भाग -13
मायराचे डोळे जड झाले हळूहळू आणि मग झोपून गेली तशीच....
पहाटे चार चा प्रहर असेल... दूरवरून तिला शेरूचा भुंकण्याचा आवाज आला.... शेरू एवढ्या पहाटे असा का भुंकतोय...??? म्हणून ती डोळे किलकिले करत उठून समोर जाऊन खिडकीच्या गजांमधून बाहेर पाहू लागली.
....तर अंधुक अंधुक असणाऱ्या प्रकाशामधून सडपातळ अशी आकृती गेटच्या आत येताना दिसली....
ती आकृती गेटच्या आत मध्ये बिनविरोध आली ... ना त्याला वॉचमनने अडवले... ना शेरुनी हाकलले... म्हणजे तो बंगल्यात नेहमी येणारा व्यक्ती असावा...
मग कोण असावा हा... असा विचार करत ती डोळे बारीक करून बघू लागली.
जसे जसे ती व्यक्ती जवळ येत होती तसं तसे तिचे चालण्याची ढब पाहून तिला वाटले की तो राम असावा.
पण खरच तो राम आहे का... तिला प्रश्न पडला..
ती असा विचार करत होती पण तेवढ्यातच बाबाराव इकडून दारातून हातात काठी घेऊन बाहेरच्या दिशेने निघाले होते.
त्यांच्या कोल्हापुरी चपलेचा आवाज कर्र कर्र येत होता.
थोडे समोर जाऊन त्यांनी मागे वळून मायराच्या रूम कडे वरती नजर टाकली.
तर लगेच मायरा पटकन बाजूला झाली खिडकीच्या.
बापरे !!!
मायराचे हृदय जोरजोराने धडधडू लागलं. आपल्याला बाबांनी पाहिलं तर नाही.
पाच सेकंदांनी पुन्हा ती उठली आणि हळूच वाकून पाहू लागली... तर बाबाराव त्या आलेल्या व्यक्तीसोबत गेटच्या दिशेने निघाले होते....
हे बघून मायरा ने पटकन अंगावर ओढणी घेतली हातानेच केस थोडेसे व्यवस्थित केले व बो मध्ये बांधून घेतले.
तिची कापडाची जूती घातली... आणि इकडे तिकडे बंगल्यात कुणाला दिसले नाही पाहिजे अशा प्रकारे चटकन बाहेर पडली.... बाहेर जाताना सरळ सरळ बाबाराव जिकडून गेले तिकडून न जाता तिच्या नेहमीच्या चोर रस्त्याने गेली.
ज्या रस्त्याने बाबाराव गेलेले आहेत त्या रस्त्याने गेल्यावर दोनच मिनिटात बरोबर चोर रस्ता मिळत होता.
तिचा तो नेहमीच सिक्रेट रस्ता कुठेही लपून छपून जायचं असेल तर त्या रस्त्याने जायची आणि घरच्यांना माहित होण्याच्या अगोदर त्याच रस्त्याने येऊन रूममध्ये येऊन राहायची.
(हा चोर रस्ता याचा उपयोग ती तेव्हाच करायची जेव्हा तिला एखादी गोष्ट करायची असेल आणि त्यासाठी बाबारावांचा किंवा लीला यांचा नकार असेल तर मग मात्र तिला ती गोष्ट हवीच असायची अशावेळी ती या चोर रस्त्याचा वापर करत असे..)
तर आताही तोच रस्ता तिने युज केला.
बस्स...
तिला दोन एक मिनिटातच समोर बाबाराव आणि ती व्यक्ती जाताना दिसली.... मग हळूहळू ती सुद्धा त्यांच्या मागे मागे निघाली.
तिने अगोदर बघितले त्यांच्याबरोबर शेरू तर नाही आहे. अशावेळी शेरू असेल तर फारच पंचायत व्हायची.. कारण त्यांचा शेरू फार हुशार आहे...
त्या दोघांच्या मागे पुढे शेरू दिसला नाही म्हणजे तो त्याच्या बनवलेल्या तंबूसारख्या छोट्या घरात झोपला असावा किंवा बांधूनही ठेवलेले असावे....
बारीक निरीक्षण करत पुढे जाता जाता तिला समजले की तो बाबाराव सोबतचा व्यक्ती म्हणजे रामच होय.
थोड्या अंतरावर गेल्यावर तिथे ते पाराजवळ उभे राहिले दोघे...
बाबाराव....( राम कडे न बघताच बोलले)
"राम ...तुला काय वाटतं??? काय करायचं आता...???"
राम....
"साहेब... माझं काही डोकं चालत नाही आहे."
बाबाराव....
"राम ...मी उद्या मायरा आणि तिच्या आईला गावाला पाठवत आहे... मायराच्या मामाच्या घरी... महिनाभर दोघी आता तिथेच ठेवीन मी... आणि या महिन्याभरात सारं मिटवून टाकतो मी... असं वाटतं...
आपण प्रथम कवडू साठेला बोलवू. त्याला समजदारीच्या गोष्टी सांगू. तो आपल्या पोराला समजावेल.. तर बरं... आणि त्याने का नाही समजवलं पोराला तर
मग मी चांगला समजून सांगतो मोहितला.
लहान तोंडी मोठा घास घेतोय तो... जमणार नाही बाबारावला ... पिढ्या दर पिढ्या आमचा घरंदाजपणा चालत आलेला आहे आणि हा कोण कुठला काही अता पत्ता नाही... कुणाचं रक्त आहे कुणास ठाऊक.... कुलकर्ण्याच्या घरंदाजपणा नाश करू पाहतोय
मी असं होऊ देणार नाही अजिबात."
इकडे झुडपामागे मायराला बाबाराव यांचे बोलणे.......
थोडी दूर होती तरीही स्पष्ट ऐकाला येत होते कारण पहाटेची निरवशांतता अवतीभवती पसरलेली होती.
जसे जसे बाबाराव पुढे पुढे बोलत होते तसे तसे इकडे मायराचे हृदयात चीड घेऊन त्यामध्ये भडका उडाल्यासारखे वाटत होते.
राम...
"तेवढ्यानेही ते दोघे ऐकले नाही तर.."
बाबाराव....
"राम... पंचक्रोशीत असा कोणी नाही आजपर्यंत जो बाबाराव यांचे म्हणणे मानणार नाही."
हे वाक्य बोलताना जरी ते राम कडे बघत नव्हते तरीही त्यांच्या डोळ्यात किती आग असावी याची जाणीव त्याला पुरेपूर होती.
रामला कल्पना आलेली होती... आणि इकडे ऐकत असणाऱ्या मायराला पण कल्पना आली होती की काहीतरी भयानक बाबारावांच्या डोक्यात प्लॅन होत आहे आणि ते त्याप्रमाणे घडणार आहे. पण नेमके काय घडणार आहे हे राम सांगू शकत नाही किंवा त्याच्या समजण्याच्या आवाक्यापलीकडे होते.
दोन क्षण थांबून पुन्हा बाबाराव म्हणाले...
"राम.... तुला सांगतो काळजीपूर्वक लक्षात घे. आपल्याला उद्याच ....मायरा गेल्यावर लगेच... कवडू साठे ची भेट घ्यायची आहे.. आणि... त्यासाठी त्याच्याशी बोलून घे."
राम...
"ठीक आहे साहेब... तसा मी फोनच केला असता मीटिंग भेटण्याची वेळ ठरवण्यासाठी.. कवडू साठेला इकडे बोलवले असते... पण त्यांच्याकडे कुठचा फोन...??
लहानसा डब्बा फोन सुद्धा नाहीये."
बाबाराव....
"खबरदार फोनचा वापर करशील तर...
कोणत्या दिवशी गोत्यात येऊ त्यामुळे...
समजणार नाही.
प्रत्यक्षात भेटून ठरव. जेवढ्या लवकर होईल तेवढ लवकर ठरव. कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. इलेक्शन तोंडावर येत आहेत.
आम्ही बाबाराव आहोत.. इज्जत जीवापेक्षा प्यारी आहे. ती राखण्यासाठी काहीही करायची तयारी आहे माझी. वेळ पडलीच तर मायराची गर्दन कापायला हात मागे हटणार नाही माझा."
बाबारावांचा आवाज अतिशय भेदक... धारदार झाला होता... सर्व एकूण मायरा तिचे हात पाय गळून पडले. शेवटचे वाक्य बाबाराव यांचे फारच जिव्हारी लागले होते तिच्या.... ऐकून हातपाय लटपट कापायला लागले होते.. कशी तरी झाडाचा आधार घेत उभी होती...
बाबारावांनी ते वाक्य बोलल्यानंतर पटापट पावले टाकत बंगल्याच्या रस्त्याने निघाले. ते निघून गेल्यानंतर दोन मिनिटं राम तिथेच उभा राहिला विचार करत आणि मग तोही हळूहळू पावले टाकीत सरळ दिशेने निघून गेला.
दोघेही निघून गेल्यानंतर मायरा कशीतरी धडपडत उठली.
आणि उभी राहून अंतर्मनात श्वास ओढून घेतला आणि गच्च डोळे बंद करून उभी राहिली दोन मिनिट...
सर्वप्रथम नजरेसमोर मोहितचा चेहरा आला साधा भोळा हसरा तिच्याकडे प्रेमळ नजरेने बघत असलेला तो...
त्यांची तिच्या ओठांवर मंदस्मित झळकले...
पुन्हा तिने श्वास ओढला अंतर्मनात लांब लांब... पुन्हा एकदा डोळे बंद करून घेतले...
आता तिच्या नजरेसमोर तिची प्रेमळ आजी दिसू लागली.... हसतमुखाने पुन्हा आजीचे रात्रीचे बोलणे... ते सर्व कानामध्ये गुंजत राहिले... आजीची ती प्रेमळ मिठी ...कुरवाळाणे... सर्व सर्व जसेच्या तसे आठवले....
बस मग तिने आपल्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवले.
पुन्हा लांब श्वास आत ओढून घेतला.... चेहऱ्यावरचे हात बाजूला केले... ते एक ठाम निश्चय घेऊनच....
चेहऱ्यावर आता आत्मविश्वास ,कणखरपणा , प्रत्येक गोष्टीला अडचणीला तोंड देण्याची धमक दिसू लागली.
व्यवस्थित ओढणी अंगावरची सावरली.... आणि आल्या दिशेने भराभर पावले टाकू लागले जेणेकरून ती बाबाराव यांच्या पूर्वीच पोहोचावी...
पटापट येऊन ती रूम मध्ये गेली... ओढणी काढून बेडच्या एका बाजूला ठेवून दिली अशी ठेवून असते. जूती उचलून रॅक मध्ये ठेवले भरकन.. बेडवर पुन्हा अंथरून अंगावर घेऊन पडून राहिली....
अंथरुणा अंगावर घेत असतानाच तिला चाहूल लागली होती बाबाराव यांची.... फास्ट आणि धावत आल्यामुळे तिला धाप लागली होती... श्वास जोऱ्या जोऱ्याने घेत होती....
आणि तेवढ्यात दरवाजाच्या खोलण्याचा आवाज आला.
जसे पावलं तिच्याजवळ येऊ लागली... तसा लगेच मायराने श्वास रोखून धरला..... शांतपणे पडून राहिली तशीच...
बाबाराव आले आत मध्ये आणि बेडकडे पाहिले तर मायरा झोपलेली होती शांतपणे....
ते जवळ गेले ....मायराच्या आणि प्रेमाने तिच्या कपाळावरून हात डोक्यावर फिरवला...
एरवी त्यांचा स्पर्श असा प्रेमळ तिला खूप छान वाटायचा. पण आज तिला तो त्यांचा प्रेमळ स्पर्श जरी असला तरी नकोसा वाटत होता. तो कपाळावरचा आणि डोक्यावरचा कुरवाळणारा हात झटकून द्यावासा वाटत होता.
श्वास रोखून पोटामध्ये.... बाबाराव यांच्या बद्दल तिरस्कार धुमसत होता सारखा... कोणत्याही क्षणात त्याचा स्फोट होईल असे वाटत होते तिला...
दोन क्षण बाबाराव तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिले.. आणि बाहेर निघून गेले..
दरवाजा बंद झाल्याचा आवाज एकटाच मायराने लांब श्वास घेतला... आणि श्वास नियंत्रणात आणू लागली.
दोन मिनिटांनी ती धडपडत उठली... तिच्या रूम मधल्या ड्रेसिंग टेबल मध्ये खालच्या खणामध्ये कोपऱ्यात वस्तू बाजूला सरकवून पाहू लागली...
पाहिल्यानंतर ती वस्तू तिला सापडली...
हातात घेऊन ती बारकाईने तिच्याकडे बघू लागली तर दरवाजा जवळ पुन्हा पावलांचा आवाज येऊ लागला
आणि मग....
🌹🌹🌹🌹🌹