शिक्षणाबाबत आदर असावा Ankush Shingade द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शिक्षणाबाबत आदर असावा

शिक्षणाबद्दल आदर कृतीत दिसायला हवा

शिक्षक.......खरं तर शिक्षक हा लोकांना शहाणा करणारा घटक. तो आहे म्हणून लोकं शहाणे बनले आहेत असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
शिक्षक हा विद्यार्थी घडविण्याचे कार्य करीत असतो. तो असे विद्यार्थी घडवतो की ज्या विद्यार्थ्याला कोणताच गंध नसतो. जेव्हा विद्यार्थी शाळेत येतात. तेव्हा त्यांना कोणत्याच सवयी नेतात नसतात. साधं शौचाला केव्हा जायचं? कसं जायचं? तेही त्याला समजत नाही. काही काही मुलं तर शौचाची क्रिया वर्गातच करुन ठेवतात. अशावेळेस त्या मुलांना समजावून सांगून त्याला उत्तूंग पातळीवर नेणे काही साधं काम नसते. ते काम शिक्षक करतो.
शिक्षक खरं म्हटल्यास आपला विद्यार्थी घडवत असतो. त्यासाठी ते काय काय कसरत करतो हे त्याचं त्यालाच माहीत असतं. त्याचं मुल्यच मोजता येत नाही. त्या बदल्यात त्याला काही मुल्य मिळतं. ते मुल्य म्हणजे तुटपुंजे आहे. कारण शिक्षकांच्या शिकविण्याचे मुल्य मोजताच येत नाहीत. ते उपकारच असतात प्रत्येकावर. परंतु ते कोण जाणतो. कोणीच जाणत नाही.
असा हा शिक्षक. या शिक्षकाच्या सन्मानासाठी भारत देशात एक दिवस आहे. तो म्हणजे शिक्षकदिन. बाकी दिवस असे आहेत की त्या दिवसांनी शिक्षकांना दीनच करुन टाकलेलं आहे. लोकं शिक्षकांना काहीबाही का बोलतात? त्याला नावबोटं का ठेवतात? त्याचा पदोपदी अपमान का करतात? त्याला आपल्या हातचे कळसुत्री बाहुले का समजतात? त्याची किंमत मोजता येणारी जरी नसली तरी त्याला पैशामध्ये कसे तोलतात? हे पाहतांना अंगावर शहारे उठल्याशिवाय राहात नाहीत. त्याला कारणं काहीही असोत. परंतु खरं सांगायचं झाल्यास शिक्षक हा मानसन्मानच करण्यासाठी असतो. त्याची कारणंही तशीच आहेत. तो आपल्यावर एवढे उपकार करतो की आपण कितीही जन्म घेतले तरी त्याचे उपकार फेडूच शकत नाही. म्हणूनच त्याला जुन्या काळात देवाची उपमा दिली होती. जगात गुरु हाच ब्रम्हा गुरु हाच विष्णू आणि गुरु हाच शिवही दाखवला आहे. याचाच अर्थ असा की जी जगाची उत्पत्ती करणाराही गुरुच आहे आणि जगाचा कार्यभार चालविणाराही गुरुच आहे. म्हणूनच मायबापानंतर तिसरा क्रमांक हा गुरुचाच लागतो. म्हणूनच त्याचा सन्मान व्हायलाच हवा. त्यासाठी भारतात पाच सप्टेंबर एकच दिवस आहे आणि त्याही दिवशी त्याचा यथोचीत सन्मान होत नाही.
म्हणतात की या दिवशी गुरुंच्या सन्मानार्थ त्यांना पुरस्कार दिला जातो. कोणाला मिळतो पुरस्कार? जो प्रस्ताव पाठवतो त्याला की ज्यांचं चांगलं कार्य नसते त्याला? जो चापलूस असतो त्याला की जो संस्थाचालक साहेबांच्या जवळचा असतो वा नातेवाईक असतो त्याला? जो आमदार खासदाराच्या जवळचा असतो त्याला की शिक्षणाधिकारी वा अधिकारी साहेबांच्या जवळचा असतो त्याला? खरं तर आजही खरे हाडाचे शिक्षक वंचीत असतात पुरस्कारापासून. कारण ते स्वतः प्रस्तावच पाठवीत नाहीत. त्यांना स्वतःच स्वतःचं कौतूक करावसं वाटत नाही. त्यांना आवडतं फक्त नि फक्त शिकवणं. पुरस्कार आवडत नाहीत त्यांना. तेच हाडाचे शिक्षक असतात. तसं पाहता त्यांच्या कार्याचा रागच असतो संचालक, मुख्याध्यापक आणि अधिकारी वर्गांना. कारण त्यांचं कार्य अनमोल असते. ते कार्य अशा घटकांना पटतच नाही. म्हणूनच राग. परंतु त्यांचा राग समाजाला नसतो. जो समाज त्यांच्या विद्यार्थ्यांपासूनच बनलेला असतो. अशा शिक्षकांसाठी प्रत्येक दिवस हा आपोआपच शिक्षकदिन बनतो. असा शिक्षक विद्यार्थी परीसरात वावरला तर त्याचा यथोचीत सन्मान होतो. एवढंच नाही तर अशा शिक्षकाला जेवनखावणंही मिळतं आणि काही वस्रही. ते त्यानं निःस्वार्थपणे केलेल्या कार्याची पावती असते. अशा शिक्षकांना सरकारच्या पुरस्काराची गरजच नसते. अशा शिक्षकाला पुरस्कार मिळो वा न मिळो, परंतु तोच सन्मान त्याच्यासाठी मोठा असतो. त्याला बसायला जागा मिळणे, त्यांना जेवणखावण मिळणे. वस्त्र वा आभुषण मिळणे. हे सर्व त्यांना पुरस्कार देण्यासारखंच असतं आणि तसा पुरस्कार त्यांचे विद्यार्थी देतातही. ही वास्तविकता आहे. अशा शिक्षकांना केवळ मानाची वागणूकच दिली जात नाही तर त्यांच्या कार्यावर अपमानाचे ओरबाडेही ओढले जात नाहीत. जपान आणि इतर देशामध्ये असंच आहे.
जपानमध्ये शिक्षक दिन नाही आणि दीनही नाही. यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका. परंतु हे माझं म्हणणं बरोबर आहे. तीच गोष्ट इतर काही देशातही आहे. याची मला खात्री आहे. यावरुन मनात एक विचार येतो की ज्या देशाची अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढं सक्षम आहे. त्या एवढ्या प्रगत असलेल्या देशात शिक्षक आणि त्यांच्या कामाचा इतका अनादर का असावा? याबाबत एक व्हाट्सअपवरील पोष्ट शेअर करतो. एका लेखकाची ती पोष्ट आहे. लेखक आणि त्या व्यक्तींमधील संभाषण. लेखक महाशय म्हणतात,
"एकदा काम संपल्यावर यममोताने मला त्याच्या घरी बोलावले. मेट्रो लांब असल्याने आम्ही पकडले. संध्याकाळचा पीक अवर होता आणि मेट्रो ट्रेनमधील वॅगन्स खचाखच भरल्या होत्या. मी ओव्हरहेड रेल्वे घट्ट धरुन उभे राहण्यासाठी जागा शोधण्यात यशस्वी झालो. अचानक माझ्या शेजारी बसलेल्या म्हातार्‍याने मला त्यांची जागा देऊ केली. एका वृद्ध माणसाचे हे आदरयुक्त वागणे समजून न घेता मी नकार दिला, पण तो ठाम होता आणि मला बसणे भाग पडले. एकदा आम्ही मेट्रोच्या बाहेर पडलो, तेव्हा मी यममोताला विचारले की व्हाईटबेर्डने नेमके काय केले ते समजावून सांगितले. यममोता हसली आणि मी घातलेल्या शिक्षकाच्या टॅगकडे बोट दाखवत म्हणाली,
'या म्हातार्‍याने तुमच्यावर शिक्षकाचा टॅग लावलेला पाहिला आणि तुमच्या दर्जाबद्दल आदराचे लक्षण म्हणून तुम्हाला त्याची जागा देऊ केली.'
मी पहिल्यांदाच यमामोताला भेट देत असल्याने तिथे रिकाम्या हाताने जाणे मला अस्वस्थ वाटले म्हणून मी भेटवस्तू घेण्याचे ठरवले. मी माझे विचार यमामोताशी शेअर केले, त्यांनी या कल्पनेला पाठिंबा दिला आणि सांगितले की थोडे पुढे शिक्षकांसाठी एक दुकान आहे, जिथे कमी किमतीत वस्तू खरेदी करता येतात. पुन्हा एकदा, मला माझ्या भावना आवरता आल्या नाहीत.
विशेषाधिकार फक्त शिक्षकांनाच दिले जातात का? मी विचारले.
माझ्या शब्दांना पुष्टी देत ​​यममोता म्हणाले,
'जपानमध्ये अध्यापन हा सर्वात आदरणीय व्यवसाय आहे आणि शिक्षक हा सर्वात आदरणीय व्यक्ती आहे. शिक्षक जेव्हा त्यांच्या दुकानात येतात, तेव्हा जपानी उद्योजकांना खूप आनंद होतो व ते हा सन्मान मानतात.'
माझ्या जपानमधील वास्तव्यादरम्यान, मी अनेक वेळा जपानी लोकांचा शिक्षकांप्रती असलेला अत्यंत आदर पाहिला आहे. त्यांच्यासाठी मेट्रोमध्ये खास जागा आहेत, त्यांच्यासाठी खास दुकाने आहेत, तेथील शिक्षक कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी तिकिटासाठी रांगेत उभे राहिले नाहीत. म्हणूनच जपानी शिक्षकांना विशेष दिवसाची गरज नसते, जेव्हा त्यांच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा उत्सव असतो.
सर्वच देश असा शिक्षकांबद्दल आदर बाळगतात. ते अविरत करीत असलेल्या कार्यामुळं. खरं तर शिक्षक हा आपले शिकविण्याचे कार्य अविरत करीत असतो. म्हणूनच बाकी देशात त्यांचा प्रत्येकदिवशी सन्मान होतो व त्याला सन्मानानं वागवलं जातं. परंतु भारतात? भारतात तसं नाही. या देशात शिक्षकांना त्रास दिला जातो. एवढा त्रास दिला जातो की तो देण म्हणून मुख्याध्यापक, संस्थाचालक, अधिकारी वर्ग यांना जर पैसा देत नसेल तर त्यांचं जगणंही असह्य करुन टाकलं जातं. त्यांना वेतनवाढी लावल्या जात नाहीत. निवडश्रेण्या मिळत नाहीत. वरीष्ठश्रेण्याही मिळत नाहीत. सन्मान तर दूरच राहिला. परंतु निवृत्त झाल्यानंतरही निवृत्तीवेतन बरोबर पदरात मिळत नाही.
अलीकडे शिक्षकांचा सन्मान होतांना दिसत नाही. नवीन शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात नाही. तरुण बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती बंद आहे. दोन हजार पाच नंतर लागलेल्या शिक्षकांना पेन्शन नाही. शिक्षकांच्या पदात खाजगीकरण आणलेलं आहे. जुने निवृत्त झालेले शिक्षक मानधनावर भर्ती करण्याच्या हालचाली होत आहेत. पुरस्कार तर सोडा, साधे वेतनही द्यायला कुचराई होत आहे. दिरंगाई तर पदरालाच बांधली आहे. एकंदरीत सांगायचं झाल्यास शिक्षकांची जणू अलिकडील काळात हेळसांड होत आहे. असेच चित्र दिसत आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास शिक्षक हा घटक एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तो जर नसेल तर हा देश, देश राहणार नाही. या देशात अंदाधुंदपणा माजेल. मग या देशाची अवस्था अंधकारमय होईल यात शंका नाही. म्हणूनच शिक्षकांचा सन्मान होणे तेवढेच गरजेचे आहे. शिक्षकांचा सन्मान हाच त्या देशाचाही सन्मान आहे यात शंका नाही. त्यामुळं सर्वांना सांगणं आहे की त्यांना त्रास देवू नये. त्यांचा यथोचीत सन्मान करावा आणि त्यांना कुठेही आणि केव्हाही अपमान करु नये. खरं तर शिक्षणाबद्दल जसा आपल्याला आदर दिसतो. तसाच शिक्षकांबद्दलही आदर असायलाच हवा व तो कृतीतही तेवढाच दिसायला हवा.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०