चोरीचे रहस्य - भाग 5 - (अंतिम) Kalyani Deshpande द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चोरीचे रहस्य - भाग 5 - (अंतिम)

कुलकर्णी काकूंनी दार उघडलं.

"काकू तुमच्यासाठी माझ्या काकूंनी हे भोकराचं लोणचं पाठवलं,तुम्हाला आवडते नं ", मी म्हणालो.

"हो हो , अरे ये नं बस ,अरे व्वा हा चिंटू पण आलाय वाटतं तुझ्यासोबत",कुलकर्णी काकू चिंटु कडे कौतुकाने बघत म्हणाल्या. थोड्या गप्पा झाल्यावर चिंटूने मला कानात सांगितलं तसा मी थोडं मोठ्याने त्याला म्हणालो,"अरे ,थोडं थांब बाजूलाच तर घर आहे आपलं ,येईल आई किंवा आजी बाहेर "

"का,काय झालं ,काय म्हणतो चिंटू ?",कुलकर्णी काकू

"काही नाही त्याला टॉयलेट ला जायचं आहे पण आमच्या कडचे दोन्ही बाथरूम्स व्यस्त आहेत म्हणून त्याला म्हंटल थांब थोडं ",मी

"अरे,त्यात काय,जाऊ दे न त्याला आमच्या कडच्या बाथरूममध्ये",कुलकर्णी काकू

"धन्यवाद काकू,चल रे चिंटू पट्कन जा बाथरूम मध्ये,थांब मी येतो तुझ्या मदतीला",मी असं म्हणून,चिंटूची शू झाल्यावर कुलकर्णी काकूंचा निरोप घेऊन आम्ही वरच्या मजल्यावर आधी पांडे मग भाले यांच्याकडे गेलो. तिथेही सेम सगळं भोकराचं लोणचं देणं वगैरे झालं जे कुलकर्णींकडे झालं. मग आम्ही घरी आलो.
सकाळी हे सगळं झाल्यावर दुपारपर्यंत अपार्टमेंट मध्ये पोलीस आले कारण मीच सकाळी त्यांना भेटून काही गोष्टी सांगितल्या होत्या.

पोलीस तडक चौथ्या मजल्यावर गेले,भालेंची मुलगी चपापली तिने तिच्या वडिलांना बोलावले. पोलिसांनी भाले काकांना सर्च वॉरंट दाखवला आणि घराची झडती घेणं सुरु केलं.

"अरे हे काय,हे सभ्य लोकांचं घर आहे असे अचानक झडती तुम्ही नाही घेऊ शकत.",भाले काकू ओरडायला लागल्या.

पण पोलिसांनी त्यांचं काम सुरू ठेवलं. सगळीकडे तपासल्यावर त्यांना चोरीचा माल कुठेच सापडला नाही. इकडे-तिकडे बघत असताना माझं लक्ष त्यांच्या बाल्कनीत गेलं. तिथे मला थोडं भंगार दिसलं ज्याच्या पलीकडे एक पाण्याची टाकी होती जिचं तोंड चादरीने झाकलं होतं. मी पट्कन तिथे जाऊन त्या टाकीची चादर काढून बघितलं आणि पोलिसांना बोलावलं कारण चोरीचा माल त्यातच होता.

आता भाले कुटुंबीयांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. माझावर जळजळीत कटाक्ष टाकायला भाले काकू विसरल्या नाहीत. एव्हाना अपार्टमेंट मधले सगळेजण भाले कडे जमले.

"एवढे सभ्य,सुशिक्षित असून तुम्ही चोरी का केली सौ. भाले",पोलीस दरडावले. ते ऐकून भाले काकू रडायला लागल्या. मग त्यांनी सांगितलं की भाले काकांची नोकरी सुटली होती त्यातच त्यांना लॉटरीचे तिकिटं घेण्याचं व्यसन लागलं होतं त्यामध्येच यांच्याजवळचे राहिले साहिलेले पैसे खर्च झाले होते. त्यांना चार मुली होत्या आणि मोठी मुलगी लग्नाची झाली होती तिचं लग्न करायचं होतं या सगळ्या गोष्टीमुळे त्यांनी हा चुकीचा विचार केला.

भाले काकू पुढे सांगू लागल्या,"चोरी करण्याच्या दोन दिवसांपूर्वी जेव्हा पांडेंनी लॉकर मधून दागिने आणले तेव्हा ते दोघे त्यांच्या घरात हॉल मध्ये दागिन्यांबद्दल बोलत होते,दार बंद होतं पण बाहेरून मला सगळं ऐकू येत होत.

मी त्यांच्या कडे विरजण आणायला गेली होती. त्यांचं बोलणं थांबल्यावर मी तशीच मागे फिरली आणि घरी येऊन बसली पण डोक्यात दागिन्यांचेच विचार फिरत होते मग माझ्या डोक्यात चोरी करण्याची कल्पना आली. मी पांडे काकूंच्या दाराची बेल दाबली आणि विरजण मागितलं.

त्यानंतर त्या विरजण आणायला आत स्वयंपाकघरात गेल्या,तेवढ्या वेळात मी तिथेच हॉलमधल्या भिंतीवर लावलेल्या खिळ्यावरची किल्ली घेतली. आणि माझ्या जवळच्या साबणावर त्याचा शिक्का घेतला आणि परत ठेवून दिली व परत आपल्या जागेवर सोफ्यावर बसली. त्यांच्या हातात मी नेहमीच ती गिटार चं किचेन असलेली किल्ली बघितली होती आणि ती मेनगेट चीच आहे हे मला माहित होत.

त्या साबणाच्या शिक्क्यावरून मी एका दुसऱ्या लांबच्या किल्लीवाल्याकडून डुप्लिकेट किल्ली तयार करवून घेतली आणि पांडे दाम्पत्य कधी बाहेर जाते याची वाट पाहू लागली.

त्यांच्या बाहेर येण्या-जाण्यावर त्यांच्या नकळत मी नजर ठेवू लागली. चोरीच्या दिवशी पांडे काका कोणाशी तरी फोन वर बहुतेक त्यांच्या मुलाशी बोलत होते. त्याला ते सांगत होते की विडिओ कॉल दीड तासाने कर कारण ते बाहेर जाणार होते व परत यायला त्यांना एक-दीड तास लागणार होता. हे ऐकल्यावर मी माझं काम तेवढ्यात उरकलं.", एवढं बोलून भाले काकू थांबल्या.

“अच्छा म्हणजे किल्लीवाला म्हणत होता ते बरोबर होतं तर!",पोलीस

"हो पांडे काका काकू बाहेर गेल्या गेल्या मीच त्या अपार्टमेंट जवळच्या किल्लीवाल्याला बोलावले. माझा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून चेहऱ्याला scarf, डोळ्याला गॉगल आणि हातात gloves घातले होते. आवाज ओळखता येऊ नये म्हणून मी बोलता येत नसल्याचे नाटक केले.",भाले काकू मान खाली घालून म्हणाल्या.

"तश्या फार हुशार आहात तुम्ही. फारच शिताफीने चोरी केली तुम्ही पण हुशारी चुकीच्या ठिकाणी वापरली. आणि चोरावर सुद्धा कोणीतरी मोर(माझ्याकडे खुण करत) होऊच शकतो हे तुम्ही सपशेल विसरल्या.",पोलीस

संपूर्ण भाले कुटुंब शरमिंदे झाले होते.

तुमच्या हातात gloves असल्यानेच तुमच्या बोटांचे ठसे कुठे आढळले नाहीत हे मला समजलं पण त्या किल्लीवाल्याचे ठसे कसे काय नाही मिळाले हे मला काही कळलं नाही",पोलीस

"मी ते किल्लीवाला गेल्यावर नीट पुसून घेतले होते",भाले काकू

"आणि पाणीपुरी वाल्याचे काय? त्याचे कुरिअर बॉय म्हणून कसे काय वर्णन केले आपण?",पोलीस इन्स्पेक्टर

"ते तर तपासामध्ये गोंधळ निर्माण व्हावा म्हणून मी असंच अंदाजे वर्णन केले होते आणि काल्पनिक कुरिअर बॉय निर्माण केला होता. मला काय माहीत त्या वर्णनाचा पाणीपुरी वाला जवळपास सापडेल म्हणून!",भाले काकू

"पण राघव बेटा तुला कसं काय कळलं भाले काकुंनीच चोरी केली म्हणून?",कुलकर्णी काकू

मी सांगू लागलो,"चोरी झाल्याच्या २-३ दिवसानंतर, पांडे काकांकडे मी व माझे काका गेलो असता,मी पांडेकाकूंना मेनगेट ची कुलूप किल्ली मागितली,जेव्हा ती किल्ली मी बारकाईने बघितली तेव्हा मला तिच्या काठावर पांढरा थर दिसला ज्याचा वास घेतल्यावर मला कळलं की तो साबणाचा थर आहे.
म्हणून मी किल्ली पांडेकाकूंच्या परवानगीने माझ्याजवळ ठेवून घेतली. मग मी विचार केला की पांडे काकांच्या घरची डुप्लिकेट किल्ली कोण तयार करू शकेल?

खंडूभाऊ आणि मोलकरीण यांच्याकडे काहीच सापडलं नाही तसेच त्यांनी शेवटपर्यंत चोरी केली नाही असंच म्हंटल किल्लीवाला आणि पाणीपुरीवाल्याची सुद्धा तीच तऱ्हा होती मग दीड तासात बेमालूम पणे कोण चोरी करू शकेल? अपार्टमेंट मधलं तर कोणी नसेल असा मला संशय आला आणि तसंही किल्लीवाल्याने त्या महिलेची उंची 5 फूट 2 इंच सांगितली होती.

योगायोगाने आपल्या अपार्टमेंट मधील सगळ्या महिलांची म्हणजे माझी काकू,कुलकर्णी काकू,पांडे काकू आणि भाले काकू ह्या सगळ्यांची उंची जवळपास 5 फूट 2 इंचच आहे. आता मला त्या किल्लीवरच्या साबणाच्या थराच्या वासावरून कोणाकडे कुठलं साबण वापरतात हे जाणून घेणं आवश्यक वाटलं जेणेकरून नेमकं कोणी किल्लीचा शिक्का घेतला हे मला कळणार होतं म्हणून मग मी अपार्टमेंट मध्ये सगळ्यांकडे कोणता साबण आहे हे बघायला प्रत्येकाच्या कडे लोणचं घेऊन गेलो सगळ्यांनाच लोणचं दिलं मग पांडे काकूंचा गैरसमज नको व्हायला म्हणून त्यांना सुद्धा लोणचं दिलं.

याच्यात मी चिंटूची मदत घेतली. त्याने शू ला जाण्याचं निमित्त करून मला सगळ्यांच्या बाथरूम पर्यंत पोहोचवलं अशा प्रकारे मी सगळ्यांकडचे साबणं तपासले. फक्त भाले कडचा साबणच या किल्लीला असलेल्या साबणाच्या थराला जुळत होता तसेच त्या साबणावर किल्ली च्या लांबीचा खड्डा पडला होता त्यावरून तर माझी खात्रीच पटली. मी त्याचा फोटो काढून पोलिसांना दाखवला व मला जे कळलं ते मी त्यांना सांगितलं आणि इथे पोलीस आल्यावर त्यांना सगळा चोरीचा माल सापडला. भाले काकूंनी सगळं कबूल केलंच आहे.

चोरीचा माल सापडला असल्याने पांडे काकांनी तक्रार वापस घेतली होती. भाले काकूंना चोरीच्या गुन्ह्यासाठी पोलिसांनी चांगलाच दम दिला आणि ह्यापुढे असं कृत्य केलं तर नक्की अटक करेन असही सांगितलं.

लवकरच भाले कुटुंब राधेशाम अपार्टमेंट सोडून निघून गेलं. सगळ्यांचा विश्वास गमावल्यावर त्यांना तिथे राहणं मुश्किल झालं होत. एवढ्या सगळ्या प्रकरणात राहून-राहून मला चिंटू चं कौतुक वाटते. खरंच आमच्या चिंटू इतका हुशार मुलगा कोणीच नाही.

समाप्त