शेतकरी मालालाही भाव द्या. त्यालाही दान
*अलिकडे लोकांना शेतीचं महत्व कळेनासं झालंय. त्याचं कारण म्हणजे शेतीचं होत असलेलं नुकसान. लोकांना मात्र शेतीशी व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही. ते शेती करणाऱ्या लोकांना कधीच मदत करणार नाहीत. उलट त्यांना त्रास देतात व त्यांना मदत करतात की जे व्यापार करतात. लोकं थेट माल शेतकऱ्यांकडून घेत नाहीत. ते व्यापाऱ्यांकडून घेतात. जो शेतकऱ्यांकडून कमी दामात म्हणजेच अतिशय लाजिरवाण्या भावात माल विकत घेतो. त्याला साफ करायला मजूर लावतो. स्वतः अंगानं काम करीत नाही. फक्त हुकूम चालवतो आणि तो माल स्वच्छ व साफसुथरा झाल्यावर जास्त दामात विकतो आणि आपण मुर्खासारखे शेतकऱ्यांना दोन पैसे न देता व्यापाऱ्यांकडून तोच माल विकत घेतो. जो कोणतीच मेहनत करीत नाही वा कोणतीच संकटं झेलीत नाही. आपल्याला असा व्यापारी चालतो. कारण आपल्याला ओरीजनल प्रत खायची सवयच नाही. सर्व अन्नपदार्थातील भेसळ खाण्याची सवय आहे.*
व्यापारी शेतकऱ्यांकडून माल तर विकत घेतात. परंतु तो माल चमकावा म्हणून त्याच मालावर रसायनांच्या प्रक्रिया करतात. जी रसायनं शरीराला घातक असतात. आपल्याला ते माहीतही असतं. तरीही आपण व्यापाऱ्यांकडूनच माल घेतो.
आजचं जगंच व्यापारी झालं आहे. आपल्या जवळ वेळ नाही की आपण अन्नधान्य साफ करु सवडीनं. साधी फळं विलायचीनं पिकवता येतात नैसर्गिक पद्धतीनं. परंतु ती प्रक्रिया आपल्याला माहीत नाही. आपण घरी फळंच पिकवायला पाहात नाही. आपल्याला पिकलेली फळं हवी असतात. मग ती कुत्रीमपद्धतीनं पिकविली असली तरी चालते. त्यात घातक रसायनं टाकलेली असली तरी चालते आणि ती रसायनं आपल्या शरीराला घातक ठरली तरी आपल्याला चालते. आजचे लोकं तर असे आहेत की त्यांना राम कथा ऐकायला वेळ आहे. परंतु शेतकऱ्यांकडून अन्नधान्य विकत घेवून ते स्वच्छ करुन खायला वेळ नाही. कारण आजचा काळ हा अल्प श्रमात जास्त काही मिळायला हवं असा आहे. तसंच आज लोकांना भपकेबाजपणा आवडतो. तांदूळ वा गव्हावरची चमक लोकांना आवडते. परंतु ती चमक का आहे? याचा कोणीही विचारच करीत नाही. रामकथेचंही उदाहरण देतो. लोकं रामकथा ऐकतात आणि त्या रामकथेनं मनोरंजन करुन घेतात. त्या रामकथेचं आयोजन करण्यासाठी पैसेही मोजतात. परंतु तो रामकथा सांगणारा कसा आहे? त्याचं वागणं कसं आहे? याचा विचार करीत नाही. खरंच रामकथा सांगणारे व्यक्ती रामाचे दोनचार गुण तरी अंगी बाळगतात का? राम वनवासात गेले, तेव्हा त्यांनी आपल्या रथाचाही त्याग केला होता नव्हे तर पादत्राणेही त्यागली होती. ते पैदल चालत होते आणि आमच्या घराकडे जे रामकथा सांगतात. ते थोडेसेही पैदल चालत नाहीत. त्यांना गाडी हवी असते. शिवाय त्यांना पायात घालायला चप्पल हवी असते तिही महागडी. आपल्याला फक्त तो कथा सांगतो साधी. तरीही आपण त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून त्याच्या चरणी एवढा पैसा अर्पण करतो की जो मोजताही येत नाही. काश! तोच पैसा आपण त्या रामकथा ऐकण्यात खर्च न करता तो शेतकऱ्यांना दिला तर त्यांच्या घरी एका सांजची चूल तरी पेटू शकते किंवा तो पैसा त्याच्या लेकरांना चड्डी घेण्याच्या कामात तरी येवू शकतो किंवा तो पैसा एखाद्या शेतकऱ्यांच्या पोरीच्या वैवाहिक कार्यात कामात येतो. बिचारीला आत्महत्या तर करावी लागणार नाही किंवा तो त्याच्या लेकरांच्या शिक्षणाच्या कामात येवू शकतो. परंतु आपण तसं करीत नाहीत. एवढंच नाही तर आपण आपल्या दरवाजावर येणारे वेषधारी लोकं.......कधी कोणाचे रुप घेवून येतात व आपण त्यांना देव त्यांच्या रुपात घरी आला असं समजून त्यांना भरपूर पैसे देतो. कधी पीठ व कधी धनधान्यही. जे ते धनधान्य विकून संध्याकाळी दारु पितात. मात्र आपल्याला ते चालतं. परंतु आपल्याला उपाशी पोटी खळ्यात मरत असलेला व स्वतःच्या गळ्याभोवती कर्जापोटी गळफास लावत असलेला शेतकरी चालत नाही. तो धडधाकट असूनही त्याला आपण दुषणं देत नाही. परंतु दुषणं आपण शेतकऱ्यांना देतो. त्यांना काहीबाही बोलतो. कारण तो शेतकरी असल्यानं ऊन, पाऊस अवर्षणच नाही तर आपलं बोलणंही सहन करतो. सहनशिलता हा गुण त्याच्यात असतो म्हणून.
निसर्गाबाबत सांगतांना एवढंच म्हणता येईल की निसर्ग हा शेतकऱ्यांवर आधीपासूनच अन्यायच करीत आला आहे. पुर्वीही सतत पाऊस यायचा की त्यात शेतीचं अतोनात नुकसान व्हायचं. पुर्वीही गारा पडायच्या आणि त्या गारात उभी पिके कोलमडून पडायची. अन् आताही काही निसर्गानं सोडलेलं नाही. जेव्हा आवश्यकता असते. तेव्हा पाऊस नसतो. मग कितीही ड्रमभर शिवपिंडीवर पाणी ओता. अन् जेव्हा आवश्यकता नसते, तेव्हा अतोनात पाऊस येतो. ही वास्तविकता आहे निसर्गाची. यात जे नुकसान होतं. ते कधीच भरुन निघत नाही. शेतकऱ्यांचं हे नुकसान दरवर्षीच होत असतं. निसर्गचक्रानं शेतीत एवढं नुकसान होतं की प्रसंगी शेतकऱ्यांना आपली बैलं, ज्या बैलांना स्वलेकरागत वाढवलेलं असतं, आपली बैलगाडी, आपली घरंदारं विकावी लागतात. काही काही तर शेतकरी असेही आहेत की त्यांनी स्वलेकरंही विकलेली आहेत शेतीसाठी लागणारे पैसे उभे करण्यासाठी. परंतु ती प्रकरणं उजेडात आलेली नाहीत. हं, आपली भार्या ते विकू शकले नाहीत. तेव्हा विचार आला व अशाच विचारात बऱ्याच शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. परंतु कर्ज काही फिटलं नाही. आज शेती व शेतकऱ्यांची परिस्थिती अशीच जर सुरु राहिली तर तो दिवस दूर नाही की तो आपली भार्याही विकेल. कारण शेती हा एक प्रकारचा जुगाराचा खेळ आहे. नशीब चांगलं असलं की पिकतं. नाहीतर कितीही मेहनत करा. पालथ्या घड्यावर पाणीच.
आज शेतकरी सुखी नाही. सुखी आहेत व्यापारी, फेरीवाले आणि मंदिरातील पुजारीदेखील. साधा हातठेला आणि पानठेला जरी लावला तरी तो बसल्या बसल्या जागेवरुनच कितीतरी पैसा कमवू शकतो. तसाच पुजारी.......पुजारीही बसल्याच जागेवरुन कितीतरी पैसा कमवतो. कारण लोकं मंदिरात श्रद्धेनं पैसा दान करतातच. देवाला पैसा हवा नसतो आणि देव काही खात नाही हे माहीत असूनही. इथं धार्मीक आस्थेच्या नावावर कितीतरी पैसा दान दिला जातो. कितीतरी मंदीरं विनाकारण बांधली जातात. परंतु तसा पैसा खर्च न करता जर तोच पैसा गरीब शेतकऱ्यांसाठी गोळा केला व तो पैसा अशा कर्जव्याप्त शेतकऱ्यांना दान जर दिल्या गेला वा गरीब लोकांना दिल्या गेला तर बिचाऱ्यांच्या आत्महत्या तरी वाचतील. ते आत्महत्या करणार नाहीत. परंतु कोण सांगणार? कारण धार्मीकता जोपासणे हा श्रद्धेचा विषय आहे. तो ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे. ते ज्याचं त्याचं मत आहे. कोणाकडून शेतकरी आत्महत्या दाखवून भावनिकतेनं पैसा काढता येत नाही. कारण पैसा हा त्यांचा असतो. तो त्यांनी कमविलेला असतो. ते तो पैसा मंदिरात दान देवो वा एखाद्या साधू नसून साधूचा आवेश आणणाऱ्या लोकांना. कोणीच त्यावर काही बोलू शकत नाही. कारण असे बोलणे हे लोकांना डिवचण्यासारखे असते. त्यांच्या मनातल्या धार्मीक भावनांना छेडल्यासारखे असते.
आज शेतकऱ्यांची ही वास्तवीकता तरी नजरेतून लपत नाही. परंतु तरीही त्याला दान देण्यासाठी कोणी तयार होत नाहीत. आणि आजचे साधू जरी संधीसाधू असले तरी त्याला दान देतांना पोत्याने पैसा ओतला जातो. कारण तो चमत्कार दाखवतो व आपला त्यावर सहजच विश्वास बसतो. त्यानंतर आजच्या साधूंची वास्तविकता नजरेतून लपते नव्हेतर लपवली जाते.
आजच्या कोणत्याही साधूचं बालपण जर पाहिलं तर तो पुर्वी गरीब होता असंच दिसतं आणि तोच साधू नंतर कितीतरी कोट्यधीश झाला हेही दिसतं. कुठून येतो हा पैसा? हा पैसा आपण दिलेल्या दानातूनच येतो आणि त्या त्या पैशाचा ते वापर कसा करतात हेही आपल्याला माहीत आहे. आज आसाराम सारखे कित्येक साधू नाबालीग मुलींनाच वासनेचे शिकार बनवतात आणि रामरहिमच्या तर मालकीच्या जागेवरच मानवाचे कंकाल सापडतात. तेच घडतं राधेमॉंबद्दल. तरीही आपले डोळे उघडत नाहीत आणि आपण म्हणतो की तो चमत्कारी होता. त्याला आपण आपला गुरु बनवतो. अशा व्याभीचारी, बलात्कारी संतांना. कारण ते चमत्कार करतात असं आपलं मानणं असतं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास खरा चमत्कार तर शेतकरी करतो की जो आपल्या शेतात साधं बी पेरतो आणि चमत्कार करुन त्या बियांना लहानाचं मोठं करतो व ते आपल्याला खायला देतो. आपलं पोट भरणं आणि त्यासाठी अन्न निर्माण करणं ही गोष्ट काही एखाद्या चमत्कारापेक्षा लहान नाही. तरीही आपण त्या शेतकऱ्यांना चमत्कारी मानत नाही. ना त्यांना एक छदामही दान देत. ना त्यांचं जीवन बनवत. उलट पदोपदी त्यांना त्रास देतो. त्यांच्या मालाचा भावटाव करुन. ही वास्तविकताच आहे. जणू शेतकरी जगूच नये असं आपल्याला वाटत असावं हेच यातून दिसतं.
विशेष सांगायचं म्हणजे शेतकरी जगायला हवा. असं वाटत असेल तर दान महत्वपूर्ण. त्याला जगविण्यासाठी. त्याची काळजी घ्या. त्याच्या आत्महत्या घडणार नाहीत यासाठी. तो नसेल तर आपलं जगणं व्यर्थ आहे. हं, मंदिरात वा एखाद्या संधी साधूला दान देता ना. खुशाल द्या. परंतु त्याचबरोबर शेतकरी वर्गालाही विसरु नका. त्यांच्याही नावानं काही ना काही फंड उभारा. त्यालाही आपले कर्तव्य समजा. त्यांच्या आत्महत्या घडू देवू नका. त्यांनाही फुल ना फुलाची पाकळी दान द्या. त्यांच्याही उत्थानासाठी कार्य करा. जेणेकरुन तोही सुखानं राहील. कर्जमुक्त होईल. आत्महत्या करणार नाही. आनंदानं धनधान्य पिकवेल व आपलंच नाही तर देशातील सर्वच लोकांचं पोट भरेल हे तेवढंच खरं आहे. मग तो आनंदी तर आपणही आनंदी राहू. तो आनंद एखाद्या दिव्य चमत्कारापेक्षाही मोठा असेल ही सत्यता नाकारता येत नाही. तसंच शेतकरी मालालाही भाव द्या. जेणेकरुन त्यांनाही स्वाभीमानानं जगता येईल यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४६०