खेळीया Balkrishna Rane द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

खेळीया

तात्या पालव बाहेर अंगणात येरझरा घालत होते. त्यांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. मध्येच ते स्वतःशी पुटपुटत मान झटकत होते. त्यांच्या मनात चाललेल्या विचारांचे द्वंद्व त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते. एवड्यात त्यांची पत्नी-देवकी घाबरीघुबरी होत बाहेर आली.
"अहो !आयकल्यास काय---आई कायतरीच करतात.चला लवकर आत."
तात्या धावतच आत गेले.माजघराच्या बाजूच्या खोलीत त्यांची आई पलंगावर अखेरच्या घटका मोजत पडली होती. तिच्या घरातून विचित्र आवाज येत होते.या आवाजामुळे देवकी घाबरली होती.तात्यांनी डाॅक्टरनी दिलेली गोळी आईच्या जीभेवर ठेवली. गोळी झटकन विरघळली. दोन चमचे पाणी त्यांनी आईच्या तोंडात घातले. घशातून येणारा आवाज थोडा कमी झाला. तात्या आईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले,
" ह्यो---नाना डाॅक्टराक हाडूक गेलो तो खंय गायब झालो?" तात्या बडबडले.
"मी काय म्हणतय आज तुम्ही नाटकाक जांव नका!" देवकी घाबरत म्हणाली.
"बघूया---!" तात्या उसासा सोडून म्हणाले.
"अहो, बघूया काय? ह्येंची ही अवस्था---घरात कोण मोठो माणूस नको?" देवकीच्या या बोलण्यावर तात्या काहीच बोलले नाहित.
एवड्यात नाना देसाई डाॅक्टरना घेवून आला. तात्या डाॅक्टरना घेऊन आईपाशी गेले. डाॅक्टरनी आईला तपासले व गंभीर चेहर्याने इंजेक्शन दिले. बॅगमधून चार औषधी पुड्या काढून देत म्हणाले,
"दर दोन तासांनी पाण्याबरोबर द्या. "
नानाने डाॅक्टरांची बॅग घेतली.तात्या पण डाॅक्टरांबरोबर बाहेर आले.
"तात्या,तुम्ही आज जत्रेला जाणार अस नाना म्हणत होता." डाॅक्टरांनी विचारले.
"हं! डाॅक्टर-आज या वर्षीची पहिली जत्रा आहे." तात्यांनी डाॅक्टरना सांगितले.
"हे बघ तात्या---थोड स्पष्ट सांगतो---आज नका जाऊ. आजची रात्र तुमची आई काढेल की नाही ते सांगता येणार नाही." डाॅक्टरांनी तात्यांना समजावले.
" डाॅक्टर!" तात्यांनी आवंढा गिळला. त्यांचा आवाज गहिवरला.
डाॅक्टरना घेऊन नाना गेला. तात्या कोलमडल्यासारखे खुर्चीत कोसळले. आधिच बावरलेली देवकी आणखी घाबरली.
"अहो,काय झाला?"
तात्या काही न बोलता शून्यात नजर लावून विचार करत बसले.त्यांच्या मनात प्रचंड गोंधळ चालला होता.आज कार्तिकी पौर्णिमा असल्याने माजगावला त्यांची या वर्षीची पहिली जत्रा होती. जत्रा चुकवणे शक्य नव्हते. पण आईची अवस्था गंभीर होती.आजची रात्र ती काढेल की नाही ते सांगता येणार नव्हते. ज्या आईने त्यांच्यासाठी खस्ता काढल्या तिच्या अखेरच्या क्षणी आपण तिथे नसणं ही कल्पना ही त्यांना सहन होईना. पण पहिल्या जत्रेला तोंडाला रंग लावून रंगदेवतेची आळवणी करण्याची परंपरा त्यांना टाकायची नव्हती. त्यात माजगावच्या ग्रामस्थांनी 'राजा गोपिचंद' नाटकाची मागणी केली होती. तात्या पालवांशिवाय ' राजा गोपीचंद ' हे शक्यच नव्हते. पण आईला सोडून कस जाणार? त्यांच्या आईने घेतलेले कष्ट त्यांना आठवत होते.
तात्या सहा वर्षांचे असताना त्यांचे वडिल वारले.त्यांच्या शेतीवाडीवर डोळे ठेवून असलेल्या भाऊबंदानी तात्यांच्या आईला त्रास द्यायला सुरूवात केली.पण त्यांची आई सार्यांना पुरून उरली.लहानग्या तात्याला शिकवण्यासाठी तिने जीवाचा आटापिटा केला. शेती,घरकाम,तात्यांची शाळा,भावकीचा विरोध या सार्या अडचंणीवर मात करत तिने तात्याला मॅट्रीक पर्यंत शिकवले. तरूण तात्यांना नोकरीची इच्छा नव्हती. शेतकाम व उरलेल्या वेळात दशावतारी नाटके पाहणे, नाटकातील पदे रचणे व चाल देवून गाणे..याची त्याला आवड होती. तात्यांच्या आईने याला विरोध न करता उलट त्याला उत्तेजन दिल. स्वःताची दशावतारी नाट्यकंपनी काढण्याची प्रेरणा दिली.
आईने ऐकवलेल्या पौराणिक गोष्टी,लोककथा,ओव्या यामुळे तात्याच नाट्यविश्व बहरले.आज तात्या पालवांच नाव गोवा- सिंधुदुर्ग इथे आदराने घेतले जायचे. शासनाचा उत्कृष्ट लोककलाकार हा पुरस्कार त्यांना मिळाला होता.
कृष्ण,वीरभद्र,नारद ,कर्ण,हनुमंत अश्या अनेक भूमिका त्यांनी गाजवलेल्या होत्या. त्यांच्या सुरेल, मर्दानी आवाजातील पदे ऐकून सारे प्रेक्षक धुंद व्हायचे.
पण आज त्यांच्या जीवाची घालमेल उडाली होती. त्यांची आई अखेरच्या प्रवासाला निघालीहोती.ज्या आईने आयुष्याचा मार्ग दाखवला,तिच्या अखेरच्या क्षणी तिच्यापाशी असण महत्वाचे होते.तात्यानी डोळे मिटले व गप्प बसून राहिले.मनातल्या विचारांचा कल्लोळ चेहर्यावर स्पष्ट दिसत होता.एवड्यात नाना आला.तात्यांची अवस्था बघून तो चिंतीत झाला.
"तात्यानू ; नाटक रद्द करूया?" नानाने घाबरत विचारले.
"नको--- तां शक्य नाय! दुसर्या कंपनिक ऐनवेळाक कसा सांगतलय."
"पण ---आम्ही सगळे जातंव---तुम्ही थांबा आईंकडे." नानाने सुचवले.
"हां----नाना म्हणतत तां बरोबर आसा." देवकी म्हणाली. काही क्षण सारेच गप्प बसले.तात्यांचे डोळे बंदच होते. त्यांच्या चेहर्यावरचे भाव झपाझप बदलत होते. झटकन उठून ते म्हणाले "नाना, टेम्पो आणलय? "
" होय तात्या, बाबून आत्ता आणल्यान. पण तात्या आई--?"
नानाला मध्येच थांबवत तात्या म्हणाले ,
" ठिक आहे. सामान भरून घ्या. सगळंयाका घेवून या. मी तयारी करतंय. अरे, मी नाटक टाकून आईकडे बसान रवलय तर तिका ता आवडायचा नाय--- आताच तिने सांगाला माका तसा." तात्या निश्चयाने म्हणाले.

-------------*----------*------
गंभीर वातावरणात गाडी सुटली. प्रवासात तात्या गप्प होते. इतर वेळी त्यांच्या हास्य-विनोदाला बहर यायचा. पण आज सारे गप्प होते.दोन तासांचा प्रवासही आज लांबचा वाटला. माजगावच्या महादेव देवळच्या शेजारच्या देवळीत ते उतरले.पेटारे खाली उतरवले.मांडणी झाली. सगळीकडे जत्रेची गडबड व लगबग होती. एवड्यातच रांगा लागल्या होत्या. दशावतारी मंडळींनी चटया टाकल्या. थोडा वेळ सारे आराम करणार होते. तात्यांनी महादेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी गणपती व रिद्दी-सिद्दीचे मुखवटा मांडले. त्यांची पूजा केली.सरस्वती व रंगदेवतेची पूजा केली. मघापासून गंभीर असणारे तात्या आता सहज झाले. चेहर्यावरचे मळभ दूर झाले होते. एवड्यात चहा घेवून देवस्थान समितीची माणसे आली.
" घ्या रे ----चहा घ्या रे सगळे. " तात्या हसून म्हणाले. सार्यांची चहा झाला.तात्या खाली स्त्रीच्या दर्शनासाठी गेले. देवीला नमन करून म्हणाले ' तूझ्या गावातला नाटक निर्विघ्न पार पाड ' अशी देवीची त्यांनी आळवणी केली.
आता तात्यांच्या चेहर्यावर तणाव नव्हता. रात्र हळूहळू सरकू लागली. जेवण झाल्यावर दशावतारी मंडळीं रंगवायला बसले. बघता -बघता शेतात राबणारे रांगडे गडी रंग चढल्यावर गंधर्वासारखे सुंदर दिसू लागले. सारे गंभीर होते पण तात्या सहज होते. स्वागताची रंगभूषा ते स्वतः करायचे. या कलेतल त्यांच कसब भल्या भल्यांना चकित करायच. एवड्यात देवळाबाहेर पालखी सोहळा सुरू झाला.ढोल-ताशे फटाके यांचा आवाज घुमू लागला.पण दशावतारी मंडळी अगदी एकाग्रचित्ताने रंगभूषा व वेषभूषेत मग्न होते.पालखी नंतर नाटक सुरू होणार होते.

पालखी झाली.आता सार्यांना नाटकाची उत्सुकता होती. त्यातही तात्या पालवांचा ' राजा गोपीचंद ' पाहण्याची ---त्यांची सुरेल पदे ऐकण्याची. नाटक सुरू झाले. गणपती ---स्टेजवर आला. भटजींनी त्याची पूजा केली. संगीत मंडळींनी 'श्री' ची आळवणी केली. त्यानंतर शंखासूर आला. नाईक व शंखासूर यांचे विनोदी सवाल-जबाब ऐकून सारे खदखदून हसू लागले.विष्णू व शंखासूर यांचे युध्द झाले. शंखासूराला वर देवून विष्णू निघून गेले. विष्णूच्या पहिल्या अवताराच स्मरण करून नाटक सुरू झाले. राजा गोपीचंद च्या वेषातील तात्यांनी स्टेजवर प्रवेश केला ,तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. उंची वस्त्रे,आभूषणे घातलेला सुखोपभोगात दंग असलेला गोपीचंद तात्यानी लिलया उभा केला. त्यांची पदे ऐकून सारे प्रेक्षक धुंद झाले.प्रेक्षक - प्रेक्षक राहिले
नाहीत तर ते नाटकाचा भाग बनून गेले. शूर, पराक्रमी , दानशूर गोपीचंद आपल्या राण्यांच्या मोहपाशात गुरफटतो. विषय सुखात मग्न होतो. आपल कर्तव्य विसरतो.प्रजेला विसरतो.त्याची आई मायावती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. पण गोपीचंद कुणाचंच ऐकत नाही. विषयसुख हेच अंतिम सुख असल्याचा तो स्वतःला निर्वाळा देतो.
एवड्यात जालंदरनाथांचे आगमन होते. मायावती जालंदरनाथांना आपला गुरू मानते. त्यांच्या शिकवणीने विरक्त होते. पण आपल्या मुलाची दुर्गती बघून ती व्यतित होते. जालंदरनाथांच्या मदतीने ती गोपीचंदाला वासनेच्या चिखलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. पण, गोपीचंद च्या कुटील राण्या हुशारीने डाव खेळतात. मैनावती त्या गोसाव्याच्या नादी लागलीय,बेताल झालीय असे त्या गोपीचंद च्या मनी भरवून देतात. संतापलेला गोपीचंद आईला जारीणी, पापणी म्हणतो. तुझ्यापोटी जन्म घेवून पाप घडले अशी दूषणे देतो. नाथांना शिक्षा देण्याची आज्ञा देतो. हे सारे तात्यांनी एवड्या उत्कटतेने रंगवलेले की प्रेक्षकांतील महिला गोपीचंदाला शिव्या देऊ लागल्या.
पण पुढे सत्य कळल्यावर आपण घोर पातक केल्याची जाणीव राजा गोपीचंदाला होते. आपल्या पवित्र मातेला दिलेली दूषण आठवून तो विलाप करतो. आपल्याला योग्य मार्ग दाखवणार्या आईला आपण ' कुलटा' अस हिणवले हे पाप कुठे फेडू ---असा विलाप करतो. पण मैनावती त्याला शांत करते. राजा गोपीचंद वस्त्रे,आभूषणे उतरवतो. हाती भिक्षापात्र घेतो. आईला वंदन करतो. त्याची आईच त्याला पहिली भिक्षा घालते ----उपदेश करते. इकडे सार्या राण्या विलाप करतात.राजाने राजत्याग न करता इथंच राहून साधना करावी --आम्ही त्याच्या आड येणार नाही; आम्ही चुकलो अस विनवतात. पण गोपीचंद आता विरक्त झालेला असतो. हाती भिक्षापात्र घेऊन तो गाण गात प्रजेजवळ भिक्षा मागतो.
तात्यांना वाटल त्यांची आईच त्यांना उपदेश करतेय. मैनावतीच्या ठिकाणी त्यांना आपली आई दिसू लागली. हा प्रसंग एवडा उत्कट झाला की प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळले. सारे स्तब्ध झाले. प्रेक्षकांकडे हातवारे करून भिक्षा मागणार्या गोपीचंदाचे भिक्षापात्र भरून गेल. स्टेजवर पैशांचा पाऊस पडला. जणू खराखुरा गोपीचंद तिथे अवतरला होता. तात्याच्या अदाकारीने सारे भारावले.
नाटक संपलं.पहाट झाली. दहिकाला झाला. तस नाना तात्यांना म्हणाले.
" तात्या, घराकडून फोन आला होता--- आई गेल्या."
तात्या स्तब्ध झाले. डोळ्यांतील पाणी त्यांनी निग्रहाने थाबंवल.
" नाना,---आईला रडलेल आवडायचं नाही---मी पण नाही रडणार. या रंगभूमीवर पात्रे येतात व जातात. आपण फक्त बाहुल्या असतो. तिन खूप दिल ---पण आता उरल्या आठवणी---चला घरी जाऊ या." तात्या गहिवरल्या स्वरांनी म्हणाले.

बाळकृष्ण सखाराम राणे

सावंतवाडी