ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 15 Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 15

प्रकरण १५
“डॉक्टर तुम्हाला मी एक फोटो दाखवतो तुम्हाला ओळखता येतो का सांगा.” मोहक ने विचारले आणि पद्मनाभ पुंड चा फोटो दाखवला.
“ ज्याचे मी शव विच्छेदन केले त्याचा हा फोटो आहे.” निनाद नानिवडेकर म्हणाले.
“ प्रथम केव्हा पहिले तुम्ही शव?” मोहक ने विचारले
“ पोलिसांनी जेव्हा त्याचे प्रेत बोटीवर पहिले तेव्हाच मला पाचारण करण्यात आले.”
“ नंतर दुसऱ्यांदा कधी ?” मोहक ने विचारले.
“ रविवारी सकाळी शव विच्छेदनाचे वेळी.” डॉक्टर निनाद नानिवडेकर म्हणाले.
“ मृत्यूचे कारण काय होते?”
“ डोक्याच्या मागे जोरात फटका बसल्यामुळे कवटीला तडा गेला आणि अंतर्गत रक्त स्त्राव झाला.” डॉक्टर म्हणाले. “ हे मी तुम्हाला अत्यंत साध्या आणि व्यावहारिक भाषेत सांगितलं.”
“ अगदी बरोबर. आम्हाला आता मृत्यू बद्दल अधिक सविस्तर सांगा. आणि मृत्यूची वेळ काय होती ते ही सांगा.” मोहक म्हणाला.
“ फटका बसल्यावर लगेचच त्याला बेशुद्धी आली.शेवट पर्यंत तो शुद्धीत नाहीच आला.अंतर्गत रक्त स्त्राव आणि मेंदूची परिस्थिती याचा विचार केला तर पाचच मिनिटात तो गेला. ”
“ याचाच दुसरा अर्थ असा की डोक्याला मार बसल्या नंतर तो उठलाच नाही?
“ बरोबर आहे.” निनाद नानिवडेकर म्हणाले.
“ तुम्ही प्रथम त्याचे शव पहिले ते नेमके कुठे होते पडलेले? हा फोटो पाहून सांगा.” मोहक म्हणाला.
डॉक्टरांनी एका ठिकाणी खूण करून ते स्थान दाखवले. “ बोटीच्या उजव्या भागात प्रेत होते. हा फोटो सुकाणूच्या दिशेने तोंड करून घेतला आहे.त्यामुळे फोटोत प्रेताची जागा फोटोच्या डाव्या बाजूला आहे. ”
“ प्रेत सापडले तेव्हा बोटीवरील आसपासच्या भागाची पाहणी केलीत का? ” मोहक ने विचारले.
“ पोलीस आल्यावर केली.” निनाद नानिवडेकर म्हणाले.
“ काय आढळलं त्यात ? ”
“ प्रेत उताण्या अवस्थेत होतं, म्हणजे तोंड वर करून.डोक्याखाली रक्ताचे थारोळे होते.केबिन मधे दुसऱ्या एका ठिकाणी कार्पेट वर रक्त साचले होते.मी ते नेमके ठिकाण दाखवणे अपेक्षित आहे?” डॉक्टर निनाद नानिवडेकर नी विचारले.
“ दाखवा , जरूर.”
डॉक्टरांनी ती विशिष्ट जागा दाखवण्यासाठी फोटो हातात घेतला तेव्हा पाणिनी पटवर्धन टेबलाला वळसा घालून त्यांच्या जवळ आला आणि त्याने ते ठिकाण पहिले.
“ एक मिनिट न्यायाधीश महाराज, रेकॉर्ड च्या दृष्टीने डॉक्टरांनी दाखवलेली जागा म्हणजे पुरावा क्रमांक क म्हणून सादर झालेल्या फोटोत दिसत असलेली वरच्या उजव्या कोपऱ्यावर आणि जोड केबिन मधे जाण्यासाठीच्या दाराजवळ .बरोबर आहे डॉक्टर? ” पाणिनी म्हणाला..
डॉक्टरांनी मान हलवून संमती दिली.
“ तिथे रक्ताचं थारोळ साचल होत?”
“ हो आणि या दोन ठिकाणांच्या मधे, थोड्या थोड्या अंतरावर डाग होते. ”
“ मुख्य केबिन आणि केबिन च्या बाहेरील जोड केबिन या दोन ठिकाणच्या उंबरठ्याची तपासणी केलीत का? ”
“ उंबरा पितळी चा होता त्यावर पण रक्ताचे सुकलेले डाग होते. ते पुंड च्याच रक्ताचे असल्याची मी खात्री केली. ” डॉ.निनाद नानिवडेकर म्हणाले.
“ ज्या ठिकाणी प्रेत पडल्याचे तुमच्या साक्षीत तुम्ही दाखवलं , त्यापासून हा उंबरठा काही फुटाच्या अंतरावर आहे?” मोहक ने विचारलं
“ हो बरेच अंतर आहे.”
“ ते प्रेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी कसे हलले या बद्दल काही कारण मीमांसा आहे?”
“ मी त्याआधी दर्यावर्दी लोक बोटीच्या भागांना काय म्हणतात ते सांगतो.पुढची बाजू, मागची बाजू, डावी बाजू आणि उजवी बाजू असे आपण ज्याला व्यवहारात म्हणतो त्याला अनुक्रमे बोव म्हणजे धनुष्याकृती बाजू , सुकाणूची बाजू, धनुष्याकृती बाजू कडे तोंड केले की आपली डावी बाजू म्हणजे पोर्ट किंवा बंदराची बाजू. उजवी म्हणजे स्टार बोर्ड असे म्हणतात
जेव्हा आम्ही बोटीवर आलो तेव्हा ओहोटी होती. आणि बोट कलली होती आणि उजवी म्हणजे स्टार बोर्ड बाजू खाली गेली होती.आणि ज्या ठिकाणी आम्हाला प्रेत मिळाले,त्या बाजूकडे ते घरंगळून आले होते. ” डॉ.निनाद नानिवडेकर म्हणाले.
“ कोणत्याही माणसाने हात न लावता त्या प्रेताने अशी जागा बदलली असेल?” मोहक ने विचारले.
“ मृत्युनंतर प्रेत काही काळाने ताठरते. म्हणजे शरीर एकदम कडक बनते , एखाद्या लाकडी ओंडक्या सारखे. वैद्यकीय भाषेत त्याला रिगर मॉर्टिस म्हणतात. तसे होण्या पूर्वी ओहोटी आली असेल तर प्रेत घरंगळत जाणे शक्य आहे. शक्य आहे. पण हात आणि पाय पसरलेल्या अवस्थेत प्रेत पडले असेल आणि ते ओहोटी येण्या आधीच ताठरले असेल तर ते हलणार नाही. ”
“ असा हा ताठरपणा म्हणजे रिगर मॉर्टिसकधी निर्माण व्हायला सुरुवात होते?” मोहक ने विचारलं
“ सरासरी वातावरणात साधारण मृत्यू नंतर ८ ते १० तासात ”
“ तुम्ही जेव्हा ते प्रेत पाहिलं तेव्हा रिगर मॉर्टिस निर्मझालं होत? ”
“ हो अर्थात.”
“ आणि काय वेळ होती ती?” मोहक ने विचारले” शनिवारची सकाळची ११.१७ ”
“ या दृष्टीने मृत्यूची वेळ काय असावी? डॉक्टर ”
“ मी तपासणी केली त्या आधी १४ ते १८ तास मृत्यू झाला असावा. म्हणजे मी शनिवारी ११.१७ ला तपासणी केली तर शुक्रवारी सायंकाळी ५.१७ ते ९.१७ या काळात मृत्यू झाला असावा.”
“ डोक्याला लागलेल्या फटक्या व्यतीरिक्त शरीरावर काही खुणा होत्या?” मोहक ने विचारले.
“ जबड्यावर एका ठिकाणी काहीतरी आपटल्या प्रमाणे मुका मार लागल्याची आणि रक्त साकळल्याची खून होती. ” डॉ निनाद नानिवडेकर म्हणाले.
“ या शिवाय कुठेही काहीही नाही?”
“ नाही ” डॉ.निनाद नानिवडेकर म्हणाले.
“ पटवर्धन , तुमच्या स्वाधीन करतोय डॉक्टरांना.” मोहक म्हणाला.
पाणिनी उठून उभा राहिला.
“ छान माहिती दिलीत डॉक्टर. बर, मला सांगा , डोक्याला लागलेला मार , त्यामुळे झालेला अंतर्गत रक्त स्त्राव म्हणजे तुमच्या भाषेत, हेमोरेज हे एकमेव कारण होत मृत्यू चं? ”
“ हो सर.”
“ मृत्यू नंतर रक्त स्त्राव किती वेळ चालू राहतो?” पाणिनी म्हणाला..
“ मृत्यू नंतर साधारण १० ते १५ मिनिटात तो थांबतो.”
“ शरीर घरंगळत गेल्यामुळे, रक्त स्त्राव जरा जास्त झाला असू शकतो?” पाणिनी म्हणाला..
“ शक्य आहे.” निनाद नानिवडेकर म्हणाले.
“ मग प्रेताच्या डोक्याखाली जे रक्ताचे थारोळे होते ते शरीर घरंगळत गेल्याचा परिणाम असू शकतो? ”
“ मला नाही वाटत तसे.”
“ मृत्यू ची वेळ ठरवताना काय काय मुद्दे विचारात घेतलेत तुम्ही.? ” पाणिनी म्हणाला..
“ मी कोणतेही गुप्त हेराचे काम न करता म्हणजे आजू बाजूची परिस्थिती , वगैरे किना पोलिसांनी दिलेली माहिती विचारात न घेता केवळ माझ्या वैद्यकीय तपासणीतून आलेल्या निष्कर्षामधून वेळ सांगितली आहे.”
“ अगदी हेच अपेक्षित असतं डॉक्टर.” पाणिनी म्हणाला. “ तुमच्या माता नुसार ज्या आघातामुळे मृत्यू आला, तो आघात खूप जोराचा असणार ? ”
“ तुमच्या मता नुसार उंबरठ्यावर अडखळत असताना तो फटका सहन झाला असेल ? ” पाणिनी म्हणाला..
“ सर्व सामान्य परिस्थितीत फटका बसल्या नंतर डोके उंबरठ्याला आपटले नसते तर त्याची तीव्रता कमी झाली असती पण या ठिकाणी डोके उंबऱ्याला आपटल्यामुळे, जास्त परिणाम झाला.”
“ डॉक्टर , असं असू शकेल का, की पुंड ला हनुवटीवर जोरात मार लागला आणि त्यामुळे तो मागे उंबरठ्यावर पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला ? ” पाणिनी म्हणाला..
“ ऑब्जेक्शन आहे आमचे.” मोहक कडाडला. “ खुना ऐवजी सदोष मनुष्यवध झाला असे सिद्ध करायचा हा प्रयत्न आहे पटवर्धन चा.”
“ ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड.” न्यायाधीश म्हणाले. “ बचाव पक्ष एका विशिष्ट पद्धतीने आणि मनात काही गृहीतके धरून पुढे जातोय.सर तपासणीत जे मुद्दे तुम्ही पुढे आणलेत , प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे त्यावर अधिक माहिती घ्यायचा अधिकार बचाव पक्षाला आहे. ”
“ पटवर्धन तुम्ही म्हणता तसे असू शकेल.” निनाद नानिवडेकर म्हणाले.
“ दॅट्स ऑल युवर ऑनर ” पाणिनी म्हणाला.
“ एक मिनिट, डॉक्टर, ” मोहक म्हणाला. “ पुंड ला तो फटका अनपेक्षित बसला म्हणून त्याला सावरायला वेळ न मिळाल्यामुळे डोके उंबऱ्याला जास्त जोरात आपटले असेल का? म्हणजे, त्यांच्यात आधी जर थोडी झटापट झाली असती तर पुंड ची मानसिक तयारी झाली असती आणि मग कदाचित तीव्रता कमी झाली असती? ”
“ मी वैद्यकीय शास्त्र जाणतो, युद्ध नीती नाही.” डॉक्टर निनाद नानिवडेकर हसून म्हणाले.
“ पण तुमच्या साक्षीतून तसा अर्थ काढला जाऊ शकतो?” मोहक ने विचारले.
“ काढायचा असेल तर काढा.” निनाद नानिवडेकर म्हणाले.
“ पण फटका खूप जोरात लागला असला पाहिजे?”मोहक म्हणाला.

“ हो.खूप जोरात.”
“ जरा अधिक स्पष्ट करा ना डॉक्टर.”मोहक म्हणाला.
“ माणूस धडपडून उंबऱ्यावर पडला असता आणि डोके आपटले असते तर जेवढी इजा झाली असती त्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक इजा या ठिकाणी झाली आहे याचाच अर्थ डोके फारच जोरात आपटले आहे; एवढेच मी सांगू शकतो पुन्हा पुन्हा.” निनाद नानिवडेकर म्हणाले.
“ म्हणजे एखाद्या प्रशिक्षित मुष्टी योद्ध्याने मारलेला फटका? ” मोहक ने विचारलं
“ त्यावर मी मत नाही देणार. फक्त ठोसा खूप जोरात बसला आहे एवढेच सांगू शकतो.” निनाद नानिवडेकर म्हणाले.
“ दॅट्स ऑल युवर ऑनर ” मोहक म्हणाला
“ दॅट्स ऑल युवर ऑनर ” पाणिनी म्हणाला.
“चित्रांगद पागनीस , माझा पुढचा साक्षीदार आहे.”मोहक म्हणाला.
हा माणूस म्हणजे रेयांश प्रजापति ज्या बोट क्लब वर बोट लावत असे, त्याची देखभाल करणारा माणूस होता.त्याने साक्षीत सांगितले की दर आठवड्याला शुक्रवारी रेयांश प्रजापति बोट क्लब वर येत असे आणि त्याची बोट घेऊन पाण्यात नांगरत असे.त्या दिवशी त्याने शुक्रवारी साडे आकाराच्या सुमारालाच बोट पाण्यात नेली.नंतर तासाभरातच बोटीला बांधलेल्या मोटार बोटीतून तो परत आला.ती छोटी होडी किनाऱ्याला बांधून ठेवली. दुपारभर तो बाहेरच होता.संध्याकाळी पाच च्या सुमाराला त्याने त्या छोट्या मोटार बोट चा आवाज ऐकला आणि खिडकीच्या बाहेर बघितलं तर ती मोटार बोट थबथब आवाज करत नदीच्या पात्राच्या दिशेने जात होती. त्यात कोणीतरी होत पण तो आरोपी होता की नाही हे साक्षीदाराला ओळखता आलं नाही.
“ मयत पुंड आणि तुझी ओळख होती? ”मोहक ने विचारले.
“ हो सर” चित्रांगद म्हणाला.
“ शुक्रवारी त्याला तु भेटला होतास?”
“ हो .साडे पाच च्या सुमाराला तो माझ्याकडे आलं होता रोइंग -बोट भाड्याने घेण्यासाठी.” चित्रांगद म्हणाला.
“ नक्की पुंड च होता? ” मोहक ने विचारलं
“ हो नक्की.”
“ तु त्याला भाड्याने दिलेल्या बोटीचा नंबर काय होता? ” मोहक ने विचारलं
“ २५”
“ ही रोइंग बोट पुन्हा कधी पाहिलीस तू? ”
“ जवळ जवळ चौवीस तासानी. शनिवारी दुपारी , नदीच्या पात्रातून, भरतीच्या पाण्यात वाहात आली होती.प्रजापति ची बोट जिथे नांगरली होती त्या पासून अर्धा किमी.अंतरावर. ”
“ वाहात आली याचा अर्थ ती प्रजापति च्या बोटीला बांधली नसावी. ” मोहक म्हणाला.
“ हा अंदाज बांधण्याचा विषय आहे.” चित्रांगद म्हणाला.
“ प्रजापति ला त्या नंतर पाहिलंस का? ”
“ पुंड गेल्यावर अर्ध्या पाऊण तासाने रेयांश ला त्याच्या छोट्या मोटार बोटने येताना पाहिलं.त्याने किनाऱ्याला ती बांधली आणि गाडीत बसून निघून गेला. ” चित्रांगद म्हणाला.
“ त्या नंतर परत रेयांश ला बघितलस का?” मोहक ने विचारले.
“ बघितलं असं नाही म्हणता येणार परंतू मी फोन वर बोलत होतो तेव्हा बोटी च्या इंजिन चा पुटपुट असा आवाज झाला पण मी बाहेर पाहिलं नाही, फोन चालू आसल्याने.पण नंतर बाहेर डोकावलं तेव्हा रेयांश ची मोटर बोट गेलेली होती.ती परत आली तेव्हा अंधार झाला होता.त्यामुळे मला त्यात कोण होत ते दिसू शकल नाही. ”
“ परत आलेल्या मोटोर बोट चं काय झालं?” मोहक ने विचारलं
“ ती रात्र भर तिथेच किनाऱ्याला बांधून ठेवलेल्या अवस्थेत होती.म्हणजे मी रात्री झोपलो तेव्हा तिथेच दिसली आणि सकाळी सहा ला उठलो तेव्हा ही तिथेच होती.” चित्रांगद म्हणाला.
“ पुंड नंतर कधी दिसला?” मोहक ने विचारलं
“ शनिवारी, रेयांश प्रजापति च्या बोटीवर.मृतावस्थेत दिसला.”
“ तु एकटाच होतास बघताना ? ”
“ इन्स्पे. तारकर आणि इतर पोलीस होते.” चित्रांगद उत्तरला.
“ धन्यवाद चित्रांगद . माझे प्रश्न संपले. ”मोहक ने जाहीर केले.
“ तू रेयांश प्रजापति ला त्याच्या मोटार बोटीतून क्लब वर परत आलेलं प्रत्यक्ष बघितलस? ” पाणिनी ने विचारले
“ हो नक्कीच.” चित्रांगद उत्तरला.
“ त्याच्याशी बोललास तेव्हा?”
“ नाही. बोलण नाही झालं ”
“ नंतर त्याला गाडीत बसून निघून जाताना पाहिलंस?” पाणिनी ने विचारले
“ हो ” चित्रांगद उत्तरला.
“ स्पष्ट दिसला का तुला तो? किती अंतरावरून बघितलास?” पाणिनी ने विचारले
“साधारण दीडशे फुटा वरून ”
“ तु तेव्हा चष्मा घातला होतास?”पाणिनी ने विचारले
“हो ”
“ मोटार बोटीत बघितल्यावर तो प्रजापति होता याची खात्री झाली होती तुझी?”
“ खर सांगायचं तर मला आधी तो दुसराच वाटला होता.” चित्रांगद उत्तरला.
“ पुंड? ” पाणिनी ने विचारले
“ हो बरोबर.”
“ किती अंतरावरून दिसला तुला तो ”पाणिनी ने विचारले
“ दीडशे ते दोनशे फूट ” चित्रांगद उत्तरला.
“ तू कुठे होतास तेव्हा? आणि काय करत होतास?”पाणिनी ने विचारले
“ माझ्या केबिन मधे स्वयंपाक करत होतो.” चित्रांगद म्हणाला
“ तू चष्मा घालूनच पाहिलंस का त्याला, खिडकीतून?”पाणिनी ने विचारले
“ हो बरोबर”
“ तेव्हा मग वाफ असणार तुझ्या चष्म्यावर स्वयंपाक करत असल्याने.” पाणिनी म्हणाला.
“ असू शकेल ” चित्रांगद म्हणाला
“ आणि तेव्हा तुला तो पुंड वाटला?”
“ हो . वाटला.” चित्रांगद म्हणाला
“ तुझ्या लक्षात कधी आलं मग की तो पुंड नाहीये म्हणून? ”पाणिनी ने विचारले
“ जेव्हा त्याचे प्रेत मी बोटीवर पहिले तेव्हा.लक्षात आले.” चित्रांगद म्हणाला
“ त्या पूर्वी तू पोलिसांना सांगून टाकल होतास की मोटार बोटीतून पुंड आलं होता म्हणून, तेव्हा पोलिसांनी तुला सांगितलं की हे अशक्य आहे कारण पुंड चा बोटीवरच मृत्यू झालाय,तेव्हा तू ठरवलंस की ज्याला मोटार बोटीतून क्लब पर्यंत आलेलं पाहिलंस तो रेयांश प्रजापति असावा म्हणून. बरोबर का? ” पाणिनी ने विचारले
“ बरोबर आहे सर, तुम्ही म्हणता तसेच झाले.” चित्रांगद म्हणाला
“ दर शुक्रवारी बोट खाडीत घेऊन जायची रेयांश ची सवय होती?”
“ हो. लोकांपासून जरा दूर जाऊन राहण्यासाठी तो तसं करायचा.” चित्रांगद म्हणाला
“ पुंड यायचा तिथे?”पाणिनी ने विचारले
“हो, कधी कधी यायचा. कधीकधी रेयांश चा खास चेला, जतीन भारद्वाज पण यायचा.पण विशेष काही असेल तरच.रेयांश ला कोणी आलेले आवडायचे नाही.”
“ तुला काय माहिती हे सर्व?” पाणिनी ने विचारले
“ रेयांश मला सांगायचा. तो बोट घेऊन खाडीत आत जायचा,क्लब दिसेनासा होई पर्यंत आत जायचा. त्याची सवय होती, भरती च्या आधी दीड दोन तास आधी तो बोट खाजणात म्हणजे चिखल असलेल्या भागात नांगरायाचा, भरती नंतर पुन्हा दीड दोन तास तिथेच ठेवायचा. ”
“ असं का”?”पाणिनी ने विचारले
“ कारण ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यात बोट ठेवली तर वाऱ्याच्या तडाख्यात जास्तच आपटते आणि नुकसान होते.”
“ बर मग ओहोटी च्या वेळी कुठे न्यायचा बोट? ” पाणिनी ने विचारले
“ त्या जागे पासून तीनशे फुटावर , थोड्याशा खोल पाण्यात.”
“ शुक्रवारी भरती आणि ओहोटी कधी होती?”पाणिनी ने विचारले
“ संध्याकाळी ५.४० ला पूर्ण भरती आणि रात्री १२.०६ ला पूर्ण ओहोटी.” चित्रांगद म्हणाला
“ म्हणजे जर कोणाला बोट खाजणातून हलवायची असेल तर भरती नंतर दोन तासानी म्हणजे ७.४० ला हलवली जाणे अपेक्षित आहे. ”पाणिनी म्हणाला.
“ अगति त्याच वेळे ला असे नाही. ८ वाजे पर्यंत सुद्धा हलवली तरी चालू शकते.”
“ आठ नंतर नाही हलवली तर हलवताच येणार नाही?”पाणिनी ने विचारले
“ पुढच्या पूर्ण भरतीच्या वेळे पूर्वी दोन तास पर्यंत नाही येणार हलवता.” चित्रांगद म्हणाला
“ कधी होती पूर्ण भरती नंतरची ? ”
“ शनिवारी सकाळी ६.२६”
“ आणि नंतर ची ओहोटी?”पाणिनी ने विचारले
“ शनिवारी १२.५२ दुपारी ”
“ मला जरा भरती ओहोटी चे गणित समजाऊन सांग.”पाणिनी म्हणाला.
“ त्या दिवशी जी तिथी असते त्याला ३/४ ने गुणायचे आणि त्यात तिथीच्या तीन पट एवढा आकडा मिनिटे म्हणून वाढवायचा.उदा. पौर्णिमा असेल तर १५ गुणिले ३/४ =११.१५ अधिक १५ गुणिले ३=४५ मिनिटे म्हणजे ११.१५ ४५ = ११.६० म्हणजेच १२ वाजता पूर्ण भरती.समजा चतुर्थी असेल तर ४ गुणिले ३/४ =३ अधिक ४ गुणिले ३= १२ म्हणजे ३.१२ ला पूर्ण भरती. पूर्ण भरती नंतर ६ तास सव्वीस मिनिटांनी पूर्ण ओहोटी. भरती ओहोटीचा खेळ हा चंद्रावर अवलंबून असतो चंद्र रोज आदल्या रात्रीपेक्षा ५२ मिनिटे उशिरा उगवतो . चौवीस तासात दोन वेळा भरती येते , दोन वेळा ओहोटी येते म्हणून ५२ मिनिटांच्या निम्मे म्हणजे २६ मिनिटे सह तासात वाढवली की बरोब्बर ओहोटीची वेळ मिळते.” चित्रांगद म्हणाला
“ ज्या माणसाला सर्वात प्रथम पुंड मेलेला सापडला, त्याच्याशी सर्वात प्रथम बोलणारा तू होतास? ”पाणिनी ने विचारले
“ मला असं वाटतं.” चित्रांगद म्हणाला
“ नक्की काय काय झालं सांग सविस्तर.”पाणिनी म्हणाला.
“ शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमाराला साधारण, खाडीच्या पात्रातून होडी वल्हवत एक माणूस येत होता. माझं लक्ष गेलं कारण ज्या पद्धतीने तो वल्हवत होता ती होडी ते सर्वाना जमण्या सारखे नव्हते. सराव असणाऱ्याचेच काम होते ते.आणि दुसरे म्हणजे, ती होडी ही फोल्डिंग ची होती म्हणजे अगदी गाडीत घालून नेता येईल अशी.” चित्रांगद म्हणाला
“ तो जेव्हा जवळ आलं तेव्हा एकदम ओरडायला लागला . म्हणत होता की त्याचे नाव पालेकर आहे आणि त्याची पुंड बरोबर बोटीवर भेट ठरली होती...........”
“ हे सर्व ऐकीव आहे.” मोहक म्हणाला.
“ या बद्दल तुम्हाला हरकत घ्यायची आहे का? ”पाणिनी ने विचारले
“ हो .”
“ ऑब्जेक्शन सस्टेण्ड ” न्यायाधीश म्हणाले. “ बरोबर आहे हरकतीचा मुद्दा.”
“ ठीक आहे. त्याच्या बोलण्यावर तुम्ही काय केलेत सांगा ”पाणिनी म्हणाला.
“ मी पोलिसांना कळवले.” चित्रांगद म्हणाला
“ काय कळवले त्यांना? पाणिनी ने विचारले”
“ पुन्हा त्याचं मुद्यावरहर हरकत आहे आमची . ” मोहक म्हणाला.
“ नाही , त्यावेळी तो पालेकर ने काय सांगितले या बद्दल सांगत होता. आता त्याने स्वत: पोलिसांना काय सांगितले हे तो सांगणार आहे. ”न्यायाधीश म्हणाले.

“ अहो पण म्हणजे पालकर ने सांगितलेलं सर्वच तो पोलिसांना सांगितलं या नावाखाली रेकॉर्ड वर आणणार ! म्हणजे ज्या गोष्टीला हरकत घेतली आम्ही आणि कोर्टाने ती मान्य पण केली तरीही ते संवाद रेकॉर्ड वर येताहेत. ”मोहक पितांबरे म्हणाला.
“ तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ते संवाद आता चित्रांगद पागनीस ने पोलिसांना सांगितलेल्या संदर्भातून येताहेत. उत्तर देऊ दे याचे चित्रांगद पागनीस ने.” न्यायाधीश म्हणाले.
“ मी पोलिसांना सांगितलं की पालकर म्हणत होता की त्याची आणि पुंड ची प्रजापति च्या बोटीवर भेट ठरली होती.होडीतून त्याने बोटी भोवती फेऱ्या मारून बर्याचदा आवाज दिला, हाक मारल्या परंतू कोणीच प्रतिसाद नाही दिला म्हणून शेवटी बोटीत चढला तेव्हा त्याला पुंड मेलेला दिसला. ” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“ पोलिसांबरोबर पालकर बद्दल आणखी काही संवाद?”पाणिनी म्हणाला..
“ त्यांनी एवढचं विचारलं की पालकर ने माझ्याच कडून होडी भाड्याने घेतली होत का? ” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“आणि तू काय उत्तर दिलंस पोलिसांना? ” पाणिनी म्हणाला..
“ हाच प्रश्न मी पालकर ला विचारला तेव्हा त्याने जे उत्तर दिले मला तेच मी पोलिसांना सांगितले, की त्याची स्वत:ची कार मधे ठेवलेली फोल्डिंग बोट असताना भाड्याने कशाला घ्यायची.” चित्रांगद पागनीस ने उत्तर दिले.
“ बोटीवर पुंड ला भेटायला जाण्यासाठी पालकर त्याच्या घरून कधी निघाला या बद्दल त्याने तुला जे सांगितले ते तू पोलिसांना सांगितलस का?”पाणिनी म्हणाला..
“ त्याने मला सांगितलं पण मी ते पोलिसांना नाही सांगितलं ” चित्रांगद पागनीस ने उत्तर दिले.
“ मग त्याला त्या बद्दलचा प्रश्न नाही विचारता येणार तुम्हाला.”मोहक पितांबरे म्हणाला.
“ विचारलाय का मी ? ”पाणिनी म्हणाला..
“ आपापसात वाद आणि हेवेदावे नको! ” न्यायाधीश म्हणाले.
“ तुझ्या शिवाय होड्या ,मोटार बोटी वगैरे भाड्याने देणारे आणखी कोण आहे?”पाणिनी म्हणाला..
“ मी एकटाच आहे.”
“ खून झाला त्या शुक्रवारी रात्री तू कोणाला होडी भाड्याने दिली होतीस का?”
“ ऑब्जेक्शन . ” मोहक पितांबरे म्हणाला.
“ ओव्हर रुल्ड ”
“ एक रोइंग बोट भाड्याने दिली होती मी. सारंग भूपाल नावाच्या माणसाला.रात्री ९ वाजता त्याने घेतली बरोब्बर १०.२० ला परत केली..त्याने भाडे आणि डिपोझिट भरले होते.खाडीच्या पाण्यातल्या जलचरांचा अभ्यास करायचा होता त्याला , म्हणजे त्याने असे सांगितले होते. ” चित्रांगद पागनीस ने उत्तर दिले.
“ केवळ एक तास वीस मिनिटात परत केली म्हणजे आश्चर्यच आहे,जलचरांचा अभ्यास एवढ्या वेळेत होतो का?”पाणिनी म्हणाला..
“ कोणता जलचर आहे आणि त्याच्या कुठल्या सवयीचा अभ्यास करायचा यावर अवलंबून आहे.” चित्रांगद पागनीस ने उत्तर दिले आणि कोर्टात हशा झाला.
“ पटवर्धन चुकीच्या माणसाला हा प्रश्न विचारात आहेत. चित्रांगद पागनीस हा काही त्यातला तज्ज्ञ नाही.” मोहक पितांबरे म्हणाला
“ उलट पक्षी मी त्यातला तज्ज्ञ आहे.” चित्रांगद पागनीस ने उत्तर दिले. आणि पुन्हा हशा झाला.”“ तुला त्या सारंग भूपाल ची आणखी काहीच माहिती नाही? तू पोलिसांना कळवलस का? ” न्यायाधीशांनी विचारलं
“ नाही कळवलं त्यांनी पण मला विचारले नाही.”
“ खुनाच्या रात्री तेव्हढी एकच बोट भाड्याने दिली गेली होती?” पाणिनी म्हणाला..
“ सर आणखी एक बोट गेली होती भाड्याने पण ती तीन वाजता. आणि ती पाच वाजता परत आली.ती एका बाईला दिली होती, मासेमारीसाठी म्हणून तिने नेली होती.”
“ या सारंग भूपाल चं वर्णन सांग ” न्यायाधीशांनी सांगितलं
“ तरुण, शिडशिडीत, सावळा वर्ण,बोट चालवण्यात सरावलेला वाटत नव्हता, कारण रोइंग बोट चालवणारे अंगावर ओव्हर कोट वागैरे घालत नाहीत, याच कारण बोटीचा तळ नेहेमी पाणी झिरपत असल्याने ओला असतो, ओव्हर कोट किंवा तत्सम कपडे हे वल्हवायला वसल्यावर खाली तळाला टेकून भिजून खराब होतात.पण या माणसाने मात्र ओव्हर कोट घातला होता.एकंदरीतच त्याचं वागणं, दिसणं हे दर्यावर्दी माणसा सारखं नव्हतं.त्यामुळे माझ्या तो लक्षात राहिला. ”
“ या माणसाने फक्त ९ ते १०.३० एवढीच होडी चालवली?” न्यायाधीशांनी विचारले
“ हो सर ”
“ कुठे गेला होता होडी घेऊन काही बोलला का? ”
“ त्या खाजणात ,अस म्हणाला. ”
“ खाजण कुठे आहे ते विचारले होते त्याने जाताना?” न्यायाधीशांनी विचारले
“ नाही विचारलं.त्याला ठाम पणे माहिती होते कुठे जायचंय ते. पण होडी मात्र तो नवख्या सारखी चालवत होता.”
“ त्याला पुन्हा पाहिलंस तर ओळखशील ना?” न्यायाधीशांनी विचारले
“ निश्चितच.” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“ व्हेरी गुड.” न्यायाधीश उद्गारले. “ पटवर्धन तुमचे प्रश्न चालू करा पुन्हा.”
“ तर मग पोलीस येई पर्यंत तू वाट बघत बसलास.?”
आपला प्रश्नांचा रोख अचानक बदलत पाणिनी म्हणाला..
“ हो सर आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांना मी सांगितलं की प्रजापति कुठे लावतो बोट नेहेमी ते मला माहिती आहे आणि मी त्यांना घेऊन गेलो ” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“ किती वाजता गेलास बोटीवर?” पाणिनी म्हणाला..
“ सव्वा अकराच्या सुमाराला.” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“ तेव्हा पूर्ण ओहोटी होती?”पाणिनी म्हणाला..
“ पूर्ण ओहोटी पूर्वी तास दीड तास ” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“ तेव्हा बोटी चा तळ जमिनीला टेकला होता का?”पाणिनी म्हणाला..
“ हो जवळ जवळ टेकला होता तळ.”
“ आणि बोट खूप तिरकी झाली होती?”
“ हो.खूपच.त्यावर सरळ उभं पण राहणे कठीण होतं ” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“ किती अंशात कलली असेल? ”पाणिनी म्हणाला..
“ २५ ते ३० अंशात असेल.” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“ पुंड च शव, फोटोत दाखवलेल्या प्रमाणे पडलं होत? ”पाणिनी म्हणाला..
“ हो बरोबर.”
“ खून जर संध्याकाळी झाला असेल तर खून झाल्या पासून प्रेत सापडे पर्यंत च्या काळात आणखी एक पूर्ण ओहोटी येऊन गेली असेल म्हणजे शुक्रवारी रात्री १२.०३ ला? म्हणजे शनिवारची पाहत म्हणू आपण. ”पाणिनी म्हणाला..
“ हो , बरोबर.”
“ आणि एक पूर्ण भरती येऊन गेली असेल.”पाणिनी म्हणाला.
“ हो बरोबर ”
“केव्हा आली ती?”
“ ६.२६ पहाटे शनिवारी.” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“ आता या फोटोमध्ये प्रेत केबिनच्या बाजूला खालच्या कोपऱ्यात डोके टेकलेल्या अवस्थेत दिसतंय.” पाणिनी म्हणाला.
“ हो बरोबर.”
“ केबिनच्या दुसऱ्या टोकाकडून या टोकाकडे प्रेत घरंगळत आलेले असू शकेल का?” पाणिनी म्हणाला..
“ शक्य आहे.” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“ शुक्रवारी रात्री १२.०३ वाजता जेव्हा पूर्ण ओहोटी आली त्या प्रक्रियेत?”पाणिनी म्हणाला..
“ हो , बरोबर.” चित्रांगद पागनीस म्हणाला. “ बोटीची उजवी बाजू म्हणजे स्टार बोर्ड साईड ही खालच्या बाजूला कलली होती.त्यामुळे खून झाला तेव्हा प्रेत दुसऱ्या बाजूला असेल पण १२.०३ च्या पूर्ण ओहोटी च्या प्रक्रियेत ते नंतर घरंगळून ते खालच्या बाजूला आले असेल.” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“ पटवर्धन ने दाखवलेल्या फोटो मधे दिसत असलेली मेणबत्ती ही लंबात उभी नाहीये तर साधारण सतरा अंशात कलली आहे.”न्यायाधीश म्हणाले.
“ असेल. त्याचं काय? ” मोहक पितांबरे बेफिकिरीने म्हणाला. “ जेव्हा खुनी माणूस घाईघाईत मेणबत्ती लावतो तेव्हा कोण मापक घेऊन ती लंबात उभी करायला जात नाही.”
“ पटवर्धन च्या मनात एक मुद्दा आहे असं मला वाटतंय आणि जो तुमच्या लक्षात आलेला नाही तो म्हणजे, या मेणबत्तीपासून जे मेण वितळून खाली पसरलय, ते सर्व बाजूनी सारखंच पसरलंय. ” न्यायाधीश म्हणाले.
“ मेणबत्तीचं मेण सर्व बाजूनी सारखंच खाली येत ना?” मोहक पितांबरे म्हणाला.
“ नाही.इथेच चुकतंय तुमचं.” न्यायाधीश म्हणाले. “ जर मेणबत्ती लंबात लावली तर मेण सर्व बाजूनी सारखंच पसरेल पण इथे मेणबत्ती तिरकी कललेली असून सुद्धा मेण मात्र सर्व बाजूनी सारखंच पसरलं आहे.”
मोहक पितांबरे चा शंकायुक्त चेहेरा पाहून न्यायाधीश म्हणाले, “ ती मेणबत्तीच साक्ष देत्ये की जेव्हा मेणबत्ती पेटवण्यात आली हिती तेव्हा ती सरळच उभी करण्यात आली होती. ”
“ हे कसं शक्य आहे? फोटोत स्पष्ट दिसतंय की ती लंबात नाहीये म्हणून.” मोहक पितांबरे वैतागून म्हणाला.
“ ती लंबात नाही हा पुरेसा पुरावा आहे ती कधी पेटवली गेली होती या बद्दलचा आणि म्हणूनच भरती ओहोटी च्या संबंधातला पुरावा महत्वाचा आहे. ” पटवर्धन म्हणाला.
“ पाच वाजत आलेत.आजचे कामकाज आपण थांबवू या. उद्या सकाळी दहा वाजता पुन्हा कामकाज चालू होईल.तो पर्यंत पोलिसांनी भरती ओहोटी च्या वेळेचा अभ्यास करावा आणि पटवर्धन च्या मेणबत्तीच्या तिरक्या कोनाचा विचार करावा न्यायाधीश म्हणाले.”
प्रकरण-15 समाप्त