कठोपनिषद - 1 गिरीश द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कठोपनिषद - 1

कठोपनिषद -
कठोपनिषद हे यमराज व नचिकेता नामक ऋषीपुत्र यांच्यातील संवाद आहे. नचिकेताचे पिता हे ऋषी असतात.
ते दानामधे उपयोग नसलेल्या गायी देत असतं. हे नचिकेताला योग्य वाटत नसे.
एक दिवस त्यांनी पिताश्री ना विचारले मला कोणाला दान द्याल व हा प्रश्न दोन तीनदा विचारल्यावर ऋषी क्रोधाने मी
तुला "मृत्यू ला " देईन असे म्हणतात.
नचिकेता जेव्हा यमराजांकडे जातात तेव्हा यमराज तेथे नसतात. तेथील लोक नचिकेता कडे लक्ष देत नाहीत.
तीन दिवस नचिकेता उपाशी राहतात. अतिथी सत्कार करणे हे एक कर्तव्य आहे.
यमराज परत आल्यावर त्यांना लोक सांगतात की अतिथी सत्कार न करणे वाईट आहे. अतिथीला तृप्त केले नाही तर पुण्य क्षय होतो.
यमराज नचिकेताना म्हणतात
हे अतिथी ! तूं नमस्कार करण्या योग्य असून माझ्या घरी तीन दिवस उपाशी राहिला आहेस त्यामुळे मी तुला तीन वर देतो ते तूं माग व म्हणतात की तुला नमस्कार असो व माझे कल्याण होवो. त्यानंतर नचिकेतानी तीन वर मागितलें.
कठोपनिषद
नचिकेत नी पहिला वर मागितला.
माझे वडिल क्रोधरहित होऊन माझ्याबरोबर पुर्वीसारखे आचरण करू देत.
पुत्रधर्म असे सांगतो की जरी वडिल रागावले तरी पुत्राने राग न करता प्रेमाने वागले पाहिजे. यमराज म्हणाले की तुझे वडिल तुझ्यावर प्रसन्न होतील. तू मृत्यू पासून वाचलास हे पाहून ते आनंदित होतील.
कठोपनिषद-
दुसरा वर - स्वर्गलोकात कोणतेही भय नाही, तिथे यमराज ही नाही, वृद्धत्वही नाही, तहान, भूक नाही तिथे आनंद आहे. मला स्वर्गलोक कसा प्राप्त करता येईल याचा उपदेश करा. यमराज म्हणाले अग्नीची उपासना केली असता स्वर्गलोक प्राप्त होतो.
अग्नी मानवाच्या बुध्दि मधे राहतो.
नचिकेताला यमराजानी अग्निविद्या सांगितली. ती नचिकेतानी नीट समजून घेऊन परत यमराजाना सांगितली. यमराज प्रसन्न झाले व नचिकेताला रत्नमाला भेट दिली.
ज्ञानामुळे स्वर्ग मिळू शकतो. जगामध्ये ज्ञानामुळेच सुखात वाढ होऊ शकते.
ज्ञान व सात्त्विकता वाढवली पाहिजे. ज्ञानामुळेच स्वर्ग पृथ्वीवर प्रगट होऊ शकेल, तसेच मरणोत्तर शांतीला स्वर्ग नाव आहे.
तिसरा वर - मनुष्याच्या मृत्यू नंतर काही म्हणतात " हा आहे ", कोणी म्हणतात
" हा नाही आहे ".
मला आपल्या कडून शरिराचा नाश झाला की आत्मा नष्ट होतो का नाही याबाबत ज्ञान प्राप्त करून घ्यायचे आहे.
यमराज म्हणाले याबाबत देवांनाही शंका आहे आणि ते कळणे अवघड आहे.
तू मुले ,नातवंडे जी १०० वर्षे जगतील, हत्ती, गायी, सोने, जमीन माग पण मृत्यू बद्दल विचारू नकोस.
तू अजून लहान आहेस, विद्वान लोकांना पण हे कळत नाही. तुझ्या दैवी आणि मानवी अशा सर्व इच्छा पूर्ण होतील असा वर देतो. दुर्लभ वस्तू, दिव्य अप्सरा, रथ , मानवाला प्राप्त होऊ शकत नाहीत अशा स्त्रिया देतो त्यांच्याकडून तू सेवा करून घे. पण मरणा बाबत किंवा मरणानंतर जीवाचे काय होते असे प्रश्न विचारू नकोस.
नचिकेता म्हणाले, आपण म्हणता याबाबत देवांनाही संशय आहे आणि हा विषय सोपा पण नाही आहे. पण याबाबत सांगण्यास आपल्याइतका श्रेष्ठ कोणीही नाही.
या वरासारखा दुसरा वर नाही.
नचिकेता म्हणाले , आपण म्हणता ते सर्व भोग क्षणभंगूर आहेत. हे सर्व उद्या असतील का नाही अशा प्रकारचे आहेत.
दिर्घ कालीन नाहीत. मानव मर्त्य आहे
हे भोग त्याच्या सर्व इंद्रियातील तेज कमी करणारे आहेत. अप्सरा इ. भोग अनर्थाचे कारण असतात.
हे भोग तेज, यश,धर्म, विर्य क्षीण करणारे असतात.
माणसाचे आयुष्य अल्प आहे.
त्यामुळे आपले रथ, स्वर्गातील नृत्य, संगीत आपल्याकडेच राहो. माणसाला कितीही संपत्ती मिळाली तरी समाधान होत नाही. आपण मला दर्शन दिलेत हेच महत्त्वाचे आहे. धन कमावता येते. इच्छा कधीच संपत नाहीत त्या वाढतचं असतात.
मला तुमचे दर्शन झाले आहे त्यामुळे मी धन पाहिजे असेल तर मिळवू शकतो. तुमचा आशीर्वाद लाभलेला मनुष्य अल्पायुषी किंवा गरीब राहू शकत नाही. आत्मविज्ञान हेच महत्वाचे आहे.
जो आज ना उद्या मृत्यू पावणारा आहे व विवेकी असा कोणताही मनुष्य धन आदी अनित्य वस्तू मागणार नाही.
मला मिथ्या भोग वस्तूंचे प्रलोभन दाखवण्या पेक्षा मी जी प्रार्थना केली आहे म्हणजेच परलोक व आत्म्याविषयी ज्ञान मला द्या. हा विषय गुढ व गहन आहे.
माझे मन अनित्य वस्तूंची इच्छा करत नाही.
त्यामुळे मला कोणतीही दुसरी इच्छा नाही. माझा वर मी मागितला आहे.