हा त्याग आठवण्यासारखा आहे Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हा त्याग आठवण्यासारखा आहे

हा त्याग खरोखरच आठवण्याजोगा आहे? 
         *डॉ. बाबासाहेब हे महान तत्ववेत्ता कसे बनले?*

         *आज महापरीनिर्वाण दिन. खुद्द बाबासाहेब याच दिवशी मरण पावले. त्यातच त्यांना आज श्रद्धांजली वाहण्याचा दिवस. मात्र हा त्यांचाच महापरीनिर्वाण दिन नसून त्यांच्यासोबत ज्या ज्या लोकांनी त्यांच्या कार्यात सहभाग दर्शवला. ज्यांच्या तारखा आपल्याला माहीत नाहीत. जे लोकंही आपल्याला माहीत नाहीत. त्या सर्वांचा महापरीनिर्वाण दिन आहे असंच समजावं. जेणेकरुन ही त्यांनाही श्रद्धांजली ठरेल. डॉ. बाबासाहेब हे एक महान तत्ववेत्ता होते. ते महान तत्ववेत्ता बनले. त्याचं कारण होतं, त्यांना आलेले अनुभव. ते अनुभव वाखाणण्याजोगेच होते. त्यांना बरेच अनुभव आले होते व त्याच अनुभवाच्या आधारावर त्यांना तत्त्ववेत्ता बनताही आले.* 
          डॉ. बाबासाहेब हे महान तत्ववेत्ता कसे बनले. शिवाय त्यांना अनुभव तरी कोणते आले? हा प्रश्न जरासा विचार करण्यालायकच आहे. तसं पाहिल्यास डॉ. बाबासाहेबांना बरेच अनुभव आले. जसे लहानपणी ते जेव्हा शाळेत गेले. तेव्हा त्यांना शिकायला वर्गाच्या बाहेर बसवणे किंवा इतर मुलांपासून थोडं दूर बसवणे. तसं पाहता त्या काळात भेदभाव होता. अस्पृश्यांचा स्पृश्य वर्ग अतिशय भेदभाव करीत असत. त्यांना मंदिर प्रवेशच नाही तर गावप्रवेशही नव्हता. गावप्रवेशाबाबत नियम होते की निर्धारीत वेळेसच त्यांनी गावात प्रवेश करावा. तेही कोणी स्पृश्य दिसलाच तर त्याचे समोर घोड्यासारखं किंचळावं. त्याचं कारण म्हणजे कोणताही स्पृश्य व्यक्ती तिथे अस्पृश्य व्यक्ती आहे, हे जाणून घेईल. स्पर्श होणार नाही व स्पर्शाचा विटाळ होणार नाही. 
           विटाळ...... साधा स्पृश्यांना स्पर्शाचाही विटाळ होत होता. म्हणूनच घोड्यासारखं त्यांचं किंचाळणं आणि एखादा व्यक्ती ते नियम पाळत नसेल तर त्याला अतिभयंकर शिक्षा. त्यातच त्या शिक्षेवर कोणाकडे दादही मागण्याचा अधिकार नव्हता. त्या शिक्षा म्हणजे नग्न करुन पाठीवर वा शरीरावर कुठेही लागेल त्या ठिकाणी चाबकाचे फटके देणे वा एखाद्या शरीरअवयवास इजा पोहोचविणे. यात एवढं सगळं होत असल्यानं व दंडावर अभय नसल्यानं कोणताही अस्पृश्य व्यक्ती स्पृश्यांच्या वाट्याला जात नव्हता. तो मुकाट्यानं दंड स्विकारत असे व स्पृश्यांनी घातलेले नियम पाळत असे. 
          डॉ. बाबासाहेब जेव्हा शाळेत जात आणि शिकायला बसत. तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या वर्गात सर्व जातीची व धर्माची मुलं एकत्र बसत. ज्यात मुस्लीम मुलंही असायची. मग विचार यायचा आणि वाटायचं की आपण हिंदू याच धर्मातील लेकरु. अन् ही मुस्लीम मुलं म्हणजे हा दुसरा धर्म. ती त्यांच्यामध्ये बसतात, मिसळतात. अन् आपण हिंदूच असून आणि यांच्याच धर्मातील असून आपला विटाळ. असं का? हाच विचार बाबासाहेबांना त्या बालपणात पडायचा. वाटायचं की हा कसला हिंदू धर्म? एक समाज हिंदू असतांनाच दुसरा समाजही हिंदू आहे, तरीही त्या समाजाला व्यवस्थीत वागवले जात नाही. यांना इतर धर्म चालतात अन् आपल्याच धर्मातील आपलीच माणसं चालत नाहीत. त्यांच्याबद्दल भेदभावच दिसून येतो यांच्या मनात. तोच त्यांच्या मनातील विचार. त्यातच एक तात्कालिक कारण घडलं. ते म्हणजे त्यांना अस्पृश्य म्हणणं. त्यांच्या मनात भेदभावाचा व विटाळाचा विचार सुरु असतांना कोणीतरी त्यांना अस्पृश्य म्हटलं व ही त्यांना शिवी वाटली. त्यातच बाबासाहेबांचं रक्त खवळलं व तेथूनच खऱ्या अर्थानं समाजातील संबंधीत विटाळ व भेदभाव दूर करण्याचं बाळकडू बाबासाहेबांना मिळालं व बाबासाहेब भेदभाव व विटाळ दूर करण्याबाबत विचारही करु लागले. 
           ते लहानगं वय. ते खेळण्याबागडण्याचं वय. परंतु त्या काळात जीवन जगतांना व शिकतांना बाबासाहेबांना विटाळाचा फार मोठा फटका पडला होता. त्याची दररोजची गाऱ्हाणी लोकांकडून रामजीकडे येत. तसं पाहिल्यास रामजी हे इंग्रज सैन्यात सुभेदार होते व ते कामात अतिशय इमानदार असल्याने इंग्रजांचे विश्वासू बनले होते. जेव्हा समाज बाबासाहेबांबद्दल तक्रार घेवून यायचे, तेव्हा रामजी बाबासाहेबांना त्या लोकांसमोर दाटत असत आणि ते लोकं गेल्यावर रामजी बाबासाहेबांना सत्यता विचारत. तेव्हा ते सत्य ऐकल्यावर रामजी बाबासाहेबांना प्रोत्साहन देत. त्यांना परिस्थिती समजावून सांगत व हेही सांगत की परिस्थितीशी तुला बरच झगडावं लागेल. हा विटाळ समुळ नष्ट करावा लागेल. त्यासाठी तुला बरंच शिकावं लागेल. 
         वडीलांचं प्रोत्साहन मिळताच बाबासाहेबांना नवीन उर्जा मिळत असे व ते नव्या जोमानं पुन्हा कामाला लागत असत. त्यातच पुन्हा विटाळावरुन बालसवंगड्यात जुंपायची व पुन्हा पुन्हा तक्रारी रामजीकडे जायच्या व रामजी लोकांसमोर बाबासाहेबांना दाटत असत व लोकं गेले की रामजी बाबासाहेबांना पुन्हा प्रोत्साहन देत. ही कृती वारंवार घडत असे. त्यातच तो स्पृश्य समाज पुर्वीसारखा बाबासाहेबांना स्वतःही दंड देवूही शकत नव्हता. त्याचं कारण होतं बाबासाहेबांचा खोडकर स्वभाव. लहानपणी बाबासाहेब हे जास्त खोडकर होते. ते मोठेपणी बरेच शांत झाले होते. 
          बाबासाहेबांच्या खोडकर कृती वाढत चालल्या होत्या. त्यातच त्यांच्या कित्येक तक्रारी रामजींना केल्या तरी त्यांच्यात सुधारणा झाली नव्हती. ते पाहून त्याच तक्रारी त्या लोकांनी इंग्रज अधिकाऱ्यांकडे केल्या व लागलीच रामजी व बाबासाहेबांना त्यांच्याकडे हजर व्हावं लागलं. मग कारण विचारण्यात आलं. कारणात इंग्रज अधिकाऱ्यानं दोन्ही बाजूंचं ऐकलं. तसं पाहिल्यास लहानपणापासूनच बाबासाहेब हे हुशारच होते. त्यांनी अशा सफाईनं व अक्कलहुशारीनं भेदभावाची गोष्ट लहानपणीच इंग्रज अधिकाऱ्याला पटवून दिली की त्यांनी त्याचवेळेस बाबासाहेबांना क्लीनचीट दिली व पुन्हा बाबासाहेबांना प्रोत्साहन मिळालं. मग काय, बाबासाहेबांनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. 
          रामजी हे बाबासाहेबांचे वडील. त्यांनी बाबासाहेबांची चाणाक्ष बुद्धी ओळखली व त्या बुद्धीला जे जे लागेल, ते सर्व खावू घातलं. त्याचा परिणाम हा झाला की पुढील काळात बाबासाहेब असे धीट बनले की त्यांनी संपुर्ण अस्पृश्य समाजाला विटाळाच्या जोखडातून बंधमुक्त केलं. समाज विटाळाच्या विळख्यातून बंधमुक्त होणं ही बाबासाहेबांची तर कृपा आहेच. शिवाय ती रामजीचीही तेवढीच कृपा आहे. त्यातच इंग्रजांचीही कृपा आहे. कारण बाबासाहेबांनी केलेले विटाळाविरुद्धचे आंदोलन व त्यात जे जे खटले बाबासाहेबांना लढावे लागले, त्या सर्व खटल्यात बाबासाहेबांनाच विजय मिळाला. ज्यात चवदार तळ्याच्या खटल्याचाही समावेश आहे. मात्र ती कूस लढत असतांना त्यांचं परिवाराकडं दुर्लक्ष झालं आणि ते होणारही होतं. परंतु त्याची त्यांनी व परिवारानंही तमा बाळगली नाही. खुद्द चवदार तळ्याचा खटला सुरु असतांना रमाई आजारी असायची. त्यावेळेस कोर्टाची तारीखही असायची. चवदार तळ्याच्या तारखेवर हजर होण्याकरिता त्यांना नाशिकवरुन मुंबईला जावे लागायचे. त्या जाण्यायेण्याला पैसे लागत. समजा बाबासाहेब नसते गेले तर चवदार तळ्याचा खटला ते हारले असते व अस्पृश्यांसाठी कधीच पिण्याचं पाणी खुलं झालं नसतं. मात्र बाबासाहेबांनी तीच बाब हेरली व आपल्या पत्नीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसे खर्च न करता तो पैसा खटल्याला लावला. ज्यातून खटला जिंकता आला. परंतु दुर्दैवं असं की ज्यातून रमाईचं आजारपण वाढत गेलं व रमाई मरण पावली. बाबासाहेबांनी आपले भेदभावाचे मिशन पार पाडण्यासाठी आपले स्वतःचे पुत्रही गमावलेत. कारण आजारपणाला जो पैसा लागायचा. तो त्यांच्याजवळ नसायचाच. तो खटल्यात वा मिशनमध्ये खर्च होत असे. त्यातूनच मुलं वा पत्नीच्या आजारपणाला पैसा लावता येत नसे. उलट बाबासाहेब हे महान कार्य करीत आहेत, हे लक्षात आल्यानं त्यांची पत्नी रमाई आपलं आजारपण न पाहता आपल्याजवळील पैसा बाबासाहेबांना देत असे व माझं आजारपण हे माझ्या स्वतःपुरतं आहे. आपण जे कार्य करीत आहात, ते लोकांसाठी आहे, असा विचार करुन रमाई बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून बाबासाहेबांबरोबर उभी राहिली व त्या दोघांनीही समाजातील विटाळ एकमेकांच्या सल्ल्यानं दूर केला. पुढं रमाई मरण पावताच बाबासाहेब एकाकी झाले, त्यांचं मन हे जगण्यात रमेनासं झालं. रामजीनंतर रमाई ही एकच आस होती बाबासाहेबांना जगण्यासाठी. त्यानंतर बाबासाहेब सतत आजारी असायचे. त्यांना रमाईचं कमीत्व खलायचं परंतु त्या कमीत्वाला दूर केलं, सविता माईनं. तिनंही बाबासाहेबांना बरीच मदत केलेली होती. ती जरी जातीनं ब्राह्मण असली तरी भेदभाव दूर झालाच पाहिजे असं तिलाही वाटत होतं. म्हणूनच अखेरच्या समयी संविधान बनत असतांना सवितानंच बाबासाहेबांना मदत केली. तिनं त्याच काळात त्यांचं आरोग्य सांभाळलं. म्हणूनच सर्वसक्षम असं संविधान बाबासाहेबांना बनवता आलं. 
          आज बाबासाहेब जगात नाहीत. त्यांचं महापरीनिर्वाण झालं आहे. त्यांनी केलेलं कार्य जगात आहे व तो आपण आठवतोही. परंतु असं जरी असलं तरी त्यांनी त्या कार्यासाठी केलेला त्याग. त्यांनी भोगलेल्या यातना, त्यातच त्यांच्या पत्नींनी भोगलेल्या यातना, मुलांनी भोगलेल्या यातना, शिवाय रामजींनी भोगलेल्या यातना आज कुणालाही आठवत नाहीत. बाबासाहेबांची मुलं आजारी असायची. परंतु दवाखान्यात पैसे लागताच म्हणून आपलं आजारपण दाखवायची नाहीत तर समजदारीपणच दाखवायची. तसेच रामजीही बाबासाहेबांना लागणाऱ्या पुस्तकाची गरज भागवत असतांना त्या पुस्तकाला पैसे लागत व ते त्यावर खर्चही करीत असत. त्यावेळेस पैसे खर्च झाल्यानं रामजीच्या घरी उपासाचे फटके पडत असत. ज्यात बाबासाहेबांची अक्का, भाऊ, यांनाही उपाशी राहावं लागत असे. तसेच त्यांच्या या कार्यात काही अशीही माणसं होती की ज्यांनी बाबासाहेबांच्या कार्यात स्वतः हालअपेष्टा भोगत सक्रीय सहभाग घेतला. 
           आज आपण पाहतो की समाज हा आपली पत्नी, आपली मुलं यात गुरफटलेला आहे. त्यांना समाज दिसत नाही व समाजावर होत असलेला अन्यायही दिसत नाही. कुठे एखाद्यावेळेस भांडण होत असल्यास व त्या ठिकाणी भांडणं करणारी मंडळी ओळखीची असल्यास वा एखाद्यावर अन्याय होत असल्यास आपण मदतीला धावून जात नाही. त्याचं कारण म्हणजे माणसं विचार करीत असतात की हे झेंगट विनाकारण आपल्या मागं लागेल. काश! बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करतांना हाच विचार केला असता तर कदाचीत आज अस्पृश्यांना स्पृश्यांच्या बरोबरीनं बसताच आलं नसतं. जे काही आज दिसत आहे, ते बाबासाहेब व त्यांचा परिवार आणि त्यांचे त्याकाळचे काही निवडक मित्रमंडळी यांच्याचमुळं दिसत आहे. त्यांनी केलेला त्याग हा अतिमोलाचा आहे. 
         आज बाबासाहेबांचा महापरीनिर्वाण दिवस आहे. लोकं बाबासाहेबांचा महापरीनिर्वाण दिन साजरा करणार आहेत. करीत आहेत व ती त्यांना श्रद्धांजलीही आहे. परंतु हा त्यांचाच महापरीनिर्वाण दिन असला तरी ही केवळ त्यांनाच श्रद्धांजली नाही तर ती त्यांनाही श्रद्धांजली आहे, ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या भेदभाव व विटाळ दूर करण्याच्या कार्यात मदत केलेली आहे. मग तो त्यांचा परिवार असो वा त्यांचा मित्रमंडळ. शिवाय याप्रसंगी आपण बाबासाहेब व त्यांच्या परिवारानं तसेच त्यांच्या मित्रांनी जेही काही भोगलं, ते जर आपण उदार मनानं आठवत असाल आणि त्यानुसार वागत असाल तरच त्यांच्या कार्याचं सार्थक होईल. तीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजलीही ठरेल. अन् तसं जर आपल्यानं होत नसेल तर त्यांनी व त्यांचा परिवार व मित्रपक्ष यांनी केलेला त्याग, त्या भोगलेल्या यातना. त्या सर्व व्यर्थ गेल्यासारखं होईल यात शंका नाही.

          अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०