प्राक्तन - भाग 4 अबोली डोंगरे. द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्राक्तन - भाग 4

प्राक्तन -४



आतापर्यंत आपण बघितलं की पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या करायला निघालेल्या अनिशाला यशने वाचवलं आणि आनंदी जीवन जगण्याचं सुत्रही लक्षात आणून दिलं. त्यामुळे अनिशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वता साठी जगत स्वताला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर तिला कळून चुकलं की सर्व फक्त यशमुळेच शक्य झालं आणि तिने त्याला पून्हा त्याच टेकडीवर भेटून त्याचे आभारही मानले. आता आठवड्यातून एकदा तरी ती तिथे जायचीच. दोघांमधला सलोखा वाढत होता. त्यानंतर अनिशाला मात्र यशबद्दल विशेष जिव्हाळा आणि आपुलकी वाटत होती. एवढं असलं तरी त्या दोघांनी नावाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्य अजूनही एकमेकांसोबत शेअर केलं नव्हतं. आणि ते जाणून घेण्याच्या आशेने अनिशा पून्हा यशकडे गेलेली. पण यावेळी मात्र तिच्यासमोर यशची हळवी बाजूही समोर आलेली...

आता पुढे...

" तुझं वय किती??" तिने परत विचारलं.

" असं वाटतंय आज तू माझी कुंडली काढण्यासाठीच आलीय. नुसते प्रश्नावर प्रश्नच चालूयेत... जरा तुमच्या बद्दल पण सांगा मॅडम आता." तो जरा मिश्किलपणे म्हणाला. तीही किंचित हसली यावर.

" मी काय तुमच्या इतकी स्कॉलर नाहीये सर. एका प्रायव्हेट ऑफिसमध्ये जॉब करते. स्वताचा खर्च भागेल इतकं कमावते. " ती म्हणाली.

" मग भारीच ना. जे आहे ते उत्तम आहे तुझं. आनंद मिळण्यात नाही मानण्यात असतो. आपण स्वताला कधीच कमी लेखायचं नाही. " तो शांतपणे म्हणाला.

" हम्म कदाचित या सगळ्या गोष्टी मला तुझ्यामुळे कळाल्यात आयुष्यात... " तिने कबुली दिली. तो मंद हसला फक्त...

" पण विषय भरकटला असं नाही का वाटत.. तू अजूनही उत्तर नाही दिलं. सांग किती वर्षाचा आहे तू " तिने परत त्याला आठवण करून दिली.

" खरं सांगू की खोटं... कारण मी खरं सांगितलं तरी तुझा विश्वास बसणार नाही. आणि खोटं सांगितलं तरी " यश उवाच.

" चल मला नको उल्लू बनवू... खरं सांग जे आहे ते " ती...

" अजून पाच महिन्यांनी मला ४२ वर्ष पूर्ण होतील. " त्याने सांगितले. पण तिला आश्चर्य वाटत होतं.

" क्काय खरंच!!? पण वाटत नाही तुझ्याकडे बघून.. एखादा कॉलेजचा मुलगा वाटतो तू तर मला " ती त्याला वरपासून खालीपर्यंत न्याहाळत आश्चर्याने म्हणाली. त्याने टी-शर्ट आणि जीन्स घातलेली.. मध्यम बांधा आणि फिटनेसही एकदम फिट होती. डेली जीम करत असावा तो किंवा फिटनेसबाबतीत सजग असावा असं तिला वाटलं.

" बघ म्हटलं होतं ना तुला खरं सांगितलं तरी ते खोटं वाटेल म्हणून घे आता... चल आता मलाही चान्स दे चकित होण्याचा तुझं वय सांगून..." तो तिला चिडवत म्हणाला.

" माझे ३८ वर्ष पूर्ण आहेत. पण तरी मी वयाने तुझ्यापेक्षा मोठी वाटत असेल हो ना." अनिशा स्वताकडे बघत बोलली.

" असं अजिबात नसतं. एज इज जस्ट अ नंबर... आणि तूही छान आहेस. फक्त जरा फिटनेसकडे लक्ष देत जा. " त्याने तिला समजावलं. मध्यम उंचीची, दिसायला सुंदर असली तरी चेहऱ्यावरचं तेज हरवून बसलेली.. अंगकाठी एकदम बारीक. चाळिशीत आली तरी विशीतल्या मुलीप्रमाणे नाजूक शरीरयष्टी होती तिची.. पण सहज कुणालाही स्वताकडे आकर्षित करेल अशी तिची देहबोली होती. त्याने क्षणभर तिचं निरीक्षण केलं.

" आता तू फिटनेस बाबत पण मला टिप्स देत जा.." ती गालातल्या गालात हसत म्हणाली. त्यानेही होकारार्थी मान हलवली.

" तुझं लग्न पण झालं असेल ना मग... तुझ्या फॅमिली बद्दल पण सांगच आता. किती लकी असेल तुझी पार्टनर जिला तुझ्यासारखा समजून घेणारा नवरा मिळाला. आणि तुझी मुलं पण तुझ्यासारखीच असतील ना हुशार आणि स्कॉलर...." ती अचानक काहीतरी आठवत त्यावर अंदाज लावत म्हणाली. पण हे ऐकून त्याचा चेहरा मात्र कमालीचा उतरला. तो फक्त जमिनीकडे तोंड करून अंगातलं सारं बळ एकवटून ठेवण्याचा प्रयत्न करत होता. न जाणो चुकून त्याचा बांध फुटला तर तो स्वताला माफ करू शकणार नव्हता.

" काय झालं यश... मी जरा जास्तच विचारून अस्वस्थ केलं का तुला??" त्याला अचानक असं बघून ती काळजीने म्हणाली.

" नाही तू स्वाभाविकपणे विचारलंय यात काही अति नाही. " तो चेहरा स्थिरस्थावर ठेवत म्हणाला. पण त्याच्या उदासीमागे असं काय दडलंय की त्याच्यासारखा इतका हसताखेळता नि स्ट्रॉन्ग माणूस पण कोलमडून गेलाय हे ती जाणून घेऊ इच्छित होती.

" यश... तू हे माझ्याशी शेअर करू शकतोस. मन मोकळं केल्याने बरं वाटेल तुला. कारण संपलेल्या माझ्या आयुष्यात देवदुताप्रमाणे येऊन तू माझा दिशादर्शक बनू शकतोस, तर मी तुझं दु:ख समजून तुझा आधार तरी नक्कीच बनू शकते ना... सांग मोकळा हो.." तिने त्याला भावनिक साद घातली. त्यालाही भरून आलं.

" माझ्या फॅमिली बाबतीत नेमकं काय नि कसं घडलं याचा साक्षीदार स्वत: हा पुलच आहे. " तो समोर त्या पुलाच्या दिशेने एकटक बघत म्हणाला. आणि हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. अतिशय भयानक विचारांनी तिच्या अवतीभवती गर्दी केली.

क्रमशः

©️®️ अबोली डोंगरे.