Sumantanchya Vaadyaat - 3 books and stories free download online pdf in Marathi

सुमंतांच्या वाड्यात - भाग ३

सुमंतांच्या वाड्यात

पात्र परिचय

दिनेश सुमंत                               मोठा भाऊ .

विशाल सुमंत                 धाकटा भाऊ.

शलाका                      दिनेशची  बायको.

विदिशा                      विशालची बायको.

आश्विन आणि विशाखा          दिनेशची  मुलं

प्रिया                       विशालची मुलगी

केशवराव                    शेजारी.

प्रदीप                       केशवरावांचा मुलगा.  

गोविंदराव                    विदिशाचे वडील. (वकील)

राधास्वामी                   मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस.

भाग  ३

भाग २ वरुन  पुढे  वाचा .......

 

“विशाल, घड्याळा कडे बघ, आज पण आपल्याला उठायला ९ वाजले आहेत. पुन्हा काही आक्रीत तर घडले नसेल?” विदिशा म्हणाली. हे ऐकून विशाल ताडकन उठला आणि त्याने हॉल मधे धाव घेतली. हॉल मधलं दृश्य पाहून त्या वाचाच बसली. भीतीची एक शिरशिरी त्यांच्या अंगावर उठली. त्यांच्या मागोमाग विदिशा पण आली होती. तिची अवस्था पण वेगळी नव्हती. तिने भीतीने डोळे मिटून घेतले आणि विशालला घट्ट मिठी मारली. त्याच वेळी तिच्या तोंडातून एक किंचाळी निघाली.

तिच्या किंचाळीने दिनेश आणि शलाकाला  जाग आली. दिनेश शलाका कडे वळून म्हणाला “ काय ग तू ऐकलंस का, कोणीतरी  किंचाळलं बहुधा.”

“अहो विदिशा. विदिशाच ओरडली. हॉल मधून आवाज येतोय.” शलाका म्हणाली आणि ती उठून हॉल कडे धावली. दिनेश तिच्या पाठोपाठ.

हॉल मधलं दृश्य पाहून शलाका मटकन खालीच बसली. तिच्या तोंडून शब्दच निघेनात.

हॉल मधे पंख्याला एक काळी बाहुली लटकत होती. तिच्यावर कुंकू शिंपडलं होतं. हॉलच्या चारी कोपऱ्यात चिरा दिलेली आणि हळद कुंकू लावलेली लिंब ठेवली होती आणि लिंबांमद्धे सुया खोचलेल्या होत्या. हा सगळा  प्रकार पाहून सगळेच भीतीने गारठले. काय करावं हे कोणालाच सुचेना. तेवढ्यात बेल वाजली. दिनेशने दार उघडलं, दारात इंदु उभी होती. पायरीवर दूध सांडलं होतं. बहुधा मांजर दूध पिऊन निघून गेली होती. इंदु घरात आल्यावर तिने पण सगळा प्रकार पाहिला. तिचाही चेहरा पांढरा फाटक पडला.

“भानामती, ताई, नक्कीच भानामती. ताई, कोणीतरी तुमच्या कुटुंबाच्या वाइटावर आहे. मी सांगते ताई लवकर कोणा मांत्रिकाला बोलवा. कोणाच्या जीवावर बेतण्या आधी बोलवा.” इंदु म्हणाली. तिच्या स्वरात खूप कळवळा होता, आणि भीती पण होती.

“स्वयंपाकघर,” शलाका म्हणाली “विदिशा स्वयंपाकघर पण बघावं लागणार आहे.”

“मी नाही येत . मला भीती वाटते.” – विदिशा.

मग दिनेश आणि विशाल किचन मधे गेले. ओट्यावर कणकेचा डबा उघडा होता आणि त्यात चिरा दिलेलं आणि कुंकू टाकलेलं लिंबू खोचून ठेवलं होतं. लिंबावर सुया टोचलेल्या होत्या. फ्रीज उघडलं तर तिथेही तोच प्रकार. यांच्या घरातला आरडा ओरडा ऐकून शेजारचे केशवराव आणि प्रदीप आले. “काय झालं?” केशवरावांनी विचारलं. दिनेशने न बोलता बोटानेच त्यांना लिंबं दाखवली. ते पाहून केशवराव दोन पावलं मागे सरकले. थोडा वेळ तसाच गेला. मग शलाका म्हणाली “इंदु, ती सगळी लिंब ऊचल आणि बाहेर फेकून दे.”

“ताई, अहो काय सांगताय? त्याला हात लावला तर मी मरूनच जाईन. नाही, मी नाही उचलणार.” – इंदु.

आता मोठा पेच प्रसंग उद्भवला होता. कोणाची हिम्मत नव्हती ती लिंब उचलण्याची.

“मी थोडं बोलू का?” – केशवराव.

“माझा एक मित्र आहे, रघुनाथ नावाचा, काही वर्षांपूर्वी त्यांच्या घरात पण अश्या  चित्र विचित्र घटना घडत होत्या. त्याने कोणाला तरी बोलावलं होतं. पण मग नंतर ते प्रकार सर्व थांबले होते. रघुनाथला विचारू का?” – केशवराव.

“हो काका विचारा. प्राप्त परिस्थितीत अजून दूसरा मार्ग दिसत नाहीये. विचारा त्यांना.” – दिनेश.

केशवरावांनी त्यांच्या मित्राला फोन लावला आणि त्यांच्या कडून राधास्वामींचा नंबर घेतला. मग त्यांनी राधास्वामींना फोन लावला. थोडं जुजबी बोलणं झाल्यावर त्यांनी दिनेशला फोन दिला. दिनेशने मग सगळा इतिहास आणि आज काय घडलं आहे ते सांगीतलं.

“मी तासाभरात पोचतो तिथे. तो पर्यन्त तुम्ही कशालाही हात लावू नका.” स्वामी.  

तासाभरात स्वामी आले. तेवढ्या वेळात या लोकांनी आपापलं आवरून घेतलं आणि केशवरावांच्या घरी जाऊन चहा आणि नाश्ता करून आले. नाही म्हंटलं तरी स्वामी येत आहेत ऐकल्यावर, सगळे थोडे रीलॅक्स झाले होते. स्वामींनी आल्या आल्या सर्व गोष्टींचं नीट निरीक्षण केलं आणि म्हणाले.

“घाबरण्याचं काही कारण नाही. आता मी आलो आहे तेंव्हा सगळं ठीक करेन.”

मग त्यांनी झोळीतून एक विभूति काढली आणि थोडा वेळ मंत्र म्हंटले. मग ती मंतरलेली विभूति सर्व लिंबांवर शिंपडली. मग त्यांच्या बरोबर आलेल्या मुलाने ती लिंब उचलून झोळीत टाकली. मग हॉल मधे आसन मांडून बराच वेळ मंत्रोच्चार करत होते. त्यांच्या समोर वाटी होती आणि त्यात विभूति होती. त्यांचा पाठ संपल्यावर त्यांनी ती विभूति दिनेशला दिली आणि घर भर शिंपडायला सांगितली. एवढं झाल्यावर ते म्हणाले “आता मी तमच्या घराचं बंधन केलं आहे, त्यामुळे आता तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. माझं काम संपलं आहे. आता मी निघतो.”

“स्वामीजी तुमची दक्षिणा ?” – दिनेश.

“५०००“ – स्वामीजी.

दिनेशने त्यांना ५००० रुपये दिले. मग स्वामी निघून गेले.

आता सर्वांच्या डोक्यांवरचं टेंशन दूर झालं होतं. केशवराव पण सर्वांना धीर देऊन आपल्या घरी गेले. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती म्हणून सर्व केशवरावांच्या घरी जेवायला गेले. तिथे बराच वेळ गप्पा गोष्टी झाल्यामुळे सुमंत मंडळींवर आलेलं भीतीचं सावट निघून गेलं होतं.

संध्याकाळी विशालने विदिशाच्या वडिलांना सर्व अपडेट दिलं. त्यावर त्यांची प्रतिक्रिया अशी आली की “ अरे हे काय करता आहात तुम्ही? चांगले उच्च विद्या विभूषित लोकं तुम्ही, अश्या लोकांच्या आहारी जाता, कमाल आहे. तो माणूस तुमच्याकडून थोडे थोडके नाही तर ५०००  रुपये उकळून गेला. काय म्हणायचं तुम्हाला.?”

त्यांच्या या उत्तरावर दिनेशला राग आला पण तो काही बोलला नाही. शेवटी विशालचे सासरे होते ते. पण विशालच बोलला “बाबा, तुम्हाला तिथे राहून कल्पना यायची नाही. इथे आम्ही इतके घाबरलो होतो की जो उपाय केशवरावांनी सांगीतला तो केला. तुम्ही इथे असता  तर तुम्ही पण तेच केलं असतं.”

यावर गोविंदरावांनी काही उत्तर दिलं नाही. पण त्यांच्या पत्नीने म्हणजे विदिशाच्या आईने त्यांच्या मागे लकडा लावला की ताबडतोब विदिशाकडे जायचं म्हणून. ती माऊली फारच घाबरून गेली होती. तिला लेकीची खूप काळजी वाटत होती. शेवटी गोविंदराव तयार झाले. दोन दिवसांनी जाऊ म्हणाले. पण त्यांच्या कोर्टाच्या इतक्या तारखा होत्या की त्यांना दोन दिवसांत जाणं शक्य झालं नाही.

हाल हळू १०-१५ दिवस उलटून गेले. सर्व काही सुरळीत चालू होतं. सर्वांनाच स्वामींचा विश्वास वाटू लागला. पुन्हा स्वामींनी दोनदा फोन करून खुशाली विचारली होती. त्यामुळे त्यांच्या मनात स्वामींच्या बद्दल अधिकच आदर  निर्माण झाला. महिना होऊन गेला. सर्व काही आलबेल. रुटीन पुन्हा सुरू झालं. होतं अशातच एक दिवस रात्री धुराच्या वासाने विशालला जाग  आली. त्याने उठून दिवा लावला. त्यामुळे  विदिशा पण उठली. “काय झालं विशाल? लाइट का लावला? आणि हा धुराचा वास कुठून येतो आहे?”

“त्याचाच विचार करतो आहे, असं म्हणून तो हॉल मधे जायला निघाला. विदिशा त्यांच्या मागे मागे. हॉलला तीन मोठ्या खिडक्या होत्या आणि त्यावरचे पडदे जळत होते. “माय गॉड” विशालच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि तो पाणी आणण्या साठी किचन कडे धावला. तो आणि विदिशा आग  विझवत होते, तेंव्हा दिनेश पण आला. आग शांत झाल्यावर चौघही किंकर्तव्यमूढ अवस्थेत सोफ्यावर बसले.   

सर्वच डोक्याला हात लावून बसले होते. कोणालाच काही कळत नव्हतं. “दिनेश, उद्याच्या उद्या आपण हे घर सोडून जायचं. आता इथे एक क्षण सुद्धा थांबायची माझी तयारी नाहीये.” – शलाका.

“माझी पण” – विदिशा. “कुठे तरी उद्याच घर बघा, आपण लगेच शिफ्ट होऊ.”

“दिनेश, या दोघींच्या बोलण्यात तथ्य आहे. आपल्या मुलांना जर उद्या काही झालं तर आयुष्यभर आपण आपल्याला क्षमा करू शकणार नाही.” – विशाल.

दिनेश सुद्धा तोच विचार करत होता. म्हणाला, “यस. उद्याच घर शोधू आपण. ठरलं. आता अजून रिस्क घ्यायची नाही.”

सकाळ पर्यन्त चौघही जागेच होते. कोणाच्याही डोळ्याला डोळा लागला नाही. पण दुसऱ्या दिवशी काही वेगळच होणार होतं. सकाळी सकाळी स्वामींचा दिनेशला फोन आला.

“दिनेश, काल रात्री मी फार अस्वस्थ होतो. धड झोप आली नाही. काही घडलंय का?”

मग दिनेशने काल रात्री काय घडलं ते सविस्तर सांगितल. आणि हे ही सांगीतलं की ते नवीन घर पाहताहेत आणि लगेच शिफ्ट होण्याच्या विचारात आहेत म्हणून. “ठीकच आहे. पण मी काय म्हणतो की मी आत्ता तिथे येतो आणि बघतो काय परिस्थिती आहे ते. मग तुम्ही तुमच्या योजने प्रमाणे करा. कारण मी तुमच्या घराचं बंधन केलं होतं, ते तोडून जर कोणी आत येत असेल तर याचा अर्थ मोठी शक्ति यात गुंतली आहे आणि मला ती बघाविच लागेल.”

“ठीक आहे या तुम्ही. पण लवकर या. म्हणजे आम्हाला उशीर होणार नाही.” – दिनेश

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.

 

 

  

 

 

 

 

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED