कामीनी ट्रॅव्हल - भाग ६ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग ६

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ६वा

मागील भागावरून पुढे.

साखरपुडा व्यवस्थित पार पडला होता. लग्नाची खरेदी सुरू झाली होती. साखरपुडा झाल्यावरही हर्षवर्धनचा एकपण फोन नाही आला याचं प्राचीला आश्चर्य वाटत होतं.त्यादिवशी तिनी केला होता तर हर्षवर्धनला त्यांनी फोन दिला नाही.नंतरही त्याचा फोन आला नाही. तिनी ते आई- बाबांना बोलूनही दाखवलं. अशोक आणि वासंतीनं प्राचीन बोलणं फारसं मनावर घेतलं नाही. विचार करून प्राची थकून गेली. एक दिवस तिनी अशोक आणि वासंतीवर बाॅंम्ब हल्लाच केला.

"आई बाबा तुम्हाला मी खूपदा त्या मुला बद्दल सांगीतलं पण तुम्ही लक्ष देत नाही मला असं वाटतंय त्यांच्या श्रीमंतीची तुम्हाला भूरळ पडली आहे. त्यादिवशी त्यांच्या घरी आपण गेलो होतो तेव्हा तुमचे चेहरे मला हे सांगत होते. त्यांचं घर, तिथलं इंटीरीयर, त्यांच्याकडचे खाद्यपदार्थ इतकचं नाही तर त्यांच्याकडची मोलकरीणीची साडी बघून आईच्या मनात काय विचार आले हे सगळं मी ओळखलं."

अशोक आणि वासंती स्तंभीत झाले. कारण प्राची जे बोलली ते खोटं नव्हतं. पण आई-बाबा म्हणून त्यांनी तिच्या चांगल्या भविष्याचाच विचार केला. त्यात त्यांचं काय चुकलं? इथे जे मिळणार नाही ते त्या घरी तिला मिळेल कारण त्यांच्याकडे पैसा आहे,सुखसोयी आहेत आनंदी राहील आपली मुलगी असा विचार केला तर काय बिघडलं?.पण ते असं प्राचीला उत्तर देऊ शकले नाही.काहीन बोलता अशोक कामानी बाहेर गेला आणि वासंती कामाची यादी बघत बसली.

प्राचीने ओळखलं.तीपण काही न बोलता आपल्या खोलीत गेली.प्राची मुद्दाम विषय काढत होती कारण त्यांच्या मनातलं तिला त्यांच्या तोंडून ऐकायचं होतं.जे तिनी त्यांना न कळेल अशा पद्धतीनं ऐकलं होतं. पण आई-बाबा बोलायलाच तयार नाहीत. शेवटी तिनी मनातल्या मनात आईबाबांना नमस्कार केला. तिच्यासाठी स्वतःची पर्वा न करता फक्त तिच्याच सुखाचा विचार करत होते.

हळुहळू महिना उलटला. लग्नाला जेमतेम पंधरा दिवस राह्यले होते. प्राचीच्या लग्नातल्या सगळ्या साड्यांवर ब्लाऊज शिवून आले होते.प्राची मुळात दिसायला छान होती देखणी गोरी अशी नव्हती. गव्हाळ वर्णाची पण तुकतुकीत चेह-याची सडपातळ बांध्याची होती. चेह-यावर सदैव उत्साह ओसंडून वाहत असे. प्राची पटकन कोणाच्या नजरेस आली नाही तरी एकदा नजरेस आली की मग कोणी ही तिला विसरू शकत नसे. तिचं बोलण्यातून तिचा आत्मविश्वास दिसत असे, गालाला हसली की खळी पडत असे. ऊंच असल्यामुळे कोणताही वेश… साडी असो की ड्रेस तिला शोभून दिसे. मेअकप करणं म्हणजे कोणत्या समारंभाला जायचं असलं तरच ती करत असे.

प्राचीमधले गूण ती जेव्हा कोणाच्या सहवासात येई तेव्हा कळतं असे. अशी ही पाटणकरांची कन्या आता बोहल्यावर उभी रहाणार होती. इतर मुलींप्रमाणे तिनेही आपल्या होणा-या नव-याबद्दल काही चित्र रंगवलं होतं. प्रत्यक्षात मात्र तो कधी आपणहून समोर येऊन तिच्याशी बोलला नाही. ही गोष्ट तिला सुरवातीपासून खटकत होती. पण आता तिला तिच्या होणा-या सासूचा चेहरा सतत डोळ्यासमोर येई.त्यांच्या मनाला काहीतरी खुपतं आहे पण त्या सांगू शकत नाहीत.असं तिला वाटतं होतं. ते काय आहे हे शोधण्याची खुमखूमी तिला लागली होती.

बघता बघता लग्नं एक दिवसावर येऊन ठेपलं.अशोक वासंतीची अजूनही लगबग सुरूच होती. कारण लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे असं कधी होत नाही. मूहूर्त जवळ आला तरी काही न काही रहातच असतं.

"प्राची तुझी बॅग भरून झाली का?" वासंती नी विचारलं." हो काकू.मी सगळ्या वस्तू नीट ठेवल्यात " राधा म्हणाली. " राधा प्राचीची बॅग तू बघ. कोणत्यावेळी कोणती साडी आणि दागीने घालायचे हे लक्षात घेऊन बॅग भरलीस नं" "हो काकू बॅग तशीच भरलीय." "अगं मेंदी वाली आली नाही अजून?" " केलाय तिला फोन रस्त्यातच आहे." राधा म्हणाली." प्राची तुझा अरूदादा हेमांगी ताई आले नाही अजून?" राधा हे बोलतच होती की बाहेर कोणीतरी काहीतरी बोललं आणि हास्याचा फवारा उठला.

"शैतान का नाम लिया और शैतान हाजीर " प्राची राधा कडे बघून मिस्कीलपणे म्हणाली." म्हणजे मला नाही कळलं?"
"एक बुडबक तू अरू दादा बद्दल विचारत होतीस नं तोच आलाय. तो जिथे जातो तिथे नेहमीच हास्याचे फवारे उडत असतात.आता बघ हा हसण्याचा आवाज ऐक..हां हेमांगी ताईचा आवाज आहे. दोघही धमाल करतात." "त्यांना तू अजून बोलली नाहीस हर्षवर्धन बद्दल." "नाही. त्यांनाच बघू दे." "प्राची तू न मला अजून कळलीच नाही." प्राची यावर फक्त हसली.

"काय मग तुमचा राजकुमार काय म्हणतो?" अरुदादाने प्राचीच्या खोलीत शिरताच तिला विचारलं. " मस्त.आता बघ ऊद्या. हेमांगी ताई तू थांबते आहेस नं मेंदी काढायला? आणि वल्लरी का नाही आली?" " अगं आली आहे ती.तिच्या बाबांबरोबर बाहेर गेलीय थोड्या वेळानी येईल." " अरूदादा वहिनी का नाही आली?" " अगं आजची रजा नाही मिळाली तिला. ऊद्या संध्याकाळपर्यंत येईल."प्राचीचा चेहरा हिरमुसला.

"किती फोन असतात तुमच्या ह्यांचे?" हेमांगी ताईंनी मिस्कीलपणे विचारलं. "असतात नं पण रोज नाही. कामामध्ये बिझी असतो ग तो." राधा आश्चर्यानी प्राची कडे बघत होती. राधाकडे लक्ष जाताच प्राचीनी डावा डोळा मिचकावला. यानी राधा अजून चमकली. प्राचीनी वातावरण खेळीमेळीचे राहील याचा प्रयत्न केला. ऊद्या हर्षवर्धनला बघीतल्यावर अरूदादा आणि हेमांगी ताई आपल्याला प्रश्न विचारणार आहेतच म्हणून प्राची आज काही बोलली नाही.

सुरवातीला तिला वाटलं होतं. दादा ताईला सांगावं पण जेव्हा त्यांच्या घरी ती जाऊन आली तेव्हापासून तिच्या डोळ्यासमोर सतत सासूचा चेहरा येई. तिच्याशी खूप जुने संबंध असल्यासारखं तिला वाटू लागलं होतं.आपण हर्षवर्धनशी लग्न करून यांच्या घरी जायला हवं आणि यांची मदत करायला हवी असंच सारखं वाटायला लागलं. त्यातच अशोक आणि वासंतीचं बोलणं ऐकल्यापासून तिनी आपल्या निर्णयात बदल केला होता.

राधा तिला गमतीने म्हणालीपण "प्राची तू तर सस्पेन्स सिनेमातली हिरोईन वाटतेय. कुछ तो गडबड है दया असं चालू असतं तुझं सारखं" "दयानी सांगीतली ती गडबड मला राधा म्हणूनच मी तयार झाले या लग्नाला. आता ती गडबड मीच सोडवणार." प्राची स्वतःशीच हसली. राधाला तिचं वागणं कळत नव्हतं पण प्राचीला स्वतःचं वागणं कळत होतं. तिकडे आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे हे ती जाणून होती.

सकाळी जेवतांना छान गंमती जमती चालू होत्या. त्या गमतीत प्राचीला चिडवणं चालू होतं. प्राचीच्या चेह-यावर हसू होतं. ती मधूनच मेंदीकडे बघत होती. हे वासंती आणखी अशोकनी बघीतले. दोघांनाही खूप मोकळं वाटलं. दोघांची नजरानजर झाली. दोघही एकमेकांकडे बघून हसले.त्यांचं एकमेकांकडे बघून हसणं अरुदादानी पकडलं. "अशोक काका आणि वासंती काकू तुमचं पण लग्न लावायचं का पुन्हा? बघा कसे चोरून एकमेकांकडे बघतात आणि हसतात." अरूच्या या बोलण्यावर घरात एकच हशा पिकला.

अशोक काही बोलला नाही वासंती मात्र कृत:कोपानी म्हणाली "अरु फार जीभ वळवळतेय." "ऐ काकू कशाला चिडते. प्राचीसाठी घेतलंय कार्यालय तुमचं लग्न पुन्हा लावू गंमत" वासंती डोळे मोठे करून आत गेली.
"अशोक काका काकू चिडली. तुझं काय म्हणणं आहे?" "मला चालेल." "अहो….काय हे! घ्या.. आता हे गुडघ्याला बाशींग बांधून उभे आहेत." यावर सगळे हसले. हेमांगी म्हणाली "काकू परदेशात करतात असं. आपणही करायचं का? अरुची कल्पना मस्त आहे."

"हेमांगी आता तूही सुरू झालीस का? " काकू अगं तुमचं लग्नं झालं तेव्हा आम्ही लहान होतो.आता मजा येईल." "काकू हवं तर प्राचीचं लग्नं झाल्यावर करू.चालेल?" सगळे पुन्हा हसले."अगं वासंती गंम्मत करतात दोघं जणं." अशोक म्हणाला.यावर वासंती म्हणाली " अहो या दोघांचं मला लहानपणापासून माहिती आहे.पण आता प्राची बरोबर तिची मैत्रीण आहे. तिला कसं वाटेल?" " काकू मला प्राॅब्लेम नाही. नाईस आयडीया. मला फक्त तुमच्या लग्नाचा वेगळा ड्रेस हवा." राधाच्या बोलण्यावर पुन्हा एकदा खसखस पिकली. वासंती जरा लाजत जरा चिडण्याचा अभीनय करत आत गेली.

दुस-या दिवशीची संध्याकाळ व्हायला आली तसे प्राची कडचे सगळे कार्यालयात आपलं सामान घेऊन निघाले.कार्यालय संध्याकाळी मिळणार होतं ही सगळी मंडळी तिथे पोचली तेव्हा कार्यालय नुकतंच रिकामं झालं होतं.सगळं स्वच्छ करणं चालू होतं.सगळे बाहेरच थांबले होते.आता या लग्नाची सजावट सूरू झाली होती.याचं काॅन्ट्रॅक्ट भय्यासाहेबांनी आधीच दिलं होतं.

जरावेळानी सगळे आपलं सामान घेऊन कार्यालयात शिरले.प्रत्येकानी खोलीत आपलं सामान ठेवलं.थोड्या वेळानी प्राचीला तयार करायला पार्लरवाली येणार होती. तोवर प्राची आणि राधा हळूहळू बोलत होत्या.

आज प्राचीच्या लग्नाचा अदला दिवस होता.श्रीमंत पूजनाचा. कार्यालयात सगळे जमले होते. नातेवाईकांचे गृप झाले होते,गप्पा चालल्या होत्या,चेष्टामस्करीला उधाण आलं होतं. मधेच अरूदादा आणि हेमांगी आत आले जिथे प्राची नटूनथटून बसली होती."प्राची हा नवरा मुलगा इतका शांत कसा बसला आहे? त्यांचे कोणी मित्र दिसत नाहीत आलेले." प्राची यावर फक्त हसली काही बोलली नाही.अरूदादा पुन्हा म्हणाला " हेमांगी तुला काही वेगळं वाटतंय का नव-या मुलांकडे बघीतल्यावर?" "वाटतं तर आहे.पण काय हे कळत नाही."

"प्राची तू बोलत का नाहीस? " "अगं काय बोलू ताई त्यांचे वडील फार कडक आहेत. त्यांना आई आणि तो दोघंही घाबरतात. माझ्याशीसुद्धा हर्षवर्धन खूप बोलत नाही."राधा प्राचीकडे आश्चर्यानी बघत होती. प्राची किती सराईतपणे खोटं बोलते आहे. पटवर्धनांचा पैसा बघून प्राची पण बदलली का? राधाच्या गोंधळलेल्या चेह-याकडे प्राचीचं लक्ष गेलं तशी ती हसून म्हणाली
" राधा मला जरा पाणी आणतेस का?"

"हो आणते." राधा पाणी आणायला गेली. प्राचीच्या उत्तरावर अरूदादा हेमांगी ताई एकमेकांकडे बघतच बसले. प्राचीला त्या मुलामध्ये काही गडबड वाटतं नाही याचं त्यांना आश्चर्य वाटलं दोघंही खोलीच्या बाहेर आले. त्यांना जातांना प्राचीने बघीतले. ती जरा हळवी झाली पण स्वतःच्या भावना तिनी आवरल्या

बाहेर येताच हेमांगी म्हणाली " अरू तू एक मार्क केलस का प्राचीला या विषयावर जास्त बोलायची इच्छा नव्हती." " हो माझ्याही लक्षात आलं ते. एवढी हुशार चाणाक्ष मुलगी आहे प्राची तिच्या नजरेतून हे कसं सुटलं असेल? का पटवर्धन पैसेवाले आहेत म्हणून तिनं पसंत केलं हे स्थळ"

" मलापण असंच वाटतंय.वासंती काकू आणि अशोक काका खूप आनंदात दिसतात आहे." " अरू आपण फार विचार करू नाही.ते तिघही आनंदात आहेत नं. मग विषय संपला. आपणही लग्नात मजा करू.चल बाहेर बसू."

राधाच्या कानावर या दोघांचा संवाद आला. तिलाही प्राचीचं वागणं कोडंच वाटत होतं.पण तिला तिच्या मैत्रीणीवर विश्वास होता. प्राचीला पाणी देऊन तिनी अरूदादा आणि हेमांगी ताईचा झालेलं बोलणं तिला सांगीतलं.यावर प्राची म्हणाली

"आयुष्यात पुष्कळदा धाडसी निर्णय घेतला जातो. आता हा निर्णय आईबाबांची इच्छा राखण्यासाठी घेतला आहे. बघू पुढे काय होतंय." "थोडक्यात तू तुझ्या अस्तीत्वाचा,इच्छांच्या बळी देणार आहेस."

"मला लहानाचं मोठं करताना आईबाबांनी पण खुपदा आपल्या इच्छांच्या बळी दिलाय. मी आज त्यांची परतफेड करतेय. इतकच." "यात चूक नाही?" " चूक काय असणार? मी आईबाबांच्या प्रेमापोटी हे धाडस करतेय.बघू पुढचं पुढे."

"यावर मी काय बोलणार?तुला खूप शुभेच्छा. तुला कधी गरज लागली तर मला हाक मार. कधी मन मोकळं करावसं वाटलं तर कर.मी ऐकीन सगळं.पण तू ताण घ्यायचा नाही.कबूल?" "हो. राधा तू मला खूप जवळची आहेस खुपदा मी काही न सांगता तुला कळतं.मी तुलाच हाक मारणार अडचणीच्या वेळी." राजधानी हळुवारपणे तिचा दाबला.

वरून प्राची शांत दिसली तरी तिच्या मनात घालमेल चालू होती. नेभळट,अबोल हर्षवर्धनशी लग्नं करण्याचा निर्णय तर तिनी घेतला होता. हा निर्णय म्हणजे अंधारात उडी घेण्यासारखं होतं. नक्की काय समस्या आहे हे तिला त्यांच्या घरी गेल्यावरच कळणार होतं.

प्राची घाबरट नव्हती म्हणून असा निर्णय घेण्याचं धाडस ती करु शकली. पण विचारांनी प्राचीचा तळहात मात्र घामेजला होता. हे बघून राधानी विचारलं " काग तुझा तळहात घामेजला आहे. ताण आला का?" " हं थोडा." एवढं बोलून ती पुन्हा आपल्या विचारात गुंतली.

भविष्याच्या पोटात काय आहे हे तिलाही कळत नव्हतं.
-------------------------------------------------------
प्राचीची ही संभ्रमीत अवस्था कशी संपेल?
क्रमशः
लेखिका...मीनाक्षी वैद्य.