विद्यार्थी मागं का? Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विद्यार्थी मागं का?

विद्यार्थी मागं का?

*अलिकडे विद्यार्थी मागं पडतात. याचं उत्तर होय असंही देता येईल आणि नाही असंही देता येईल. होय, यासाठी की बरेच विद्यार्थी शिकत नाही. ते मधातच शाळा सोडतात आणि नाही यासाठी म्हणता येईल की बरेच विद्यार्थी यशाच्या शिखरावरही जात असतात.*
अलिकडे शिक्षकाला बैल म्हटलं गेलं तर वावगं ठरत नाही. कारण शिक्षकाला घाण्याला जुंपलेल्या घाण्यागत रिकामं ठेवलं जात नाही. त्याला वारंवार कोणत्या ना कोणत्या कामात जुंपलं जातं. त्याचं कारण हे न कळेनासं आहे.
शिक्षकांनाच शासन अशी कामं का सांगतो? तर याचं उत्तर आहे. शिक्षक हा इमानदार व मेहनती प्राणी आहे. तो सतत काम करीत असतो. त्याला काम करणं आवडतं. त्याला कुणाचं नुकसान करणं आवडत नाही. ना विद्यार्थ्यांचं नुकसान करणं आवडत. ना शासनाचं. म्हणूनच तो इमानीइतबारे कोणतीही अपेक्षा न करता कामे करीत असतो. परंतु तो तरी कुठपर्यंत विना स्वार्थानं कामे करणार. त्यालाही परीवार आहे आणि पोटंही आहे. तसं पाहता तो परीवार व ते पोट तेवढंच महत्वाचं आहे.
शिक्षकांचं काम आहे शिकवणं. लहानच नाही तर मोठ्याही व्यक्तीला शिकविण्याचं काम हा शिक्षकच करीत असतो. कधी निवडणूकीचं काम करतो. कधी मतदार यादीचं काम करतो. कधी जनगणना करतो. कधी शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करतो तर कधी हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी योजना राबवतो.
शिक्षक केवळ एवढंच काम करीत नाहीत तर काल जेव्हा कोरोनाचं संकट देशाला भेडसावत होतं. तेव्हा अशा कठीण काळातही या शिक्षकाने अगदी आपल्या प्रकृतीची काळजी न करता आपल्या ड्युटीचाच एक भाग समजून नाक्यानाक्यावर पोलिसांची ड्युटी केली. त्यानंतर सुटकेचा श्वास सोडला. काही तर यात मरणही पावले.
मुळात कोरोना राहो की एखाद्या गंभीर रोगाची साथ. शिक्षकांना आपल्या नोकरीचा भाग म्हणून ड्युटी करावीच लागते. अगदी त्याला सांगीतलं की दहनस्थळावर रात्रभर एकट्यानं जागली करावी. तरी ती करणारच भीती न बाळगता. असा हा शिक्षक. परंतु खरं तर त्याच्या कामाच्या कार्यानुसार त्या शिक्षकांना तेवढा सन्मान मिळत नाही ही शोकांतिकाच आहे. त्याच्यावर आजच्या काळात कोणीही ताशेरेच ओढत असतात. तो आपल्या विद्यार्थ्यांना शिकवीत नाही असेही म्हणतात.
शिक्षकाबद्दल सांगायचं झाल्यास शासन त्याचेबाबत उदासीन भुमिका घेत असतं. त्याला बैलच समजत असतं शासन. एवढी कामं त्याच्या पाठीमागं असतात की विचारता सोय नाही. सध्या ऑनलाईनच्या काळात तर शिकवणं कमी करा आणि रेकॉर्ड जास्त ठेवा अशी शिक्षकांची अवस्था झाली आहे. शिक्षकाला केवळ आणि केवळ त्रासच दिला जातो. प्राथमिक शाळेची अवस्था तर यापेक्षा बिकट आहे.
प्राथमिक शाळेत पटसंख्या कमी असेल तर चपराशी नसतो. मग झाडण्यापासून तर टेबल पुसण्यापर्यंतची कामं शिक्षकालाच करावी लागतात. शिवाय बाबू नसल्यानं बाबूचीही कामं शिक्षकालाच करावी लागतात. शासन वेतन देतं. परंतु ते वेतन शिकविण्याचं नसतं तर ते वेतन बाबू बना, चपराशी बना. भाट बना. भंगी बना. यासाठी असतं. असं म्हटल्यास कुणाला राग येईल जे शिक्षक असतील. परंतु त्यात तसूभरही असत्यता नाही. भंगी बना याचा अर्थ हागणदारी मुक्त गावाच्या योजना कार्यान्वीत करा. भाट बना याचा अर्थ घरोघरी जावून भाटासारखे ओरडा. जन्मकुंडल्या विचारा. नावं विचारा. ते आठवणीत राहात नाहीत. म्हणून लिहून ठेवा. याचाच अर्थ असा की पुर्वी भाट जे काम करायचे. तेच काम आता शिक्षकांना करावे लागत आहेत. शिक्षकांच्या पाठीमागं सर्वेक्षणाचं काम आलं आहे. मग ते सर्वेक्षण शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं असो वा कोणत्याही स्वरुपाचं. ते शिक्षकांना करणं आलंच. याचाही परिणाम विद्यार्थ्यांना शिकविण्यावर होत असतो.
शिक्षकांच्या पाठीमागं शासनानं बरीच कामं लावून ठेवलेली आहेत. त्याला तसूभरही सवड मिळत नाही. शाळेच्या कामाव्यतिरिक्त त्याला बाहेरचीच कामं जास्त आहेत. तरी तो त्रास सहन करुन शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवीत असतो. कारण तो आपल्या मुलांसारखा आपल्या विद्यार्थ्यावर प्रेम करतो. त्या विद्यार्थ्यांना बोलकं करतो. बोलणं शिकवतो. वाचणं शिकवतो. त्याला शौचालयाच्या सवयी लावतो. एवढं करुनही शासन त्याची कदर करीत नाही. पालक त्यांना चांगले म्हणत नाही. यातही विद्यार्थ्यावर संस्कार करीत असतांना तो विद्यार्थ्यांना प्रेमानं छड्याही मारतो. त्या छड्या त्याला सुधरविण्यासाठी असतात. परंतु यात समजा एखाद्या विद्यार्थ्याला लागलंच तर पालक आपले तुणतुणे हावलत शाळेत येतात व शिक्षकांना अपशब्द बोलून मोकळे होतात. ते शिक्षकांचा एवढा अपमान करतात की त्याबद्दल न सांगीतलेलं बरं.
सरकारी शाळेत तर शिक्षकांना वेतन जास्त प्रमाणात असतं. तेथील पालकांनी बोललेलं एकदाचं खपूनही जाईल. परंतु खाजगी शाळेत शिक्षकांना अतिशय अल्प वेतनात काम करावं लागतं. त्यातच पालक वर्ग आपल्या मुलांना शिकविण्याचं शुल्क भरीत असल्यानं त्यांची ओरड जास्त असते. ते पालक आपल्या मुलांना उच्च स्तरावर नेवून पाहतात. ते मुलांचे पैसे भरतात आणि त्याबदल्यात शंभर प्रतिशत निकालाची अपेक्षा करतात. परंतु यात ते विचार करीत नाहीत की काल आपण या मुलांएवढेच होतो. तेव्हा आपण किती प्रतिशत गुण मिळवले होते. उदाहरण द्यायचं झाल्यास त्याच विद्यार्थ्यांचे पालक जेव्हा दहावीत असतील. तेव्हा त्यां दोघांच्याही दहावीत मिळालेल्या गुणांची बेरीजही शंभर प्रतिशत येत नसेल. परंतु मुलांकडून अपेक्षा बाळगून त्यानं शंभर प्रतिशत गुण मिळवावे ही अपेक्षा केली जाते. याच दृष्टीकोनातून शिक्षकांवर ताशेरे ओढले जातात. त्यानं जीव ओतून शिकवावं ही माफक अपेक्षा केली जाते. तो शिक्षक शिकवतोही जीव ओतून. परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांचा बुद्यांक. तो लायक नसतो की त्याला शंभर प्रतिशत गुण पडतील. त्यात त्याला कमी गुण पडतात. मग भ्रमनिराश होतो व त्याचा परिणाम हा होतो की ते पालक विद्यार्थ्यावर ओरडतात. यातून विद्यार्थी निराश होतो व तो मरण पावतो आत्महत्या करुन.
आज शिक्षकांकडून जशा शासनाच्या अपेक्षा आहेत की सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मुल शिकलं पाहिजे. ते टिकलं पाहिजे व त्याला दर्जेदार शिक्षणही मिळालं पाहिजे. पालकांनाही अगदी तसंच वाटतं. ते अपेक्षा करतात. कराव्या अपेक्षा. अपेक्षांनीच योजना कार्यान्वीत होतात. परंतु ते हा विचार करीत नाहीत की शिक्षकांवर कामाचा ताण किती आहे? शिक्षकांना कामं किती आहेत? त्याला कोणती कामं आहेत? अलिकडे तर कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत. तिथं तर शिक्षकांचे हाल विचारताच येत नाहीत. तेथील शिक्षकांना अतिशय कमी वेतन मिळतं. जे वेतन त्यांचं घर वा परीवार चालेल, एवढंही नसतं. तरीपण तेथील शिक्षक हिरीरीनं शिकवतात व आपल्या शाळेतील मुलांना मेधावी बनवतात. तरीपण त्यांचं कौतुक केलं जात नाही ना त्यांचं वेतन वाढवलं जात. आज अशीच परिस्थिती सगळीकडं आहे. आदिवासी भागात तर चित्र वेगळं आहे. तिथं शिक्षकांना गावकऱ्यांनी गोठ्यात बांधलेली जनावरं बाहेर काढावी लागतात व त्याचा शेणपोयटाही करावा लागतो.
विशेष सांगायचं म्हणजे मुलं शिकविणं काही खेळ नाही वा जादूची कांडीही नाही की जी फिरवली व मुले शिकली. दररोज रटवून घेतला जातो सराव. तरीही मुलं घडत नाहीत. जे थोडेसे बुद्यांकानं चांगले असतात. तेच घडतात. बाकी सर्व ढेपाळतात. मोठी मुलं थोडीशी समजदार झालेली असतात. त्यांना लिहिता वाचता तरी येते. परंतु लहान मुलांना शिकविणं तारेवरची कसरतच असते. ते बरेचदा शिकतच नाहीत. कितीही सराव करुन घेतला तरीही. ती दोन चार वर्ष तशीच राहात असतात.
महत्वाचं म्हणजे मुलं शिकू शकतात. त्यांना पुर्ण स्वरुपात शिक्षकांनी वेळ दिला तर......परंतु शासन त्यांना तसा वेळ देवू देत नाही. कधी त्यांच्या मागं मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण आणतं. तर कधी कोणत्याही स्वरुपाचं सर्वेक्षण आणतं. कधी जनगणणा आणतं तर कधी निवडणूक ड्युटी. त्यातच बऱ्याच सुट्ट्याही येतात की ज्यात विद्यार्थी डिस्टर्ब होतात. कधी लागोपाठ सुट्ट्या आल्या की मुलं गावी जातात. मग मुलं शाळेत हजर राहात नाही. अशावेळेस जो अभ्यासक्रम शिकवला जातो. तो अभ्यासक्रम अशा गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्याआडून जातो व विद्यार्थी मागं राहतात. कधी वेतनासाठी शासनाशी भांडण करावं लागतं तर कधी संस्थाचालकाशी. ही भांडणं कधी वेतनासाठी असतात तर कधी हक्कासाठी. हक्कं डावलला म्हणून. यातही शिक्षक डिस्टर्ब होतात व त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो व विद्यार्थी मागं पडतात.
विद्यार्थी मागं पडत नाहीत. पडू शकत नाहीत. परंतु ते पडतात. त्याचं कारण म्हणजे शिक्षकांना मिळत असलेली वागणूक. अशी वागणूक कधी शासनाकडून कधी पालकांकडून तर कधी संस्थाचालकांकडून मिळत असते. कधी त्याला घाण्याला जुंपलेल्या बैलागत वागवलं जाते. तर कधी त्याला एखाद्या गुलामागत वागवलं जाते. त्यांचे हक्क डावलले जातात. वेतनकपात केली जाते वा वेतन कमी दिलं जाते. त्यामुळंच शिक्षक निराश होतात. एवढे निराश होतात की त्यांचं विद्यार्थ्यांना शिकविण्यात मन लागत नाही. तरीही शिक्षक शिकवितात. कारण ते समजदार आहेत. इमानदार आहेत. ते जाणतात की आपलं नुकसान झालं तरी चालेल. परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको. कारण आपल्या भांडणात त्या निरागस निष्पाप विद्यार्थ्यांचा दोष नाही. परंतु अशा हक्क डावलण्यातून वा अशा शासनाच्या, पालकांच्या व संस्थाचालकांच्या बेताल वागण्यातून जो परिणाम शिक्षकांवर होतो. त्या परिणामाचा परिणाम शिक्षकांवरही होतो हे न सांगीतलेलं बरं. म्हणूनच विद्यार्थी मागं पडतात हे तेवढंच खरं आहे. म्हणून शासनांनं एवढी कामं शिक्षकांवर लादू नयेत की त्याचा परिणाम दुष्परिणामांवर बदलेल. तसंच संस्थाचालकानंही चांगलं वागावं. त्याचबरोबर पालकांनीही आपली भुमिका सुधरवावी. जेणेकरुन विद्यार्थी शिकतील. ते अभ्यासात मागं पडणार नाहीत व पुढे जावून ते आपलं, आपल्या पालकांचं, संबंधीत यंत्रणेचं व आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील हेही तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०