वाचन संदिप खुरुद द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वाचन

             जगामधील कोणत्याही थोर व्यक्तींना डोळयासमोर धरुन पहा. त्या सर्वांना वाचनाची आवड होती. वाचनाने त्यांचे विचार प्रगल्भ झाले. वाचनानेच त्यांना ज्ञान प्राप्त झाले. कोणताच माणूस परिपूर्ण नसतो. ज्ञानच त्याला परिपूर्ण बनवत असते. आपल्याकडे दिवसाचा अर्धा वेळ मोबाईलवर वाया घालणाऱ्या लोकांना मात्र वाचनासाठी वेळ नसतो. किंवा काही माणसांना काम नसल्याने दिवस खूप मोठा जातो.

            एके दिवशी वाचनालयातून पुस्तक घेऊन मी घराकडे जात होतो. तेवढ्यात मला माझा एक मित्र भेटला.

             मी विचारले, "कुठे चाललास?"

तो म्हणाला,

             "वेळ कटत नाही म्हणून जरा फेरफटका मारायला बाहेर चाललो आहे."

             मी त्याला माझ्याकडील एक पुस्तक दिले. एक हप्त्यानंतर तो मला भेटला.

            म्हणाला, " मला वाचनाची आवड नव्हती तेव्हा वेळ कटत नव्हता. आता लक्षात आले. पुस्तक एवढे आहेत आणि वाचनासाठी  वेळ खूप कमी आहे."

            आज विविध भाषांमध्ये विविध प्रकारची विविध विषयांवरील कितीतरी पुस्तके आहेत. आपले आयुष्य संपले तरी सर्व पुस्तकांचे वाचन करणे शक्य नाही. रोज आपल्या शरीराला अन्नाची गरज असते. तसेच आपल्या मेंदूला ज्ञानाची गरज असते. ज्ञान मिळवण्यासाठी वाचनाची गरज असते. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांचे एक वाक्य आहे.

            ‘वाचन हे एकमेव व्यसन आहे ज्यात माणूस वाचतो.’

            वाचन नावाचं व्यसन प्रत्येक माणसाला असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण माणसाचे विचार जसे असतात तसाच माणूस असतो. विचार चांगले बनवण्यासाठी चांगल्या वाचनाची आवश्यकता आहे. नुसते वाचनच महत्त्वाचे नाही तर काय वाचले पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण वाईट विषय वाचनात आले तर आपले विचारही वाईट होतील. मग त्या वाचनाचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. त्याउलट तोटा मात्र होईल.

            वाचनाची आवड निर्माण झाल्यावर एखादे दिवशी काहीच वाचलं नाही तर आपल्याला करमत नाही. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो वाचन करायला वेळच मिळत नाही. पण आता आपण कोठेही असलो तरी मोबाईलवर ऑनलाईन वाचु शकतो. आवड असली की सवड मिळते या उक्तीप्रमाणे वाचनाची आवड निर्माण झाली की सवड मिळतेच. कटिंग करायला गेल्यावर आपल्यापुढे नंबर असतात. त्यावेळी आपण मोबाईलवर वाचू शकतो. प्रवासामध्ये आपण वाचू शकतो. ज्या- ज्या वेळी आपल्या हाती मोबाईल असतो त्या- त्या वेळी आपण वाचू शकतो. फक्त वाचनाची आवड निर्माण व्हायला हवी.

            आपण म्हणतो एखादी व्यक्ती खूप हुशार आहे. ती व्यक्ती हुशार नसते. त्या व्यक्तीला आपल्यापेक्षा ज्ञान जास्त असते. त्या व्यक्तीने ते ज्ञान मिळवण्यासाठी वाचन केलेले असते. आपणही वाचन केले तर आपल्यालाही ज्ञान प्राप्त होईल. लोकांमध्ये कोणत्याही विषयावर चर्चा चालू असेल तर आपल्याला त्या विषयाबद्दल बोलता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्या विषयाचं ज्ञान असणं महत्ताचं आहे. आणि ज्ञान मिळवण्यासाठी आपण पुस्तक वाचलं पाहिजे.

            लहान मुलांना लहाणपणापासूनच पुस्तकांची आवड निर्माण व्हायला हवी. सुरुवातीला चित्र असलेली पुस्तके घरी न्यावीत. त्यानंतर छोटया- छोटया बोधपर गोष्टींची पुस्तके वाचायला द्यावीत. त्यामुळे त्यांना वाचनाची आवड निर्माण होईल. वाचनातूनच त्यांच्या मनामध्ये चांगले विचार रुजतील. चांगल्या विचारांची पुस्तके त्यांच्या वाचनात आली तर त्यांच्यावर वेगळे संस्कार करण्याची गरज नाही. आपोआप चांगल्या विचारांचे संस्कार त्यांच्यावर होतील. त्यांच्या रुपाने आपल्या देशाला चांगल्या विचारांचे नागरीक मिळतील.

            बऱ्याच वेळा आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो. त्यावेळी समोरच्या व्यक्तीचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करतो. सद्याच्या काळात लोक मोठया प्रमाणावर वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसाला पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तक भेट देणे उत्तम पर्याय आहे. कारण पुष्पगुच्छ काही वेळात कोमेजून जाईल. पण त्या पुस्तकामुळे प्राप्त झालेल्या ज्ञानाचा त्या व्यक्तीला आयुष्यभर उपयोग होईल. पुस्तक वाचत चला. पुस्तक वाचण्याची सवय आपल्या मित्रांना, आप्तांना लावण्यासाठी प्रयत्न करा. कारण माणूस वाईट नसतो त्याचे विचार वाईट असतात. त्यामुळे आपल्या लोकांच्या मनामध्ये चांगले विचार बिंबवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा.

            माणसाला इतर कोणत्याही गोष्टीचं व्यसन नसावं पण वाचनाचं व्यसन मात्र प्रत्येकाला नक्की असावं. कारण देशात वाईट प्रवृत्त्तीचे लोक खूप आहेत. तरीही देश आज चांगल्या विचारांच्या लोकांमुळेच चालतो. त्यामुळे विचार चांगले करण्यासाठी चांगल्या विचारांची पुस्तके वाचत राहा. तुमचे विचार चांगले असतील तर त्याचा प्रभाव तुमच्या सानिध्यातील लोकांवर होत असतो. तुम्ही एकटयाने जरी वाचन केले तरी तुम्ही तुमच्या सोबतच्या लोकांना चांगले विचार देवु शकता.

            वाचत राहा. ज्ञानी बना आणि ज्ञान वाटा.

 

लेखक - संदीप खुरुद