मातंग समाजानंही पुढं यावं Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मातंग समाजानंही पुढं यावं

*मातंग समाजानंही विकासाच्या क्षेत्रात यावं?*

          *अलिकडे चित्र दिसतं की मांग वा वेगवेगळ्या नावानं संबोधल्या जाणारा हा समाजात रस्त्यावर भीक मागतांना दिसतो. एकदा कुणाच्या तरी रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी असतांना एक व्यक्ती माझ्याजवळ आला. म्हणाला, "साहेब आपण मला बोजारा दिला नाही." त्याचं ते बोलणं. त्यावर इतर उभी असलेली माणसं हसायला लागली. मला मात्र आश्चर्य वाटत होतं. त्याची ती आर्जव. ती काही मला समजली नाही. त्यानंतर कळलं की मी कदाचीत शिक्षीत वाटत असल्यानं त्यानं दारुसाठी माझ्याकडं पैसे मागीतले होते. बोजारा म्हणून. जरी आयोजकानं त्याच्याशी ठरलेले पैसे दिले असले तरी. हे त्यांच्या समाजात अशी पैसे मांगण्याची रीत का? तर त्याला असलेलं दारुचं व्यसन. त्या दारुच्या व्यसनातून त्यांना मिळत असलेला पैसा पुरत नाही. म्हणूनच ही मागण्याची रीत. ही एक प्रकारची शोकांतिकाच आहे.*
           मांग किंवा मातंग समाज. या समाजाला वेगवेगळी नावं आहेत. कुठे यांना गारुडी देखील म्हणतात तर कुठे मादिंग, दानखनी, उचले, ककरकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे इत्यादी. कुठे त्यांना दुसरंच काही. कुठं या समाजाला आजही हिन दर्जाची वागणूक मिळत असते. कुठं या जातीच्या व्यक्तींचा हशा पिकवला जातो. कधी म्हटलं जातं की मांग भलतीच गोष्ट सांग. असा विपर्यास केला जातो. कारण त्यांचं वागणं. ते वागणं हशा पिकविणारं असतं. ज्याप्रमाणे तांदळात खडे असतात ना. तसेच दोनचार खडे याही समाजात असतात. जे दारुसाठी अगदी लाचार होवून इतर समाजांपुढे दोन चार रुपये मागत असतात. जी भीक नसते. परंतु वाईट सवय असते. ती सवय इतरही समाजाला असतेच. परंतु त्या त्यांच्या वाईट सवयीनं ते स्वतःलाच नाही तर आपल्याच समाजातील इतर स्वाभिमानी लोकांनाही बदनाम करीत असतात.     
           मातंग किंवा मांग. एक शुरवीर जात. कालची आणि आजचीही. या जातीच्या भरवशावर गतकाळातील राजे महाराजांनी फारच मजा मारलेली दिसून येते. परंतु बदल्यात या जातीला काहीही दिलेलं नाही. या जातीचा ऐतिहासिक काळ पाहता असं आढळून येतं की पुर्वीच्या काळी या जातींना चौक्या रक्षणाचं काम दिलं जायचं. त्यातच किल्ल्यातील देव्यांचं पुजेचं साहित्य यांच्या हातानंच बोलावलं जात असायचं. त्याचं कारण होतं त्यांच्यातील गुण. कोणाकडून कोणती वस्तू कशी काढून घ्यायची याचं ज्ञान त्यांना होतं. तो गुण आजही आहे त्यांच्यात. हा समाज कोणत्याही बाबतीत लज्जा बाळगत नाही. शिवाय कोणतीही वस्तू कोणाकडून मांगत असतांना हा समाज साम, दाम, दंड व भेदाचा वापर करीत असे आणि काढून आणतच असे. आता दाम हे तत्व मागे पडलेले आहे. याच कारणावरुन त्यांना मांग हे नाव पडले असावे. हे नाकारता येत नाही. पुढं हेच नाव चालत आले असावे. 
         गडावरील चौक्या रक्षणाचं यांना काम दिलं जायचं तर काही ठिकाणी किल्ल्यावर पहारे करण्याचं काम यांना दिलं जायचं. काही ठिकाणी किल्लेदारांची जबाबदारीही मांग समुदायाला दिली जायची. याचं कारण आहे, हा समाज मानत असलेल्या देवी देवता. बरीचशी मांग मंडळी ही मांगवीर बाबा व महालक्ष्मी मातेची पुजा करीत असतात. ते आताही त्यांचीच पुजा करीत असतात. म्हटलं जातं की मातंग समाज हा मुळचा क्षत्रीय रांगडा, आक्रमक, तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षणकर्ता समाज होता. हा समाज फारच इमानदारही होता. या समाजाचा मुळ पुरुष हा जाम ऋषी अर्थात जलजंबू मानल्या जातो. या समाजात गुरुपरंपरा आहे व मातंग ऋषी, श्री मांगवीर बाबा व महालक्ष्मी माता हे या समाजाचे कुलदैवत आहेत. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे, घरे, चौक्यांचे पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदाराची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. त्या काळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे आहेत. ज्यात शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन रायगडावर तोफ चढवणारे सर्जेराव मांग व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरुन विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने येल्या मांग होते. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, रामोशी  अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवले. कारण त्यांच्यात असलेले शौर्य. त्यांना इंग्रजांनी गावांतूनच तडीपार केले होते. त्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले होते. तेव्हा मातंगांनी इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. 
          मातंग समाजात अनेक शुरवीरही निर्माण झाले. लहूजी साळवे याच समाजातील. लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण अनेक लोकांना दिले व त्यांच्याच तालमीतून अनेक शूर वीर या समाजात निर्माण झाले. पुर्वीच्या काळातही हाच समाज आखाडा भरवीत असत. त्याचं कारण होतं शुरविरांना तालिम देणं. ज्यात इतरही अनेक समाजातील तरणीताठ मुलंही तलवारबाजी शिकायला येत. 
           मुळात पुर्वीचा समृद्ध आणि शुरवीर असलेला हा समाज. तो समाज जसा पुर्वी गडावर पहारेकरी वा किल्लेदार म्हणून काम करायचा. ज्यातून तो समाज क्षत्रीय असल्याचा निर्वाळा येतो. मग हा समाज असा कसा अस्पृश्य बनला? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. त्याचं कारण आहे यांचं शुरत्व व रणमैदानावर गाजवत असलेली पराक्रमं. याला जास्त प्राधान्य आहे. 
          मातंग समाजालाही अस्पृश्य बनवलं गेलं. त्याचं कारण यांच्यातील शौर्य असू शकते. हा समाज आधीपासूनच शुरवीर व अतिशय इमानदार होता. तो मरण पत्करत असे. परंतु फितूरी, बेईमानी सहन करीत नसे. त्यामुळंच या समाजाला जाणूनबुजून जबरदस्तीनं गुलाम बनवलं गेलं. त्यातच त्या समाजानं मरणाऐवजी वा पळून जाण्याऐवजी हिन दर्जाची कामं करणं पसंत केली. ज्या कामात बाळंतपण करणं होतं. मरण धोरण होतं. सुर्यग्रहण व चंद्रग्रहण होतं नव्हे तर घरच्या इडापीडाही. 
         बाळंतपण..... ज्या बाळंतपणाला विटाळ मानल्या जात होता. ती बाळंतपणं, मांग घरची बाई करीत असे नव्हे तर पोट जगविण्यासाठी करावीच लागत असत मजबुरीनं. शिवाय बाळंतपण झालं की मांग पुरुष व्यक्ती त्या व्यक्तीच्या घरी जावून वाजा वाजवत असे. जरी विटाळ होत असला तरी. हे पोटासाठीच होतं आणि अगदी मजबुरीनंही. चंद्रग्रहण व सूर्यग्रहणात निषीद्ध झालेले कपडे अंगावर ग्रहण केले की आयुष्याला ग्रहण लागतं, असे मानणारा समाज मांगांना ते कपडे दान देत असे. तसंच अन्नाचंही दान देत असे. तेव्हा ते दान निषीद्ध आहे हे माहीत असूनही मांग समाज आनंदानं स्विकारु लागला होता. त्याचं कारण होतं त्यांची मजबुरी. पुढं मेलेल्या माणसांचा विटाळ होत असतो हे माहीत असूनही त्यातूनही त्यात हा समाज आनंदानं वाजा वाजवू लागला त्यांच्या घरातील मरणसमयी. तिथंही त्याची मजबुरीच होती. अन् घरची इडापीडा जावी म्हणून मांगाना इथलेच विदेशी आक्रमणकारी वस्त्र व अन्नाचं दान देत. तेही हा समाज आनंदानं स्विकारत होता व त्यांच्या इडापीडा अंगावर झेलत होता. त्याचंही कारण होतं मजबुरी. त्या अंधश्रद्धा मांग समुदायालाही माहीत होत्या. परंतु सर्वात मोठी मजबुरी होती पोट जगवणं. पोटासमोर सारं काही तुच्छ होतं. 
         आज मात्र चित्र बदललं आहे. कारण भारत स्वतंत्र्य झाला आहे. सर्वांना संविधानाने समान अधिकार दिले आहेत. त्यानुसार जीवन तेही अर्थपुर्ण जगण्याचा अधिकार मिळालेला आहे. ज्यात मांगांचाही समावेश आहे. ज्यातून मांगांचीही बिरादरी सुधारली आहे. त्यांचीही मुलं ही शिक्षण शिकू लागली आहेत. परंतु किती? तर ते प्रमाण अत्यल्प आहे.
          मांग लोकांचे मुख्य व्यवसाय केवळ झाडू वा टोपल्याच बनवणं नाही तर वाजा वाजविणंही आहे व ती एक कला आहे. परंतु ती कला त्यांची तारक नाही तर ती कला त्यांना मारक ठरलेली आहे. असे वेळोवेळी दिसून येत आहे.
          मांग समुदायाजवळ जी कला आहे. त्याची तुलनाच करता येत नाही. परंतु त्यानुसार त्यांची नोंद ग्रीनीच बुकात होत नाही. कारण त्या कलेचा त्यांना सुत्रबद्ध अभ्यास नाही. म्हणूनच ज्या समाजाजवळ मांग समाजाची कला आहे व ज्यांच्यात त्या कलेचा सुत्रबद्ध अभ्यास आहे. त्या समाजातील व्यक्तींची ग्रीनीच बुकात नोंद होत आहे. त्याचं कारण आहे सुत्रबद्धता. 
         आज हा समाज सुधारणेच्या कक्षेत आहे. चांगला भरजरी पोशाख घालून हा समाज वावरतो आहे. चांगलं सुग्रास अन्न आज खातो आहे. सगळं काही व्यवस्थीत आहे. परंतु तरीही त्यांना इतर समाज हीनच लेखतो. त्याचं कारण आहे. या समाजाचं वागणं. ते वागणं लक्षात घेण्यासारखं आहे. त्यात जर थोडा बदल झाला की बस समाज सुधारला असं नक्कीच म्हणता येईल. ते वागणं आहे. त्यांच्यात असलेलं दारु पिण्याचं व्यसन. शिवाय आपल्या लेकरांना जास्त न शिकवणं. इतर सुधारीत समाजातील लोकांपेक्षा या समाजातील लोकं हे आपल्या मुलांना जास्त शिकवीत नाहीत. तसं पाहिल्यास आपली कला ही मंडळी आपल्या मुलांना लहानपणापासूनच शिकवीत असतात. तशी कला शिकणं काही वाईट नाही. परंतु त्या कलेतून या समाजातील बऱ्याच मुलांचं लहानपणापासूनच अभ्यासातून लक्ष उडतं व व्यवसायाकडं लागतं. ते जास्त शिकत नाहीत व व्यवसाय करु लागतात. त्यानंतर असा व्यवसायातून पैसा आला की व्यसन जडतात व हा समाज व्यसनाधीन बनतो. मग पुढील पुर्ण आयुष्य व्यसनातच जात असते. हे तेवढंच खरं.
         महत्वाचं सांगायचं झाल्यास आज संविधान आहे. शिकायला संधी आहे. त्यानुसार आपल्या स्वतःचे उत्थान करण्याचीही संधी आहे. काल आपण नाही शिकलो. कारण आपली बिरादरी गुलाम होती. आज तसं नाही व आज आपण गुलाम नाही. तेव्हा मांग वा मातंग समाजानंही जास्त शिकावं. संविधानाचा लाभ घ्यावा. त्यांना असलेल्या विकासाच्या संधीचा लाभ घ्यावा. जेणेकरुन त्यातून त्यांचाच विकास होईल व कोणी त्यांचेवरही कोणत्याही स्वरुपाचा ताशेरे ओढणार नाहीत वा त्यांना कोणीही कमी लेखणार नाही यात शंका नाही.

           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०