Mobile books and stories free download online pdf in Marathi

मोबाईल

             आजपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभुत गरजा होत्या. पण या गरजांमध्ये एक मुलभुत गरज म्हणून मोबाईलचाही समावेश करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण माणसाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल जवळ लागतो. मोबाईल जरासा जवळ नसेल तर माणूस बेचैन होतो. एवढंच काय बऱ्याच लोकांना सकाळी टॉयलेटमध्ये मोबाईल जवळ नसेल तर त्यांचे पोट साफ होत नाही. मोबाईलची बॅटरी उतरली तरी माणूस बेचैन होतो.

            पुर्वी माणसाची नाळ गावाशी, नात्यांशी आपल्या माणसांशी जोडलेली असायची आज मोबाईलशी जोडली आहे. भावना मोबाईलशी जोडल्या गेल्या आहेत. वेगवेगळया भावनांचे इमोजी देखील मोबाईलवर उपलब्ध आहेत. माणसं मोबाईलने जेवढी जवळ आली. तेवढीच दुरावली देखील. आज आपण क्षणात बाहेर देशात असलेल्या व्यक्तीशी बोलू शकतो. व्यक्ती कोठे आहे हे आपल्याला मोबाईलमुळे लगेच कळते.

            आमच्या लहाणपणी मोबाईल नव्हते. त्यावेळी मित्राच्या घरी त्याला बोलवायला जायचो. त्यामुळे मित्राच्या कुटुंबाशीही आपण जोडले जायचो. मित्र घरी जेवण करत असेल आणि आपण नेमके त्यावेळी गेलो तर मित्राची आई आपल्याला आग्रहाने जेवायला बसवायची. आता मोबाईलमुळे मित्रांच्या घरी जाणे होत नाही. त्यामुळे मित्रांच्या कुटुंबापासूनही आपण दुरावलो आहोत. उद्याचे नियोजन आजच ठरलेले असायचे. सर्व मित्रांनी ठराविक वेळेला ठरावीक ठिकाणी जमायचे असे आजच सांगीतले जायचे. आज क्षणात नियोजन ठरते आणि क्षणात माणसं एकत्र जमतात. पुर्वी माणसं एकत्र जमायची आणि गप्पा मारायची एकमेकांशी संवाद साधायची. हितगुज सांगायची. आजही माणसं एकत्र जमतात आणि एकत्र बसलेले असले तरी मोबाईलमध्ये डोकावतात.

            दोन समाजामध्ये जातीय, धार्मीक तेढ निर्माण करण्याचे कामही मोबाईलने मोठया प्रमाणावर केले आहे. एखाद्या जातीय ग्रुपवर एकत्र जमण्यासाठी मेसेज पडला तर क्षणात सर्व लोक दंगलीसाठी एकत्र जमतात. सर्व सुस्थितीत चालू असताना एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल, धर्माबद्दल काहीतरी आक्षेपार्ह पोस्ट टाकतो. त्या पोस्टमुळे अगदी अल्पावधीत सामाजिक वातावरण दुषित हाते. अशाप्रकारे समाजमाध्यमांवर एखाद्या आक्षेपार्ह पोस्टमुळे दंगल घडवणारेही आपणच आहोत आणि एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिच्या उपचारासाठी निधी गोळा करणारी पोस्ट टाकणारे व सढळ हाताने मदत करणारेही आपणच आहोत. अशा प्रकोर मोबाईलचे फायदे व तोटे दोन्हीही आहेत. पण फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत.

            पुर्वी प्रेयसीजवळ प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम एक तर प्रेमपत्र होते किंवा धाडस करुन तिला समोरासमोर बोलावे लागे. आज मोबाईलमुळे तेही सोपे होवून बसले आहे. मोबाईलवर तिला मेसेज टाकून दिला की फक्त तिच्या रिप्लायची वाट पाहायची. पण मोबाईलवर मेसेज करताना त्याच्या खाली लिहायचे ‘ तुला माझं प्रेम मान्य नसेल तर तसे मला स्पष्ट सांग. मी परत कधीच तुला त्रास देणार नाही. पण मी तुला मेसेज केला आहे असे घरी सांगू नकोस.’ असा मजकुर लिहिला की जरा भिती कमी होते. आता मोबाईलवरच प्रेम जुळतं. आणि काही दिवस चॅटींग केल्यानंतर मोबाईलवरच प्रेमभंग पण होतो.पुर्वीच्या काळी समोरासमोर उभे राहून डोळयात डोळे टाकून प्रेम व्यक्त करण्याची असलेली पद्धत हीच खरी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. पण हल्ली असं कोणी प्रेम व्यक्त करत नाही. मोबाईलमुळे ते सोपं झालं.

            मोबाईलवर लहान मुलांपासून मोठयापर्यंत सर्वचजण व्यस्त असतात. मोबाईलवर रोजचे सात ते आठ तास वेळ वाया घालणाऱ्या लोकांना व्यायामासाठी, वाचनासाठी, फिरण्यासाठी मात्र वेळ नसतो. रिल्स पाहण्यात कसा वेळ निघून जातो ते कळत देखील नाही. रिल पाहता - पाहता काही तरी वाईट व्हिडीओ येवून जातात.ज्यामुळे सज्जन माणूसही वासनेच्या आहारी जातो. मोबाईलवर सहज उपलब्ध होणाऱ्या अशा वाईट व्हिडीओमुळे प्रेमाचा अर्थ बदलत आहे. आज प्रेम म्हणजे वासना हाच अर्थ रुढ होत आहे. मोबाईलवर चांगल्या ज्ञानाच्या गोष्टीही आहेत. पण माणूस चांगलं कमी पण वाईट जास्त शिकतो. तरुण मुले व मुलींच्या मनावर मोबाईलवर सहज उपलब्ध असलेल्या अशा वाईट व्हिडीओंमुळे विपरीत परिणाम होतो. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. परस्त्री मातेसमान अशी शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण आपले आदर्श मानतो. पण त्यांची शिकवण मात्र विसरतो. माणूस तसाच असतो जसे त्याचे विचार असतात. कोणताच माणूस वाईट नसतो तर त्याचे विचार वाईट असतात. त्यामुळे मोबाईलवर काय पाहायचे यापेक्षा काय पाहायचे नाही हे माणसाला कळलं पाहिजे. दिवसभराच्या कामातून मोबाईलसाठी ठरावीक वेळ दिला पाहिजे.

            मोबाईल माणसाच्या खाजगी आयुष्यातही खूप डोकावत आहे. आज आपला मुड कसा आहे, आपण काय खाल्ले, आपण कोठे जात आहोत या सर्व गोष्टी आपण मोबाईलवर लिहितो.एखादा व्यक्ती सुट्टीच्या दिवशी आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवत आहे. तेवढयात त्याच्या बॉसचा कामाबद्दल एखादा मेसेज त्याच्या व्हॉटस्अपला येतो. त्या मेसेज मध्ये त्या कामाचे महत्व व ते लवकर करणे किती आवश्यक आहे हे लिहिलेले असते. ते वाचून क्षणभरापूर्वी आनंदी असलेला तो व्यक्ती निराश होतो. चिडचिडा होतो. त्याच्या सोबतच्या मित्र व कुटुंबियांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही.

            माणसाच्या आयुष्यातील अर्धा वेळ झोपेमध्ये जात आहे. उरलेल्या अर्ध्या वेळापैकी अर्धा वेळ मोबाईलमध्ये खर्च होत आहे. त्यामुळे माणूस परिपूर्ण आयुष्य जगण्यापासून वंचित राहत आहे. एका कुटुंबामध्ये पाच व्यक्ती असतील तर त्या सर्वांजवळच मोबाईल आहेत. प्रत्येकाकाडे साधारणत: तीस हजार रुपयांचा मोबाईल असला तरी त्या कुटुंबामध्ये जवळपास दीड लक्ष रुपये फक्त मोबाईलवर खर्च होतात. त्यामध्ये बरेच जण सहा महिने किंवा वर्षाला मोबाईल बदलतात. मोबाईल कसा आहे यावरून व्यक्तीची ऐपत ठरवली जात आहे. माणसाने काळासोबत बदललं पाहिजे. या उक्तीचा माणसाने चुकीचा अर्थ घेतला असल्याचे दिसून येते. माणूस काळासोबत जरा जास्तच बदलत आहे आणि त्यासोबतच मोबाईल जास्त बदलताना दिसत आहे.

            मोबाईल संवादासाठी जेवढा आवश्यक आहे. तेवढाच नातेसंबंध तोडण्यासाठी घातक आहे. आज बरीच लफडी केवळ मोबाईलमुळे घडत आहेत. पती - पत्नी आपल्या साथीदाराची विश्वसार्हता गमावत आहेत. मोबाईलवर थोडयावेळासाठी आलेली व आपली स्तुती करणारी, आपल्याशी गोड बोलणारी व्यक्ती लगेच आपल्याला आवडू लागते. त्या क्षणभंगुर प्रेमाला भुलुन बरीच मौल्यवान नाती तुटत आहेत. मोबाईलमुळे माणसं दूर असली तरी बोलण्यानं जरा जास्तच जवळ येत आहेत.आणि पवित्र नात्यांचेही भान न ठेवता अनैतिक काम करत आहेत.

            कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा आपल्या विनाशास कारणीभुत असतो. गरजेनुसार वापरणे व गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापरणे यामध्ये फरक आहे. आज मोबाईलवर आपले खूप मित्र आहेत. पण प्रत्यक्षात आपले जवळचे मित्र किती आहेत? आपण मोबाईलवर सगळयांशी जोडलेले असलो तरी मनाने मात्र एकटे पडत चाललो आहोत.

            मोबाईलवर आपले नियंत्रण असायला हवे परंतू मोबाईलचेच आपल्यावर नियंत्रण आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांचा बराच वेळ मोबाईलवर खर्च होत आहे. त्यामुळे अभ्यास करणाऱ्या व इतर क्षेत्रात मेहनत करणाऱ्या तरुणांचे प्रतीस्पर्धी नक्कीच कमी झाले आहेत. जे मोबाईलला टाळतात, कामा पुरताच मोबाईलचा वापर करतात तेच आज यशस्वी होताना दिसत आहेत.

            आजकाल जन्मदिवसाच्या शुभेच्छा, नविन घर घेतल्याच्या शुभेच्छा, नविन गाडी घेतल्याच्या शुभेच्छा आपण मोबाईलवरच देतो. इतकेच काय एखाद्या ग्रुपला एकाच दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा व भावपूर्ण श्रद्धांजली या दोन्ही पोस्ट पडतात. मग एखाद्याकडून ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली व जो मयत झाला आहे त्याच्या फोटोला वाढदिवसाच्या शुभेच्छा चुकून पडतात.

            मोबाईलमुळे जग जवळ आलं हे जरी खरं असलं तरी आपण आपल्यापासून दूर जात आहोत. बदलत्या काळासोबत मोबाईलचा वापर कामापुरता करावा पण अतिवापर करु नये आणि महत्वाचं आपण मोबाईलचा वापर करावा.मोबाईलने आपला वापर करु नये.

 

लेखक, कवी- संदीप खुरुद

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED