अस्तित्व Ankush Shingade द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अस्तित्व

अस्तित्व        ती अस्तित्व होती त्याचं.हवी तर त्याची मसीहा ही.लहानपणापासून ती फार कष्ट करीत होती.पण खरं सुख तिच्या जीवनात अजून आलं नव्हतं.       असाच तिचा पती मरुन गेला.चौदावीही आनंदात पार पडली.आता मात्र तिच्यासमोर मोठा विचार येत होता की कसे आपले पोट भरावे?      तिला तीन मुली होत्या.त्या आपआपल्या घरी सुखी होत्या.मात्र जो एक मुलगा होता.त्याला मात्र कोणताच आधार नव्हता.त्यामुळे तिला त्याचाही विचार असायचा की त्याला जगवावे कसे?तसा तो शहरात उच्च शिक्षण घेत होता.त्यामुळे आपलं पोट व आपल्या लेकराचं पोट एवढंच तिचं उद्दीष्ट्य होतं.        मुलगाही वयात आला होता.त्यालाही आपल्या आईची काळजी वाटत होती.पण त्याला शिक्षण घ्यायचे होते.उच्च शिक्षण हे त्याचं ध्येय होतं.पण आईलाही सांभाळणे हेही तो आपले कर्तव्य समजत होता.आई जे काम करायची.लोकांच्या शेतीत राबराब राबायची.ते पाहुन त्याला दया यायची.त्याला वाटत होते की त्याच्या आईला त्याच्या बहिणीने सांभाळावे.तसा तो बहिणींना बोलूनही गेला होता.पण....      बहिणीने नकार दिला होता.बहिणीने नकार दिल्याने ती काबाडकष्ट करीत आपले पोट भागवित असतांना बरेचसे उतार चढाव झेलत होती.ती रोजमजुरीला शेतात जात होती.तिचं वय झाल्याने व काम बरोबर जमत नसल्याने मजुरीच्या बायाही तिला सोबत न्यायला नकार देत.मालकही ती का आली म्हणुन तिला टार्चर करीत.तरीही ती जबरदस्तीनं शेतावर गेली असल्यानं नाईलाजानं व मालकाला दया येत असल्यानं तिला लोकं कामाला लावीत.काही पैसेही पचवीत होते.       मुलगा शहरात शिक्षण घेत घेत कामही करीत होता.त्याचीही अस्तित्वाची लढाई त्याच गावी सुरु होती.परमानंट नोकरी होईल या आशेने तो अगदी फुकटामध्ये नोकरी करीत होता.कधी रात्रीला फुटपाथवर झोपत होता.तर कधी बहिणीकडे तर कधी गावाकडे सायकलनं जात होता..बदल्यात तो आईने शेतावरुन आणलेला माल,टमाटर,मिरची,वांगे इत्यादी पदार्थ बहिणीला द्यायचा.        गावचं घरंही पडत चाललं होतं.मातीच्या भींतींना पाणी लागून त्या पाऊस येत असतांना अगदी नजरेसमोर पडायच्या.त्यातुन डोळ्यादेखत साप,विंचूसारखे विषारी वन्यजीव निघायचे.ते घराच्याच आतमध्ये साचलेल्या पाण्यात जलक्रीडा करायचे.नव्हे तर पावसाच्या पाण्यानं अंथरुण ओलं व्हायचं.पण तेही ओलं अंथरुण थंडीने कुडकुडत असलेली आई अंगावर लपेटून घ्यायची व कुडकुडतच झोपी जायची.दिवसभराच्या थकव्याने अंथरुण ओलं असलं तरी झोप केव्हा लागायची ते कळायचंच नाही.शिवाय केव्हा ह्या भींती भुईसपाट होवून केव्हा पडतील व केव्हा आई दबून मरेल याचा नेम नव्हता.      मुलाला दया यायची.पण तो तरी काय करणार.त्याची कमाईच नसल्यानं तो हतबल होता.तो बहिणीला सारखा विनवणी करीत होता की आईला पुष्कळ त्रास आहे.तो आपलं पोट पाहून घेईल.बहिणीने आईला पोसावे.पण बहिणी ऐकणार तेव्हा ना.         मुलाला शाळेत नोकरी लागली होती.पण तो खाजगी श्रेत्रात असल्याने व वेतन अल्प असल्याने तो आपली उपजीवीकाही बरोबर चालवू शकत नव्हता.तरीही त्याने आपल्या आईला शहरात आपल्याजवळ आणलं होतं.तो स्वतःच्या हातानं स्वयंपाक करीत होता.त्यात सवय नसल्यानं पोळ्याही कच्च्या राहायच्या.पण आई तेही पदार्थ गोड समजून खायची.किळस करायची नाही.शिवाय त्याला साथ द्यायची.यातच कालांतरानं त्याचा विवाह झाला.       पगारवाढ झाली होती.आता तो बायकोही पोसू शकत होता.शिवाय कदाचित पत्नी आल्यावर आपल्या आईला चार घास सुखाचे मिळतील या उद्देशाने त्याने विवाह केला होता.पण नियतीला आणि त्याच्या पत्नीला त्याच्या व तिच्या खस्तांची जाणीव नव्हती.पत्नी दिड महिण्यातच नखरे दाखवायला लागली.ती त्याला म्हणत असायची की त्याच्या आईला त्याने वृद्धाश्रमात किंवा बहिणीच्या घरी ठेवावे.एकतर आईलाच ठेवावे नाहीतर मला.मुलाला आता पदोपदी विचार यायचा की ज्या आईनं आपल्याला जन्म दिला,ज्या आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि ज्या आईनं आपल्याला शिकवून मास्तर बनवलं.त्याच आईला वृद्धाश्रमात!बहिण तर पोसायलाच तयार नव्हती.विचाराअंती त्यानं ठरवलं.बायको सोडून गेली तरी चालेल.पण आईला सोडायचे नाही.       काही दिवसानं पत्नी सोडून गेली होती.आई अजुनही जवळच होती.पुन्हा कामं करतांना नाकीनव यायचं.म्हणून त्याने दुसरा विवाहही केला होता. त्यातच त्याला पुन्हा विचार यायचा की माझा दुसरा विवाह.......मला पुढे मुलं बाळ झाले तर कदाचित माझे लक्ष मुलाबाळात गोवेल.आईकडे राहणार नाही.मग आईला राग येईल.माझं आईच्या सेवेकडे दुर्लक्ष होईल.म्हणुन त्याने एक एकर शेती आईच्या नावानं करुन दिली होती.कदाचित इस्टेटीच्या लोभानं तरी आपण आईची सेवा करु शकू हा त्याचा उद्देश होता.       लोभ कोणाला राहात नाही.आईच्या शेतीबद्दलही तसंच घडलं.आतापर्यंत झोपलेल्या बहिणी आईला चाहायला लागल्या.आम्हाला हिस्सा दे म्हणायला लागल्या.आईला थुलकवू लागल्या.आईही जाळ्यात फसत जावू लागली.त्यातच आता पोरा सुनेचा राग करायला लागली.पोरी तिला प्रिय व्हायला लागल्या.तिच्यात अगतिक बदल घडायला लागला.      कधीही आईवर हात न उचललेल्या मुलाला मुलीही बदनाम करायला लागल्या.त्याची पत्नी मारते....तोही मारतो.शिळ्या पोळ्या खायला देतो.इत्यादी आरोप व्हायला लागले.सारं अस्तित्व संपायला लागलं.आईचं आणि त्याचंही.त्यातच एक दिवस आईला गाजरचा हलवा खायच्या निमित्यानं पोरींनी आईला नेलं.एक एकर नावावर करुन घेतली.आईचे परत हाल सुरु झाले.पण आता मुलाने पुर्ण दुर्लक्ष केलं होतं.ज्या आईवर त्याने मनापासून प्रेम केलं होतं.ज्या आईसाठी त्याने आपली पत्नी सोडली होती.ज्या आईच्या नावावर एक एकर शेती करुन दिली होती.तिच आई अंतिम समयी शेत नावावर होताच मुलाचा विचार न करता त्याला सोडून गेली होती.तिनं जुन्या दिवसाचा विचार केला नव्हता.पडक्या भींती,रोजंदारीचे काम,नकार असतांनाही कामाला बायांच्या मागे लागून जाणे,पैसे व्यवस्थीत न मिळणे,बहिणींना आईला पोसा म्हटल्यावरही बहिणींचे आईला न पोसणे.या सा-याच गोष्टी आई विसरली होती.पण तिला तरी म्हातारपणात काय कळेल?म्हातारपणात आपला मेंदू तल्लख नसतो.तेच आईच्या बाबतीत झालं.       महत्वाचं म्हणजे आज म्हाता-या माणसांची सेवा करणं हा अभिशापच वाटतो माणसाला.अलिकडचा जमाना स्वार्थी आहे.या काळात सुनेला सासूसासरे सहनच होत नाही.मुलगाही तिच्यासमोर बैलासारखा वागतो.आईनं आपल्यासाठी काय केलं हे विसरुन तिच्या म्हणण्यानुसार तिला वृद्धाश्रमात टाकतो.ज्या वृद्धाश्रमात नातवंड दिसत नाहीत.ना मुलाचे प्रेम.अगदी जीव कासावीस होतो.म्हातारपण जगतांना.पण काय करणार.मरण येईपर्यंत जगावंच लागत असतं.         तो देश महान होता की ज्या देशात ती जन्माला आली होती.ती जेव्हा मुलीकडे राहायला गेली.तेव्हा तिनं हाय खाल्ली होती.कारण मुलीनं तिच्या नावावरचं शेत आपल्या नावावर मरणाआधी करुन टाकलं होतं.       आज ती हयात नव्हती.पण तिचं अस्तित्व पावलोपावली जाणवत होतं.वृद्धाश्रम ही गोष्ट त्याला थोतांड वाटत होती.मुलगी असो की मुलगा,त्याने इस्टेटीचा लोभ न करता मायबापाची सेवा करावी असं त्याला वाटत होतं.ते अस्तित्व संपलं असलं तरी ज्या महान देशात तिचा जन्म झाला होता.त्या महान देशातील ती महिला अभागी ठरली असली तरी वृद्धावस्था हे तत्व तिच्याहीसाठी अभिशाप ठरलं होतं.ती महान होती नव्हे तर ज्या देशात अशी मंडळी जन्मतात,तो देशही महान असतो असं त्याला वाटत होतं.         मित्रांनो,वृद्धावस्था जरी अभिशाप असला तरी ही वृद्धावस्था तुम्हालाही येणारच असते.याचा थोडा विचार करा.म्हातारे आईबाप हे आपलेच एक अंग असतात.त्यांची सेवा करा निस्वार्थपणे.त्यांना अंतर देवू नका.त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका.वृद्धाश्रम त्यांच्यासाठी नाही.ज्यांना काहीच संतती नाही.त्यांना जगू द्या वृद्धाश्रमात.......पण ज्यांना खरंच संतती आहे.त्यांना मात्र घरीच ठेवा.नातवंडाचं सुख पाहू द्या.त्यांचं अस्तित्व जगवा.कारण त्याची सेवा केल्यानेच तुमचा देशही महान बनणार आहे.       अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०©®©