वेदूची आत्मनिर्भरता
भाजीपाला रस्त्यावर पडला होता.काही भाजीपाला सडत होता.तर काही जनावरांसमोर टाकला होता.जनावरंही त्या भाजीपाल्याला तोंड लावत नव्हतं.पण काय करणार?शेतक-यांजवळ उपाय नव्हता.प्रति किलोला दोन रुपये तीन रुपये एवढाच भाव भेटत होता.त्यामुळे शेतक-यांचे वाभाडे निघत होते.
टमाटरचीही हालत गंभीरच होती.टमाटरही रस्त्यावर फेकले होते.कारण टमाटरची अख्खी डाग दोन रुपये चार रुपये किलो होती.बाजारपेठेत नेण्याचाही पैसा निघत नव्हता.
आज शेतक-यांच्या शेतात एवढं पिकलं होतं की त्यांच्या मालाला भाव नव्हता.साधं जनावरंही या मालाला हुंगत नव्हतं.मग लोकं कसे काय घेणार? शेतक-यांसमोर विचार होता.
वेदू हा मालाची ही खस्ता हालत पाहणारा शेतक-यांचा मुलगा होता.तोही आपल्या उघड्या डोळ्याने हे सगळं पाहात होता.त्यालाही पश्चात्ताप होतच होता.तसा तोही विचार करीत होता की दरवर्षी अवर्षणात शेतक-यांना पिकत नाही तरी पिकांना पाहिजे तेवढा भाव राहात नाही.यावर्षी पिकलं तरी शेतमालाला पाहिजे तेवढा भाव नाही.
वेदू बाजारात जात असे.तो बाजारात मालाकडे लक्ष देत असे.साधा बटाटा त्याला कमी भावाचा दिसत असे.तर त्यापासून बनवलेले चिप्स मात्र कितीतरी पटीनं जास्त महाग. तसा विचार करता करता एक गोष्ट त्याच्या मनात चमकून गेली.जर ह्या मालापासून काही बनवता आलं तर......
तो विचार करु लागला.काय बनवायचं,कसं बनवायचं?त्याला काही सुचत नव्हतं.पण विचारांती त्याला एक कल्पना सुचली.जर हा माल वाळवून ठेवला तर......तर अवर्षणात कामी येवू शकेल.
तसे ते हिवाळ्याचे दिवस होते.माल तोडायलाही पैसा लागत होता.तसा बाजारात नेण्यालाही पैसा लागायचा.पण वेदूच्या मतानुसार त्याने आपल्या वडीलांना शेतीचा माल तोडायला तर लावलाच.पण तो बाजारात नेण्यात वा फेकण्यात वेळ दवडण्यापेक्षा त्या मालाला छोट्या छोट्या भागात कापून वाळवू लागला.पुढे पुर्ण माल वाळल्यावर त्या वाळलेल्या मालाला प्लास्टिक पिशवीत पैक करु लागला.तसे पैकींग पॉकेट तो शहरातल्या लोकांना विकू लागला.तसे काही लोकं तो माल खरेदी करु लागले.
विकायला गेलं तर मातीही विकली जाते.या विचाराचा वेदू, त्याला मात्र आता या नवीन प्रयोगाचा आनंद होता.यावर्षी त्याने आपल्याच शेतीत प्रयोग केला होता.माल सडण्यापेक्षा तोच माल त्याने त्यावर प्रक्रिया करुन तोच माल त्याने बाजारपेठेत विकला.तोही चांगले दाम मिळवून.
दरवर्षी शेतक-यांच्या जीवनात हिवाळा यायचा.हिवाळ्यात टमाटर एवढे पिकायचे की शेतक-यांना ते फेकावे लागत वा जनावरांना टाकावे लागत असे.नव्हे तर माल स्वस्त झाला म्हणून शेतात सडविण्यापेक्षा तो माल पिक चांगलं असूनही मोड करावी लागत असे.अर्थात वखरुन टाकावा लागत असे.आज मात्र तो माल वेदू शेतक-यांकडून विकत घेवू लागला.त्यावर तो प्रक्रिया करु लागला.असं दरवर्षी करता करता आज त्याने कारखाना उभा केला होता.एक उद्योजक म्हणून तो पुढे येत होता.
वेदूने ठरवले होते की शेतक-यांना आत्महत्येपासून वाचवावे.तसेच त्यांना आत्मनिर्भर करावे.त्या जिल्ह्यात अवर्षणात खुप बळी जायचे.हिवाळ्यात थोडं अन्न मिळायचं.पाणीही मिळायचं.पण उन्हाळा मात्र उष्मांक गाठत होता.हाच उन्हाळा त्याचा माल चांगला वाळविण्यासाठी उपयोगाचा होता.माल जर चांगला वाळला असला तर तो जास्त टिकतो असे तो मानत असे.त्यामुळं कच्चा माल बाजारात विकण्यापेक्षा परीपक्व माल शेतक-याने विकावा यासाठी तो शेतक-यांना प्रेरीत करीत होता.
वेदूच्या उद्योगप्रक्रीयेत आंब्याच्या खुला,वांग्याच्या खुला,वाळलेली टमाटर,वाळलेल्या मिरच्या,दहीमिरच्या जे सहजपणे शेतक-यांना जास्त मेहनत न करता बनवता येते.त्याच वस्तू होत्या.त्याची ही अन्न टिकविण्याची पद्धती गावोगावी माहीत होत होती.दुरदूरुन लोकं त्याच्या या अन्न टिकावू उपक्रमाला भेट देत व ते पाहून त्यांचीही तसं करण्याची उमेद जागत असे.तसं मार्गदर्शन देखील वेदू आज शेतक-यांना करीत असे.थोड्याच दिवसात त्याने सौर उर्जेवर अन्न सुकविणारे यंत्र तयार केले.तो काचाद्वारे सुर्याचा प्रकाश अन्नावर पाडत असे.सुकलेल्या जिनसांना मसाले लावून वा त्यांचे लोणचे बनवून ते बाजारात विकत असे.आज त्याला त्याचा माल विकायला बाजारात जावं लागत नसे.तर त्याचा माल घ्यायला व्यापारीच त्यांच्या शेतावर येत असे.अशाप्रकारे तो आत्मनिर्भर झाला होता व त्याने असे आत्मनिर्भर आपल्यासारख्या कित्येक मित्रांनाही केले होते.आज त्याला आनंद होत होता.त्याचबरोबर त्याच्यासारख्या मित्रांनाही त्याने आत्मनिर्भर केले होते.
अंकुश शिंगाडे
९९२३७४७४९२