Information on types of poetry books and stories free download online pdf in Marathi

कवितेचे प्रकार माहिती

रुबाई, चारोळी, हायकू, संवादिनी म्हणजे काय हो?

आधुनीक काळ फार व्यस्ततेचा काळ आहे. या काळात स्री आणि पुरुष दोघंही कामाला जात असतात. त्यामुळंच कोणाकडं वेळच उरलेला नाही. तसं पाहता त्याचं कारण म्हणजे महागाई. महागाईच्या या काळात सर्वांनाच आपलं पोट भरणं कठीण झालंय आणि त्या महागाईची झळ सर्वांनाच पोहोचलीय असे म्हणायला काहीच हरकत नाही.
आज महागाई आहे व पोटासाठी पती पत्नी असलेले स्री पुरुष दोघही कामाला जातात. कारण महागाईमुळं व्यस्ततेची झळ त्यांना पोहोचलेली आहे. तशीच ती झळ कवी व लेखक वर्गालाही पोहोचलेली आहे. आता लोकं दिर्घ असलेली कादंबरी वाचत नाहीत वा एखादी दिर्घ कविता वाचत नाहीत तर ते लघु कविता किंवा अति लघुकथा वाचतात. आता या लघुकविता किंवा लघुकथेनुसार त्यातील प्रकाराचे स्वरुप बदलले आहे. लघुकथेचं जावू द्या. तिला फक्त लहान रुप तेवढं आलं व त्याला फक्त लघुकथा नाव दिलं गेलं. परंतु कवितेत कवी कल्पनेनुसार लघुकवितेचे बरेच प्रकार कवितेत आधीपासूनच अस्तित्वात आहेत. ज्याला आता बरंच वलय प्राप्त झालेलं आहे. त्यात दोनोडी, हायकू, रुबाई, चौपाई, चारोळी व संवादिनी इत्यादी कविता अस्तित्वात आहेत. एका कविनं तर एकाच अक्षराची कविता केलीय. ते अक्षर 'मी' व दुसरं अक्षर ती होय. यात मी व ती चा अर्थ व्यापक असून त्यानं फक्त मी व ती हे एकच अक्षर लिहिलं. याचा अर्थ असा की मी व ती या अक्षराचा हवा तो अर्थ, ज्याला जसा पटेल, तसा अर्थ त्यानं लावून घ्यावा. महत्वाचं सांगायचं झाल्यास मी व ती या अक्षराची ही एकमेव कविता अशी असेल की ती कविता अतिशय लघू असेल. विशेष म्हणजे कोणी त्या अक्षराला कविता मानत नाहीत.
कवितेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मराठी कवितेत आर्या, अंगाई, अभंग, ओवी, कणिका, खंडकाव्य, गझल, चारोळी, चित्रपटगीत, चौपदी, दशपदी, दिंडी, नाट्यगीत, पोवाडा, निसर्गगीत, लावणी, बालकविता, बालगीत, भक्तीकाव्य, भलरी (शेतकरी गीत) भावगीत, महाकाव्य, मुक्तछंद, रुबाया, विडंबन काव्य, विनोदी कविता, श्लोक, हायकू, सुनीत, शृंखला काव्य, चक्री काव्य व वर्तुळ काव्य इत्यादी कवितेचे प्रकार आहेत. त्यात आता कोणी कोणी एवढे शहाणे आहेत की स्वतःचं नाव मोठं व्हावं म्हणून काही अनगीनत काव्य प्रकार अस्तित्वात आणत आहेत. त्यात द्रोण काव्य द्रोणाच्या आकारात कवितेत शब्द मांडले जातात. अष्टाक्षरी काव्य, आठच अक्षर असतात कवितेत. त्यानंतर इतर बरेच काही. असो, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतातच.
महत्वाचं सांगायचं म्हणजे कोणतीही कविता का असेना, तीचे तीन अंग असतात. पहिला रस काव्य दुसरा छंदकाव्य व तिसरा अलंकार काव्य. रसकाव्यात कोणत्याही रचना मोडतात. जशा सामान्य रचना. यात काव्याला बंधन नसतं. त्यात फक्त कविता ऐका व आनंद माना एवढंच अभिप्रेत असतं. छंदात मात्र तसं नाही. छंद काव्य प्रकारात मात्रावर व वृत्तावर जास्त जोर असतो. या काव्यप्रकारात शब्द निर्मीती ही धातूपासून होते. यात अक्षरांची गिणती, गती, यति मात्रा आदींवर भर दिला जातो. तर अलंकार काव्य प्रकारात काव्याची शोभा वाढविण्यावर भर दिला जातो. अलंकार प्रकारात कविता करतांना सामान्यतः रुपक, अनुप्रास, उपमा, श्लेष व यमक अलंकार वापरला जातो. जशी एखादी नववधू विविध अलंकार वापरुन आपलं स्वतःचं सौंदर्य खुलविते. तसाच प्रकार शब्दातही असतो शब्दही विविध अलंकार परीधान करुन आपलं सौंदर्य वाढविण्यावर भर देत असतात.
कवितेबद्दल आणखी थोडं सांगतो. ते सांगणं गरजेचं समजतो. विद्या.......विद्येबद्दल सांगायचं झाल्यास त्या चार प्रकारच्या असतात. व्याकरण, कोश, छंद व अलंकार आणि कला अर्थात उपविद्या चौषस्ट प्रकारच्या असतात. तसेच कवित्वाचे आठ स्रोत सांगीतले गेले आहेत. जसे, स्वास्थ, प्रतिभा, भक्ती, अभ्यास, विद्वकता, बहूश्रृतता, स्मृतीदृढता, राग. कविता मुळात दोन आधारावर चालतात. सामान्य दृष्टी आधार व रचना आधार. सामान्य दृष्टी आधाराचे दोन गट पडतात. दृश्य काव्य व श्रव्य काव्य. दृश्य आधार याचा अर्थ एखादी कविता वाचून आनंद मिळविणे व श्रव्य याचा अर्थ एखादी कविता एखाद्याकडून ऐकून आनंद मिळविणे.
रचना तीन आधारावर आधारल्या असतात. पद्य रचना, गद्य रचना व चंपक रचना. पद्य अर्थात ज्यात ओळीशेवटी यमक साधलेला असतो. गद्य अर्थात ज्यात ओळीशेवटी यमकाला महत्व नसते तर केवळ अर्थाला जास्त महत्व असते व चंपू अर्थात गद्य व पद्य दोन्ही प्रकार मिश्रीत असलेली रचना. चंपुकाव्याचा जनक हा त्रिविक्रम भट आहे. राष्ट्रकुटवंशी राजा कृष्ण द्वितीया नातू जगतुग आणि लक्ष्मी पुत्र इंद्रराज तृतीय च्या आश्रयास राहून त्रिविक्रम भटनं अशा प्रकारच्या चंपू रचना बनवल्या होत्या. त्यात त्याची चंपू काव्यातील नल दमयंतीची कथा फार प्रसिद्ध आहे. तसेच चंपू काव्यात भोजराजचे रामायण, अनंतभटचे भारतचंपू, शेष श्रीकृष्णाचे पारिजातहरण व नीळकंठ दिक्षीतचे समुद्रमंथन इत्यादी रचना प्रसिद्ध आहेत.
कवितेत महाकाव्य आणि खंडकाव्याचीही रचना केली गेली. महाकाव्य हे एका राजाविषयीची संपुर्ण कथा असायची. त्यात राजाचं गुणवर्णन असायचं. तसं पाहता पुर्ण इतिहासच. तसं खंडकाव्यात त्या राजाच्या व्यक्तीमत्वातील एखादा प्रसंग वर्णीत केलेला असायचा.
सामान्यतः एक कथा वा कादंबरी लिहिणं सोपं आहे. परंतु कविता लिहिणं कठीण आहे. कारण कवितेत एक पुर्ण दिर्घ कथानक अगदी दोनचार ओळीत बसवावा लागतो. अलिकडे तर असे असे कवी आहेत वा निर्माण होत आहेत की जे कवितेत अनेक ओळी ठेवतात. जणू ती कथाच आहे की काय असं वाटतं. कवितेच्या दिर्घ प्रकारात मुकातछंद येतो. या प्रकाराचे जनकत्व कवी अनिलांकडे जाते. त्यांना प्रवर्तक मानलं जातं. याही प्रकारात कोणी कवी अनिलांना मुक्तछंदाचे जनक मानतात तर कोणी केशवसुतांना. हा काव्य प्रकार रस काव्यात मोडतो व यात कविता करतांना कोणत्याही स्वरुपाचं बंधन नसतं. अलिकडे असे प्रकार कालबाह्य ठरणार आहेत. कारण दिर्घ काव्य लिहिण्याला वेळ वाया जातो. तो एवढा वाया जातो की त्याला खरा कवी जर असेल तर उभी हयात निघून जाते. म्हणतात की बालकवीला एक कविता पुर्ण करायला अठ्ठावीस वर्ष लागले. हीच गरज व वेळ लक्षात घेवून मी काही अति लहान काव्य प्रकाराची माहिती देत आहे.
१) रुबाई. या प्रकारात चार ओळीची कविता असते. पहिली, दुसरी व चवथी ओळ मिळतीजुळती असते. तशी तिसरी ओळ वेगळ्या स्वरुपाची असते. रुबाईतील चार ओळी म्हणजे एक अर्थपुर्ण कविता असते. रुबाई हरिवंशराय बच्छन यांनी लिहिल्या आणि अलिकडे ज्ञानेश वाकूडकर लिहितात. ते एका रुबाईत म्हणतात.
'जीवनाचे सार आहे
मी खुला व्यवहार आहे
का उगाच जळतात काटे
मी फुलांचा हार आहे'
रुबाई ही मुळात पारशीतील. म्हणतात की इसवी सनाच्या २५१ व्या शतकात अरबमध्ये एक सुलतान राहात होता. त्याचं नाव याकुब होतं. त्याचा एक मुलगा गोळ्या मारण्याचा खेळ खेळत होता. एवढ्यात एका गोळीचा निशाणा लागला व आनंदानं शब्द बाहेर पडले. ती पहिली रुबाई ठरली. त्यानंतर ती रुबाई कवी माधव ज्युलियन यांनी पहिल्यांदा मराठीत आणली. आता बरीच मंडळी रुबाई लिहायला लागले आहेत.
२) चारोळी. चारोळी ही चार ओळीची असते. दोन अर्थपुर्ण ओवी असतात. परंतु त्या ओळी चार ओळीत विभागल्या जातात. यातही एक रचना उदाहरणादाखल देतो. जसे. 'प्रसववेदनांची झळ तिला
मृत्युवेळी आठवली
मुलापरस मुलगी सरस
आज तिने दाखवली'
चारोळीच्या जन्माचा तसा इतिहास सापडत नाही. परंतु कोणी म्हणतात की चारोळीचा जन्म हा अगदी ऋग्वेद काळापासून झाला. आता त्यात किती तथ्य आहे. ते वाचकांनी ठरवावं.
३) चौपाई. चौपाई म्हणजे चारोळीच होती. परंतु थोडासा फरक होता. बंधनं नव्हती. अलिकडे हा प्रकार बव्हंशी वापरत नाहीत.
४) हायकू. हायकूचा जन्म मुळात जपानमधील. हायकू जपानमध्येच वाढला. त्यानंतर त्या काव्यानं चीनमध्ये प्रवेश केला व पुढे इतर देशात. त्यात भारताचाही समावेश आहे. हायकूचा कालखंड हा साधारणतः १६४४ ते १६९४ मानला जातो. हायकू मात्सुओ बाशो याने प्रसवला असे म्हटले जाते. अर्थात तो त्याचा जनक.
हायकू रचनेत कवितेची अक्षरे पहिल्या ओळीत पाच दुसऱ्या ओळीत सात व तिसऱ्या ओळीत पाच असतात. एकुण सतरा अक्षरे असतात. यात पहिली व तिसरी ओळ महत्वपुर्ण ओळ असून पहिल्या दोन ओळीचा सार हा तिसऱ्या ओळीत घेतला जातो.
'मी शब्द झालो
जरी मी कवी नाही
कवितेतील'
५) संवादिनी. संवादिनी म्हणजे सहा ओळीची कविता. हा प्रकार वापरुन वाकूडकरांनी एक कविता लिहिली.
'तिथे वाहतो भरुन पेला
इथे तहानलेला किनारा
जीवा शिवाचा संगम व्हावा
असा सनातन ऋतू
आणि आमचे ओठ कोरडे
ऋतू चालले ऊतू '
६) दोनोडी. दोनोडी ही दोन ओळीची रचना असून या कवितेतून पुर्ण प्रसंगच साकारला जातो. इतर ओळी करण्याची गरज नाही. जसे
'शत्रू माघारी फिरला
जेव्हा बुद्ध दिसला '
याचा अर्थ असा की त्या काळी तथागत गौतम बुद्धांना सर्व प्रजाजन मानायचे. परंतु बुद्धांना युद्ध नको होतं. ते शांतीचे प्रणेते होते व त्यांना चाहणारे होते. एकदा असाच एक प्रसंग घडला. एका राजानं युद्धासाठी दुसऱ्या राजाला आव्हान दिलं. दुसऱ्या राजाला युद्ध टाळायचं होतं. तो बुद्धाजवळ गेला. विनवणी केली आणि सांगीतलं की मला युद्ध नको आहे. ते ऐकताच तथागत म्हणाले, "काही हरकत नाही. असं जर असेल तर मी स्वतःच येतो तुझ्यासोबत. तुझ्या जागी मी मरणार. परंतु युद्ध करणार नाही."
तथागत युद्धभूमीवर गेले. त्यांच्या हातात काहीही नव्हते. ते निःशस्र होते. परंतु पलीकडील शत्रू त्यांना ओळखणारा होता. त्यानं तथागतांना ओळखलं. तो तथागगताच्या पायावर नतमस्तक झाला. त्यानं क्षमा मागीतली व तो माघारी फिरला.
या कवितेत दोनच ओळी आहेत. परंतु त्या दोन ओळींचा अर्थ जबरदस्त आहे.
अलिकडील काळात वेळ नसल्यामुळेच या अति लघू स्वरुपाच्या रचना उदयास येत आहेत व या रचनांना जोर पकडत आहे. हाच दृष्टिकोन अंगीकारुन त्याची तशी गरज कवींना वाटली व या रचनांचा परिचय लोकांना व्हावा व लोकांनी जास्तीत जास्त या प्रकारात लेखन करावं म्हणून नागपूरात साहित्य कला सेवा मंडळानं एक अभिनव प्रयोग करण्याचं ठरवलं व संमेलन घ्यायचं ठरवलं. तसंच यासंदर्भात एक संमेलन आयोजित केलं. अति लघू काव्य प्रकार साहित्य संमेलन. हे संमेलन नवीन वर्षाच्या येत्या ६ व ७ जानेवारीला आहे. या संमेलनाचा विषयच अभिनव आहे. अभिनव स्वरुपाचं हे संमेलन ठरणार आहे. खरंच यातून हे लघुकाव्य म्हणजे काय आहे. हे लोकांना नक्कीच कळेल यात शंका नाही. तशीच लोकांनाही अति लघु काव्य प्रकाराची माहिती होईल हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED