Pappachi Pari Paricha Bap books and stories free download online pdf in Marathi

पप्पाची परी परीचा बाप

पप्पाची परी परीचा बाप

रोजच्या प्रमाणेच मी नोकरी निमित्त गावाहून जिल्हयाच्या ठिकाणी जाण्यासाठी सकाळी नऊ वाजता बसस्थानकामध्ये आलो. तेवढयात मला पंधरा वर्षापुर्वी आमच्या गल्लीमध्ये राहणारे पण सद्या दुसऱ्या कॉलनीमध्ये राहायला गेलेले अजित काका दिसले. मला पाहून ते माझ्याकडेच आले.

           “खूप दिवसांनी भेट झाली तुझी.”

          मी, “ हो काका. आपली बऱ्याच दिवसांपासून भेट नाही.”

          तेवढयात बस आली. सुदैवाने बस रिकामीच होती. त्यामुळे आम्हा दोघांना एकाच सिटवर बसायला जागा मिळाली.

          काका “अरे, माझी आता तालुक्याहून जिल्हयाच्या ठिकाणी बदली झाली आहे. त्यामुळे आता आपली बहुतेक रोजच भेट होईल.”

          मी आनंदाने, “हो.बरंच झालं तुमची ईकडे बदली झाली ते.”

          काका, “ मीच बदली करुन घेतली. कारण आमची दिदी यंदा बारावीला आहे. ती जिल्हयाच्या ठिकाणीच आहे शिकायला. मेसचं जेवण चांगलं नसतं. त्यामुळे तिला आता रोज घरचा डबा घेऊन जातो. आणि त्यानिमित्ताने रोज तिची भेटही होते.”

          मी “हो ना. बाहेरच्या जेवणापेक्षा घरचं जेवण कधीही चांगलंच. यश कितवीला आहे आता?”

          काका “ यश नववीला आहे. तो गावातल्याच शाळेत जातो.”

          मी “अच्छा.”

          काका “यशच्या शाळेची कालच फीस भरली. लगेच दिदीने टयुशनसाठीच्या फीसाठी पैसे मागीतले. त्यात नविन घराचे हप्ते चालु आहेत. त्यामुळे खुप परेशान झालो. आमची बारावी जेवढया पैशात झाली नसेल. तेवढे पैसे तर आता एल.के.जी.यु.के.जीसाठीच लागतात.”

मी “हो ना. सद्या शिक्षणाची खूप वाईट परिस्थीती झाली आहे. गरिबांच्या मुलांनी कसे शिक्षण घ्यावे ?”

काका “ हो ना. पण सद्याच्या या स्पर्धेच्या युगात टिकायचं म्हणजे तेवढे करावेच लागते. काय करणार नाविलाज आहे.”

मी होकारार्थी मान डोलावली.

काका, “पण काहीही होऊ दे. मी माझ्या लेकरांना चांगलं शिक्षण देणारच. त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी काही कमी पडु देणार नाही. रात्रीच दिदीचा फोन आला होता. त्यांच्या कॉलेजची सहल जाणार आहे म्हणाली. माझ्याजवळ पैसे नाहीत. पण आता कोणाकडून तरी ऊसने पैसे घेऊन तिला द्यावे लागतील. आपल्या लेकराने आपल्याला काही मागीतले आणि ते देण्यासाठी आपण समर्थ नसलो तर पोटात तोडल्यासारखं होतं रे. खूप वाईट वाटतं.”

          मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होतो. खूप दिवसांनी त्यांनाही कोणीतरी जवळचा माणूस भेटल्याने तेही माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत होते. मी लहान असल्यापासून त्यांचा संघर्ष पाहत आलो होतो. दुसऱ्याच्या किराणा दुकानात काम करत त्यांनी अभ्यास करुन मोठया कष्टाने नोकरी मिळवली होती.

          ते पुढे म्हणाले, “आपली एकच अपेक्षा आहे. आपण जे भोग भोगलेत ते आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नयेत. आपली मुले स्वत: च्या पायावर उभी रहावीत. समाजात सन्मानाने वावरावीत. त्यामुळे मी त्यांना काही कमी पडु देत नाही. ऊसने पैसे घेऊन त्यांची गरज भागवतो. पण त्यांना नाही असं कधी म्हणत नाही.”

          त्यांच्या प्रत्येक शब्दातून एका बापाची आपल्या लेकरांविषयी असलेली तळमळ, प्रेम दिसून येत होतं. मनात आलं खरंच बाप होणं सोपं नाही.थोडयाच वेळात बसस्थानक आले. काका त्यांच्या कार्यालयाकडे व मी माझ्या कार्यालयाकडे आलो.

          रात्री सातच्या वेळेस परत जाण्यासाठी मी बसस्थानकामध्ये आलो. काका असतील या अपेक्षेने मी त्यांना फोन केला. पण त्यांना बस भेटली असून ते आता अर्ध्या रस्त्यामध्ये असल्याचे त्यांनी सांगीतले. बसस्थानकामध्ये येवून वीस मिनिटे झाली तरी गावाकडे जाणारी

बस आली नव्हती.

          थोडयाच वेळात माझ्या बाजूला दोन मुले व त्यांच्याच वयाच्या दोन मुली येवून उभे राहिले. ते दोन्ही मुले आमच्या गावातीलच होते. गर्दी असल्यामुळे त्यांनी मला पाहिले नव्हते. त्यांच्या सोबत असलेल्या मुलींनी चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळलेला होता. तरीही त्यातील एका मुलीच्या डोळयावरून मला ती ओळखता आली. ती काकाचीच मुलगी होती. जिला मी ती खूप लहान असताना पाहिले होते. तसेच ती शाळेत जाताना आमच्या घरापासूनच जायची त्यामुळे तिला त्यावेळी पाहण्यात आले होते. त्यांना पाहून मी मुद्दाम थोडे दूर जावून उभा राहिलो.

          थोडया वेळाने गावाकडे जाणारी एक बस आली. मी जागा पकडून एका सिटवर बसलो. माझ्या पाठीमागच्याच सिटवर दोघी बसल्या. त्या दोन मुलांनी खिडकीमधून सॅक टाकून त्यांच्यासाठी जागा पकडली होती. बस चालू झाली. बस आता शहराच्या बाहेर आली होती. ते दोन मुलेही गाडीवर बससोबतच प्रवास करत होते. कधी बसच्या पाठीमागे तर कधी ओव्हरटेक करुन बसच्या पुढे जात होते.

          मी सिटवर मान टेकवून डोळे मिटून बसलो होतो. मी जरी तिला ओळखत असलो तरी बहुतेक ती मला ओळखत नसावी. त्या दोघींचे संभाषण चालू झाले. काकाची मुलगी दुसऱ्या मुलीला म्हणाली,

          “आज त्याचा वाढदिवस आहे. त्याला गिफ्ट देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. बरं झालं तू मला पैसे दिलेस. मी पप्पांना सहलीला जाण्यासाठी पैसे मागीतले आहेत. आज घरी गेल्यावर त्यांच्याकडून पैसे घेते. आणि उद्या तुला देते.”

          तिची मैत्रीण,

          “ हो ना. माझ्याकडील पैसे संपले आहेत. उद्या नक्की दे.”

          “ हो. मी सकाळीच पप्पांना सांगीतले आहे. आज घरी गेल्यावर ते देतीलच.”

          मैत्रीण, “ड्रेस खूप छान घेतलास त्याला. आणि घडयाळ पण मस्त आहे.”

          “ हो ना. आज त्याचा वाढदिवस आहे. आज जर मी त्याला गिफ्ट दिले नसते तर मला दिवसभर करमले नसते.आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी आपण इतकंही नाही का करु शकत? ”

          “ हो ना. बरं झालं आज आपण त्याला बोलवून घेतले. गावामध्ये भेटताही येत  नाही. सगळयांचं आपल्याकडेच लक्ष असतं.”

          “ मी गावाकडे असल्यावर तर तो माझ्या घरासमोरून किती चकरा मारतो? तो समोर असला तरी मला त्याला भेटता येत नाही. आज त्याच्यासोबत चित्रपट पाहता आला.यापेक्षा दुसरा कोणता मोठा आनंद आहे. माझं त्याच्यावर जिवापाड प्रेम आहे.”

          तिचं बोलणं ऐकून माझ्या मनात विचार आले. तो आता तिच्या आयुष्यात आला आहे. तिचे आई वडील ती पोटात असल्यापासूनच तिच्यावर प्रेम करत आहेत. प्रत्येक पप्पासाठी त्याची मुलगी परीच असते. प्रत्येक बाप आपल्या मुलींच्या भविष्याबाबत चिंतीत असतो. आपल्या परीसाठी तिची काळजी घेणारा एखादा राजकुमार मिळावा एवढीच त्याची माफक अपेक्षा असते. तो बोलून दाखवत नसला तरी आतली आत कुढत असतो.मनाला खात असतो. लहानपणापासून सांभाळलेली आपली मुलगी कळत्यापणी आपल्या ईच्छेविरुद्ध पळून जाते ही गोष्ट त्याच्यासाठी मरणापेक्षा कमी नसते. बस थांबली तशी माझ्या विचारांची शृंखलाही थांबली.

          गावचे बसस्थानक आले होते.मी खाली उतरलो. काका मोटारसायकल घेवून तिलाच न्यायला आले होते.

          मला पाहून काका,

          “ तू पण याच गाडीत होतास का? दिदी याच गाडीत आहे.”

          मी फक्त हो म्हणालो व येतो म्हणून घराकडे निघालो.

          रात्राचे साडेनऊ वाजले होते. नुकतेच माझे जेवण उरकले होते. माझ्या डोक्यात काका व त्यांची मुलगी हाच विषय घोळत होता. तेवढयात मला काकांचाच फोन आला.

          मी, “ हॅलो काका, बोला ना.”

          काका, “बाहेर येतोस का? मी तुझ्या घराबाहेरच आलो आहे.”

          मी, “काका, आत या ना.”

          काका, “ नको. तुच बाहेर ये. जरा अर्जंट आहे.”

          मी बाहेर आलो.

          काका, “ माझे एक काम करतोस का?”

          मी, “ बोला ना काय काम आहे?”

          काका, “मला थोडे पैसे उसने हवे होते. पहिल्यांदाच मागतोय नाही म्हणु नकोस.”

          मी, “ किती हवेत ?”

          “पाच हजार. तुला मागीतले  नसते पण तुला सकाळी सांगीतले होते ना. दिदीची सहल जाणार आहे. तिला द्यायचे आहेत. ती त्यासाठीच आज घरी आली आहे. आता पैसे नाहीत म्हणल्यावर रुसुन बसली. जेवणही केले नाही तिने.”

          मी त्यांच्या फोनपेवर पैसे पाठवले. त्यांना खूप आनंद झाला. जाता जाता मी एटीएमवरुन काढून घेतो. लेकरु जेवलं नाही अजून. त्यामुळे मगापासून पोटात कालवत होतं.तू देवासारखाच भेटलास बघ. पगार झाली की तुझे पैसे देवून टाकतो. असे म्हणून ते आनंदाने निघून गेले.

          नुकतेच जेवण झाल्यामुळे शतपावली करावी या हेतूने मी थोडे अंतर चालून घरापासून पुढे आलो. गावातील रिकमटेकडया माणसांच्या कट्टयावर तो मुलगा उभा होता. त्याच्या भोवती त्याचं मित्र मंडळ होतं. त्याच्या मित्रांनी एका मोटार सायकलवर केक ठेवला. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याचे मित्र मोठयाने चिअर्स करु लागले. त्याने केक कापला. तेवढयात त्याच्या एका मित्राने त्याच्या चेहऱ्याला केक लावण्याचा प्रयत्न केला.

          तो मोठयाने त्या मित्राला शिव्या देत ओरडला. “कपडयांना केक लागु देवु नकोस. आपल्या आयटमने आज आपल्याला हा ड्रेस घेतला आहे.”

          ते सर्व तरुण व तो स्वत: मद्यधुंद अवस्थेत होते. कोणीतरी त्याच्या चेहऱ्यावर केक फासला. त्याच्या डोळयात केक गेला. मित्रांनी त्याला खाली वाकवून त्याच्या पाठीत जोरात बुक्क्या मारल्या. एकाने त्याचा शर्ट ओढला. त्याचा शर्ट थोडा फाटला. तेवढयात इतर मित्रांनीही त्याचा शर्ट ओढला. त्याबरोबर तो शर्ट आणखी फाटला. पाहता पाहता त्या शर्टच्या चिंधडया झाल्या. ‘माझ्या आयटमने दिलेला शर्ट का फाडला?’ असे म्हणून तो अर्वाच्च भाषेत शिव्या देऊ लागला.

          मी घरी आलो. बिछान्यावर अंग टाकले. झोपण्याचा प्रयत्न करुनही मला झोप येईना. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा पट माझ्या डोळयासमोर उलगडला. आपल्या परीला काही कमी पडु नये यासाठी धडपडणारा, तळमळणारा बाप. आपल्या बापाला खोटे बोलून त्याच्या आर्थीक परिस्थीतीचा, त्याच्या इज्जतीचा कसलाही विचार न करता आपल्या प्रियकराला आपल्या बापाच्या पैशांनी ड्रेस व घडयाळ विकत घेणारी परी. आणि आपल्या प्रेयसीने शर्ट दिला असे सांगून त्या फाटलेल्या शर्टासारख्याच आपल्या प्रेयसीच्याही नावाच्या, अब्रुच्या चिंधडया उडवणारा परीचा तो उनाड प्रियकर.

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED