Sumantanchya Vaadyaat - 2 books and stories free download online pdf in Marathi

सुमंतांच्या वाड्यात - भाग २

सुमंतांच्या वाड्यात

पात्र परिचय

दिनेश सुमंत                               मोठा भाऊ .

विशाल सुमंत                 धाकटा भाऊ.

शलाका                      दिनेशची बायको.

विदिशा                      विशालची बायको.

आश्विन आणि विशाखा          निशांतची मुलं

प्रिया                       विशालची मुलगी

केशवराव                    शेजारी.

प्रदीप                       केशवरावांचा मुलगा.  

गोविंदराव                    विदिशाचे वडील. (वकील)

 

भाग  २

भाग १  वरुन  पुढे  वाचा .......

 

“नाही तर असं करू. जुनं घर असल्याने आपल्या खोल्या खूप मोठ्या आहेत. आपण मुलांचा पलंग आपल्या खोलीत शिफ्ट करू, विदिशा आणि विशाल त्यांच्या खोलीत. दोन्ही दारं उघडी. मग प्रश्नच मिटला.” – शलाका

ही कल्पना सर्वांनाच मान्य झाली. मग दिनेशने सुताराला बोलावून, रूमच्या दारांना बाहेरून असलेल्या कड्या काढून टाकल्या, जेणेकरून बाहेरून दरवाजा बंद करता येणार नाही. एवढी जय्यत तयारी झाल्यावर, सर्वांना जरा बरं वाटलं. हे रुटीन चालू असतांना पुढचे १५-२० दिवस काहीच घडलं नाही. हळू हळू मागच्या घटना मनातून पुसल्या जात होत्या, एक दिवस सकाळी बऱ्याच उशिरा शलाकाला जाग आली. घड्याळात पाहिलं तर आठ वाजून गेले होते. दिनेश आणि मुलं गाढ झोपेत होती. तिला जरा आश्चर्यच वाटलं शाळा आणि ऑफिस असल्याने इतका उशिर कधीच व्हायचा नाही. अजूनही तिच्या डोळ्यांवर झोपेचा अंमल होता. घाई घाईने सर्व आवरून शलाका किचन मधे आली, आणि जे पाहीलं त्यामुळे तिच्या तोंडून एक किंचाळी निघाली. वर्षांची किंचाळी ऐकून, दिनेश आणि विशाल धडपडत उठले आणि धावले, त्यांनी जे पाहिलं त्याने सर्वांची वाचाच बसली.

किचन मधे जिकडे तिकडे वाळूच वाळू पसरलेली दिसत होती. जमिनीवर, ओट्यावर, कपाटांवर वाळू सांडलेली होती. दिनेश धावतच हॉल मध्ये आला, तिथेही तोच प्रकार. सोफा, खुर्च्या, जमिनीवर, जिकडे तिकडे वाळूचा पातळ थर. दारं खिडक्या सर्व बंद. वाळू आली कुठून? चौघेही परस्परांकडे भकास नजरेने पाहत होते. एक अनामिक भीती चेहऱ्यावर दिसत होती. विशालने जाऊन समोरचं दार उघडलं. पायरीवर दुधाची पिशवी पडली होती, आणि ती फोडून एक मांजर दूध पित होती. बहुधा दुधवाला बेल वाजवून सुद्धा दार न उघडल्यामुळे पायरीवरच दुधाची पिशवी ठेवून गेला होता. पण दाराबाहेर वाळूचा एक कणही नव्हता.  

“विशाल मी बाबांना फोन लावते.” असं म्हणून विदिशा फोन आणायला धावली.

“अग थांब, थांब. इतकी घाई करू नको.” – विशाल तिच्या मागे धावला.

पण तो पर्यन्त विदिशाने फोन लावला होता. शलाका तिच्या बाजूला उभी राहिली. “स्पीकर वर टाक” शलाका म्हणाली. विदिशा हो म्हणाली. आता दिनेश आणि विशालच्या हातात मूक दर्शक होण्यापलीकडे काहीच नव्हतं.

“हॅलो, काय म्हणतेस विदिशा, आता मी खूप घाईत आहे. संध्याकाळी बोललं तर चालेल ना?” – गोविंदराव.

“हो, हो बाबा, मॅटर महत्वाचं आहे, पण अर्जंट नाहीये, मी संध्याकाळी कॉल करतो.” विदिशा काही बोलण्याच्या आधीच विशाल बोलला आणि फोन ठेऊन दिला.

“अरे, हे काय? तू मध्येच का बोलला? मला बोलायचं होतं, मी आईशी बोलले असते ना.”– विदिशा.

“तेच तर नकोय मला. अग तुझी आई मनाने फार हळवी आहे. आपल्या मुलीवर काय संकट आलं आहे, या विचाराने ती घाबरून जाईल. संध्याकाळी आपण निवांत बाबांशी बोलू. ते बरोबर समजावतील आईला.” विशालने विदिशाची समजूत काढली.

“चला, आता प्रथम साफ सफाई करावी लागणार आहे. त्याच्या शिवाय, चहा, आणि मुलांचे डबे करता येणार नाही. चला विदिशाबाई  कामाला लागा.” – शलाका.

पण तेवढ्यात इंदु म्हणजे त्यांची वरकाम करणारी मोलकरीण आली, आणि शलाकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. इंदुने आल्या आल्या सगळीकडे विस्फारलेल्या नजरेने पाहिलं आणि विचारलं, “ताई, हे काय झालं?”

मग शलाकाने  सगळी कहाणी सांगितली. मग इंदु मुकाट्याने कामाला लागली. सर्व आवरून घ्यायला जवळ जवळ तास गेला. मुलांच्या शाळा तर बुडल्याच होत्या. पण दिनेश आणि विशाल ऑफिसला जाण्याची तयारी करत होते.

“दिनेश, आज तुम्ही दोघांनी सुट्टी घेतली तर चालणार नाही का?” – शलाका

“आम्ही सुट्टी घेऊन काय साधणार आहे? त्याच त्याच गोष्टी फिरून फिरून बोलण्यात येणार. त्यापेक्षा ऑफिसला गेलो तर जरा स्वस्थता लाभेल मनाला.” – दिनेश.

“आणि आमचं काय? इथे आमचा जीव भीतीने अर्धमेला झालाय. त्याचं काय? तुम्ही दोघं घरी राहिलात, तर आम्हाला पण धीर येईल.” – विदिशा.

शेवटी दिनेश आणि विशालने सुट्टी घेतली. एवढं सगळं झाल्यावर साहजिकच सगळेच एकदम गंभीर झाले होते.

“विशाल, बाबांशी बोलायलाच पाहिजे. तू त्यांना फोन कर न.” – विदिशा.

“अग, पण त्यांनी माघाशीच सांगीतलं नाही का, की ते दिवसभर अत्यंत बिझी असणार आहेत म्हणून. आपण संध्याकाळी बोलू. त्यावेळी ते जरा निवांत असतील.” – विशाल.

“पण आम्हाला खूप भीती वाटते आहे रे. कोण असेल आपल्या वाइटावर? आपण कुणाचेही कधी वाईट चिंतलं नाही, मग असं का आपल्या वाट्याला येतेय? – विदिशा

दिवसभर वातावरणात भीतीची छाया दाटली होती. संध्याकाळी विशालने विदिशाच्या वडीलांना फोन करून सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली. ऐकून घेतल्यावर गोविंदराव म्हणाले” “हं, जरा गंभीरच दिसतंय सर्व प्रकरण, पण विशाल यात कोणीतरी मुद्दाम हा कारभार करतो आहे असा मला संशय येतो आहे.”

“येतोय ना बाबा तुम्हाला पण असा संशय? दूधवाला म्हणतच होता. कोणीतरी भानामतीचे प्रयोग करतो आहे म्हणून.” – विदिशा.

“नाही नाही,” गोविंदराव म्हणाले “भानामती वगैरे नाही, पण कोणीतरी हे करतेय  असं मी म्हणालो.”

“म्हणजे काय? कोण करणार? सगळे दरवाजे खिडक्या बंद. बाहेरचा माणूस आत येण्याचा काहीच चान्स नाहीये. घरातलं कोण कशाला करेल? इन मीन चार लोकं घरात आम्ही.” – दिनेश.

“हे बघा, भानामती वगैरे कहाण्या इकडे विदर्भात असतात. तुमचा दूधवाला इकडच्या भागातला असावा, म्हणून त्याला भानामतीचा संशय आला. तुमच्याच पैकी कोणी हे काम नकळत करतं आहे का यांचा शोध घ्या. भानामती वगैरेचा विचार करू नका. आणि मुळीच घाबरू नका.” – गोविंदराव.

“काका, आम्ही जेमतेम चार माणसं आणि आमच्या पैकी कोणीही हे काम केलं नाहीये, याची खात्री आम्ही केली आहे. आम्हीच आम्हाला घाबरवण्याचा उद्योग कशाला करू?” – दिनेश.

“एक काम करा एखाद्या कौंसेलरशी बोला. तो तुमच्याशी बोलून बरोबर शोधून काढेल की कोण मनाच्या सुप्त अवस्थेत हे काम करतेय ते.” – गोविंदराव.

“विशाल, विदिशाच्या बाबांनी तर हे प्रकरण अजूनच अवघड करून ठेवलं आहे. त्यांचा तर आपल्यावरच संशय आहे. आता काय करायचं.” – दिनेश.

“साहेब, मी बोलू का?” – इंदु.

“हूं, बोल.” – विशाल.

साहेब, तुमचा सुखाचा संसार आहे, ही गोंडस मुलं आहेत तुम्ही सर्व गुण्या गोविंदाने एकत्र राहता आहात, हे बाहेरच्या कोणाला तरी पाहवलं नाही. त्यांनी तुमच्यावर जादू केली असणार साहेब. ही बाहेरची बाधा आहे साहेब. तुम्ही कोणी तरी मांत्रिक शोधा, त्याशिवाय काही खरं नाही. काही जालीम उपाय केल्या शिवाय हा त्रास काही थांबणार नाही.” – इंदु.

इंदु असं म्हणाली आणि शलाका आणि विदिशाचे चेहरे अधिकच चिंताग्रस्त झाले. शेवटी बरीच भवति न भवति होऊन एका मानसोपचार तज्ञाकडे जाण्याचे ठरले. मानसोपचार तज्ञाकडे गेल्यावर, त्याने सर्व ऐकून घेतलं, आणि तो म्हणाला, की कधी कधी आपल्यामध्ये दुहेरी व्यक्तिमत्व डोकं वर काढतं. मला प्रत्येका बरोबर बोलावं लागेल, मगच मी काही सांगू शकेन.

मग त्यांचं प्रत्येका बरोबर सेशन सुरू झालं. यात महिना गेला पण निष्पन्न काही नाही. त्याने सर्वांना क्लीन चिट दिली. प्रश्नाचं उत्तर मिळालचं नाही. पुन्हा महिनाभर काही घडलं नाही त्यामुळे, सर्वांना वाटलं की सुटलो आपण. पण नंतर एक दिवस पुन्हा तो प्रकार घडला. यावेळी त्याची तीव्रता जरा जास्तच होती.

त्या दिवशी पुन्हा सर्व गाढ झोपले होते, आणि जेंव्हा जाग आली तेंव्हा सकाळचे नऊ वाजले होते. विदिशाला प्रथम जाग आली. भिंतीवरच्या घड्याळात नऊ वाजलेले बघून तिच्या छातीत धस्स झालं. तिने विशालला उठवलं.

“काय ग काय झालं? तू अशी घाबरलेली दिसते आहेस.” – विशाल.

“विशाल, घड्याळा कडे बघ, आज पण आपल्याला उठायला ९ वाजलेले आहेत. पुन्हा काही आक्रीत तर घडले नसेल?” – विदिशा. हे ऐकून विशाल ताडकन उठला आणि त्याने हॉल मधे धाव घेतली. हॉल मधलं दृश्य पाहून त्या वाचाच बसली. भीतीची एक शिरशिरी त्यांच्या अंगावर उठली. त्यांच्या मागोमाग विदिशा पण आली होती. तिची अवस्था पण वेगळी नव्हती. तिने भीतीने डोळे मिटून घेतले आणि विशालला घट्ट मिठी मारली. त्याच वेळी तिच्या तोंडातून एक किंचाळी निघाली.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.

 

 

  

 

 

 

 

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED