महाराष्ट्र दिन की कामगार दिन? Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

महाराष्ट्र दिन की कामगार दिन?

महाराष्ट्र दिन की कामगार दिन?

१ मे महाराष्ट्र दिन म्हणून आपण महाराष्ट्रात राहणारे लोकं साजरा करीत असतो. तसाच हाच दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केल्या जातो. त्याचं कारण म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो व आपला महाराष्ट्र आपल्याला राहू देतो. आपल्या भुमीवर पिकलेले अन्न खावू घालतो. तसाच महत्वाचं सांगायचं म्हणजे महाराष्ट्र आपल्याला पोषतो. त्यामुळं त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्याला एका विशेष दिवसाची आवश्यकता पडली. ज्या दिवशी महाराष्ट्र बनला व त्या राज्याला ज्यानं बनवलं. तो कामगार. म्हणूनच आपण महाराष्ट्र दिन हाच दिवस कामगारांच्या स्मरनार्थही कामगार दिवस म्हणून साजरा करतो.
महाराष्ट्र राज्य हे १ मे १९६० ला अस्तित्वात आले. परंतु ते अस्तित्वात येण्यापुर्वी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात नव्हते तर त्याला बॉम्बे म्हटलं जात असे.
महाराष्ट्राचा इतिहास सांगतांना भारताची काहीशी माहिती नक्कीच आपल्याला माहीत व्हायला हवी. भारत देश हा १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला. त्यानुसार राज्य बनवितांना भारत सरकारनं प्रत्येक राज्याची पुनर्रचना केली व त्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार अनेक राज्य निर्मीतीची प्रक्रिया पार पडली. ज्यात भाषावार प्रांतरचना हे मुल्य ठेवलं गेलं. त्यानुसार काही राज्यही बनले होते. त्यातच गुजरात आणि महाराष्ट्र राज्य बनवायचं सुरु होतं.
गुजरात आणि महाराष्ट्राचा वाद हा सन १९५६ साली सुरु झाला. महाराष्ट्र आणि गुजरात राज्य बनण्यापुर्वी या भागातील राज्यकारभार बॉम्बे राज्याच्या नावाने सुरळीत सुरु होता. त्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते. परंतु बॉम्बे राज्यात चार भाषेचे लोकं राहात होते. त्यात कोकणी, मराठी, गुजराती आणि कच्छी बोलणारे लोकं होते. त्यानंतर भाषांच्या आधारे राज्य बनवायचे ठरले. मराठी कोकणी भाषाधारकाचे महाराष्ट्र आणि गुजराती व कच्छी भाषाधारकांचे राज्य गुजराती. त्यानंतर ठरलं की मुंबई हे शहर गुजरात राज्यात समाविष्ट करावं. त्यातच कोणी म्हणत होते की मुंबई हे शहर महाराष्ट्रात समाविष्ट करावं. त्यानंतर दोन्ही राज्याचा वाद सुरु झाला मुंबईबद्दल. शिवाय भारतातील या दोन राज्यांसाठी सीमा परिभाषित केल्या गेल्या. या कायद्याचा परिणाम म्हणून जे मुंबई राज्य निर्माण झाले, ते मात्र वेगवेगळ्या मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मिळून बनले होते. संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याचे दोन राज्यात विभाजन करण्याच्या चळवळीत आघाडीवर होती. एक भाग जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरा भाग जेथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात. त्यानंतर सन २५ एप्रिल १९६० रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा, १९६० नुसार या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. हा कायदा १ मे १९६० रोजी अंमलात आला.
महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्याचाही रोमहर्षक इतिहास आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मीती व्हायचीच होती. मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून आंदोलन सुरु होतं. त्यावेळेस सन २१ नोव्हेंबर इ. स. १९५६ रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. त्यामुळे मराठी माणसं चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संघटनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे प्रयोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे गोळा झाला. मोर्चा पोलिसांमार्फत उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र काही सत्याग्रही टस चे मस झाले नाहीत. त्यावेळेस आंदोलकांमुळे पोलिसांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाही आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. त्यानंतर गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक शहीद झाले. आंदोलक शहीद झाले असले तरी आंदोलन मात्र माघारले नाही. ते अधिकच तीव्र होत गेले. शेवटी या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते धोरण घेवून मुंबई महाराष्ट्राला देवून टाकली व १ मे इ. स. १९६० रोजी मुंबई राजधानीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
आपली भुमी. महाराष्ट्र ही आपली भुमी ठरली. आपल्याला पोषणारी भुमी ठरली. आज आपण सुखी आहोत. परंतु आपण हे लक्षात घ्यायला हवं की ज्या महाराष्ट्रात आपण राहतो. त्याच महाराष्ट्रात एकशे सहा लोकांना त्या महाराष्ट्राच्या निर्मीतीसाठी हौतात्म्य पत्करावं लागलं. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते तर ते कामगारच होते. पुढे याच दिवसाला कामगार दिन हेही नाव पडलं. त्याचं कारण तेच होतं. कामगार लोकांनी महाराष्ट्राला मुंबई मिळवून दिली. परंतु आज आपण त्याच कामगाराला विसरलेले दिसत आहोत ही शोकांतिकाच आहे.
महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र बनविण्यात आणि विशेष करुन मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यात कामगारांचं महत्वपुर्ण योगदान होतं. तसं पाहिल्यास मुंबई हे सम्राट अशोकाच्या काळापासूनच एक महत्वपुर्ण शहर होतं. तसंच हे शहर छोट्या छोट्या द्विपामध्ये समाविष्ट होतं. या मुंबईला फारच मोठा विशालकाय समुद्र किनारा लाभलेला होता व या किनार्‍यावरुन घाऊक वा इतर कोणत्याही स्वरुपाचा व्यापार चालत असे. शिवाय त्या सर्वच प्रक्रियेत पुर्वीपासूनच कामगारांचा समावेश होता.
मुंबई हा पुर्वी सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ. स. पू. २५० सालातील असून मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी लिहिलेल्या पुस्तकात सापडतो. इ. स. पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लीम साम्राज्याने मुंबई हस्तगत केले. एलिफंटा गुफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून मुंबई काबीज केली व बॉम बाहीया असे नाव दिले.
सन १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई हा द्वीपसमूह इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन ब्रेगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देवून टाकली व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. यापुर्वी सुरत हे इस्ट इंडीया कंपनीच्या व्यापाराचे शहर होते. कंपनीला ही बेटे भारतीय उपखंडातील आपले पहिले मोठे बंदर स्थापन करण्यास योग्य वाटले आणि आपली एक प्रेसिडेन्सी त्यांनी मुंबई येथे हलवली.
मुंबई हे व्यापाराचे केंद्र होते व इथे मोठमोठे उद्योग इस्ट इंडीया कंपनीनं उभारले होते. त्याचबरोबर या उद्योगकेंद्रात काम करण्यात मराठी भाषीक कामगारांचा समावेश होता व त्यांची संख्या जास्त प्रमाणात होती. त्यामुळंच त्यांनी मोठ्या संख्येनं आंदोलन करीत महाराष्ट्राची राजधानी म्हणून मुंबई शहरच मागून टाकलं.
मुंबई शहराची मागणी होत असतांना तब्बल एकशे सहा मराठी कामगार लोकं मरण पावले असले तरी मराठी भाषीक लोकं घाबरले नाहीत. लढा आणखी तीव्र केल्या गेला व शेवटी ठरलं की मुंबई महाराष्ट्राला देण्यात येत आहे. त्यानंतर दि. २५ एप्रिल १९६० ला मुंबई शहराचा महाराष्ट्र राज्यामध्ये विलिनीकरणाचा निर्णय होताच महाराष्ट्र राज्य १ मे १९६० ला अस्तित्वात आले व त्याची राजधानी मुंबई शहर घोषीत करण्यात आले.
आज महाराष्ट्रात आपण राहतो. सुखी समाधानाने राहतो. परंतु बहुतेकांना माहीत नसेल की महाराष्ट्र कसं तयार झालं. खरंच या महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीत एकशे सहा शहीदांचं रक्त आहे. शिवाय त्या कामगारांचं बलिदान आहे. त्यामुळंच आपण कामगारांना सन्मान द्यायलाच हवा. कारण ते जर नसते तर कदाचीत मुंबई आपल्याला मिळाली नसती व आपले राज्य एक विकसीत राज्य म्हणून अस्तित्वात आले नसते व आपल्या राज्याला विशेष ओळखही मिळाली नसती. आज मुंबई शहरानं आपण जागतिक बाजारपेठेतच नाही तर जगाच्या नकाशावर अग्रस्थानी आहोत. ते केवळ मुंबईमुळं. हे आपण विसरुन चालणार नाही आणि हे आपण विसरुही नये. तसंच आपण त्या कामगारांनाही विसरु नये की ज्यांनी मुंबई शहर महाराष्ट्राला मिळवून दिलं हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०