पति संदिप खुरुद द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

पति

             लग्न होतं आणि पुरुष पती होतो. एका व्यक्तीची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर येते. हळूहळू मुले होतात. मग संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर येते. त्याने काम करायचं, झिजायचं आणि संपूर्ण कुटुंबाचा भार सांभाळायचा. त्याला काही झालं की संपूर्ण कुटुंब उघडयावर येतं. कारण तो घरचा कर्ता असतो. पतीची घर सांभाळायची जेवढी जबाबदारी असते. तेवढीच त्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्या पत्नीची असते.

            तो बाहेर अनेक संकटांशी सामना करून आपल्या घरासाठी पैसा कमावतो. नोकरीवर असेल तर बॉसचे, मालकाचे बोलणे खातो. त्याला त्याचा खूप राग येतो. पण तो आपल्या कुटुंबाचा विचार करुन शांत बसतो. बाहेरचं त्याला खूप टेंशन असते. पण तो कधी ते घरी दाखवत नाही. पण कधी- कधी त्याची चिडचिड होते. अशावेळी पत्नीने त्याला समजून घेतलं पाहिजे. पुरुष बाहेरच्या जगाशी, कोणत्याही संकटाशी लढू शकतो. पण घरात भांडण असेल तर तो हतबल होतो.  त्यामुळे घरचं वातावरण शांत ठेवण्याची जबाबदारी ही पत्नीची असते.

            तो सतत आपल्या घराचा विचार करत असतो. घर सांभाळणं त्याच्यासाठी तारेवरची कसरत असते. घरचा खर्च भागावता- भागवतो त्याची दमछाक होते. आपल्या कुटुंबाच्या मुलभूत गरजा पूर्ण करता करता तो आपल्या स्वत:च्या गरजा कमी करतो. किराणा, नळपट्टी, पाणीपट्टी, सर्वांना कपडे, मुलांच्या शाळेची फीस,दवाखाना, आई- वडीलांची औषधे या सर्व गोष्टींमध्ये त्याने मेहनतीने कमावलेला पैसा खर्च होतो. सगळयांची हौस पुरवता पुरवता तो स्वत:ची हौस पुरी करणं विसरून जातो.

            आयुष्यभर तो पत्नीसाठी, कुटुंबासाठी झिजत असतो. तरी स्त्रियांना वाटतं आपल्या नवऱ्याचं आपल्याकडे लक्षच नाही. खरं तर त्याचं सारं लक्ष आपल्या कुटुंबावरच असतं. तो स्वत: आधी आपल्या कुटुंबाचा विचार करत असतो. कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करता-करता त्याची स्वत:चीच स्पप्ने अपूर्ण राहतात. दुसऱ्या स्त्रीने भारीतली साडी घेतली तर तुम्हालाही ती हवी असते. तिने सोने खरेदी केले तर तुम्हालाही लगेच सोने हवे असते. ती फिरायला गेली तर तुम्हालाही लगेच फिरायला जावेसे वाटते. तुम्हाला काय वाटतं तुमच्या नवऱ्याला तुम्हाला भारीतली साडी घ्यावीशी वाटत नाही. तुमच्यासाठी सोने घ्यावेसे वाटत नाही. तुम्हाला फिरायला न्यावेसे वाटत नाही. त्यालाही या सर्व गोष्टी कराव्याशा वाटतात. पण पैशाअभावी तो ते करु शकत नाही. त्यावेळी तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला वाटतं तो सुट्टीच्या दिवशी आराम करतो. दुसरं काही करत नाही. पण खरं तर तो आठवडाभराच्या कामाने दमून गेलेला असतो.  सुट्टीच्या दिवशी त्याने आराम केला तरच त्याला आठवडाभर काम करायला ऊर्जा मिळते.

            तो कितीही थकला तरी कुटुंबाची जबाबदारी त्याला थकु देत नाही. त्याला आजारी पडण्याची मुभा नसते. कारण तो कामावर नाही गेला कुटुंब चालणार नाही हे त्याला माहित असते. तो मनातून कितीही दु:खी झाला तरी त्याला रडण्याची, खचण्याची मुभा नसते. कारण तोच कुटुंबाचा कर्ता आहे हे त्याला पक्क माहित असते. पत्नीला वाटतं आपला नवरा फक्त कामात लक्ष देतो पण तो काम फक्त कुटुंबासाठी करतो हे ती विसरते. पती कुटुंबासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतो. पण पत्नीला वाटतं तो आपल्याला वेळ देत नाही. तो प्रत्येक वेळी तुमचाच विचार करतो पण तुम्हाला वाटतं. त्याला आपल्यासाठी वेळच नाही.

            कितीही कष्ट सोसावे लागले तरी तो मागे हटत नाही. कितीही संकटे आली तरी तो हरत नाही. कारण कुटुंबाची जबाबदारी त्याला हरु देत नाही. रोजच्या ताणतणावाच्या जीवनात बऱ्याच वेळा त्याला आयुष्य नकोसं होतं. पण तो कुटुंबाकडे पाहत तसाच जगत असतो. बाहेर त्याला सतत ताण, तणाव असतो म्हणून त्याला घरी शांतता हवी असते. अशावेळी पत्नीनेच त्याला सावरलं पाहिजे. तो महिनाभर कामावर नाही गेला तर खायचे वांदे होतात. तो वादळ, वारा, पाऊस यांपासून संरक्षण करणारं घराचं छप्प्र असतो. तो जर नसेल तर घर उघडयावर येतं.

            आपल्या कुटुंबासाठी तो जीवाचं रान करतो. त्याच्या असण्याणं कुटुंबावर कोणाची वाईट नजर पडत नाही. तो कुटुंबाची ढाल असतो. पत्नी जेवढी सांभाळून घेते, जेवढी समजून घेते तेवढी त्याची मानसिकता चांगली राहते. पत्नीने मानसिक त्रास दिला तर मग त्याचं मनस्वास्थ्‍ बिघडतं. मग त्याचं घरी व कामातही मन लागत नाही. हे सर्व करायचं तर कोणासाठी करायचं हा प्रश्न त्याला पडतो. बाहेरच्या संकटांशी तो एखाद्या महान योद्ध्याप्रमाणे लढतो पण घरातल्या भांडणामध्ये तो हतबल होतो. आपल्या पतीला बळ देण्याची जबाबदारी ही पत्नीचीच असते. पण तीच जर त्याचे मन खच्चीकरण करत असेल तर मग तो हरल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही परस्थितीमध्ये पत्नीने त्याच्यासोबत खंबीरपणाने उभे राहिले पाहिजे. मग त्याला प्रचंड बळ येतं. कारण त्याची उर्जा त्याची पत्नीच असते.

            त्याच्या स्वप्नांना पत्नीनेच पंख द्यायला हवेत. तो आकाशात भरारी मारल्याशिवाय राहणार नाही. शारिरीक ताणापेक्षा मानसिक ताण जास्त घातक असतो. त्यामुळे आपल्या पतीचे मानसिक स्वास्थ्य जपण्याची संपूर्ण जबाबदारी पत्नीचीच असते. पत्नी पतीसाठी आयुष्य जगण्याची प्रेरणा असते. म्हणून प्रत्येक पत्नीने आपल्या पतीला हळुवार जपलं पाहिजे. कारण एकवेळ करोडपती होणं सोपं असतं पण पती होणं अवघड असतं.