कामीनी ट्रॅव्हल्स भाग ८वा
काल काय घडलं हे आपण बघीतलं.त्या प्रकरणाने प्राचीची झोप उडाली होती आता काय होईल पुढे…
सकाळी सकाळी प्राचीला थोडा डोळा लागला होता. तेवढ्यात तिच्या खोलीचं दार वाजलं प्राचीने डोळे उघडले पण क्षणभर तिला काहीच कळेना. मग हळुहळू तिच्या सगळं लक्षात आलं. तिनी उठून दार उघडलं बाहेर तिच्या सासूबाई उभ्या होत्या. "प्राची सकाळी तू सकाळी चहा घेतेस की काॅफी?"
"काही नको मला." हे बोलतांना ती रागानेच सासूकडे बघत होती. तिच्या अश्या बघण्याने त्या काव-याबाव-या झाल्या.
"काल जे घडलं त्यामुळे तू नाराज असणं स्वाभाविक आहे. पण तू रागावू नकोस.एकदा माझं ऐकून घे्. हर्षवर्धन असा का झाला हे तू ऐकून घे.मग तु काय करायचं ते ठरव." त्या काकूळतीनी तिची विनवणी करत होत्या.प्राचीच्या डोक्यातला राग अजून गेला नव्हता.
भय्यासाहेब जोरात ओरडले" काय करताय तुम्ही तिकडे?मला चहा कधी मिळणार आहे?" "मी प्राचीला चहा घेते की काॅफी हे विचारायला आले."त्या घाबरतच बोलत होत्या. प्राचीला नवल वाटलं. एकतर भय्यासाहेबांना एवढं ओरडून बोलायची गरज नव्हती. दुसरं या इतक्या घाबरून का बोलतात, वागतात? काय कहाणी आहे या मायलेकांची.
सासूबाई म्हणतात तसं ऐकली पाहिजे यांची बाजू. "येतेस नं खाली." एवढं बोलून त्या खाली उतरल्या एवढं त्यांना मी रागानी बोलले पण डोळ्यात किती ममता होती. प्राची भानावर आली. फ्रेश होऊन खोलीतून बाहेर पडता पडता प्राचीचं लक्ष हर्षवर्धनकडे गेलं.तो झोपलाच होता.या जगाची त्याला शुद्ध नव्हती. क्षणभर त्याच्याकडे बघून ती खोलीच्या बाहेर पडली.
स्वयंपाक घरात प्राची आली तशी कामीनी बाईंनी तिच्यापुढे चहाचा कप धरला. "आज तुझा आपल्या घरचा पहिला दिवस आहे. तुला रुळायला वेळ लागेल. काही अडचण आली तर सांग. आम्ही आहोत." आज तिच्या सासूबाई इतकं बोलल्या याचं नवल वाटलं तिला."तुम्ही पहिल्यांदा बोललात माझ्याशी"
" हं.या घरात मी फारसं बोलत नाही." " का?" "या घराचा नियमच आहे तसा. इथे फक्त हर्षवर्धनचे बाबा बोलतात. आम्ही दोघं ऐकतो.तू बघ बोलून तुला बोलता आलं तर आनंदाची गोष्ट आहे." त्यांचं वाक्य पूर्ण व्हायची होतं की तेवढ्यात भय्यासाहेबांचा पायरव ऐकू आला तशी त्या चटकन वळून ओट्यापाशी गेल्या.
भय्यासाहेब आत आले म्हणाले" चहा अजून तयार नाही का? अरे प्राची तू अशी उभी राहून काय चहा पिते आहेस? चल समोरच्या खोलीत बसून पी." " हो आले. आई तुम्हीपण चला नं समोर बसून एकत्र चहा घेऊ."
तिनं असं अचानक म्हटल्यामुळे कामीनी बाई बावरून गेल्या. एकदाच त्यांनी भय्यासाहेबांकडे बघीतलं. त्यांचे रागीट डोळे बघीतल्यावर त्यांनी मान खाली घातली.भय्यासाहेबांचे रागीट डोळे बघीतल्यावर प्राचीला कोडं पडलं एवढा कसला राग आला यांना
"या कशाला हव्यात बाहेर चहा प्यायला. त्या त्यांचं काम करतील. प्राची तू आणि मी बाहेर बसून चहा घेऊ. द्या मला चहा." कामीनी बाईंनी लगेच चहाचा कप त्यांना दिला. प्राचीला कळेना आपल्याबरोबर सासूबाई चहा घ्यायला बसल्या असत्या तर काय बिघडलं असतं.भय्यासाहेब रागातच चहाचा कप घेऊन बाहेर गेले.
प्राचीचा पाय स्वयंपाक घरातून निघत नव्हता. भय्यासाहेबांनी तिला हाका मारली तशी ती म्हणाली
" मी इथेच चहा घेते आईंसोबत." प्राचीच्या बोलण्यानी कामीनी बाईंच्या चेहे-यावर हलकंसं हास्य आलं. तिही प्रत्युत्तर म्हणून तसंच हसली.
दोघी नुसत्या एकमेकींकडे बघत अंदाज घेत होत्या.प्राचीची नजर त्यांच्या चेहे-याआड दडलेलं दु:ख वाचायचा प्रयत्न करत होती.कालचा प्रसंग प्राचीच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला.हे ड्रग्ज हर्षवर्धनच्या आयुष्यात कधी आणि कसे आले हे तिला जाणून घ्यायचं होतं.
एवढा पैसा असून यांनी वेळेवर उपचार का नाही केले. आपल्या सासूला औषधाप्रमाणे वेळेवर ड्रग्ज देण्याची वेळ का आली. आपली सासू जो पर्यंत मोकळेपणानी आपल्याशी बोलत नाही तो पर्यंत आपल्याला खरी गोष्ट कळणार नाही हे प्राचीच्या लक्षात आलं.
या घरात येऊन तिला एक दिवस जेमतेम झाला होता. तरी तिच्या लक्षात आलं की जोपर्यंत भय्यासाहेब घरात असतील तोपर्यंत आपल्याशी आपल्या सासूबाई मोकळेपणानी बोलणार नाहीत. म्हणजे आपल्याला वाट बघावी लागेल भय्यासाहेब बाहेर जाण्याची.
तशी संधी लवकरच प्राचीला मिळाली.त्याच दिवशी दुपारी जेवण झाल्यावर भय्यासाहेबांना कोणाचा तरी फोन आला.ते तडक तयार होऊन बाहेर गेले. प्राचीने ही संधी साधून सासूला बोलकं करायचं ठरवलं.आणि वेळ न घालवता प्राची झपझप खाली आली.समोरचं दार बंद आहे की नाही हे आधी प्राचीने बघीतलं.
सासूच्या खोलीत प्राची आली. त्या काहीतरी वाचत होत्या. तिला खोलीत आलेलं बघताच त्यांनी वाचन थांबवलं आणि प्रश्नार्थक मुद्रेनी तिच्याकडे बघू लागल्या. "आई भय्यासाहेब बाहेर गेलेत म्हणून मी इथे आले.ते येईपर्यंत मला तुमची बाजू जाणून घ्यायची आहे. तुम्ही मनमोकळी बोला.सगळं सांगा न घाबरता."
सगळा धीर एकवटून कामीनी बाई सांगू लागल्या.त्या जसं जसं सांगत होत्या ते ऐकून प्राचीच्या अंगावर काटा आला. आपल्याला ऐकतानाच इतका त्रास होतोय मग यांनी हे सगळं कसं सहन केलं असेल? हां विचार करुनच प्राची हादरली.
"आई तुम्ही भय्यासाहेबांना कधी प्रतिकार का नाही केला?"
"कसं करणार? मला कोणाचा पाठींबा नव्हता ग. सावत्र आईकडून काय अपेक्षा करणार? यांनी माझ्या भावांचा बहिणींचा शिक्षणाचा खर्च उचलला, त्यांची लग्नं लावून दिलीत. ओळखीनी नोकरीत लावून दिली.मग सांग सगळे माझ्या बाजूंनी का उभे राहतील?"
"माझी बाजू घेऊन स्वतःच्या पायावर का धोंडा मारून घेतील. सरळ गणीत आहे हे. मी अजीबात त्यांना दोष देणार नाही. खूप खडतर आयुष्य होतं माहेरी आमच्या सगळ्यांचं. सकाळी जेवायला मिळालं तर रात्री काय हा प्रश्न असायचा.
माझे भाऊ आणि बहिणी कुठे अन्नदान चालू आहे हे कळलं की तिथे जाऊन जेवत. घरात अन्नाचा कण नाही मग काय करणार? माझी लहान भावंड नाईलाजानी जेवायची तिथे.
भूक माणसाला काही करायला लावते.माझी भावंडं तर फार लहान होती.ते कसे उपास सहन करू शकले असते.माझी आईपण मुलांसाठी नाईलाजाने जायची.
मी आणि माझे वडील मात्र नाही गेलो कधी. बायको मुलं अन्नछत्रात जाऊन जेवतात हा त्यांना स्वतःचा अपमान वाटायचा. ते हरवल्यासारखे बसून असायचे. मला त्यांची स्थिती बघवायची नाही म्हणून मी नाही जायची जेवायला.
सावत्र आई असली तरी ती एवढी पण दुष्ट नव्हती. थोडंसं जेवण आमच्या दोघांसाठी आणायची. माझे वडील ते जेवत नव्हते.माझी सावत्र आई मला म्हणायची "बाई तू लहान आहे. तू नको वडलांसारखी उपाशी राहू. खाऊन घे." वडील म्हणायचे "पोरी मी हरलो ग! महिन्यातून पंधरा दिवस दुष्काळातच ठेवतो तुम्हाला. पण दुसरं काम मिळत नाही काय करु?एका कामाच्या पैश्यात भागत नाही."
मी वयात आले होते.आमच्या घराजवळ एक संस्था होती त्यात थोडंफार काम करायला जायचे. खूप पैसे नव्हते मिळत पण तेवढाच हातभार व्हायचा घराला. वडलांचं दु:ख मला बघवत नव्हतं. मी मन लावून काम करत असे.
तिथल्या मुख्य होत्या सुलभा ताई त्यांना मी फार आवडतं असे. मी फार बोलत नसे. बोलण्यासारखं काहीच नव्हतं ग माझ्याकडे. गरीबी तोंडाला कुलूप लावते.गरीबीत पोटाची भूक,अन्नाची भूक हेच स्वप्नं असतं.
त्या संस्थेच्या कार्यक्रमात एकदा हे अध्यक्ष म्हणून आले होते. त्यादिवशी सुलभाताईंनी त्यांची एक जूनी साडी आणि ब्लाऊज दिलं होतं. ती घाल म्हणाल्या कार्यक्रमाच्या दिवशी मी ती साडी घातली .दोन्ही खांद्यावरून पदर घ्यायची सवय होती कारण साडी ठीक असली तरी ब्लाऊज खराब असायचं पुष्कळदा फाटकं असायचं ते दिसू नये म्हणून असा पदर घ्यायची.
सुलभा ताईंनी दिलेल्या त्या जुन्या साडीतही मी आकर्षक दिसत होते. यात माझ्या सौंदर्याची कमाल नव्हती कारण मी बेतास बात होते दिसायला.
ही माझ्या वयाची जादू होती. सोळाव्या वर्षात गाढवीण पण सुंदर दिसते म्हणतात. माझं तसंच होतं. यांना मी आवडली. माझं बंद तोंड त्यांना आवडलं कारण त्यांना कोणी प्रश्न विचारलेले आवडतं नाही.
लग्नं होऊन इकडे आले मग यांचा स्वभाव कळायला लागला. मला यांनी कधीच पत्नीचा दर्जा दिला नाही. माणूस म्हणून माझं अस्तीत्व माहेरी नव्हतंच इथेही नाही. फरक फक्त हा होता की इकडे मला दोन वेळी पोटभर जेवायला मिळायचं .
स्वयंपाकाची जबाबदारी कधीच नव्हती. स्वयंपाकाला बाई होती. तसं बघीतलं तर ती आणि मी एकाच पातळीवर होतो. तिला पैशासाठी कामं करत फिरावं लागायचं. माझ्याभोवती पण माझा नसलेला श्रीमंती डौल होता. एवढाच फरक होता आणि आहे.
कुठेतरी राह्यचं म्हणून इथे राहत होते जेवत होते. माझ्या आई वडलांच्या दृष्टीनं माझ्या जेवणाचा प्रश्नं नेहमीसाठी सुटला होता.
जेव्हा जेव्हा यांनी बोलावलं तेव्हा तेव्हा कुठलंही कारण न सांगता माझं शरीर यांच्या स्वाधीन करत गेले. कारण सांगायला मला वाव नव्हता. कारण मी यांची कठपुतळी होते आणि अजूनही आहेच.
कसलाच आनंद मला आयुष्यात घेताच आला नाही. हर्षवर्धन सुरवातीला यांचं वागणं बघून घाबरायचा. हळूहळु घरी थांबणं त्यांनी कमी केलं त्याच्या मनाची उलघाल मी बघत होते पण तो कधी बोलला नाही मला त्रास नको म्हणून.
ऐन तारुण्यात असलेला मुलगा संवेदनशील असतो हे कधीच त्यांनी समजून घेतलं नाही. कोणासमोर कधी आणि कोणत्या शब्दात ते हर्षवर्धनचा अपमान करतील हे सांगता यायचं नाही. त्यालाही खूप काही शिकायचं होतं. वेगळं काहीतरी करायचं होतं पण यांच्या अशा स्वभावामुळे तो पार कोषात गेला ग.
तेव्हापासून कोणी येणार असलं यांच्याकडे की तो घरी थांबतच नसे. माझा जीव कळवळायचा पण मी काही करू शकत नव्हते.
मला हिम्मत नव्हती त्याला विचारायची. त्यालाही माझी मर्यादा कळत होती. खालमानेनी मनात दु:ख लपवून जगत होता तो आणि मीपण. आणि एक दिवस हर्षवर्धनच्याही नकळत तो या ड्रग्जच्या आहारी गेला."
भावना वेग सहन न होऊन कामीनी बाई थोड्या वेळ बोलायचं थांबल्या.
"त्याला याचं व्यसन लागलाय कळल्यावर उपाय का नाही केलेत?" प्राचीने न राहवून कामीनी बाईंना प्रश्न केला. " यांनी साफ नाही सांगीतलं. त्यांच्या दृष्टीनं हर्षवर्धन बेकाम आणि नालायक मुलगा होता. म्हणाले त्याला बुडू दे नशेत आणि जाऊ दे त्याला जिवानिशी. तेव्हाच माझी सुटका होईल असं म्हणाले. तू जर जास्त मागे लागलीस तर निघून जा घरातून असं बोलले."
मी काय करणार? बसले गप्प. मुलाला उपचार तर मिळालेच नसते पण माझ्या भावंडांशी यांचं वाकडं झालं असतं. त्यांचाही विचार करावा लागला." कामीनी बाई हुंदका आवरू शकल्या नाहीत.त्यांना जवळ घेऊन प्राची नी त्यांना हळूच थोपटलं तसं त्या अधिकच रडू लागल्या.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि दोघी सावध झाल्या."तू वर जा पटकन मी दार उघडते." कामीनी बाई डोळे पुसत प्राचीला म्हणाल्या. प्राची धावत पळत जीना चढून खोलीत गेली. तीने खोलीचं दार लावलं तसं कामीनी बाईंनी समोरचं दार उघडलं. "इतका वेळ का लागला दार उघडायला?" त्या काहीच बोलल्या नाही."प्राची कुठे आहे?" भय्यासाहेबांनी विचारलं." आपल्या खोलीत आहे." कामीनी बाईंनी उत्तर दिलं.
आत्ता जर प्राचीनी दार उघडलं असतं तर त्यांना आनंद झाला असता. इतकी वर्ष बायकोचा चेहरा बघून कंटाळलेले भय्यासाहेब जरा चिडलेच. रागानीच ते सोफ्यावर बसले त्यांचं वेळी त्यांना एक फोन आला.ते बोलण्यात गुंतले.
त्यांच्याकडे बघताना कामीनी बाईंच्या मनात विचार आला की पैसा आणि बाई दिसली की यांचं वागणं किती बदलतं. प्राचीला या घरात यांच्यापासून वाचवायला हवं. प्राची गुणाची आहेच पण खरोखरच सुंदर आहे. प्राची मनानी, विचारानी सुंदर असल्यानी छान दिसते. आपण कधीपर्यंत तिला यांच्यापासून वाचवू शकू? हां प्रश्नं त्यांना पडला.
आपलं आयुष्य माहेरी बिनबुडाचे होतं इथेही तसंच. आपले बाबा आपल्याला म्हणाले होते "कामीनी मला हा मुलगा आवडलेला नाही पण कशाच्या जोरावर नाही म्हणू. तुझं त्यांच्याशी लग्नं झालं तर तुझ्या भावंडांचं आयुष्य बदलेल.ते शिकतील पोटापाण्याच्या उद्योगाला लागतील.पण हे सगळं तुझा सौदा केला तरच होणार आहे. तुझ्याबदल्यात तुझ्या भावांचा आयुष्य. तुझी आई असती तर तिनं असं कधी केलं नसतं."एवढं बोलून स्वस्थ बसले पण त्यांच्या डोळ्यातुन अविरत पाणी गळत होतं.
स्वतःच्या वडिलांची ही अवस्था कामीनीला बघवली नाही.तिला येणारं रडू मनातच दडवून ती आपल्या वडलांना म्हणाली." बाबा आईनी पण मुलांचाच विचार केला.तिचं काही चुकलं नाही.मी त्या घरी गेले की मला चार घास जेवायला मिळतील हेच तिनी बघीतले. माझी उपासमार टळेल .त्यांचा पाठींबा असेल तर आपल्या घरातील कोणालाही अन्नछत्राच जेवायला नाही जावं लागणार. आईचं चुकलं नाही.तसच तुमचही चुकलं नाही.तुमचे वडील लवकर गेले म्हणून तुम्ही शाळा सोडलीत नाहीतर आज तुम्ही चांगलं शिकून चांगल्या नोकरीत असता."
"हो ग पोरी तू म्हणतेस ते खरं आहे. ज्या घरी जाते आहेस त्या घरी आनंदानी रहा. " कामीनी बाई स्वतःच्या विचारात इतक्या गुंतल्या होत्या की भैय्यासाहेबांच्या हाका त्यांच्या कानी पोचल्याचे नाही. भय्यासाहेब त्यांना शोधत त्यांच्या खोलीपाशी आले."लक्ष कुठे आहे तुमचं?केव्हाचा हाका मारतोय" "अं…" त्या दचकून विचारातून बाहेर आल्या."काही कामं होतं का?" "दुपारच्या चहाची वेळ झाली.लक्षात आहे की नाही.आणि प्राचीला स्वयंपाक घरात बसवून चहा देऊ नका. बाहेरच्या खोलीत पाठवा कळलं?" " हो".म्हणत कामीनी बाईंनी मान हलवली.
चहा करण्यापूर्वी त्या वर प्राचीला बोलवायला गेल्या.दरावर टकटक करून म्हणाल्या "प्राची मी आहे.तू चहा घेणार आहेस का?" त्यांच्या आवजानी प्राची विचारातून बाहेर आली. तिनी दार उघडलं." चहा घेणार आहेस?" " मी दुपारी चहा नाही घेत." " काॅफी घेतेस का?" " हो काॅफी चालेल." " ठीक आहे. काॅफी करून तुला आणून देते." "नको मी येतेन खाली."
कामीनी बाईनी डोळ्याने खालच्या बैठकीकडे खूण करून सांगितलं "तिथे बसावं लागेल चहा घ्यायला.यांनी सांगीतलं आहे." प्राचीला राग आला.एवढ्यात भय्यासाहेबांचा आवाज आला " किती वेळ आहे चहाला?" " मी प्राचीला चहा घेतेस का म्हणून विचारायला आले." "तिचा चहा इकडे समोरच आणा." किती लंपटपणा या माणसाचा प्राचीच्या मनात आलं." ती नाही येणार खाली.तिला बरं वाटतं नाही.आणि ती चहा घेत नाही. मी काॅफी करून देते तिला." " ठीक आहे. मलापण काॅफीच कर." यावर कामीनी बाई कुत्सीतपणे हसल्या.
---------------------------------------------------------
कामीनी बाईंकडून भय्यासाहेबांबद्दल कळल्यावर प्राची आता पुढे काय करेल?
क्रमशः लेखिका.. मीनाक्षी वैद्य