मंडप व मिळवणुकीवर दंड असावा Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मंडप व मिळवणुकीवर दंड असावा

आता मंडप व मिळवणुकीवरही दंड लावावा?

         *नुकतीच शहरात एक प्रकारची जनजागृती होत आहे आणि केली जात आहे. ती जनजागृती आहे, हेल्मेट वापराविषयीची. हेल्मेट हा आपल्या सुरक्षेचा विषय असून शासनानं गतकाळातच हेल्मेट वापरासंबंधी नियम बनवले. ज्यात दुचाकी चालकाला आणि चालकाच्या पाठीमागं बसणाऱ्यालाही हेल्मेट वापरणं शासनानं सक्तीचं केलं. आता जर या दोहोंपैकी एकानं जरी हेल्मेट वापरला नाही तर दंड होणार आहे. ज्यातून दंड म्हणून आलेल्या रकमेतून देशाचा विकास करता येईल. तेच धोरण राबवून नवीन कायदा असाही बनावा की मंडप टाकणाऱ्याला व नवरदेवाची मिळवणूक काढणाऱ्यालाही दंड व्हावा. जेणेकरुन त्यातून पैसा मिळेल व तोही पैसा देशाच्या विकासाच्या कामी येईल.*
           अलिकडील काळ म्हटलं तर दिखाव्याचा काळ आहे. या काळात गरीब कोणी आहे, असा दिसत नाही. लोकं श्रीमंत आहेत व त्यातच ही श्रीमंती एखाद्यावेळेस विवाह सोहळ्यात दिसून येते. 
         लोकं आजच्या विवाहसोहळ्यात एवढा पैसा खर्च करतात की ज्याची गणतीच करता येत नाही. प्रसंगी त्या विवाहसोहळ्याला रंगीत बनविण्यासाठी लोकं कर्जही काढत असतात. 
           पुर्वीही विवाहसोहळे व्हायचेच व विवाह सोहळ्यात लोकं आज जेवढा खर्च करतात. तेवढा खर्च करीत नसत तर त्यांची जेवढी चादर असायची. तेवढीच ते पसरायचे. ज्यातून त्या परीवारावर कर्जाचं डोंगर उभं राहात नसे. मात्र आज तसं नाही. आज शान वाढली आहे, ज्याला आपण दिखावा म्हणतो. लोकांजवळ आज पैसाच पैसा असेल असं वाटतं. त्यांचा तो भरजरी पोशाख, ती त्यांची लाली, ती त्यांच्या चेहर्‍यावरची सजावट. ते पाहून असं वाटतं की यांच्याजवळ पैसा किती असेल? परंतु प्रत्यक्षात शहानिशा झाल्यावर कळतं की त्यांच्याजवळ अजिबात पैसा नाही. ते फक्त दाखवणं असतं. विवाह सोहळ्याबाबतीतही असंच आहे. जवळपास जरी पैसा नसला तरी लोकं विवाह सोहळ्यात एवढा पैसा खर्च करतात की वाटतं संबंधीत गृहस्थ किती श्रीमंत असेल. ती रोशनाई, ती सजावट, ते जेवन सगळं काही एखाद्या अतिश्रीमंत माणसालाही लाजवेल असंच असतं. 
          अलिकडील काळात कर्जामुळे आत्महत्या होत असल्याच्या घटना वारंवार घडत असलेल्या दिसून येत आहेत. कधी शेतीतून निर्माण झालेल्या आत्महत्याही दिसतात. त्यातील काही आत्महत्या या विवाह करण्यासाठी कर्ज उचलल्यानं व त्या कर्जाचा भरणा करता न आल्यानं, त्यातच त्याचं व्याज वाढल्यानं आणि त्यातच हफ्तेवसुलीवाले आपलं घर, आपली मालमत्ता जप्त करत असल्यानं निराशा येत असते व आत्महत्या घडते. हे सगळं जरी बरोबर असलं आणि आपल्यासमोर ते जीवंत उदाहरण असलं तरी आपण विवाह करतांना कर्ज हे उचलतोच. शिवाय त्या कर्जाची परतफेडही आपल्यानं होत जरी नसेल तरी आपण कर्ज उचलतो. त्याचं कारण आहे, शेजारील व्यक्ती घोड्यावर नाचतो ना. मग आपणही घोड्यावरच नाचायला हवं. परंतु त्यावेळेस आपण असा विचार करीत नाही की तो व्यक्ती त्याच्या नशिबानुसार श्रीमंत आहे, आपण त्याची बरोबरी करु शकत नाही. आपण लहाणतोंडी मोठा घास घ्यायला नको. आपण लहानतोंडी लहानच घास घ्यावा. परंतु आपण तसे करु तेव्हा ना. आपण तसं करीत नाही व त्याच्यासारखंच वागायला पाहतो. ज्यातून आपण समस्येत फसतो कारण शेजारील व्यक्ती आपण उपाशी असतांना आपल्याला जेवन आणून देत नाही. उलट त्याला मजाच वाटते.
            विवाहसोहळ्यात चमकधमक असते. त्यातून असं दिसतं की विवाहसोहळ्यात किती खर्च करतात हे लोकं. ज्यात रोशनाई तिही गाण्याच्या तालावर थिरकणारी, ते त्या वधू वरांचं नृत्य. जणू स्वर्गातील इंद्र अप्सरेसोबत नृत्य करीत आहे आणि तो स्वर्गच आहे, असं धुशार वातावरण. या सर्व गोष्टी आज विवाहसोहळ्यात असतात. ज्याला अतोनात पैसा लागणार नाही तर काय? शिवाय असे करीत असतांना जो पैसा लागतो. तो पैसा आज काही लोकांजवळ असतो. सर्वांजवळ नसतोच. अन् ज्यांचेजवळ असतो, ती मंडळी खर्च करीत असतात. त्यांना तो पैसा खर्चही करायला किंतू परंतु वाटत नाही. कारण तो त्यांचा स्वकष्टानं कमविलेला पैसा नसतो. परंतु ज्यांचा पैसा स्वकष्टानं कमविलेल असतो. तो व्यक्ती जर असा खर्च करीत असेल तर ही बाब विचारात घेण्यालायक असते. कारण स्वकष्टाचा पैसा हा अशा विवाहसोहळ्यातील एवढा अवाढव्य थाट करायला पुरत नाही. त्यातच कर्जच काढावं लागतं. 
         महत्वपुर्ण बाब ही की आपल्याजवळ जेवढं आहे, तेवढीच चार पसरावी. कारण दुसरा आपल्याला थंडी वाटत असल्यास चादर देत नाही. तसं पाहिल्यास कोरोनाच्या साथीपासून बरीचशी मंडळी सुधरली आहेत व ती मंडळी आता जास्त अतोनात पैसा खर्च करीत नाहीत. ते आता विवाह सोहळ्यासाठी एखादा सभामंडप न ठरवता आपल्याच घरासमोर मंडप टाकतात. तो त्यांचा खर्च वाचतोच. परंतु यात काही महाभाग एवढे चालू असतात की ते अख्ख्या रस्त्यावर मंडप टाकत असतात. ज्यात मंडप टाकतांना साधे पादचारी चालायलाही जागा सोडत नाहीत. मग गाडीवाल्यांचं ठीक असतं की त्यांना तो मंडप पाहता गल्ली फिरुन जातांना त्राण लागत नाही. थोडंसं पेट्रोल लागतं. 
          ते रहदारीचा रस्ता बंद करीत असतात. ज्यात त्या रस्त्यावर रहदारी करणाऱ्यांची गैरसोय होत असते. ते शासनाची परवानगीही घेत नाहीत. तशी परवानगी घेण्याला महत्व देत नाही. कारण शासनानं सध्यातरी त्यावर कंबर कसलेली नाही. 
          रस्त्यावर मंडप टाकणारी मंडळी ही जास्त श्रीमंत नसतात. ती गरीबच असतात. परंतु संपुर्ण रस्ता बंद करुन ते विवाह सोहळे साजरे करीत असतात. ज्यातून नागरिकांना त्रास होत असतो. ठीक आहे की जिथे सोयच नाही, त्याठिकाणी रस्ता बंद करायलाच हवा. परंतु जिथे सोय असते, तिथेही रस्ता बंद केला जातो. जणू तो रस्ता त्याच व्यक्तीच्या मालकीचा असतो. 
          शासनानं खरं तर असे मंडप जे गल्लोगल्लीत टाकले जातात. जे रहदारीचा रस्ता अडवतात. त्या रस्ता अडविण्यावर कारवाईच करायला हवी. चांगला दंडच लावायला हवा. कारण रहदारी करणाऱ्यांची अशा गोष्टीनं गैरसोय होत असते. कारण काही ठिकाणी मोठी जागाही असते. परंतु अशी जागा जरी असली तरी काही लोकं रहदारी करायला गल्ली सोडत नाहीत अन् त्यांना काही म्हणायला गेल्यास ते अरेरावी करतात. 
          अलिकडे लोकं घरासमोरच मंडप टाकू लागले आहेत. काही विवाह सोहळे करु लागले आहेत तर काही बारसे, अक्करमासे, जयंत्या, पुण्यतिथ्या, वाढदिवसं करु लागले आहेत. काही लोकं रस्त्यानं नवरदेवाच्याही मिळवणुका काढू लागले आहेत. ज्या मिळवणुकीतून रहदारी करायला मोठ्या अडचणीही निर्माण होत असतात. शिवाय अशी मिळवणूक काढणारी माणसं त्यांच्याच मालकीचा जणू रस्ता असल्यागत बादशाही थाटात चालत असतात. ते चालणाऱ्यांना रस्ताही देत नाहीत. ज्यात कधीकधी कोणाला अर्जंट जायचं असतं. कधी कोणाला अटॅक आलेला असतो व त्यातच त्या व्यक्तीचा जीव वाचवणं अगदी महत्वाचं असते. परंतु अशा उत्सवप्रसंगी वा मिळवणूक प्रसंगी जायला पुरेशी जागा न मिळाल्यानं शेवटी मरण पत्करावं लागतं. इथे जाणाऱ्याचा जीव जातो मंडप आणि मिरवणुकीच्या माध्यमातून. अन् त्यांना आनंद होतो. कारण सुग्रास जेवन मिळत असते म्हणून. म्हणूनच याबाबत विशेष सांगायचं झाल्यास शासनानं अशा मिळवणूक व रस्त्यावर टाकण्यात येणाऱ्या मंडळावर आवर घालावा व असा आवर घालण्यासाठी त्यांच्यावर दंड ठोकावा. शिवाय परवानगी घ्यायचं बंधन घालावं. अशी परवानगी देतांना ते किती आणि कुठून मंडप घालणार आहेत ते पाहावे. शिवाय विशेष करुन त्यांनी रहदारी करण्यासाठी पुरेशी गल्ली सोडली का याचा विचार परवानगी देतांना करावा. ज्यातून मंडप टाकणारे रहदारी करणाऱ्यांशी अरेरावी करणार नाहीत. तसेच दंड म्हणून मिळालेली रक्कम त्या त्या परीसराचा विकास करण्याच्या कामी येतील. या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे, जेणेकरुन त्यातून राज्याचा महसुलही वाढू शकतो व त्या परीसराचाच नाही तर देशाचाही विकास साधू शकतो हे तेवढंच खरं.

         अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०