स्वातंत्र्य खरंच आहे काय? Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वातंत्र्य खरंच आहे काय?

स्वातंत्र्य खरंच आहे काहो?

भारत माझा देश आहे. असं आपण नेहमी बोलतो. कधी प्रतिज्ञाही घेतो आणि मानतोही की भारत माझा देश आहे. परंतु भारताबद्दल असा विचार करतांना खरंच भारताला आपण आपला देश मानतो का? असा विचार केल्यास त्याचे उत्तर नाही असेच येईल. त्याचं कारण म्हणजे आपल्या देशाची वास्तवात घडत असलेली परिस्थिती. ही परिस्थिती एवढी बेकार स्वरुपाची आहे की त्याचा आपण विचार करुच शकत नाही.
भारत माझा देश आहे असे आपण म्हणतो. मग आपण आपलं समजणा-या याच भारतातील बांधवांना किती मदत करतो. साधा एखादा अपघात झालाच तर सगळेच त्या अपघातावेळेस धावून जात नाहीत. काही तर केवळ बघ्यासारखेच पाहात असतात आणि काही लोकं तसेच पाहातही नसतात. तसंच जेव्हा काही अपराधीक गुंड प्रवृत्तीची माणसं एका स्त्रीवर बलात्कार करीत असतात. तेव्हा ना कोणाच्या मनात त्या स्रीबद्दल आपुलकीची भावना जागृत होत, ना त्यांना भारत आपला देश आहे हे समजत. जणू ती स्री म्हणजे त्यांना त्यांच्या गळ्यातील ताईतच वाटते. जेव्हा विचार आला तेव्हा तिच्यावर बलात्कार करायचा आणि जेव्हा विचार आला तेव्हा तिला छळायचं. यालाच का स्वतंत्र्यता समजायची? हेच का स्वातंत्र्य? अन् यासाठीच का त्या हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करलं? आज स्री छळली जाते. आज गरीब माणसांना छळलं जातं. आज कित्येक अस्पृश्यांना छळलं जातं. उभा मणीपूर पेटवला जातो. मणीपुरात कित्येक स्रियांवर त्यांना नग्न करुन अत्याचार केला जातो. त्यानंतर दिनदहाडे गोळ्या चालवून त्यांची हत्याही केली जाते आणि प्रमाण दिलं जातं की ही कुकी व नागा जाती आहे. ज्यांना मणीपूरच्या राजानं आपल्यावर झालेलं आक्रमण थोपविण्यासाठी बोलावलं होतं. जे पहाडावर अफू व गांजाची लागवड करतात. परंतु मला म्हणायचं आहे की अत्याचारासाठी स्रीयाच मिळतात का? त्यांनी काय बिघडवलं पुरुषाचं. मग ती मणीपूरची असो की इतर भारतातील कोणत्याही भागातील. याला स्वातंत्र्य म्हणता येत नाही. आज देशात शेतक-यांचा मोर्चा तोडला जातो. उद्योगपतींना या देशात मालामाल केलं जातं. महागाई वाढवली जाते. कित्येक माणसांना उघड्या डोळ्यांनी दिसतं. परंतु त्याला विरोध करता येत नाही. कारण आपण आपल्या परीवाराचे गुलाम आहोत. आपला परीवार आपल्याला सांगतो की काही बोलू नका. नाहीतर संक्रात आपल्याच घरापासून सुरु होईल. खरं आहे. परंतु आपण गप्प राहिल्यास खरंच संक्रात आपल्याच घरापासूनच सुरु होवू शकते यात शंका नाही. तशी एक वेळ येते. मग बाकीचेही मंडळी बघ्यासारखीच पाहात असतात. यावेळेस आपण विचार करायला हवा की काल आपल्याला स्वतंत्र्याचा दिवा दाखविणारा आपल्याच देशातील भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनाही परीवार होताच आणि त्यांच्याही परीवारानं म्हटलंच असेल की कशाला इंग्रजांशी वैर करता? आपण सुखी आहोत ना. अन् ते ऐकून ते इंग्रजांशी लढले नसते व फाशीवर गेले नसते तर आज चित्र काही वेगळंच असतं. आज आपण स्वतंत्र्य नसतोच. आज आपण स्वतंत्र्य आहोत. म्हणूनच आपल्याला एका अबलेवर बलात्कार करता येतो आणि एका अस्पृश्याला छळता येते. एवढंच नाही तर गरीबांनाही छळता येतं.
काही लोकं स्वातंत्र्याचा एवढा गैरफायदा घेतात. त्यांना वाटते की सर्व माझ्याच धाकात राहावेत. त्यामुळंच स्वातंत्र्य कोणाला मिळालं? असा प्रश्न केल्यास मोजक्याच लोकांना असं म्हणता येईल. याबाबत एक प्रसंग वर्णितो. याबाबत गत काही दिवसापुर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता व्हाट्सअपवर. त्या व्हिडीओत एका स्रीला दोरानं झाडाला बांधून ठेवलं होतं व तिला तिच्या सभोवताल असलेले नराधम चांगल्या जाड काठीनं जोरानं मारत होते व ती जिवांच्या आकांतानं रडत होती. प्रसंग होता विवाहाचा. ती गावातील तरुणी होती व तिनं एका गावातीलच तिच्या जातीच्या नसलेल्या तरुणावर प्रेम केलं होतं व ते दोघंही विवाह करु पाहात होते. परंतु गावातील लोकांना तो प्रेमविवाह मंजूरच नव्हता. प्रसंग असा की एका चित्रपटाला शोभेल असा.
जग कुठल्या कुठं पोहोचलंय. एकीकडे तरुणी अवकाशात जातात. काही तरुणी मोठमोठ्या हुद्यावर आहेत. एक स्री राष्ट्रपती बनलेली आहे आणि दुसरीकडे एका तरुणीला अमूक जातीवर प्रेम केलं व विवाह करु पाहते म्हणून छळलं जात आहे. यालाच आपण स्वातंत्र्य म्हणायचं काय? स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर जातीभेद मिटेल. असं वाटलं होतं. परंतु नाही. इथं एका स्रीला आपल्या मनानुसार जोडीदारही निवडता येत नाही. असं हे स्वातंत्र्य. एका स्रीला रात्री अपरात्री बिनधास्त फिरता येत नाही. असं हे स्वातंत्र्य. ज्या देशाला पुरातन इतिहास लाभला आहे जोडीदार निवडीचा. पुर्वी भारतात जोडीदार निवडतांना स्वयंवर होत असे. आता कोणी म्हणतील की या देशाला भारत तरी म्हणत होते काय? व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. तसंच महाभारत काळात तरी स्वातंत्र्य होतं. कारण त्या काळात एका मत्सकन्येला म्हणजेच सत्यवतीला महाराजा शांतनूशी विवाह करता आला अन् आज एका स्रीला परजातीशी विवाह करता येत नाही. ही शोकांतिका? यावरुन स्वातंत्र्याची कल्पना येते.
हा देश असा आहे की ज्याचेवर अत्याचार होतो. त्यालाच चूप राहायला सांगीतलं जातं. त्याला बोलताच येत नाही. तो बोलायला गेलाच. तर त्याला खुनाची धमकी दिली जाते. तरीही तो बोललाच तर त्याचा मुडदा पाडला जातो. अन् ते नाही जमलं तर किरकोळ स्वरुपात दुखापत केली जाते. ज्याला अर्धा खुन अर्थात हॉप मर्डर म्हटलं जातं. त्यातही समजा त्या हॉप मर्डरची केस दाखल केलीच तर हॉप मर्डर होवूनही केवळ पुराव्याअभावी वकिलांच्या जोरावर आरोपी सुटतो आणि तो सुटताच तो उलटा चोर कोतवाल को दाटे या युक्तीवादाने उलटफेर वकीलांच्या मदतीने आपली बदनामी केली असा अर्ज न्यायालयात दाखल करुन आधीच खटला टाकणा-या पक्षकाराला तो निर्दोष असूनही न्यायालयाच्या कठड्यात उभा करतो व आपल्या वकिलामार्फत त्याला तो निर्दोष असतांनाही पैशाच्या जोरावर खोटे पुरावे उभे करुन व सादर करुन त्याला तुरुंगात टाकतो आणि बिचारा निर्दोष असलेला पक्षकार आपोआपच पैशानं म्हणा की अशा कायद्याचा गैरवापर झाल्यानं जाळ्यात फसतो. ही वास्तविकता आहे. या देशात अस्पृश्यावर अत्याचार होतात. ते खटले न्यायालयात चालतात. दोन्ही बाजुतून वकील लढतात. पुराव्याअभावी अस्पृश्य हारतात. मग उलटफेर पुन्हा खटले चालतात आणि त्यात अस्पृश्यांना वकीलांच्याच माध्यमातून हारवलं जातं. यात मोठी हिंमत करुन अस्पृश्य केस तर टाकतात आणि मोठ्या जिकीरीनं लढतातही. परंतु जेव्हा ते खटले हारतात व त्यांच्यावर उलटफेर असे खटले उलटा चोर कोतवाल को दाटे अंतर्गत उभे ठाकतात. तेव्हा मात्र विचार येतो. विचार येतो आणि म्हणावंसं वाटतं की यालाच स्वातंत्र्य म्हणावं का? हेच सुरु आहे गरिबांच्या बाबतीतही. खुद्द न्यायालयातही न्याय मिळत नाही.
आज स्वातंत्र्य आहे. स्वैराचार नाही. कोणालाही कसंही वागता येत नाही. वागवलं जात नाही. अन् तसं वागवलंच तर त्याची दाद न्यायालयात मागता येते. राजा नाही. राजपद नाही. प्रतिनिधित्व सरकार आहे. ज्या सरकारला आपण निवडणूकीच्या माध्यमातून निवडून आणतो. इथंपर्यंत बरोबर आहे. परंतु हे स्वातंत्र्य खरं वाटत नाही. कधीकधी स्वातंत्र्याचा अर्थ हा खोटाच वाटतो. असं वाटतं की हे स्वातंत्र्य पैसेवाल्यांचं वा उद्योगपतींचं तर नाही. कारण अशा ब-याच गोष्टी आहेत की ज्या त्यांच्याच हिताच्या घडतात. त्यांनाच कायद्याचं संरक्षण मिळतं आणि त्यांच्याच घराकडे दिवाळी साजरी होतांना दिसते. कधी वसंत येतो तर कधी श्रावणही त्यांच्याच घराकडे उजळतो. ते अत्याचार करु शकतात आणि पैशाच्या जोरावर न्यायालयातून निर्दोष सुटूही शकतात. त्यांच्या घरी कधी संक्रात दिसत नाही. होळी तर नाहीच नाही आणि शिशीरही नाही. परंतु गरीब, अस्पृश्य आणि स्री वर्गाकडे जास्त पैशाची रेलचेल नसल्यानं स्वातंत्र्य तिकडे फिरकतच नाही असं दिसतं. त्याचबरोबर दिवाळी दसरा नसते. कधीकधी वसंत येतो. नवी उमेद घेवून. परंतु त्याचं रुपांतर लवकरच शिशीरात होते. तोच वसंत कधी संक्रात घेवून येतो तर कधी होळी घेवून येतो. त्यावेळेस अशी भीती वाटते की कदाचीत पारतंत्र्य तर जवळपास नाही ना.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आज देशात स्वातंत्र्यच आहे. परंतु या स्वातंत्र्याचा उपभोग गरीब, स्री व अस्पृश्यांना घेता येत नाही. ज्याचेजवळ पैसा आहे. तोच घेत असल्याचं चित्र पावलोपावली दिसतं. हे असंच सुरु राहिलं तर उद्या पुन्हा एकदा पारतंत्र्य येईल अशी भीती वाटते व पुन्हा एकदा या तिनही वर्गांना स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल असे वाटते. ही वास्तविकता आहे. परंतु असं जरी वाटत असलं तरी मुळात मिळालेलं स्वातंत्र्य कसंही का असेना, उपभोगावं. त्याचा स्वैराचार होवू देवू नये म्हणजे झालं. तसंच कुणालाही त्याचा स्वैराचार करु देवू नये म्हणजे झालं एवढंच या स्वातंत्र्यावर सांगणं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०