बंद दरवाजा Balkrishna Rane द्वारा मानवी विज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बंद दरवाजा

बंद दरवाजा

हर्षदा घाईघाईने जीना चढली. तिने दरवाजा वाजवला.पण आतून प्रतिसाद आला नाही. ती थोडी घाबरली. सत्यभामा आजी आजारी तर नाही ना? असा प्रश्न तिला पडला.तीने पुन्हा दरवाजा वाजवला.
" येते ग बाई..जरा धीर धर." आतून आजीचा आवाज आला.
हर्षदाच्या जीवात जीव आला.संथ पावलांचा आवाज जवळ येत गेला.दरवाजा उघडला. आज हर्षदाला आजीचा चेहरा थोडा मलूल वाटला.डोळे ओढल्यासारखे वाटत होते.
" आजी , बर वाटत नाही का? रात्री झोप लागली नाही का?"
" मला काय धाड भरलीय? काल झोप लागेना..
उगाचच भूतकाळ आठवू लागला..त्या गोड-कडू आठवणीत ..कूस बदलत राहिले . बाकी काही नाही. "
" आजी जे घडून गेल ते आता आठवून काय उपयोग?" हर्षदा म्हणाली.
" होय ग बाई..."
हर्षदाने यापूर्वी आजीच्या भूतकाळाबद्दल
तिच्याकडूनच ऐकल होत.आजीच माहेर गोवा- पेडणे महालातील पालये गावातल.तिच लग्न एकोणीसाव्या वर्षी तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या सुधाकरशी झाल होत. सुधाकर कारवारच....पण नोकरीनिमित्त पेडण्यात राहायचा.दोघांच्या विचारात..अन् अनुभवातही फरक पण सत्यभामान तक्रार न करता
संसार केला.दोन मुल झाली पण लग्नाच्या नवव्या वर्षी सुधाकरचा एका अपघातात मृत्यू झाला. दोन लहान मुलाना संभाळत तिने काळाशी आणि समाजाशी टक्कर दिली.बार
मॅट्रीक पास असलेल्या सत्यभामेला तिच्या नवर्याच्याजागी बॅंक ऑफ इंडियात नोकरी मिळाली.लवकरच तिची कारवारात बदली झाली.कन्नड बहूल परीसरात तिच घर होत.पण सुखाचे दिवस येताहेत अस वाटत असतानाच ...नियतीने दगा दिला. तिचा मुलगा रितेश अमेरिकेला साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून गेला तो परतालाच नाही.मुलगी निता नवर्यासोबत सिंगापूरला गेली .आज दोघांचा साधा फोनही येत नव्हता. खर म्हणजे आज तीला आधारची नितांत आवश्यकता होती.पण हा आधारच हरवला होता. सत्यभामा आजीने हर्षदाच्या कुटुंबाला आपल्या माडीच्या घरात भाड्यान जागा दिली होती.आपल्याला कुणाचीतरी सोबत मिळेल हाच तिचा उद्देश होता.
हर्षदा व आजीची गट्टी छान जमली होती. हर्षदा आजीकडून बर्याच गोष्टी शिकली होती.आजीला बर नाही हे लक्षात येताच हर्षदा काळजीत पडली.
" आजी , डाॅक्टरला बोलावू का?"
" छे..ग..छोट्या-छोट्या गोष्टींसाठी डाॅक्टर कशाला?"
तो दिवस...थोडा रटाळ व कंटाळवाणा गेला. हर्षदा काॅलेजमधून दुपारी आली.त्यानंतर ती संध्याकाळी बीचवर मैत्रिणींसोबत फिरायला गेली.आल्यावर ती आजीची चौकशी करायला माडीवर गेली.आजी आरामखुर्चीवर बसून खिडकीतून दिसणार क्षितिज न्याहाळत बसली होती.हर्षदाची चाहूल लागतच ती म्हणाली..
" ये..ग...मला वाटल तू मला विसरलीस की काय ?"
" हे काय आजी? मी तूला कशी बरी विसरेन....?"
" ती दूर गेलेली माझी कोकर ..आपल्या आईला विसरलीच ना?...जाऊ दे ग. मी आपली गंमत केली."
" पुन्हा नका अशी...गंमत करू. आणि हो मी आज रात्री तुमच्या सोबत झोपायला येणार..चालेल?"
" अग..चालेल...काय ..मला आवडेल.
खूप गप्पा मारू रात्री. ऐ पण तू शिरा खाणार? मी केलाय."
" शिरा! व्वा...मी..मी..घेते." हर्षदा धावतच आजीच्या स्वयंपाकघरात शिरली
त्या रात्री जेवल्यानंतर हर्षदा आजीसोबत झोपायला आली. आजी आज खूपच खुषीत होत्या. ती गोव्यातल आपल लहानपण....शिक्षण..
यावर खूपच बोलली.तेरेखोल नदी ...समुद्र किनारे..पात्रांव..तरी(होडक)....ताजे मासे...पेडण्याच्या भगवतीचे जत्रोत्सव...वैगेरे. हर्षदालाही खूप गंमत वाटली.
सकाळी हर्षदाला उशिरा जाग आली. आजी खिडकीजवळ उभी राहून हातवारे करत डुलत होती.हर्षदाला आश्चर्य वाटल.आजी नेमकी काय करतेय.हर्षदा धडपडत उठली.
" आजी...!"
"हर्षदा...,कुणीतरी रेडिओ लावलाय...छान मराठी गाणी लागलीयत....नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा...नाच."
आजीने चक्क दोन उड्या मारल्या ती खुपच उत्साहात होती.
" आजी....कुठ गाणी लागलीयत? मला तर काहीच ऐकू येत नाहीय."
" ये ...तू ना कान तपासून घे...बहिरी झालीस काय? हे हे ऐक जरा .... ढगांशी वारा झुंजला रे...ऐकलस?"
आजी गात होती..तिचा आवाजही छान होता.
"
हर्षदा विचारात पडली.खरच तिला काही ऐकू येत नव्हते. शिवाय मराठी गाणी...इथ चूकून ऐकायला येतात.
" अरेच्चा...कुणीतरी रेडिओ बंद केला....किती वर्षांनी छान बालगीते ऐकली मी..लहानपणी आमच्या घरी रेडिओवर...सकाळी ही गाणी लागत.मी नाच रे मोरा...या गाण्यावर नाचायची...बाबा कौतुकाने बघत राहायचे."
हर्षदाला काहीच कळल नाही.तिला वाटल आजीला भास होतायत. त्यानंतर हर्षदा काॅलेजला गेली.आज तिच्या काॅलेजमध्ये सायकाॅलाॅजीवर सेमीनार होत. येणार्या पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारी तिच्यावर होती.तीन वाजता ती परतली.जेवण करून ती तडक आजीकडे गेली.
" तूच कर्ता आणि करविता
शरण तूला रे मी भगवंता...
आजी गुणगुणत होती.हर्षदा दचकली.आजी कालपासन मराठी गाणी गुणगुणत होती.हर्षदाने गेल्या दोन वर्षे आजीला मराठीत बोलताना...किंवा गुणगुणतांना ऐकल नव्हते.आज आजीचा चेहरा उजळला होता.
" आजी कसल गाण म्हणताय..?" हर्षदाने विचारले.
" भक्तीगीत आहे....सकाळ सारखीच कुणीतरी रेडीओ किंवा मोबाईलवर गाणी लावलीत. इथ कोणी मराठी कुटुंब राहायला आलय का?"
" नाही....इथ आपण सगळे कन्नड बोलणारे राहतो."
" पालयेत ग्रामपंचायतीत सायंकाळी लाऊडस्पीकरवर गाणी लावत...तिथे हे गाणे वाजे..या गाण्यानंतर...आपल्या सोहिरोबानाथंच...
हरीभजनाविण काळ घालवू नको रे..हा अभंग वाजयचा. अरेच्चा हा काय ...बघ चालू झालय...छान ऐकू येतोय.."
" मला...मला...तर काहीच ऐकू येत नाहीय.
हे अस काय होतय." हर्षदा पुटपुटली.
आजीला..म्हातारचळ...तर लागल नाही ना? की तिला....एखादा मानसिक आजार तर जडला नाही ना? असे अनेक प्रश्न हर्षदाला पडले.
किही वेळाने आजी म्हणाली
" हर्षदा आज आपण ..मलापे बीचवर जाऊया?"
हर्षदाला प्रचंड आश्चर्य वाटल.गेल्या वर्षभरात आजी चुकूनच घराबाहेर पडल्या असतील..त्या सुध्दा काही सामान आणायला.आता तर त्या चक्क बीचवर जाऊया म्हणतात.
" विचार कसला करतेस? रिक्शाने जाऊ. गोव्यात बाबा मला केरीच्या बीचवर नेत.मला पाठीवर घेऊन वाळूत धावत.....चल ना."
"ठिक आहे..मी आईची परवानगी घेऊन सांगते." हर्षदा म्हणाली.
" अग मी दुपारीच तूझ्या आईची परवानगी घेतलीय."
आता मात्र हर्षदाला आश्चर्याचा धक्काच बसला.
संध्याकाळी दोघीही मलापेच्या बीचवर गेल्या.बीचवर खुप गर्दी होती.सोनेरी सूर्यकिरण....भनभनता वारा....उडणारी वाळू...किनार्यावर धावत येणार्या फेसाळ लाटा.
आजी धावतच...वाळूत गेल्या.त्याना सावरता सावरता हर्षदाच्या नाकी नऊ आले. आजी वाळूत..बसल्या....पाण्यात डुंबल्या. अनेकजण वाळूत धावत...पतंग उडवत होते.
" मलाही पतंग उडवायचा आहे." अस म्हणत आजींनी..पतंग व मांझा खरेदी केला.आजीं पतंग उडवू लागल्या .अचानक त्या मागे वळून ओरडल्या..
" बाबा ..माझा पतंग...किती उंच गेलाय बघा."
हर्षदाने दचकून मागे वळून पाहिले. पण आजी काहीच घडल नाही अशा पध्दतीने पतंग उडवू लागली. मध्येच त्यांनी कॅडी खरेदी केली...येताना पिपाणी खरेदी केली.परतीच्या प्रवासात आजीला पुन्हा आपले बाबा आपल्याशी बोलतात अस वाटू लागल.आज आजी प्रचंड आनंदी होती.
पण हर्षदा खंतावली होती.उद्या प्रोफेसर सोहनींशी बोलायचच अस तिने ठरवल.प्रो.सोहनींनी सायकाॅलाॅजीवर पी.एच.डी. केली होती.तसेच ते क्लिनिकल प्रॅक्टीस करत होते.
दुसर्या दिवशी हर्षदा लवकरच काॅलेजमध्ये गेली.स्टाफरूममध्ये ती सोहनीना भेटली. सत्यभामा आजीची सारी हकिकत तिने त्यांना सांगितली.
प्रो.सोहनी.. काही क्षण गप्प उभे राहीले.
" म्युझिकल एपिलेप्सी" ते ओरडले.
" म्हणजे ?"
" ऐक...आपला मेंदू एकदा ऐकलेली..
वाचलेली...किंवा पाहिलेली गोष्ट मरेपर्यंत विसरत नाही.अगदी लहानपणी न कळण्याच्या वयातले प्रसंगसुध्दा आठवणींच्या कोंदणात जपून ठेवले जातात. असे अनेक कप्पे आयुष्यभर भरून ठेवले जातात.काही कप्प्यांचे दरवाजे बंद होतात.एखाद्या..अपघाताने....एखाद्या मानसिक धक्क्याने किंवा वारंवार येणार्या फिटमुळे हे बंद दरवाजे उघडतात.बालपणीच्या गोष्टी..प्रत्यक्ष..आपण जगत असल्याचा भास त्याना होतो.बहूतकरून..बालगीते..आठवणीतली गीते जी पूर्वी ऐकलेली होती. ..जगलेली होती.ती पुन्हा ऐकू येतात."
" पण याने काही नुकसान होत का?"
" किहीही असल तरी तो एक मानसिक विकार आहे.
त्यावर उपाय करावा लागेल. आजीची तपासणी करावी लागेल."
"त्यामुळे काही गोंधळ तर नाही ना होणार?"
हर्षदाच्या विचारण्याचा रोख सोहनींच्या लक्षात आला.
" अस करूया मीच तूझ्या घरी येतो.मी तूझा शिक्षक असल्याने कुणालाच फरक पडणार नाही. अशीच एक केस डाॅ. आॅलिव्हर सॅक्स यांच्याकडे आली होती.पंच्याहत्तरीच्या आयरीश आजीची केस होती ती. तिलाही बालपणीची विस्मृतीत गेलेली गाणी ऐकायला येत होती.
त्या सायंकाळी डाॅ. सोहनी हर्षदाच्या रूमवर आले.काळा सूट..वर इन केलेला पांढरा शर्ट ...काळे बूट...असा त्यांचा पेहराव होता.स्वच्छ नितळ..अंतराचा ठाव घेणारे डोळे...बोलताना मध्ये ..मध्ये भूवया उंचावणे..शांतपणे बोलणे अशी त्यांची सवय होती. थोडा वेळ हर्षदा व तिच्या आई वडीलांशी बोलून ते आजीकडे गेले .सोबत हर्षदा होती. सोहनींनी आजीला तिच्या भूतकाळाविषयी विचारले.., सत्यभामाची आई ती पाच वर्षांची असताना न्यूमोनियाने वारली होती.तिचा सांभाळ वडीलांनी केला होता.त्यांच्या लक्षात आल की आजी आत्ता दुहेरी जीवन जगत आहेत.त्यांच्याशी बोलतानाही ती तिच्या भूतकाळात होती. अनुभवाचे भास ती प्रत्यक्षात जगत होती.
बोलता-बोलता आजी मध्येच थांबली.

" पाऊस पडतोय...कौलांवर टपटप आवाज येतोय..
मला ...पावसात भिजायच आहे. "
आजी उठून उभ्या राहिल्या.
"ये रे पावसा...तूला देते पैसा
पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा"
गाण म्हणता-म्हणता दोन्ही हात वर खाली करत पाऊस धारा झेलू लागली.दोन पाय फरशीवर आपटत..पाणी उडवू लागली. मध्येच बाबांवर पाणी उडवू लागली.
खर म्हणजे ना तिथे पाऊस होता....ना पाणी....ना तिचे बाबा पण नव्हते. पण आजी आपल बालपण प्रत्यक्ष जगत होती.जे पूर्वी घडल तेच ती अनुभवत होती. सत्तरीच्या आजी..पाच सहा वर्षांची बालिका झाली होती.काही काळाने आजी शांत झाली.
" सर हे असच होत. सतत कसले तरी आवाज..
गाणी फक्त मलाच ऐकू येतात.मला याची भिती वाटते.मला खात्री आहे की माझ्या मेंदूत काहीतरी गोंधळ आहे. मला माझे बाबा दिसतात..मग आई का दिसत नाही?"
प्रो.सोहनी हसले.
" आजी , तुम्ही तुमचं बालपण जगा....बाकी माझ्यावर सोपवा.आत्ता तुम्ही खूप आनंदी दिसता आहात."
तिथून बाहेर पडल्यावर सोहनी हर्षदाला म्हणाले..
"आजीच्या मेंदूची इलेक्ट्रीकल तत्परता तपासावी लागेल. मला त्यांच्या टेंम्पोरल लोब मध्ये गडबड दिसतेय. एखाद्या न्यूरोलाॅजीस्टची मदत घ्यावी लागेल.तिच तिच्या बाबांशी खूप ॲटॅचमेन्ट आहे त्यामुळे ते प्रसंग तिला सतत जाणवत.पण एकदा तरी तिला आई सोबतचा एखादा प्रसंग आठवाव अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. "
जाताना सोहनींनी मसूरच्या डाळीएवड्या गोळ्या दिल्या.पुढच्या तीन दिवसात आजीच्या विविध चाचण्या करण्यात आल्या.त्यांच्या इ.इ.जी.त व एम.आर. मध्ये टेंम्पोरल लोबला रक्त पुरवठा करणार्या रक्तवाहिनींना सूज आलेली दिसली.ह्या सर्व टेस्ट न्यूरोसर्जन डाॅ.निर्मला याच्या दवाखान्यात झाल्या.आजीच्या आजाराच कारण समजल त्यामुळे उपचार सुरू झाले.आजीच्या भासांची वारंवारता कमी झाली.अखेर सहा दिवसांनी आजींना डाॅ निर्मलांनी आजीला डिस्चार्ज दिला.
" मला प्रो.सोहनींना भेटालच आहे."
तिने हर्षदाला सांगितले.
" सर बाहेरच तुमची वाट बघताहेत." हर्षदाने तिला सांगितले.
आजी लगबगीने दवाखान्याच्या पायर्या उतरल्या.
वेटिंग रूममध्ये सोहनी बसले होते.
" आजी कस वाटतय ?"
" छान! माझ्या मनातल्या मधुर आठवणी भरलेल्या एका कुपीचा बंद दरवाजा उघडला होता. गेल्या दहा-बारा दिवसात त्यान मला खूपच आनंद दिला. आता हा दरवाजा पुन्हा बंद झालाय.आता या पुढ किती आठवेल कुणास ठाऊक? पण मला मिळालेल्या आनंदाच गाठोडं मोठ आहे.त्यामुळे यापुढे मला जगण्याच बळ मिळेल....आणि हो दवाखान्यात भरती झाले त्याच दिवशी मला अंथरूणावर झोपलेली आई दिसली. ती मला जवळ घेत नव्हती पण ती माझ्याकडे प्रेमळपणे बघत होती....खरच सर..तूमची मी आभारी आहे. चल हर्षदा घरी जाऊया ना!"
आजी उत्साहाने म्हणाल्या.

बाळकृष्ण सखाराम राणे
8605678026