करामती ठमी - 2 - ठमी चा गायन क्लास Kalyani Deshpande द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

करामती ठमी - 2 - ठमी चा गायन क्लास

टाकाऊ पासून टिकाऊ क्लास चा बोऱ्या वाजल्यावर ठमीने आपला मोर्चा गायनाकडे वळवला. अचानक सकाळी दात घासताना तिला शोध लागला की तिचा जन्म हा गायक होण्यासाठीच झाला आहे. तोंड धुताना गुळणा करताना ती अचानक हरकती(गायनातल्या) घेऊ लागली. तिने जाहीर करून टाकलं.
आईबाबा मला शास्त्रीय गायनाचा क्लास लावायचा म्हणजे लावायचा.
तिचे आई बाबा म्हणाले, अगं पण असं अचानक कसं ठरलं तुझं? आधीचे उद्योग काय कमी आहेत का तुझे?

ते काही नाही, आई बाबा तुम्ही मला जर गायन शिकण्याची परवानगी दिली नाही तर जग एका अभिजात गायिकेला मुकेल आणि पुढे हे जग त्यासाठी तुम्हाला दोष द्यायला कमी करणार नाही तेव्हा विचार करा आणि मला क्लास लावायची परवानगी द्या. माझा सुमधुर स्वर श्रोत्यांचे कान तृप्त करण्यास आतुर झाला आहे. असं म्हणताना तिने डावा हात डाव्या कानावर ठेवला आणि उजवा हात लांब केला.

अखेर तिच्या आई बाबांना तिच्यापुढे हार मानावी लागली. आणि गाड्याबरोबर नळ्याची यात्रा ह्या न्यायाने तिच्या समवेत माझा ही गायनाचा क्लास सुरू झाला.

आमच्या घराजवळच गानू गुरुजींचा गायनाचा क्लास होता तिथे रोज संध्याकाळी पाच वाजता नियमितपणे आम्ही जाऊ लागलो.

तिथे गायनाबरोबरच हार्मोनियम, तंबोरा, तबला हे सुद्धा वाजवणे शिकावे असं ठमीला वाटू लागलं.

ठमी म्हणाली,गुरुजी गायनाबरोबरच हार्मोनियम तंबोरा तबला हे सगळं मी लीलया शिकू शकेन असं मला माझा आतला आवाज सांगतोय, हे तुम्ही शिकवू शकाल का?

वा वा का नाही परंतु सध्या आपण गायनाकडेच लक्ष केंद्रित करावं असं मला वाटते ठमी ताई,गुरुजी म्हणाले.

झालं आमचा गायन क्लास सुरू झाला. पहिल्या दिवशी सारेगमप शिकवलं. काही आलाप ताना शिकवल्या. आणि नियमितपणे रियाज करायचा असं आम्हाला सांगण्यात आलं.

ठमीने ते फारच मनावर घेतलं. सकाळी उठल्या उठल्या तिने रियाज सुरू करून टाकला.
आsssss आssssss
हात वारे करून तोंड वेडं वाकडं करून ती आलाप ताना घ्यायला लागली.
तिची आजी तिच्या समोर येऊन उभी राहिली हिचं आपलं डोळे बंद करून रियाज सुरूच होता. आजीने मिनिटभर तिचं निरीक्षण केलं आणि स्वयंपाकघरातून दोन तीन वाट्यांमध्ये काही वस्तू घेऊन आली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,

"ठमे पोट बीट दुखतेय का? की दात दुखतोय? तू आत्ता गालाला हात लावून रडत होती म्हणून विचारलं पोरी"

ठमीने डाव्या कानाला हात लावून नमस्कार करत घाईने आपला रियाज थांबवला.

"हे बघ हे ह्या वाटीत हिंगाचं पाणी आहे पोट दुखत असेल तर ते घे आणि जर दात दुखत असेल तर हे ह्या वाटीतलं लवंगेच तेल दातांना लाव म्हणजे बरं वाटेल तुला पोरी"

असं आजीने म्हणताच ठमी आजीकडे नाक फुगवून आणि एक डोळा बारीक करून रागाने बघू लागली आणि तिने डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताच्या मुठीने मारत "डॅम इट!!" असं जोरात म्हंटल.

" हे काय पितामही आम्ही रियाज करतोय आणि तुम्ही हे काय काय घेऊन आलात? हिंगाचं पाणी काय लावंगेचे तेल काय? ह्याची गरज नाही आम्हास, आमचं काहीच दुखत नाहीये.
आमच्या रियाजाला रडणं म्हणून चक्क एका उदयोन्मुख गायिकेचा अपमान केलाय आपण पितामही!"

अरे बापरे! हिला पुन्हा हिस्टोरीकल अटॅक आलेला दिसतोय हे बघून आजी "माफ करा गायिका जी आपल्या पितामहीला, आम्ही आमच्या दालनात जमा होतो आणि आमचं दंतविरहित बोळकं हलवत बसतो." असं म्हणून सगळ्या तेल पाण्याच्या वाट्या घेऊन निघून गेली.

संध्याकाळी नेहमीप्रमाणे आम्ही क्लास ला गेलो.
तिथे सर पेटी वाजवत होते ते बघून ठमीने मी सुद्धा एकदा वाजवून बघते अशी इच्छा जाहीर केली.
शेवटी घे बाई एकदाची त्याशिवाय तू काही ऐकणार नाही ह्या अविर्भावात गुरुजींनी तिला पेटी दिली.

सारे गंमप ध नी सा वाजवताना तिची चांगलीच त्रेधा तिरपीट उडत होती.
सा सापडला आता रे कुठे आहे असं म्हणून ती नवीन टाइपिंग शिकणारे विद्यार्थी जसे कीबोर्ड वर बटन शोधतात तसे ती करू लागली.

सर म्हणाले,ठमी ताई सा च्याच बाजूला रे आहे. बघा नीट.

सा। रे ग (हं ग आता खाली,गुरुजी म्हणाले)

म (म वरचं काळे बटन हो, खाली कुठे शोधताय आणि भाता सोडू नका तो उघडझाप करत राहा गुरुजी वैतागले)

प प प कुठे आहे पळाला वाटते माझ्या तावडीतून(ठमीचे स्वगत)

प पळायला का तो उंदीर आहे का ससा? तेच वरचं बटन हां तेच,गुरुजी अस्वस्थ झाले.

ध ध आत्ता दिसत होता गुरुजी (ध खालचे बटन,गुरुजी शून्यात बघत म्हणाले)

नी वरचा न? (नी ध च्या बाजूला पांढरे बटन आणि सा वरचे बटन,गुरुजी दूर आकाशाकडे बघत म्हणाले.)

असं बऱ्याच प्रयासानंतर ठमीचे पेटी वाजवणं झाले.

त्या नंतर ठमीने तंबोरा वाजवण्याची इच्छा जाहीर केली पण ज्या पद्धतीने तिने पेटी वाजवली ते पाहता गुरुजींची हिम्मत झाली नाही.
ते आपण उद्या शिकू ठमी ताई तूर्तास आपण हा सरगम शिकण्याचा सराव करू.

त्यादिवशीचा क्लास आटोपून आम्ही आपापल्या घरी गेलो. दुसऱ्या दिवशी क्लास ला जाण्यासाठी मी तिच्या घरी गेली असता बाहेरच पायऱ्यांवर तिचे आईबाबा आणि आजी बसलेले दिसले आणि आतून विचित्र आवाज येत होते, मधुनच जात्याची घरघर ऐकू येत होती तर मधूनच कोणाचा तरी उंच स्वर ऐकू येत होता आणि विकल मन विकल मन एवढं ऐकू येत होतं.
मी त्यांना बाहेर बसण्याचे कारण विचारले आणि ठमी कुठेय हे ही विचारले तर ठमी आत रियाज करतेय आणि लोकांना तिला आम्ही मारतोय आणि म्हणून ती रडतेय असं वाटू नये म्हणून आम्ही सगळे बाहेरच बसलो असं मला आत्याने सांगितले.
मग आत जात्यावर कोण दळतेय जात्याची घरघर ऐकू आली म्हणून मी आत्याला विचारलं तर तिने सांगितलं की तो ठमीचा खर्जातला आवाज आहे. आज सकाळीच तिने गायनाचा प्रोग्राम बघितला त्यात गायिका खर्जात गात होती आणि लगेच तार सप्तकात गात होती त्याचा ठमीवर फारच परिणाम झाला आणि म्हणून ती त्याचाच सारखा रियाज करतेय असं आत्याने मला सांगितलं.

मी गेल्यामुळे मात्र आत्याला हायसं वाटलं. जा बाई तिला क्लास ला घेऊन तेवढेच आमचे कान सुटकेचा श्वास सोडतील,असं तिने मला म्हंटल.

ठमी आणि मी गुरुजींकडे पोचलो. ठमीला बघताच गुरुजींच्या पोटात गोळा आला पण तो गोळा बाजूला करून ते चेहऱ्यावर उत्साह गोळा करून आम्हाला शिकवायला सज्ज झाले.

आम्हाला एका गाण्याचे ध्रुवपद शिकवून सर आत त्यांच्या पत्नीने आवाज दिल्याने चहा प्यायला निघून गेले.

ठमे! गुरुजी नाही तोवर तंबोरा आणि तबला वाजवण्याची संधी आहे उठ लवकर!,असं ठमीच्या inner voice ने म्हंटल.

मी मात्र प्रामाणिकपणे गुरुजींनी जे ध्रुवपद दिलं होतं ते अगदी मनापासून आळवत होती. तोपर्यंत ठमीने बराच वेळ तंबोरा आणि तबल्याशी झटापट केली आणि गुरुजींच्या पायाची चाहूल लागताच जागेवर साळसूदपणे येऊन हातवारे ध्रुवपद आळवू लागली.

हां शाब्बास ठमी ताई छान, गुरुजींनी शाबासकी दिली.

त्यांनी केलेली प्रशंसा ऐकून ठमीचा परत कॉन्फिडन्स वाढला. ती म्हणाली,
गुरुजी आज मी एक नाट्यगीत शिकलीय ते म्हणून दाखवू का?

गुरुजींनी कपाळावरचा घाम पुसला आणि आवंढा गिळून त्यांनी होकार दिला.

पुढचे काही मिनिटं जात्याची घरघर त्यानंतर लगेच किंचाळण्याचा आवाज मग पुन्हा घरघर पुन्हा किंचाळणे. हे सुरू असताना गुरुजी छातीला हात लावून बसल्याबसल्या मागे सरकत सरकत थेट भिंतीला जाऊन टेकले. भिंत असल्याने त्यांना अजून काही मागे जाता आलं नाही.

किंचाळण्याचे एवढे प्रकार असू शकतात ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता.

शेवटी पुन्हा एकदा घरघर झाली आणि मोठयाने किंकाळी ऐकू आली. काही सेकंद काय झालं काही कळलंच नाही मग उजेड आल्यासारखं वाटलं म्हणून मी डोळे उघडून बघितलं आणि बघतच राहिली.

वरचं कौलारू छप्पर केव्हाच उडून गेलं होतं. गुरुजींच्या डोक्यावर बसून एक कावळा कावकावत होता. वर बघितल्यावर दिसलं की भिंतींवर बरेच पक्षी जमले होते. शेजारचे पाजारचे, गुरूजींच्या मिसेस सगळे कोणीतरी स्टॅच्यू केल्यासारखे स्तब्ध झाले होते. कोणी ठमिकडे तर कोणी गुरुजींकडे तर कोणी उडालेल्या छप्पराकडे बघत होते.

ठमीने शांतपणे डोळे उघडून माझ्याकडे बघितलं पण माझी हताश नजर बघताच तिने सभोवताली बघितलं. आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. घरी येताना ती मला म्हणालीसुद्धा की आपण गोष्टीत तानसेन बद्दल वाचलं आहे की त्याच्या गायनाने पाऊस पडायचा पण एवढ्या कमी वयात माझ्या गायनाने छप्पर उडण्याचा चमत्कार झाला म्हणजे कमालच आहे नाही! आणि स्वतःशीच ती कौतुकाने हसत होती.

इकडे गुरुजींच्या घरी गहजब माजला. छप्पर तर छप्पर पण गुरुजींच्या अपरोक्ष तिने जी तंबोऱ्याशी आणि तबल्याशी झटपट केली होती त्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरुजींना तंबोरा सगळ्या तारा तुटलेल्या अवस्थेत दिसला. आणि तबल्याची अवस्था तर काही विचारूच नका. गुरुजी तबला वाजवायला गेले असता त्यांचे दोन्ही हात तबल्यात जाऊन बसले.

गुरुजींनी ठमीच्या आईवडिलांना रीतसर बोलावून कृपया तुमच्या मुलीला ह्यापुढे गाणं शिकायला आमच्याकडे पाठवू नका. मीच काय पण जगातला कुठलाही गुरुजी तिला गाणं शिकवू शकत नाही,असं हात जोडून गुरुजी व त्यांच्या मिसेस उभयता म्हणाले.

ठमी ला मात्र आता दिवसभर सुट्ट्यांमध्ये काय करावं ह्याचा घोर लागून राहिला होता.

तर अशी आहे आमची ठमी
नाही कोणाहीपेक्षा कमी
आणि हमखास गोंधळाची हमी

★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★