pageant information books and stories free download online pdf in Marathi

तमाशा माहिती

तमाशा ; अलिकडे लोप पावत चाललेला प्रकार?

*आज तमाशा हा प्रकार लोप पावत चाललेला असून आता या प्रकाराला जुन्या लोकांचा प्रकार असं समजलं जातं. तसाच हा प्रकार रात्रभर चालत असल्यानं कोण रात्र जागवेल असंही मनामनात बसतं. शिवाय सरकारनं माईक वाजवायला रात्री दहा वाजतानंतर बंदी घातलेली आहे. त्यानंही या प्रकाराला बंदीस्त करुन टाकलेलं आहे. त्यामुळंच त्याच्या उपयोगीतेवर प्रश्नचिन्हं उभं राहिलेलं आहे. त्यामुळं पुढील काळात हा प्रकार पुर्णतः लोप पावेल की काय ही भीती जनमाणसाला पडलेली आहे. ती भीती नाकारता येत नाही. त्यादृष्टीनेच त्याप्रकाराचा घेतलेला आढावा. लेख काहीसा माहिती संकलनातून आहे.*
सतराव्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये तमाशा हा अतिशय लोकप्रिय असणारा कलाप्रकार अस्तित्वात आला. हा कलाप्रकार सिद्ध होण्यापूर्वी महाराष्ट्रात गोंधळ, जागरण, बळीराजा आणि महासुभा, ज्योतिबा यांच्या कार्याची जागृती पर गीत गायन जागरण, वाघ्यामुरळी, दशावतार, बहुरूपी, वासुदेवाची गाणी, पोतराज इ. लोककलाप्रकार प्रचलित होते. त्यानंतर तमाशा आला व तमाशातील अंग लोकांना कळायला लागली. तमाशा हा गण, गौळण, लावणी, बतावणी आणि वग अशा पाच अंगांनी समृद्ध झालेला आहे.
'तमाशा' हा शब्द अरबी असून त्याचा अर्थ 'प्रेक्षणीय दृश्य' असा आहे. तमाशाच्या नायकांना असलेली 'शाहीर' ही संज्ञाही मूळ 'शायर' किंवा 'शाहर' या अरबी शब्दापासून बनलेली आहे. तमाशाचे आणि नायकाचे नाव अरबी असल्यामुळे हा तमाशा मुसलमानांच्या प्रभावातून उदय पावला असावा, असं काही विद्वानांचं मत आहे. तसंच 'तमाशा' हा शब्द मूळचा मराठी भाषेतील नसून तो उर्दूतून मराठीत आला आहे.
१३ ते १४ व्या शतकात दक्षीण भारतात मुसलमानी अंमल सुरु झाल्यापासून तो मराठीत आढळतो. एकनाथांच्या एका भारुडात 'बड़े बड़े तमाशा 'देखें' अशी ओळ आहे. अशी माहिती तमाशाच्या जन्माविषयी सापडते.
१८ व्या शतकाच्या सुरुवातीला वीरांच्या विषयवासनेवर उतारा म्हणून जन्मलेला हा खेळ, १९ व्या शतकाच्या सुरुवातीला भक्ती, नीती, ब्रह्मज्ञान यात टाकण्यात आला. म्हणजे तमाशाचे हाड शूरवीरांच्या शृंगाराचे, तर मांस सात्त्विकतेचेच टाकले असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. हाडाचे वळण आणि मासांने दिलेला आकार यांनी प्रकृती बनते, तसे शृंगाराच्या हाडाने आणि सात्त्विकतेच्या मांसाने तमाशाचे शरीर बनले आहे. सध्याच्या तमाशाच्या गाडीचे एक चाक शृंगाराचे तर दुसरे ब्रह्मज्ञानाचे आहे. या दोन्ही चाकांना जोडणारा कणा शूरवीरांच्या पराक्रमाचा असतो.
साधारणपणे असे तमाशाचे स्वरुप आहे. तमाशाचे खरे स्वरुप जरी पेशवाईतच उत्तर पेशवाईतच उदयास आले असले तरी तो प्रकार महाराष्ट्रात पूर्वीपासूनच अस्तित्त्वात होता. आज तमाशातून ते शुरवीरांचे पोवाडे जास्त करुन दिसत नाहीत की ज्यांचे पोवाडे पुर्वी गायले जायचे.
तमाशांचं आयोजन राजा करीत असे. राजा ते आयोजन करीत असतांना त्यात दोन हेतू ठेवत होता. पहिला हेतू असायचा, तो म्हणजे पोवाडे गायल्यावर सैनिकांना प्रेरणा मिळेल व ते नवजोशानं शत्रूंशी लढतील. कारण तमाशाचे जे गण पाडले होते. त्यात पोवाड्यांचाही समावेश होता व ते पोवाडे शुरविरांचे गायले जात असत. शाहीर हा हुबेहूब शुरविरांचे पोवाडे गात असत.
तमाशाचा दुसरा हेतू होता. तो म्हणजे मनोरंजन. सैनिक जेव्हा एखाद्या लढाईतून विजय मिळवून परत येत. तेव्हा ते थकलेले असायचे. तेव्हा त्यांचं मनोरंजन व्हावं या हेतूनंही तमाशे आयोजीत केले जायचे.
आज तमाशाचं स्वरुप पुर्णच बदललेले आहे. आज तमाशात शुरविरांचे पोवाडे कमी दिसतात. परंतु जे ही दाखवलं जातं. ते कामाचं व सुधारणेच्या दृष्टिकोणातून दाखवलं जातं. अपेक्षा केली जाते की समाज सुधरावा. त्यानुसार एखाद्या व्यक्तीची हत्या का केली? माणसानं कसं वागावं? यावर आधारीत घडलेल्या सत्य घटनेवर आजचे शाहीर पोवाडे तयार करुन त्याचं सादरीकरण हुबेहूब करुन घेतात. असं वाटतं की ती कथा खरोखरच घडत आहे.
तमाशाचे काही गणंही पडतात. तमाशाची सुरुवातच गणाने म्हणजेच गणपतीला आवाहन करुन होते.. 'अथर्वशीर्षात 'गं' काराची उपासना आहे. ज्ञानेश्वरांनी या 'गं' काराला व्यवहारी भाषेत गण असे नाव देऊन त्याला ईश आदि अशा शब्दांनी 'भावार्थदीपिकेत' नमन केले आहे. शाहिरांनी गण हा शब्द तसाच ठेवला आणि 'गणापूत झाली सारी उत्पत्ती' असे म्हटले. प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात गणेशपूजनापासून करण्याची आपली परंपरागत प्रथा आहे. म्हटलं जातं की गणपती ह्या देवतेला पुजा सुरुवातीला केल्यास आपले विघ्न टळतात व आपल्या संबंधीत कार्यात बाधाच येत नाही. तीच गणाच्या रुपाने तमाशात रूढ झाली. आजही समाजामध्ये प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही विघ्नहर्त्या विनायकाची पूजा अथवा नमन करुनच होताना दिसते. तमाशातही प्रत्येक खेळ निर्विघ्न पार पडावा म्हणून गणेशाला गणातून नमन अथवा आवाहन केले जाते.
शाहिरात पुर्वी दोन प्रकारचे आध्यात्मीक विचार प्रवाह होते. आजही आहेत. शिव किंवा ब्रह्म यांना श्रेष्ठ मानणारे 'तुरेवाले' तर शक्ती व माया यांना श्रेष्ठ मानणारे 'कलगीवाले' हे आपापल्या परीने आपल्या दैवतांचे स्तवन करीत 'गण गाताना हे शाहीर प्रतिपक्षाला उद्देशून धाक वैन्याला किंवा अपयश द्यावे दुष्मनाला अशी भाषा वापरीत. अर्थात श्रोत्यांनी गण ऐकल्याबरोबर तो गाणारा शाहीर कोणत्या पक्षाचा आहे, याची कल्पना श्रोत्यांना येत असे. हा गण सादर करताना म्हणण्यात येणाऱ्या काव्यास 'गणाची लावणी' असे म्हटले जाते. ज्या काळात तमाशा उभारीस आला तो काळ पेशवाईचा आणि पेशवे गजाननाचे भक्त होते आणि तमाशा हे शेवटी आध्यात्मीक बीज असणारे लौकिक लोकनाट्य असल्याने गणातून गणपतीची आराधना करण्यास प्रथम प्राधान्य मिळाले.
तमाशा सादर करत असताना गणानंतर गौळण सादर झाली. या गौळणीचे मूळ ज्ञानेश्वरापर्यंत जाऊन पोचते. त्यांनी आध्यात्मीक गौळणी लिहिल्या. तमाशात मात्र आध्यात्मातूनही शृंगार दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. महाभारत काळात श्रीकृष्ण मथुरेला दही, दूध, तूप, लोणी घेवून जाणाऱ्या गौळणींना अडवत असे आणि त्यांच्याकडून लोणी घेत असे हे सर्वज्ञातच आहे. तोच संदर्भ येथेही येतो. तमाशातील श्रीकृष्णही मथुरेला जाणाऱ्या गौळणींना अडवतो. गौळणीमध्ये राधा व इतर गौळणींची कृष्ण व त्याचे सवंगडी त्यामध्ये प्रामुख्याने पेंद्या छेडछाड करतो. त्यातूनही विनोद निर्माण होतो. गौळणीतील मावशी आणि पेंद्या, मावशी आणि कृष्ण, मावशी आणि इतर गौळणी यांच्यातील बोलणं अतिशय चटकदार आणि द्व्यअर्थी असतं. हे पूर्णपणे करमणूकप्रधान संवाद असतात. सर्व गौळणी, मावशी कृष्णाची विनवणी करतात. शेवटी कृष्ण आपले अस्सल दान म्हणजेच तमाशातील 'गौळण' मिळाल्यानंतर सर्व गौळणींना जाण्याची अनुज्ञा देतो आणि गौळण संपते.
तमाशात लावणीलाही मोठे महत्व आहे. प्रत्येक तमाशात एक दोन लावण्या असतातच. हा तमाशातील अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. लावणी या शब्दाचा संबंध काहीजण संस्कृतमधील लापणिके शी लावण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक शेतीमध्ये ज्याप्रमाणे भाताच्या रोपाची लावणी असते. तशी अक्षरांची शब्दांची एकापुढे एक लावलेली रचना म्हणजे 'लावणी' अशी निर्मिती सांगून 'लावणी'च्या निर्मितीचा संबंध श्रमपरिहारार्थ झाला असावा असे सांगतात. ती समूहमनाचे रंजन करण्यासाठीही जन्मल्याचे सांगीतले आहे. लावणीचे विषय वेगवेगळ्या स्वरुपाचे असतात. यात पौराणीक, आध्यात्मीक, सामाजीक, काल्पनीक तसेच स्त्री-पुरूष सौंदर्यवर्णन, शृंगार, विरह, वियोग, रूसवे फुगवे इत्यादी विषय हाताळले जातात. परंतु या सर्व विषयातील शृंगारावर आधारित असणाऱ्या लावण्यांची संख्या जास्त असल्याने लावणी म्हणजे शृंगार अशी धारणा झाल्याचे दिसते.
बतावणी, ह्या प्रकारालाही तमाशात अतिशय महत्व आहे. नाटकाची लांबी वाढविण्यासाठी किंवा गंभीर नाटकात प्रेक्षकांना हसविण्यासाठी फार्स रंगभूमीवर होऊ लागले. समाजातील व्यंगावर यामधून बोट ठेवले जाई. ते ही विनोदाच्या साह्याने. तमाशातील फार्समध्ये बहुतांशी 'तात्या' आणि 'बापू' ही दोन पात्रे असतात. पुढे सादर होणाऱ्या वगातील पात्रांची रंगरंगोटी होईपर्यंतच्या वेळात बतावणीचे सादरीकरण होत असे. 'तात्या' आणि 'बापू' दोघेही विनोदासाठी चुटक्यांचे किंवा शापांचे सहाय्य घेऊन प्रेक्षकांना हसवत. जर पात्रांचे कपडे बदलवायचे असेल तर त्याला पुरेसा वेळ लागत असे. त्या वेळात कधी ढोलक मास्तर तर कधी खंजेरीवाला असा तात्या वा बापू बनून यायचा व लोकांचं मनोरंजन करायचा.
तमाशातली फार्स किंवा बतावणी संपल्यानंतर वगाचे सादरीकरण होते. तमाशातील नाट्य खऱ्या अर्थाने वगामध्ये पहावयास मिळते. 'वेग' हा शब्द 'ओघ' या शब्दाचा अपभ्रंश असावा, कारण ग्रामीण भाषेमध्ये 'ओघ' ऐवजी 'वग' या शब्दाचा वापर केल्याचे आढळून येते. तर 'सातवाहन राजा हाल याच्या गाथासप्तशती या ग्रंथामध्ये 'वग्ग' हा शब्द समूह कळप या अर्थानी वापरला असल्याचे दिसते. या 'वग्ग' या शब्दापासून वग हा शब्द रूढ झाला असावा. कारण तमाशातील वगाची निर्मिती किंवा प्रत्यक्ष प्रयोग समूहमनाच्या किंवा प्रत्येक पात्रांच्या स्वतंत्र प्रतिभेचे एकत्रीकरण असते म्हणून ती समूहनिर्मिती ठरते. वगाचे स्वरूप हे नाटकाप्रमाणे असते. संवाद, पात्रे नाटकाप्रमाणेच असतात. वगाची कथा ठरलेली असते. पण प्रत्येक पात्राच्या तोंडचे संवाद मात्र स्वयंस्फूतीने किंवा हजरजबाबीपणाने अभिव्यक्त होतात. तमाशाचा साधारणपणे उत्तरार्ध म्हणजे वग. वगाची लिखित संहिता नसते पण स्थूल कथा प्रत्येक पात्राला ज्ञात असते. पात्रे स्वयंस्फूर्तीने पण कथेला अनुसरून संवाद म्हणत असतात. सरदार किंवा तमाशाचा प्रमुख संवादामध्ये सुसूत्रता राखून कथेला गती प्राप्त करून देत असतो. विमुक्त संवाद, अभिनय, नृत्य, संगीत यांच्या माध्यमातून वगाचा प्रयोग सिद्ध होतो.
वरील स्वरुप बाबी ह्या पात्राबाबतच्या आहेत. मात्र तमाशातील मुख्य बाब म्हणजे वाद्य. वाद्यात ढोलकी, तुणतुणे, हलगी किंवा कडे आणि झांज या चारींच्या वाद्यमेळ्यात नाचीच्या पायातील चाळांचीही भर पडते. या प्रत्येक वाद्याची माहिती पुढीलप्रमाणे.
ढोलकी हे तमाशातील महत्त्वाचे वाद्य आहे. दक्षिणेतील मृदुंग, खोळ याहून ती वेगळी आहे. मृदंगाचे एक टोक लहान करत नेलेले असते. तसेच तमाशातील ढोलकीचे काहीवेळा ते थोडेसे लहान केलेले दिसते. मृदंगाच्या आवाजात एक दमदारपणा आहे. तर ढोलकीत कडक फडकतेपणा आहे. साधारण दोन-सव्वादोन फूट लाकूड पोखरून हे खोड बनविलेले असते. हे खोड बहुधा शेळी, बोकड यांच्या निम्म्या कमविलेल्या कातड्याने मढविलेले असते. धिमपुडा रुंद आणि शाईपुडा अरुंद असतो. बऱ्याच वेळा तमाशाची ढोलकी सरळ समारंतरही असलेली आढळते. शाईकडचा पुडा लोखंडी कड्यावर आवळलेला आणि तो धिमपुड्याला सुताच्या दोरीने जखडलेला असतो. तमाशा ढोलकीचा स्वर दोरीच्या तिढ्यात बारीक खुंट्या घालून, त्यांनी दोरीचा पीळ वाढवून खालीवर नेलेलंअसतं. तसेच तुणतुणे. तुणतुणे लाकडी मापट्याला, खालच्या तोंडाला कातड्याने मढवून तयार केलेले असते. मापट्याच्या मध्यावरून बारीक तार वर घेतलेली असते. मापट्याच्या बाजूला दोन-अडीच फुटाची तिरकस दांडी बसवून तिच्या वरच्या टोकाच्या खुंटीला ती तार गुंडाळलेली असते. ही दांडी हातात धरुन, त्याच हाताच्या बोटाने नखाने तुणतुणे वाजवतात. तुणतुण्याच्या टोकाला रंगीत रुमाल बांधलेला असतो. तुणतुणे वाजविणारा सुरत्या असतो. गाण्याचे पालुपद पुढे चालवीत तो तुणतुणे वाजवत असतो. तसंच हलगी हे वाद्य. हे वाद्य शाहिरांच्या डफापासून तमाशात आले. पण डफापेक्षा हलगीचा आवाज कडक आणि टणक असतो. हे एक साधे वाद्य आहे. साधारण: मोठ्या ताटाच्या आकाराचे हे वाद्य लाकडी किंवा लोखंडी कड्यावर कातडे मढवून तयार केलेले असते. तमाशात विशिष्ट प्रसंगीच या वाद्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे तमाशात कडाक्याचा रंग भरला जातो. तमाशाच्या मुख्य सरदाराजवळ ही हलगी असते. ही हलगी तो छातीच्या डाव्या बाजूला उभी धरून तिच्यावर उजव्या हाताची थाप देऊन वाजवितो. हलगीच्या खाली तो डाव्या हाताच्या पंजाने बोटात लहान काडी धरून त्या काडीने हलगीवर आघात करूनही तो हलगी वाजवितो. त्यामुळे काडीच्या आघाताने व उजव्या हाताच्या थापेने हलगीतून कडक आवाजाचे संगीत निर्माण होते. या हलगीला 'कडे' असेही म्हणतात.
झांज.......झांज हे घनवाद्य प्रकारात येते. झांज हे वाद्य पितळ या धातूपासून बनविले जाते. दोन चकत्या पितळ या धातूपासून तयार करून त्या एका दोरीच्या दोन टोकांना बांधतात. या दोन चकत्यांचा एकमेकांवर विशिष्ट पद्धतीने आघात केला की निर्माण होतो. हे वाद्य सहाय्यक वाद्य म्हणून वापरले जाते. याचा वापर जास्त करुन भजनात होतो. हे वाद्य देखील तमाशात पुर्वी वापरले जात असत.
तमाशा हा एक लोकप्रिय खेळ असून अलिकडील काळात लोकांना तमाशा हा प्रकार आवडत नाही व विचार केला जातो की हा प्रकार म्हाताऱ्या लोकांच्या मनोरंजनाचा प्रकार आहे. परंतु महत्वपुर्ण गोष्ट ही की हा प्रकार मनोरंजनाचा प्रकार नसून या प्रकारातून एखाद्या नवीन घटनेची हुबेहुब माहिती देता येते. तेही जिवंत. शिवाय हाताला काम मिळतं ते वेगळं. त्याच दृष्टीकोनातून तमाशाचं महत्व आहे. तसंच पुर्वीच्या काळात लढाया लढल्या गेल्या व जिंकता आल्या. त्याचं महत्वपुर्ण कारण तमाशाच होतं हेही विसरुन चालणार नाही.
विशेष बाब ही की व लोकांनी तमाशा पाहावा किंवा पाहू नये. परंतु कोणालाही तमाशा पाहात असतांना त्यापासून परावृत्त करु नये म्हणजे झालं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५० (माहिती संकलक)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED