फिरून पुन्हा एकवार Balkrishna Rane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

फिरून पुन्हा एकवार

फिरून पुन्हा एकवार

चैताली व प्राजक्ता किनार्यावर बसली होती. दूरवर एक जोडप बसल होत..तिकडे लक्ष जाताच चैताली दचकली .
होय तो निश्चितच अजय होता तो पाठमोरा बसला होता. पण ती त्याला कुठेही ओळखू शकत होती.
क्षणभरात तिच्या डोळ्यासमोर गेल्या वर्षभरापूर्वी घडलेली घटना उभी राहिली.

दोघ समोरासमोर बसली होती. हातातला वाफाळणारा चहा तसाच हातात धरून शून्यात बघत होती.त्या चहासारखीच त्यांच्या मनात खदखद चालली होती.
" अभय, आजकाल आपणात खूपच भांडण होतायत."
" भांडण मी करतोय का?"
" मग, मला भांडणाची आवड आहे?"
" चैताली..रोज तुझी पिरपीर चालू असते..."
" अरे..माझी ती पिरपीर आणि तूझी दिवसभर दादागीरी चालू असते त्याला काय म्हणायच?"
" मला वाटत..आपण दोघ एकमेकांना कंटाळलोय...अति परीचयावज्ञा..अशी आपली स्थिती झालीय..."
" मग...तूला घटस्फ़ोट पाहिजे का ?"
" नको तो अर्थ काढू नकोस..मी तस म्हणालो नाही...म्हणजे बघ आयुष्य निरस वाटतय..आपण ओढूनताणून जगतोय अस वाटतय..नाटक केल्यासारख."
" ठिक आहे, मग एकमेकांपासून काही काळ दूर राहूया ? चालेल?"
" म्हणजे?"
" उद्यापासुन एक वर्ष आपण एकमेकांना भेटायच नाही. जराही संपर्क करायचा नाही. अगदी अज्ञातवासात जायच !"
अभय काहीक्षण गप्पच राहिला. एक वर्ष एकमेकांन पासून दूर राहायच ..
भेटायच नाही ...बोलायच नाही...कस शक्य आहे हे.
" चैताली ..अजून थोडा विचार कर...हे आपल्या भांडणावरच उत्तर नाही."
" हे बघ अभय ..आता माघार नाही...आपण कुठ आहोत हे कुणालाही कळू देता नये...पार्थलाही कळता कामानये.ओळखीच्या सार्या खुणा इथंच सोडायच्या अगदी मोबाईल सुध्दा! जमेल?"
" होय. चालेल...सध्या कामापुरते पैसे घ्यायचे...नंतर स्वतः काम करून पैसे
कमवायचे."
"चालेल...उद्याच आपण इथून निघायच.बघूया एका वर्षात आपल एकमेकांवाचून काहीच अडल नाही तर घटस्फ़ोट हा पर्याय आपल्यासमोर असेल...हो आणी एक वर्षा आगोदर जर पुन्हा समोरा समोर आलो तर नव्याने पुन्हा एक वर्ष दूर जायच!"

" हं...." अजयने फक्त हुंकार दिला. हिच्या वाचून माझ काय अडणार...?जेवणाचा प्रश्न उरेल...!.वर्षभर मस्त बाहेर जेवायच.... फक्त पैसा फेकावा लागेल एवडच ! अजय मनात विचार करत होता.
अजयवाचून माझ काय अडेल...? असाच विचार चैताली करत होती. पैसा तर मी पण कमवत होते..
पुढेही कमवेन....आपण कुठेही कमी पडणार नाही. पुरूषांच्या आधाराशिवाय बायका जगूच शकत नाहीत हा पुरूषी अंहकार तिला खोटा ठरवायचा होता. उलट आता एक हवाहवासा वाटणारा मोकळेपणा मिळणार होता...मोकळा श्वास ती घेणार होती. त्या दिवशी दोघही नव्या उत्साहात वावरत होते. एकमेकांशिवाय आपण काहीही करू शकतो हे त्यानां दाखवायचे होते. दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजता अजय तिचा निरोप घ्यायला आला तेव्हा तिने निर्विकारपणे त्याला गुडबाय केल. तोही त्वरीत पाठ फिरवून निघूनही गेला.
" आला मोठ्ठा...!" तिनेही फणकारून पाठ फिरवली.
मी ही चालले बर का ! ती मनातल्या मनात पुटपुटली.
आयुष्य या वळणावर येईल अस दोघांनाही वाटल नव्हते. अभय हा जे.जे.स्कूल आॅफ आर्ट्स चा विद्यार्थ्थी .
..स्वतःमध्ये रमणारा....स्वप्ने जगणारा...तर चैताली ही फिजिओथेराॅपिस्ट...त्यात तिला समाजसेवेची आवड..ती
अनेक स्वयंसेवीसंस्थाची काम करायची.बावीस वर्षांपूर्वी अजयच्या खांदा दुखावला होता.चैतालीने पंधराएक दिवस त्याच्यावर उपचार केले.या दरम्यान ती त्याच्या चिंत्रावर फिदा झाली तर तो तिच्या निळसर झाक असलेल्या डोळ्यात हरवला. मग भेटीगाठी होवू लागल्या.ती त्याच्या स्टुडीओला भेट देवू लागली. तिथला अस्ताव्यस्त पसारा ती आवरू लागली.त्याने तीची वेगवेगळी पोट्रेट रंगवली.एक दिवस दोघांच्या घरच्यांच्या संमतीने त्यांचा विवाहही झाला.
सुरुवातीचे दिवस फुलपाखरांप्रमाणे निघून गेले. दरम्यान पार्थचा जन्म झाला ...नव्या वळणावर त्यांचा संसार आला.पण गेली दोन चार वर्षे दोघानांही आयुष्य बेचव झाल्यासारख वाटू लागल. पावला पावलावर खटके उडू लागले.एकमेकांना ह्या त्या गोष्टींवरून दोष द्यायला सुरूवात झाली. बारावीनंतर पार्थ शिक्षणासाठी परदेशात गेला आणि भांडणाच प्रमाण खुपच वाढल.तिला वाटायच ती संसारासाठी मरमर मरतेय पण अजयला त्याची काहीच पर्वा नाही. त्याला वाटायच तो संसाराचा सगळा भार उचलतोय....त्याचा सावलीत ती सुरक्षित आहे.पण ती आताशा त्याला काहीच किंमत देत नाही.बावीस वर्षांच्या संसारानंतर सहवासाची गोडी संपली होती...स्पर्शातला थरार संपला होता.त्याची नवीन चित्रे तिला भुरळ घालत नव्हती..गेल्या किही वर्षात त्यान तिच नवीनचित्र काढल नव्हत...जुनी पोट्रेट धूळ खात पडली होती.त्यालाही तिचे निळसर डोळे खुणावत नव्हते. तिच्या मोकळ्या केसांच्या नशिल्या गंधात तो हरवला जात नव्हता. बस्स आता दूर होणच चांगल !
चैतालीला हे सगळं आठवल.गेल एक वर्ष तिला एका यूगासारख वाटल. काळ किती संथ गतीने चाललाय असच तीला वाटत होत.ती जेव्हा घरातून बाहेर पडली तेव्हा नेमक कुठ जायच हे तीन ठरवल नव्हत.अखेर तिन कारवारला जायच ठरवल. तिच प्राथमिक शिक्षण कारवारच्या मराठी शाळेत झाल होत. तिचे वडील कारवारला मालपे इथे पोष्टमास्तर होते. एका कौलारू घरात ते भाड्याने राहायचे.घरमालकांची एकुलती एक मुलगी प्राजक्ता व तीची जोडी छान जमली होती.ती दोघ रोज सायंकाळी मालपेच्या किनार्यावर जायची सोनेरी वाळूत धावायची...पतंग उडवायची....भन्नाट वार्यावर पतंग भरभर वर जायचे.दोघ उसळत्या लाटात येथेच्छ डुंबायचे.चैतालीला तीच बालपण आठवल तिने रत्नागिरी गोवा बस पकडली.गोव्यातून दोन तासात ती मालपेला पोहचली.
खर म्हणजे मालपेत प्रचंड बदल झाला होता.मातीचे रस्ते.
सिमेंटचे बनले होते.छोटी टूमदार घर आता...बंगल्यात रूपांतरीत झाली होती.किनार्यावर पर्यटकांची गर्दी उसळली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे मासे फ्राय करून देणारे स्टाल्स लागले होते.तिथे खवय्यांची गर्दी उसळली होती.तिला मासे फारसे आवडत नसत पण अजयला मासे फार आवडतात...अरेच्चा पुन्हा अजयची आठवण...तिन डोक झटकल व समोर पाहिले. गांधीचे सुंदर शिल्प समोर होते. पन्नास एक पतंग आकाशात विहरत होते. त्यात एक म्हातर जोडपही भान विसरुन पतंग उडवण्याच्या आनंद लुटत होती. कांही तरूण जोडपी वाळूत बसली होती. इलेक्ट्रॉनिक खेळणी विकणारे...फुगे विकणारे फिरत होते. समुद्रात डुंबणार्यांची संख्या खुपच होती.गार वारा गात्रा गात्राला स्पर्श करून जात होता.
या वातावरणामुळे चैताली प्रसन्न झाली.लहानपणीचे ते मंतरलेले दिवस तिला पुन्हा आठवले. डावीकडे वळत तिने विठ्ठल मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. ती थोडी गोंधळली ते जुन कौलारू घर तिला दिसेना. अखेर चौकशी केल्यावर कुणीतरी तिला म्हणाल होत की तो समोर दिसतो तो बंगला म्हणजे ती शोधत असलेल ठिकाण आहे.
ती गेट ढकलून आत गेली.एवढ्यात कुणीतरी स्री व त्या पाठोपाठ एक सोळा सतरा वर्षांची मुलगी बाहेर आली. ती स्री व चैताली एकमेकांकडे बघत राहीली. मग दोघही एकाचवेळी ओलडल्या...
" चैताली.."
" प्राजक्ता.."
दोघही एकमेकींना कडकडून भेटल्या.

" चैताली अग एवढ्या वर्षांनतर अशी अचानक? सगळं ठिक आहे ना?"
चैतालीने आपली सगळी कर्म कहाणी तिला सांगितली.
प्राजक्ता काही क्षण गप्पच राहीली होती व मग खळखळून हसली होत.
" अग हे जगावेगळं...वागण तुम्हा दोघांच झाल. काय म्हणाव तुम्हाला? छान प्रयोग आहे. कळेल तुम्हाला. पण ठिक आहे रहा आमच्यासोबत इथ.
आम्ही दोघीच असतो इथ!"
" ही तूझी मुलगी ना ? तुझ्यासारखीच दिसते .अन् तुझे मिस्टर?
" अग गल्फला असतात..हल्लीच येवून गेले.आता दिड वर्षांनी येतील? आपोआपच दुरावा तोही दिड वर्षांचा..!"
प्राजक्ता हसत म्हणाली.
" तेच बर..तो रोजाचा छळ नको बाई." चैताली म्हणाली.
गेले वर्षभर चैताली कारवारला प्राजक्ता सोबत राहिली होती.तिथल्याच एका दवाखान्यात ती फिजिओथेराॅपिस्ट म्हणून काम करू लागली. रोज सायंकाळी तिघ तासभर समुद्र किनार्यावर जाऊन बसायची.पण तिला सतत जाणवत होत की अजय तिच्या सोबत आहे.इथल्या वार्यात ..इथल्या हवेच्या गंधात तो तिला जाणवत होता.एखाद चित्र दिसल की ती त्याची तुलना अजयच्या चित्रिशी कळत नकळत करायची.जसजसे दिवस जात होते तसतशी तिची अधिरता वाढत होती.आपण हे काय करून बसलो..?
का असा मूर्खपणा केला..अस तिला वाटू लागल. कधी कधी तिला वाटायच की त्याला तडक जाऊन भेटायच. पण ..पण कुठ असेल तो ? काय करत असेल ? त्याला सगळ पुढ्यात नेऊन द्याव लागायच ? आता काय करत असेल ? कस निभावत असेल? क्षणभर तिला वाटे बरच झाल आतातरी त्याला माझी किंमत कळेल.पण एक नक्की तिला अजय पूर्वीपेक्षाही अधिक आवडू लागला होता.आजही ती तिघ रोजच्यासारखी किनार्यावर वाळूत बसली होती. गार बोचरा वारा लडिवाळपणे अंगाला रोमांचित करून जात होता. चैताली आज खुपच खुषीत होती .वर्ष संपायला एकच दिवस उरला होता .ऊद्या ती रत्नागिरीला आपल्या घरी जाणार होती. ठरल्याप्रमाणेच अजयही येणार होता. तिला खात्री होती ....तोही तिला पुन्हा भेटायला उत्सुक असणार ..गेल्या वर्षभरातील विरहाने भेटीची उत्कंठा वाढवली होती.

पण आता समोर अजयला बघून ती थोडी आश्चर्यचकित झाली होती. तो मुद्दाम तिला शोधत किंवा तिला खिजवण्यासाठी आला होता का? त्यान मुद्दाम अट मोडली होती का ? एक वर्ष ह्वायला अजून एक दिवस होता.पून्हा एक वर्ष त्याला तिच्यापासून दूर जाव लागणार होत. आणि त्याच्या सोबत असलेली ती स्त्री कोण आहे?
त्याने नविन जोडीदार शोधला होता का? त्यान तिच्याशी प्रतारणा केली होती का? नाही..हे शक्य नाही..तो अस कस करू शकतो? तिच्या गालावर कढत अश्रू ओघळू लागले. मघापासून तिच्याकडे एकटक बघणार्या प्राजक्ताच्या लक्षात ती गोष्ट आली.
" चैताली काय झाल? अशी अचानक...उदास कश्याला झालीस ? तो समोर बसलाय तो अजय तर..."
पण तिच वाक्य पुर होण्याआधीच चैताली धावत समोर बसलेल्या जोडप्याजवळ पोहचली होती. पाठीमागून अजयचे दोन्ही खांदे पडकत ती म्हणाली.
" अजय, तू...तू .इथ का आलास आणि ह्या कोण आहेत तूझ्यासोबत...?'
अजयने वळून बघितल.
" चैताली ! तू...?"
अजयच्या चेहर्यावर प्रचंड आनंद दिसत होता.
" तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल नाहीस.?"
" ऐक मी रत्नागिरीतून बाहेर पडलो तेव्हाच माझ्या लक्षात आल होत की मी तुझ्याशिवाय एकटा राहूच शकत नाही. पण तरीही उसन अवसान आणून मी गाडी पकडली .काहीच ठरवल नव्हत. मग विचार आला एक वर्ष तर आपल्या हाती आहे. शिवरायांचे गड कोट पालथे घालायचे. निसर्ग न्याहाळत फिरायच.चित्रे रेखाटायची..पण एकही चित्र नाही काढू शकलो. ब्रश हाती घेतला की तू आठवायचीस हात थरथरायचे...मग जाणवल तू माझी प्रेरणा आहेस...तूझ्याविणा मी अपुरा आहे. असाच वाई येथे कृष्णेच्या काठी बसलो होतो....अगदी विमनस्क होतो.मनात नको ते विचार येत होते. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक .कृष्णाकाठ सावळा झाला होता.कुणीतरी माझ्या खांद्याला स्पर्श केला.
" मुला....असा किती वेळ बसणार आहेस? नेमक काय झालय?"
त्या आवाजात आईची माया व ममता होती.
मी तीला आपल्याबद्दल सगळं सांगितले. ती हसली व म्हणाली....
" विलक्षण आहात तुम दोघ संसारात भांडण असाव पण त्याचा अतिरेक नको .पण हा दुरावाच तुम्हाला पुन्हा एकत्र आणेल."
मी तिला विचारल ती कोण आहे म्हणून?
ती वाईत अनाथ मुल व बायकांसाठी अनाथालय चालवायची सारे तिला माई म्हणत.तिलाही तिच्या व्यसनी नवर्याने मारझोड करून घराबाहेर काढल होत.ती म्हणाली माझ्यासाठी सारी नाती गोती मेलीत..." मी फक्त आई उरलेय...बस्स. या वयातही तिने खूप भोगल होत..बघितल होत.तिने मला अनाथालयासाठी काम करण्याची
विनंती केली. मी पण तिच्या त्या मुलांपैकी एक झालो.आज इथ एका संस्थेच्या अनाथालयाच्या स्थापनेसाठी मार्गदर्शक म्हणून त्या व मी इथ आलो आहोत."
एवड्यात माई उठल्या.
" चैताली बस इथ. खुप काही बोलायच असेल तूला याच्याशी नाही? आणि हो वर्षे पूर्ण झाल बर का. शंका ठेवू नकोस आज एकोणतीस फेब्रुवारी..एक जादा दिवस असतो वर्षात. "
" माई..माई..मला माफ करा.."
चैताली हात जोडत म्हणाली.

" होय माई ती फिरून एकवार प्रेमात पडलीयत एकमेकांच्या...सगळे रूसवे फुगवे निघून जातील क्षणभरात. पुन्हा ती हूरहूर ...ती ओढ ..ती ह्रदयाची धडधड सार नव्याने अनुभवतील ती दोघ." तिथे आलेली प्राजक्ता हसत म्हणाली.
चैताली विलक्षण लाजली.अजयच्या खांद्यावर डोक ठेवत तिने डोळे मिटले व तो क्षण ह्रदयात अधिरपणे साठवू लागली.

बाळकृष्ण सखाराम राणे .