कर हर मैदान फते संदिप खुरुद द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कर हर मैदान फते

             आयुष्य ही एक रणभुमी आहे. येथे प्रत्येक जण स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. खरी लढाई ही आयुष्यभर चालूच असते. पण तरुणपणात जास्त ताकदीने लढावं लागतं. म्हणजे उतारवयात जास्त लढण्याची आवश्यकता राहत नाही.

            आजचा तरुण अनेक संकटांशी लढत आहे. आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. तसं पाहिलं तर पहिली लढाई ही आपली स्वत:शीच असते. आपल्यातील दुर्गुणांशी असते. त्यांच्यावर मात केल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही. आजचे तरुण हे मेंढयांच्या कळपासारखे एकाच क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जसे पुर्वी डी.एड. ला मार्केट आले होते. त्यावेळी सर्वचजण डी.एड.कडे वळले. नंतर इंजिनिअरींग व डॉक्टर असे सर्वच क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत गेली. करण्यासारखे भरपूर आहे पण आपण ते करत नाही. उगाच आपला मित्र एखाद्या क्षेत्रात गेला म्हणून आपण तिकडे जातो. नोकरी शिवाय करिअर करण्यासारखे भरपूर आहे. पण आपल्याला फक्त नोकरीच दिसते. सर्वचजण नोकर झाले तर मालक कोण होईल?

            आपण ज्या क्षेत्रामध्ये उतरतो त्या क्षेत्रामध्ये आपले 100% योगदान दिले पाहिजे. आपल्याला यशस्वी होण्यासाठी दुसऱ्यापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल. यश प्राप्त करण्यासाठी जिद्द,चिकाटी,मेहनत,त्याग,सातत्य व वेळेचे नियोजन या गोष्टींची आवश्यकता असते. तरच माणूस यशस्वी होऊ शकतो. बरीचशी मुलं सद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. काहीजण 07 ते 08 वर्षांपासून अभ्यास करत आहेत. काहीजणांचं अभ्यास करता करता वयही निघून गेलं. तरीही त्यांना यश का येत  नाही? याचा अर्थ यशासाठी आवश्यक असलेल्या वरीलपैकी काही गुणांचे त्यांनी पालन केले नाही.

            आजच्या युगात चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी आपण लहान असतो त्यावेळी लोक आपल्याला विचारतात. तुझे वडील काय करतात? ज्यावेळी आपण मोठे होतो. त्यावेळी तेच लाक विचारतात. तू सद्या काय करतो? आपण काय काम करतो यावर आपल्याशी कसं वागायचं हे समोरचा ठरवतो.

            लहाणपणी आपल्याला बापाच्या नावावरुन ओळखतात. पण मोठयापणी आपल्या नावावरुन आपल्या बापाला ओळखतात. त्यामुळे स्वत:साठी नाही. पण आपल्या बापाच्या नावासाठी मेहनत घेतली पाहिले. आपल्या आई-वडीलांनी आपल्या कार्याबद्दल अभिमानाने सांगीतले पाहिजे.आई-वडीलांना जास्त काही अपेक्षा नसते. त्यांना फक्त आपला मुलगा, आपली मुलगी ही चांगल्या पदावर किंवा चांगली व्यावसायीक व्हावी. त्याने/तिने समाजात नाव कमवावे एवढीच माफक अपेक्षा असते. आपण त्यांची इतकी छोटी इच्छासुद्धा पूर्ण नाही का करु शकत. आपल्या कर्तत्वावरुन आपल्या आई-वडीलांना त्यांच्या उतारवयात मान, सन्मान मिळत असतो हे नेहमी लक्षात असु द्या.

            आजकाल मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुली भरपूर आहेत पण मुलींचे आई-वडील चांगल्या कर्तत्ववान मुलाच्या शोधात असतात. आपण आपली योग्यता बनवली पाहिजे. मुलींचे स्थळ आपल्याला शोधत येतात.

            आपण जर कर्तत्ववान नसु तर जवळचेही दूर जातात. त्याउलट आपण चांगले कर्तत्वत्वान असू त्यावेळी दूरचेही जवळचं नातं दाखवतात. तरुणपणात खूप गोष्टी आपल्या मनाला भुलवतात. पण त्या गोष्टींना न भुलता आपण आपल्या भविष्याकडे लक्ष दिले पाहिजे. कितीही मोठं संकट, समस्या असली तरी त्याचं उत्तर, समाधान असतंच कारण त्या वाटेने पुर्वी कोणीतरी गेलेलं असतं. फक्त मार्गदर्शन करणारा माणूस आपल्याला मिळायला हवा. आपलं संकट दूर होण्यास आपल्याला नक्कीच मदत होते. डोक्यावर आलेला सूर्य, भरुन आलेलं आभाळ नेहमीसाठी तसेच राहत नाहीत. त्याचप्रमाणे आयुष्यात कितीही दु:ख आली, कितीही संकटे आली तरी ते काही ठरावीक काळासाठीच असतात. फक्त त्या काळात आपण संयम ठेवला पाहिजे.

            काही जणांकडे व्यवसायासाठी पैसे नसतात. त्यावेळी त्यांनी अभ्यास करुन नोकरी मिळवणं हाच उत्तम पर्याय आहे. कारण अभ्यास करण्यासाठी जास्त खर्च करण्याची आवश्यकता नसते. पण बुद्धी खर्च करावी लागते.ज्यावेळी आपल्याला यश मिळतं त्यावेळी केलेल्या कष्टाचं काही वाटत  नाही. त्यामुळे कष्ट करा.केलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत.

            स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे. ‘युवकांनो झेप घ्या. दिशा तुम्हास शरण येतील.’ त्या वाक्याप्रमाणे युवकांनी झेप घेतली पाहिजे दिशा नक्कीच शरण येतील. पण आजचे युवक झेप घेण्याऐवजी झोप घेत आहेत. सकाळी लवकर उठलं पाहिजे.व्यायाम केला पाहिजे. शरीर सदृढ असेल तर मन सदृढ होईल. इतर लोक तयार होवून आपल्या कामाला जाण्याच्या तयारीत असेपर्यंत आपला तीन-चार तास अभ्यास झाला पाहिजे.आपल्या क्षेत्रात आपण तेवढे जास्त योगदान दिले पाहिजे.

            बऱ्याच तरुण मुलांची समस्या आहे. त्यांना अभ्यासच करावासा वाटत नाही. त्यांनी एकदा अभ्यासाला सुरुवात करावी. नंतर त्यांना अभ्यास नाही केला तर दिवसभर करमणार नाही. युवकांनी चांगलं जे-जे आहे ते सर्व केलं पाहिजे. कोणत्याच क्षेत्राला दुय्यम मानु नये. नोकरी, व्यवसाय काहीही करा पण 100% मन लावून करा. जन्म घेतलेल्या प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक प्राण्याला आपल्या अस्तित्वासाठी काहीना काही काम करावेच लागते. त्यामुळे कामाचा कंटाळा करु नये. कारण कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याला काम करावेच लागते.

            आपल्या मनाशी नेहमी स्वप्ने पाहत रहा. ज्यामध्ये आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालो आहोत. आपले आई-वडील आपल्या यशाने खूप खुष आहेत. आपले नातेवाईक, मित्र मंडळी आपल्याला मान-सन्मान देत आहेत.समाजामध्ये आपले, आपल्या आई-वडीलांचे कौतुक होत आहे. असे स्वप्न दिवसा किंवा रोज रात्री झोपताना पहा. जे तुम्हाला मेहनत करण्यास प्रेरणा देत राहील. एक दिवस आपले ते स्वप्न सत्यात उतरवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे झेप घ्या आणि दिशांना शरण येण्यास भाग पाडा. ‘स्वत:साठी नाही पण आपल्या आई-वडीलांसाठी यशस्वी व्हा.’

            सर्वांना यशस्वी होण्यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा !

लेखक- संदीप खुरुद