे. असं नातवंडांचं सक्तीचे प्रेम नाही लादलं पाहिजे.”

            यश सर्वांचे बोलणे ऐकत होता. तो पाच वर्षांचा असल्यामुळे त्याला त्यांचे बोलणे बऱ्यापैकी समजलं होतं. यश म्हणाला, “आजी नको जाऊस ना आम्हाला सोडून. आता आम्ही तुला त्रास नाही देणार.आमच्यामुळे तुम्ही भांडु नका.”

            यशचं बोलणं ऐकून सर्वांनाच हसु आलं. दिनकरराव यशला जवळ घेत म्हणाले,

“आजी-आजोबा आणि नातवंडांचे नातेच निराळे असते. नातवंडांमुळे आम्हाला विवेक आणि विनोद तुमचेही बालपण आठवते. कधी कधी आम्ही मग त्या आठवणीतही रमून जातो. तुझ्या फ्लॅटच्या हप्त्यासाठी मी काही पैसे पाठवतो. म्हणजे तुमच्या दोघांचाही ताण कमी होईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडेही लक्ष देता येईल. विवेकला नाही लक्ष देता आले तरी किमान उर्वशीला तरी लक्ष देता येईल.”

            उर्वशीने भितभितच विचारले, “ म्हणजे आप्पा, आता तुम्ही आईंना घेवून चाललात?”

            दिनकरराव उमाबाईंकडे पाहून म्हणाले, “ यायचं ना तुला ?”

            उमाबाई म्हणाल्या, “तसं पाहिलं तर माझं ईथे मनच रमत नाही. पण यांच्या फ्लॅटचे हप्ते फिटेपर्यंत काही दिवस राहते. उगाच माझ्या पिलांची आबाळ व्हायची.”

            आजी थांबणार हे ऐकून यशला खूप आनंद झाला. पळत येवून त्याने आजीला मिठी मारली. त्याचे पाहून स्वराही आजीकडे पळत आली. आजीने दोन्ही लेकरांना प्रेमानं जवळ घेतले. दिनकररावांनीही जयला हृदयाशी धरलं. ते पाहून संपूर्ण कुटुंब पुन्हा आनंदी झालं. कारण आता ते सक्तीने लादलेलं प्रेम नव्हतं तर ते आजी आणि नातवंडांचं खरंखुरं प्रेम होतं.